Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 3 मिनिटे
ढग येतायंत, पण पाऊस कुठे गेला? जूनचा अर्धा महिना होऊन गेला, तरी महाराष्ट्रात मान्सून म्हणावा तसा बरसलेला नाही.
पुढच्या आठवड्यापर्यंत पावसात वाढ होण्याची शक्यता नसल्याचंच भारतीय हवामान विभाग आणि इतर हवामान संस्थांच्या अंदाजांवरून स्पष्ट होतं.
खरंतर आठ जूनला मान्सून दक्षिण कोकणात आणि लगतच्या भागांत दाखल झाला होता. मग तो पुढे का सरकत नाहीये? जाणून घेऊयात.
महाराष्ट्र हे राज्य मान्सून कोअर झोनमध्ये येतं. म्हणजे असा प्रदेश, जो प्रामुख्यानं नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे आणि या वाऱ्यांमधला थोडासाही बदल इथे मोठा परिणाम घडवून आणू शकतो. मान्सूनचा सर्वाधिक पाऊसही याच परिसरात पडतो.
त्यामुळे या प्रदेशात मान्सून सक्रिय नसतो, तेव्हा त्याला मान्सूनमधली ब्रेक फेज किंवा मान्सूनला खीळ बसली असं म्हटलं जातं. यंदा मान्सून कोर झोनमध्ये बहुतांश ठिकाणी अजून पाऊस सक्रीय झालेलाच नाही. यामागची कारणं काय आहेत?
1. चक्रीवादळं आणि कमी दाबाच्या पट्ट्यांचा अभाव
एरवी मान्सूनपूर्व काळात, एप्रिल ते मे दरम्यान प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं येतात, तसंच मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाही कमी दाबाचे पट्टे तयार होतात. त्यामुळे मान्सूनला वर सरकताना गती मिळते. मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरातल्या या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पावसातही वाढ होताना दिसते.
यंदा मात्र मान्सूनपूर्व कालावधीत इथे एकही चक्रीवादळ किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं नाही.
2. जेट स्ट्रीम आणि उत्तरेतले कोरडे वारे
जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह, जे पृथ्वीभोवती ध्रुवीय आणि समशीतोष्ण प्रदेशात फिरत असतात. उन्हाळ्यात तिबेटचं पठार तापतं, तेव्हा उत्तर गोलार्धातला जेट स्ट्रीम थोडा उत्तरेला सरकतो.
त्यामुळे तयार झालेल्या पोकळीत दक्षिणेकडून येणारे वारे पुढे सरकतात, त्यातून मान्सूनला गती मिळते. यावेळी हा जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा थोडा दक्षिणेकडून वाहात राहिल्यानं मान्सूनच्या वाटचालीला अडथळा आल्याचं मत काही तज्ज्ञांनी मांडलं आहे.
फोटो स्रोत, IMD
उत्तर भारतात यंदा वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या वादळांचा प्रभाव अजूनही पाहायला मिळतो आहे. तसंच अफगाणिस्तानकडून कोरडे वारे भारताच्या मैदानी प्रदेशाकडे वाहतायत. या कोरड्या वाऱ्यांमुळेही मान्सूनला पुढे सरकताना अडथळा येत असल्याचं युकेच्या रेडिंग विद्यापीठाचे वरिष्ठ हवामान तज्ज्ञ अक्षय देवरस सांगतात.
या कोरड्या हवेच्या स्थितीमध्ये बदल घडून मोठा पाऊस पडेपर्यंत जूनचा अखेरचा आठवडा उजाडू शकतो, असा अंदाज वेगवेगळ्या हवामान संस्थांनी वर्तवला आहे.
फोटो स्रोत, NOAA
3. मॅडन जुलियन ऑसिलेशन
विषुववृत्तालगतच्या भागात वारा आणि हवेचा दाब यांत चढउतार होत असतात. साधारण 30 ते 60 दिवसांच्या काळात हे चढउतार विषुववृत्तीय भागात पूर्वेकडे सरकत राहतात. त्यालाच मॅडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO म्हणतात.
MJO हिंदी महासागरात किंवा इंडोनेशियाकडे असतं, तेव्हा भारतात मान्सूनच्या पावसात वाढ होते. याच्या विपरीत, मॅडन जुलियन ऑसिलेशन पॅसिफिक महासागरात असतं, तेव्हा मान्सून थोडा क्षीण होतो.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच MJO पॅसिफिक महासागरात आहे. जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहू शकते.
फोटो स्रोत, Getty Images
4. एल निनोचा प्रभाव, IOD चा अभाव
एल निनो हा पॅसिफिक महासागरातला प्रवाह आणि इंडियन ओशन डायपोल म्हणजे IOD ही हिंदी महासागरातली स्थिती या दोन्हींचा मान्सूनच्या पावसावर परिणाम होतो.
एल निनोचा प्रभाव जगभरातील वारे आणि हवेच्या दबावावर होताना दिसतो. त्यामुळे साधारणपणे एल निनोच्या काळात भारतात तुलनेनं कमी पाऊस पडतो. तर IOD सकारात्मक स्थितीत असल्यास तो एल निनोचा प्रभाव कमी करू शकतो. या दोन्ही संज्ञांविषयीचे सोपी गोष्टचे व्हिडियो जरूर पाहा.
यंदा काय होतंय, तर एल निनो अगदी वेगानं तयार झाला आहे. तोही मान्सूनच्या सुरुवातीलाच. त्याचवेळी IOD न्यूट्रल स्थितीत आहे, तो इतक्यात सकारात्मक होण्याची चिन्हं नाहीत.
थोडक्यात, महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्यासाठी थोडा आणखी वेळ लागू शकतो आणि त्यानंतरही पुरेसा पाऊस पडेलच याची शाश्वती नाही. तसंच जोरदार पाऊस पडला तरी तो सगळीकडे पडेलच असंही नाही.
सध्या तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याची सध्याची परिस्थिती पाहता, मान्सूनच्या वाटचालीकडे सगळेच डोळे लावून बसले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




