Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याचं औषध वाटणाऱ्याला अटक; आरोपीकडून 14,900 कॅप्सूल्स जप्त

मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याचं औषध वाटणाऱ्याला अटक; आरोपीकडून 14,900 कॅप्सूल्स जप्त

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मोहरमच्या मिरवणूकीत उंदीर मारण्याचं औषध वाटणाऱ्याला अटक

मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान उंदीर मारण्याचं विष असलेल्या कॅप्सूल्स वाटणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

गर्दीत या कॅप्सूल्स वाटणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने भायखळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

संशयित व्यक्तीनं या गोळ्या वेदनाशामक असल्याचा दावा केला असला तरी या गोळीचं सेवन केलेल्या एका व्यक्तीला उलट्या आणि अस्वस्थतेसारखे त्रास झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

फैयाज निसार प्रेमजी असं या आरोपीचं नाव आहे. तो 39 वर्षांचा असून पुण्यातील विमान नगरचा रहिवासी आहे.

त्याच्यावर बीएनएसच्या (BNS) कलम 109, 110 आणि 123 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मोहरमच्या मिरवणूकीत उंदीर मारण्याचं औषध वाटणाऱ्याला अटक

मुंबईचे झोन-1 चे पोलिस उपायुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालच्या (27 जून) मिरवणुकीदरम्यान, गोळ्यांचे वाटप करत असताना भायखळा पोलिसांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. संबंधित व्यक्तीने त्या गोळ्या वेदनाशामक असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यातील एक गोळी सेवन केलेल्या व्यक्तीला उलट्या आणि अस्वस्थतेसारखे त्रासदायक परिणाम जाणवल्याचे समजते.

पोलिसांनी त्वरित कारवाई केल्यामुळे या गोळ्यांचे पुढील वाटप रोखले गेलं, असंही त्यांनी सांगितलंय.

सध्या संबंधित व्यक्ती धोक्याबाहेर आहे. त्याच्या तक्रारीवरून भायखळा पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता, 2023’ च्या कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असंही पोलिसांनी सांगितलंय.

आरोपीकडून 14,900 कॅप्सूल्स जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून आतापर्यंत 14,900 कॅप्सूल जप्त करण्यात आले आहेत.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “पहाटे 4 च्या सुमारास, सलमान नावाच्या एका व्यक्तीला त्यातील एक कॅप्सूल खाल्ल्यानंतर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेचा तपास करून पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.”

मोहरमच्या मिरवणूकीत उंदीर मारण्याचं औषध वाटणाऱ्याला अटक

“मिरवणुकीला लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्याचा हा कट होता, अशी कबुली त्याने दिली आहे. त्याने 50 किलो झिंक फॉस्फाइड आणि 30 हजार रिकाम्या कॅप्सूल मिळवल्या होत्या आणि मुंबईत वास्तव्यास असताना गेल्या 15 दिवसांत त्या भरल्या होत्या. वेदनाशामक औषधे असल्याचे भासवून त्या वितरित करण्याचा त्याचा बेत होता,” असं मीना यांनी सांगितलं आहे.

“मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली. आतापर्यंत 14,900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून, उर्वरित कॅप्सूल आणि रसायनांबाबत तपास सुरू आहे.”

“पेंटचा व्यवसाय करणाऱ्या या आरोपीने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून रसायने मिळवली आणि कॅप्सूल ऑनलाइन मागवल्या होत्या. त्याच्या परदेश प्रवासाचे दुवे आणि मुंबईतील संभाव्य साथीदारांचाही तपास केला जात आहे,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

मोहरमच्या मिरवणूकीत उंदीर मारण्याचं औषध वाटणाऱ्याला अटक

या प्रकरणावर भाष्य करताना एआयएमआयएमचे (AIMIM) नेते वारिस पठाण म्हणाले की, “मी सुद्धा त्या मिरवणुकीत सहभागी होतो. माझ्यासोबतही तसं काहीतरी घडू शकलं असतं. कदाचित कुणीतरी माझ्याकडेही त्याच प्रकारे आले असते. पण मी अल्लाहचा आभारी आहे की, मला कोणीही तशी गोळी किंवा कॅप्सूल दिली नाही; मी काहीही घेतले नाही.”

पुढे ते म्हणाले की, “पण ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि मला याची निष्पक्ष चौकशी व्हावी असं वाटतं. अशी शक्यता आहे की, आमच्या बाबतीतही असेच काहीतरी घडवून आणण्याचा कट रचला गेला असावा. मी तिथे होतो आणि तुम्ही माझा व्हीडिओ नक्कीच पाहिला असेल. तो सर्वत्र व्हायरल होत आहे. मी तिथे होतो. आमचे सह-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) तिथे होते, संपूर्ण पोलीस दल तिथे होते आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व इतरही अनेकजण तिथे उपस्थित होते.”

