Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे
महाराष्ट्रात सगळेच सध्या मान्सूनच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहातायत. मान्सून आज थोडा पुढे सरकला आहे, पण राज्यात त्यानं आगेकूच केलेली नाही. परिणामी अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळतंय.
सध्या हवामानाची स्थिती काय आहे? कधीपर्यंत मान्सून सक्रिय होईल आणि सध्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय इशारे दिले आहेत, जाणून घेऊयात.
नैऋत्य मान्सूननं आज 15 जून रोजी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल पूर्णपणे व्यापलं असून तेलंगाना, ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्येही आगेकूच केली आहे. महाराष्ट्रात मात्र तो हर्णे आणि सोलापूरच्या पुढे सरकलेला नाही.
पुढच्या चार पाच दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी आगेकूच करू शकतो. पण सध्या राज्यात मान्सूनचे वारे मंदावलेले दिसत आहेत. पश्चिमेकडून येणारे वारेही म्हणावं तसं बाष्प घेऊन येत नाहीयेत.
पुढच्या 2-3 दिवसांतही परिस्थितीत बदलाची शक्यता नाही
15 जूनला दुपारी सॅटेलाईटनं टिपलेलं दृश्य पाहिलं तर त्यातही महाराष्ट्रावर मान्सूनचे दाट ढग जमा झालेले दिसत नाहीत. राज्यात बहुतांश ठिकाणी विरळ ढग आहेत तर विदर्भात काही ठिकाणी थंडरस्टॉर्म्स दिसतायत. हे स्थानिक पातळीवर तयार झालेले ढग आहेत.
पुढच्या दोन तीन दिवसांतही या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. कोकणात तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह थोडाफार पाऊस पडू शकतो.
विदर्भात तुरळक ठिकाणी दोन तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
फोटो स्रोत, RMC Mumbai/X
विशेषतः पूर्व विदर्भात तापमान 40 ते 42 अंश सेल्सियपर्यंत जाऊ शकतं. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमान 38 ते 40 अंशांच्या आसपास राहील. कोकणात तापमानात घट झाली असली तरी दमट हवामान असल्यानं उष्णतेचा त्रास जाणवेल.
याच परिसरात रात्रीच्या किमान तापमानात मात्र फारशी घट होताना दिसत नाहीये. विदर्भासह कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवायला मिळू शकते.
जिल्हानिहाय कुठे किती पाऊस?
15 जूनच्या रात्रीसाठी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना इथे उष्ण रात्रीसाठी यलो अलर्ट आहे.
तर विदर्भात वर्धा आणि यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे. 15 जूनलाच पुणे, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, अमरावती, नागपूर, बुलढाणा आणि चंद्रपूरमध्ये थंडरस्टॉर्म म्हणजे विजा आणि गडगडाटासह हलक्या पावसासाठी यलो अलर्ट आहे.
फोटो स्रोत, Getty Images
16 जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई तसंच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर इथे उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट आहे.
अकोला, अमरवाती, वर्धा आणि यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे. तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, जालना, संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या पावसासाठी यलो अलर्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







