Home LATEST NEWS ताजी बातमी यास्मिन शेख : ज्यू कुटुंबात जन्म ते मराठी भाषेच्या गाढ्या अभ्यासक; पंढरपुरात...

यास्मिन शेख : ज्यू कुटुंबात जन्म ते मराठी भाषेच्या गाढ्या अभ्यासक; पंढरपुरात बडव्यांनी यामुळे नाकारला होता मंदिरात प्रवेश

3
0

Source :- BBC INDIA NEWS

यास्मिन शेख

फोटो स्रोत, Shamsuddin Tamboli

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख (वय 101) यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झाले.

डॉ. यास्मिन शेख यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी अविरतपणे काम केलं. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य असल्याचं त्यांनी सातत्याने सांगितलं.

यास्मिन शेख यांचं मूळ नाव जेरूशा रुबेन. त्या बेनेइस्रायली ज्यू. त्यांचे वडील जॉन रुबेन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यांची नोकरी फिरतीची. त्यामुळे यास्मिन यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं.

त्यांनी पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून मराठी भाषा आणि साहित्य या विषयातून पदवी घेतली. श्री.म.माटे हे त्यांचे शिक्षक.

माटे सरांच्या उत्तम मराठी शिकवण्याचा, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे यास्मिन या मराठीच्या, मराठी व्याकरणाच्या प्रेमात पडल्या. तिथून पुढे तेच त्यांचं कार्यक्षेत्र बनलं.

यास्मिन शेख यांनी औरंगाबादमधील मिलिंद कॉलेज तसंच मुंबईतल्या सायनच्या ए.आय.इ.एस महाविद्यालयात अध्यापन केलं.

निवृत्तीनंतर त्यांनी काही वर्षं स्पर्धा परीक्षेच्या मुलांना भाषाशास्त्र व मराठी व्याकरण शिकवलं.

त्यांनी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही मराठी व्याकरणाविषयीची दोन नितांत सुंदर पुस्तकं लिहिली आहेत.

जन्माने ज्यू, मुस्लिम व्यक्तीशी विवाह आणि भाषा शास्त्रासारख्या विषयाचा अभ्यास यांमुळे अनेकांना त्यांच्याबद्दल कुतूहल होतं.

अगदी लहानपणीही त्यांना त्यांच्या धार्मिक वेगळेपणाचा अनुभव आला होता. एबीपी माझाच्या मुलाखतीत त्यांनी तो किस्सा सांगितला होता.

पंढरपूरच्या मंदिरात नाकारला होता प्रवेश

आधी उल्लेख केल्याप्रमाणे यास्मिन शेख यांच्या वडिलांची फिरतीची नोकरी होती. ते पंढरपूरला होते तेव्हाची गोष्ट…यास्मिन म्हणजेच तेव्हाच्या जेरूशा शाळेत जाताना फ्रॉक घालून जायच्या. त्यांचे केस कापलेले होते. इतर मुली मात्र त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे परकर-पोलक्यात होत्या.

एकदा शनिवारी मुली-मुलींचं ठरलं की, शाळा सुटल्यावर सगळ्यांनी विठ्ठलाला जायचं.

“आम्ही तिथे गेल्यावर ते बडवे बाहेर आले, त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांना मी वेगळी वाटले. त्यांनी माझ्या बाकीच्या मैत्रिणींना विचारलं की, ही कोण आहे. त्यांनी माझं नाव सांगितलं- जेरुशा रुबेन.

नाव ऐकल्यावर त्यांनी ‘हिला मंदिर प्रवेश नाही’ असं म्हटलं. हे ऐकून मुली चकित होऊन एकमेकींकडे पाहू लागल्या. मग त्या म्हणाल्या की, आम्हीही येत नाही आणि त्याही मंदिरात आल्या नाहीत.”

याच मैत्रिणींनी यास्मिन यांना आपल्या घासातला घासही भरवला होता. तोही किस्सा त्यांनी सांगितला होता.

यास्मिन यांच्या आई त्या नऊ वर्षांच्या असताना वारल्या होत्या. वडिलांनीच या सात भावंडांचा सांभाळ केला. त्यांच्याकडे स्वयंपाकाला एक बाई यायच्या. पण यास्मिन आणि त्यांची बहिण शाळेत जायच्या तोपर्यंत त्यांचा स्वयंपाक तयार नसायचा. मग त्या दोघीही डबा न घेताच जायच्या.

“ज्या मुला-मुलींची घरं जवळ होती, ते जेवायला जायचे. काही जण डबा घेऊन यायचे. मी त्यावेळी वर्गातच बसूनच असायचे. माझ्या काही मैत्रिणींच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी मला विचारल्यावर मी सांगितलं की, मी जेवून आलीये. मी खोटं बोलतीये, हे त्यांच्या लक्षात आलं. त्या मला आग्रहाने घेऊन गेल्या. आम्ही गोल करून बसलो. त्यांनी डबे उघडले…एक घास घेतला आणि माझ्या समोर धरून म्हणाल्या की, खा रे माझ्या तान्ह्या बाळा…तो घास मला भरवला. त्या प्रसंगानंतर मी मोकळेपणाने त्यांच्यासोबत जेऊ लागले,” यास्मिन यांनी तो प्रसंग सांगितला होता.

मुस्लिम व्यक्तीशी लग्न, पण धर्माने मुस्लिम नाही

यास्मिन शेख यांच्या वडिलांची नोकरी फिरतीची असली तरी ते नंतर नाशिकला स्थायिक झाले. नाशिकमधल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांचा परिचय प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकरांशी झाला.