झिंक फॉस्फाईड काय असतं?

झिंक फॉस्फाईड (Zinc Phosphide) हे एक अतिशय विषारी रासायनिक संयुग असून ते प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी(रोडंट) मारण्यासाठी वापरलं जातं. हा पदार्थ शेती आणि धान्य साठवणुकीत कीटकनाशक (Rodenticide) म्हणून वापरला जातो.

झिंक फॉस्फाईड हा झिंक (Zn) आणि फॉस्फरस (P) यांपासून बनलेला अजैविक पदार्थ आहे. त्याचा रासायनिक फॉर्म्युला Zn₃P₂ असा असून तो गडद करड्या किंवा काळसर रंगाच्या पूड किंवा कणांच्या स्वरूपात आढळतो.

ते पोटात गेल्यावर काय होतं?

तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाईड पोटातील आम्लाशी प्रतिक्रिया करतं आणि त्यातून फॉस्फिन नावाचा अत्यंत विषारी वायू तयार होतो. हा वायू शरीरातील पेशींना ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया थांबवतो. त्यामुळे हृदय, फुफ्फुसं आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

झिंक फॉस्फाईडचा वापर प्रामुख्याने :

  • शेतीत पिकांना नुकसान करणाऱ्या उंदीर, घुशी, खारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी
  • धान्य साठवण केंद्र, शेतजमीन, बागा आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा
  • बहुतेक वेळा हा पदार्थ धान्य किंवा खाद्यात मिसळून वापरला जातो.

झिंक फॉस्फाईड चुकून गिळल्यास किंवा फॉस्फिन वायू श्वासात गेल्यास प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे अनेक देशांत या रसायनाचा वापर कडक नियम आणि नियंत्रणाखाली केला जातो आणि तो सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध नसतो.

दरम्यान, मुंबईतच यापूर्वी मुंबईतीलच पायधुनी भागातील कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये झिंक फॉस्फाईडचा उल्लेख होता. त्यावेळी बीबीसी मराठीनं झिंक फॉस्फाईड म्हणजे काय, याबद्दल जाणून घेतलं होतं. तेही वाचकांच्या माहितीसाठी इथे देत आहोत :

डॉक्टर काय सांगतात?

झिंक फॉस्फाईडचा वापर कशात होतो? शरीराला ते कसं घातक असतं? यासंदर्भात मुंबईतील डॉ. भूषण रोकडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, “झिंक फॉस्फाईड हे एक अत्यंत विषारी रासायनिक रसायन (संयुग) आहे.

याचा वापर उंदीर, घुशी आणि इतर किडे मारण्यासाठी “रॅट पॉइझन” म्हणून केला जातो. हे साधारणपणे काळ्या किंवा राखाडी रंगाच्या पावडर स्वरूपात असतं. मात्र त्याचा वापर आणि स्वरूपानुसार काही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तो बाजारात आढळतो.”

याचा वापर कशात होतो, याबद्दल बोलताना डॉ. भूषण रोकडे म्हणाले की, “शेती करताना घुस लागू नये म्हणून उंदीर नियंत्रणासाठी, गोदामे, धान्य साठवण जागा येथे, कीटकनाशक किंवा उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो.”

“मानवी शरीराला आणि इतर पाळीव प्राण्यांना हे खूप हानिकारक आहे.”

उंदीरनाशक झिंक फॉस्फाईड

फोटो स्रोत, Getty Images

शरीराला ते कसं घातक असतं, यासंदर्भात बोलताना डॉ. रोकडे म्हणाले की, “हे रसायन शरीरात पोटात गेल्यानंतर किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर हे रसायन “फॉस्फीन गॅस” तयार करतं, जो अतिशय विषारी असतो.

हा वायू शरीरातील पेशींना ऑक्सिजन वापरण्यापासून रोखतो आणि अनेक अवयवांवर गंभीर परिणाम करतो.यामुळे उलट्या होणे, श्वासाला लसणासारखा वास येणे, छातीत घट्टपणा जाणवणे, धाप लागणे, शॉक बसणे. अगदी कमी प्रमाणातही हे प्राणघातक ठरू शकते.”

“यासाठी कोणतेही ठराविक प्रतिविष (अँटिडोट) उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करून केवळ आवश्यक ते सहाय्यक उपचार (सपोर्टिव्ह ट्रीटमेंट) दिले जातात. हे रसायन लहान मुलांपासून आणि अन्नपदार्थांपासून दूर ठेवावे. चुकून गिळल्यास किंवा विषबाधेची शंका आल्यास उलटी करण्याचा प्रयत्न करू नये. अशावेळी तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे,” असंही डॉ. रोकडे म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC