Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Applause Entertainment
प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांच्या ‘मैं वापस आऊंगा’ या नवीन चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर सीमा ओलांडून पाकिस्तान आणि जगभरातील सिनेरसिकांची मनं जिंकली आहेत.
भारत-पाकिस्तान फाळणीचा संवेदनशील इतिहास, कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि काळजाला भिडणारी भावनिक कथा यामुळे या चित्रपटाने सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावलं आहे.
बॉलिवूडचे प्रेक्षक तर आधीपासूनच इम्तियाज अली यांच्या स्टोरीटेलिंगच्या शैलीचे चाहते आहेत. मात्र, यावेळी पाकिस्तानातही या चित्रपटाची ऑनलाईन जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात नसीरुद्दीन शाह हातात पेन घेऊन उर्दूतील काही शब्द लिहिताना दिसतात. अगदी त्याच क्षणापासून ही कथा भूतकाळ, जुन्या आठवणी आणि अपुऱ्या राहिलेल्या नात्याभोवती फिरणारी असल्याचा अंदाज प्रेक्षकांना येतो.
थिएटरमध्ये चित्रपटाचे नावही उर्दू लिपीत दाखवले जाते.
भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाने पुन्हा एकदा दोन्ही देशांतील प्रेक्षकांचे लक्ष त्या इतिहासाकडे वेधले आहे, ज्याने लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकले होते.
पाकिस्तानी चित्रपट निर्माते उमैर नासिर अली यांनी या चित्रपटाचे कौतुक करत म्हटले की, हा सिनेमा फाळणीमुळे झालेल्या मानवी वेदना आणि त्याची किंमत अत्यंत संवेदनशीलतेने मांडतो.
बीबीसी उर्दूशी बोलताना उमैर नासिर अली म्हणाले, “मला इम्तियाज अली यांचे सिनेमे नेहमीच आवडत आले आहेत. पण मला असं वाटतं की, एक चित्रपट निर्माता म्हणून ‘मैं वापस आऊंगा’ हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे. हे अत्यंत सुंदर आणि क्रिएटिव्ह काम आहे. हा मनापासून आणि अत्यंत प्रेमाने बनवलेला एक खराखुरा सिनेमा आहे.”
‘नायाब’ या पाकिस्तानी चित्रपटाचे दिग्दर्शक उमैर यांचं म्हणणं आहे की, या चित्रपटाचं एडिटिंग त्यांना विशेष आवडलं.
ते म्हणतात, “संपूर्ण चित्रपटभर दोन वेगवेगळ्या कथा आणि भावना एकाच वेळी पुढे नेणं सोपं नसतं. पण एडिटर आरती बजाज यांनी ज्या प्रकारे हे हाताळलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. चित्रपटातील भावनिक परिणाम शेवटपर्यंत कायम राहतो.”
उमैर यांनी चित्रपटाच्या प्रत्येक पैलूचं कौतुक केलं. मात्र, नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाची त्यांच्यावर सर्वाधिक छाप पडली.
ते म्हणाले, “या चित्रपटातील त्यांचं पात्र सर्वांत कठीण आहे. ज्या पद्धतीने नसीरुद्दीन शाह यांनी ते साकारलं आहे, तसं दुसरा कोणताही अभिनेता या भूमिकेला इतका प्रभावी न्याय देऊ शकला असता, असं मला वाटत नाही.”
स्टोरी काय आहे?
‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच खिळवून ठेवतो. ही कथा 95 वर्षीय ईशर सिंग ग्रेवाल यांची आहे. ही भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी साकारली आहे.
त्यांना पॅरालिसिस (लकवा) झाला असून, हळूहळू त्यांची स्मरणशक्तीही कमकुवत होत चालली आहे.
त्यांचा नातू नरवीर, ज्याची भूमिका दिलजीत दोसांझ यांनी साकारली आहे, तो इंग्लंडहून त्यांच्याकडे परत येतो.
ईशर सिंग यांच्या विखुरलेल्या आठवणींमधून नरवीरला त्यांच्या आयुष्यातील अशी काही गुपितं समजतात, जी फाळणीपूर्वीच्या पंजाबशी आणि पाकिस्तानमधील सरगोधा शहराशी जोडलेली आहेत.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
ईशर सिंग यांची एकच शेवटची इच्छा असते, त्यांना पुन्हा एकदा सरगोधाला जायचं असतं. हे तेच शहर आहे, जिथे त्यांनी आपलं बालपण घालवलं होतं आणि जिथे काही आठवणी, काही वचनं आणि एक अपूर्ण प्रेम मागे राहिलं होतं.
चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे, इम्तियाज अली फाळणीकडे केवळ एक राजकीय घटना म्हणून पाहत नाहीत, तर त्या वादळात होरपळलेल्या मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवतात.
याच कारणामुळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षक केवळ त्या ऐतिहासिक घटनेकडे पाहत नाहीत, तर त्या पिढीने सहन केलेल्या वेदनाही अनुभवतात.
लोकांना चित्रपटात काय आवडले?
दिल्लीतील 28 वर्षीय इकराम मोहसिन हिने बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितले की, या चित्रपटाने तिला प्रचंड भावूक केले.
ती म्हणाली, “भूतकाळात जे काही घडलं, विशेषतः आपल्या माणसांची जी ताटातूट झाली, ती कदाचित कधीच व्हायला नको होती.”
ती पुढे म्हणाली, “माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही होती की, भूतकाळात द्वेषाची जी बीजं पेरली गेली होती, ती आजही दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं करू शकलेली नाहीत. धर्म आणि सीमा आपल्या जागी आहेत. पण भावनिक नातं आजही जिवंत आहे.”
30 वर्षीय संदीपने बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितले, “मी इम्तियाज अली यांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत आणि माझ्या मते ‘मैं वापस आऊंगा’ हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम आहे.”
तो म्हणाला, “चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याने मला आतून हादरवून सोडलं. जेव्हा कीनो मल्लिकाकडून जाण्याची परवानगी मागतो, तेव्हा मी माझे अश्रू आवरू शकलो नाही. चित्रपट संपल्यानंतरही त्यातील भावना माझ्या मनात कायम राहिल्या.”
फोटो स्रोत, AFP via Getty Images
पाकिस्तानचे अली उस्मान कासमी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “इम्तियाज अली यांनी द्वेषावर आधारित सिनेमांच्या काळात हिंमत दाखवली आहे.”
“या चित्रपटाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्याला आठवण करून देतो की, आपण फाळणीचे ते दुःख स्वतःचे मानू शकत नाही. आपण ते फक्त अनुभवू शकतो. त्याबद्दल सहानुभूती बाळगू शकतो, पण ज्या पिढीने या वेदना सोसल्या, त्यांचा अनुभव आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही.”
फोटो स्रोत, LightRocket via Getty Images
उमैर नासिर अली यांचं म्हणणं आहे की, या चित्रपटाचं संगीत आणि त्यातील सांस्कृतिक वातावरण अगदी खरेखुरे वाटते.
ते म्हणाले, “मी माझ्या आजी-आजोबांकडून ऐकलं होतं की, त्या काळातही लोकांना वेस्टर्न म्युझिक आणि नृत्याची खूप आवड होती. चित्रपटात ही संस्कृती अतिशय सहजपणे पडद्यावर आणली आहे.”
उमैर स्वतः गेल्या काही वर्षांपासून फाळणीच्या आठवणींवर आधारित एका चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाचं नाव गुलजार यांच्या प्रसिद्ध कवितेवरून प्रेरित होऊन ‘छोड आये हम वो गलियाँ’ असं ठेवण्यात आलं आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, ज्या प्रकारे इम्तियाज अली यांनी ‘मैं वापस आऊंगा’मध्ये भूतकाळाला आजच्या प्रेक्षकांशी आणि सध्याच्या परिस्थितीशी जोडले आहे, ते पाहता तेही आपल्या चित्रपटात काही नवे पैलू जोडू इच्छितात.
उमैर यांनी अहमद फराज यांच्या या शेरच्या माध्यमातून चित्रपट आणि त्याची कथा थोडक्यात मांडली—
‘सुना है उस के शबिस्ताँ से मुत्तसिल है बहिश्त,
वहाँ के रहने वाले भी इधर के नज़ारे देखते हैं।’
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