कानेटकरांमुळेच यास्मिन यांची ओळख तिथल्या चित्रमंदिरात काम करणाऱ्या अझीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी झाली. 1950 साली त्यांचा विवाह झाला.

यास्मिन शेख

फोटो स्रोत, Shamsuddin Tamboli

मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला असला तरी यास्मिन यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नव्हता. कारण त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.

त्यावेळी भिन्न धर्मीय व्यक्तींचं लग्न जेव्हा व्हायचं, तेव्हा रजिस्ट्रार तिथे यायचा आणि सांगायचा की ‘आय बिलाँग टू नो रिलिजन’ आणि सही करायला सांगायचा.

‘मी माझा धर्म सोडलेला नाही. पण लग्नानंतर सासरचे सगळे सणवार केले. पहिल्या वर्षी प्रत्येक सणाला आम्ही पुण्याला जायचो,’ अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

‘मुलांना वाटलं बुरख्यातली बाई शिकवायला येणार’

यास्मिन शेख यांनी त्यांचं मुस्लिम नाव आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा याबद्दलचीही एक आठवण सांगितली होती.

पहिल्या दिवशी जेव्हा त्या शिकवायला गेल्या, तेव्हा मुलांना वाटलं की, आता बहुतेक बुरख्यातली बाई शिकवायला येणार, ती तुकारामांचे अभंग कसे शिकवणार. त्यामुळे सगळे विद्यार्थी त्यांची थट्टा करायची याच बेताने बसलेले असायचे.

“मी वर्गात जायचे, तेव्हा माझे केस कापलेले. मी पाचवारी साडी नेसलेले असायचे. त्यामुळे मुलं माझ्याकडे चकित होऊन बघायचे आणि मला कळायचं नाही की, एवढं काय चकित होऊन पाहत आहेत. मी शिकवायला लागले की त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य हळूहळू नष्ट व्हायचं. मग त्यांना माझं शिकवणं आवडायला लागलं,” असं त्यांनी सांगितलं होतं.

‘भाषेला धर्म नसतो’

निवृत्तीनंतर यास्मिन शेख या पुण्यातील औंध इथे स्थायिक झाल्या होत्या. ‘अंतर्नाद’ या मासिकाचे संपादक भानू काळे यांनी ‘साधना’ साप्ताहिकासाठी यास्मिन शेख यांच्यावर लिहिलेल्या लेखात या काळातील एक प्रसंग लिहिला होता.

एकदा महापालिकेचा एक कर्मचारी जनगणना करण्यासाठी त्यांच्या घरी आला. तो विचारत असलेल्या प्रश्नांमध्ये ‘तुमची मातृभाषा कोणती?’ हा एक प्रश्न होता. ‘मराठी’ हे शेखबाईंनी दिलेले उत्तर त्याला पटत नव्हते. ‘तुमचे आडनाव शेख म्हटल्यावर मातृभाषा उर्दू लिहायला हवी’, असा त्याचा आग्रह होता.

पण शेखबाईंनी ‘मातृभाषा मराठी’ अशीच नोंद त्याला करायला लावली. शमा आणि रुकसाना या त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे.

यास्मिन शेख

फोटो स्रोत, Shamsuddin Tamboli

भानू काळे यांनी लिहिलं आहे शेखबाई एकदा म्हणाल्या होत्या, “भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझे माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही; ती महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे.”

प्रमाण भाषेचा आग्रह

भाषेच्या संदर्भात यास्मिन शेख यांची मतं ठाम होती. ललित साहित्यात बोलीभाषा चालू शकते, मात्र निवेदनात आणि वैचारिक लेखनात मात्र प्रमाणभाषाच हवी यावर त्या ठाम होत्या. हे मत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलं होतं.

एका बोलीभाषेतील लेखनाचे नेमके आकलन दुसरी बोलीभाषा असलेल्या वाचकाला होणार नाही आणि पर्यायाने भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल, अशी याबाबतीत त्यांची भूमिका होती.

त्याचप्रमाणे व्याकरणाचे नियमही आपण पाळलेच पाहिजेत हाही त्यांचा आग्रह होता. सर्वच शास्त्रांमध्ये त्या-त्या शास्त्राचे नियम असतात आणि आपण ते विनातक्रार पाळतच असतो. इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगदेखील आपण घोकून घोकून पाठ करत असतो. मग मराठीच्या बाबतीत कंटाळा का करायचा? असा यास्मिन शेख यांचा आग्रह होता.

मराठी व्याकरणाविषयी आग्रही असल्या तरी त्या दुराग्रही अजिबात नव्हत्या. बदलत्या काळानुसार त्यात विशेषत: ऱ्हस्व-दीर्घाबाबतच्या नियमांमध्ये बदल करायला हवेत, अशीही त्यांची भूमिका होती.

‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तकं मराठी व्याकरणाविषयीचं एक अधिकृत पुस्तक मानलं जातं. या पुस्तकाच्या प्रती बाईंनी स्वत: विकत घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना भेट दिल्या आहेत.

2007 मध्ये त्यांनी ‘मराठी शब्दलेखनकोश’ तयार केला. मराठी शब्दांचं योग्य रूप कोणतं, याची माहिती देणारा हा कोश मराठी भाषेचे अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमी यांच्यासाठी महत्तावाचा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC