Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याचा राग, फसवा कॉल करून पुरोहिताचीच हत्या’

‘मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याचा राग, फसवा कॉल करून पुरोहिताचीच हत्या’

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मंदार रानडे

वाचन वेळ: 3 मिनिटे

आपल्या मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याच्या रागातून पुरोहिताचीच हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इचलकरंजीतील पुरोहित आणि ज्योतिषी मंदार रानडे यांचा मृतदेह 31 ऑक्टोबरला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मानकापूर परिसरातील एका शेतात आढळून आला. त्यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

पोलीस तपासानंतर या हत्येमागचं कारण समोर आलं.

नेमकं काय घडलं होतं?

इचलकरंजीमधील गुजरी पेठ येथे राहणाऱ्या 35 वर्षीय मंदार रानडे हे पौरोहित्य आणि ज्योतिषाचा व्यवसाय करायचे. 31 ऑक्टोबर 2026 ला त्यांचा मृतदेह महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मानकापूर परिसरातल्या एका शेतात आढळून आला होता.

अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची तक्रार केदार चंद्रकांत कुलकर्णी (वय 44, रा. इचलकरंजी) यांनी दिली होती. त्यानुसार सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 255/2026, भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राम राजन यांच्यासह पोलीस उपअधीक्षक, सदलगा पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्रातल्या शिरदवाड येथील दीपक अण्णा मगदूम यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता हत्येचं कारण समोर आलं.

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याचा राग

दीपक अण्णा मगदूम यांच्या 19 वर्षांच्या मुलीने घरातून निघून जात 13 जानेवारी 2026 ला शिवनाकवाडी इथे तिच्या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह केला.

हा विवाह ज्योतिषी मंदार रानडे यांनी जुळवून देण्यास मदत केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच रागातून आरोपीने मंदार रानडे यांना संपवण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलीस म्हणाले की, आरोपी दीपक अण्णा मगदूम यांनी 31 ऑक्टोबर 2026 ला वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मंदार रानडे यांच्याशी संपर्क साधला. आणखी एक लग्न जुळवायचे असल्याचे सांगत त्यांनी मंदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना इचलकरंजी येथून मानकापूर गावच्या शिवारात बोलावून घेतले.

मंदार रानडे घटनास्थळी पोहोचताच आरोपीने त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली.

या घटनेनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिसांनी तपास केला.

या घटनेनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पोलिसांनी तपास केला. नातेवाईक, मित्रमंडळींची चौकशी, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत महाराष्ट्रातील शिरढोण परिसरातून दीपक अण्णा मगदूम यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

आरोपीच्या वकिलांची किंवा कुटुंबाची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर येथे अपडेट करण्यात येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC