Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Iraqi Film Corporation
‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’ हा सिनेमा जुलै 1983 मध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित झाला आणि त्यानंतर तो पुन्हा कधीच दाखवला गेला नाही. 2020 मध्ये या सिनेमाच्या निर्मात्याने बीबीसीशी बोलताना सक्तीची लष्करी भरती, चौकशी आणि दारूच्या नशेत असलेल्या अभिनेता ऑलिव्हर रीडबद्दलच्या काही आठवणी सांगितल्या.
सद्दाम हुसेनच्या ‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’ या भव्य हॉलिवूड स्टाईल सिनेमासाठी सर्वात मोठी अडचण 1980 मध्ये इराण आणि इराकमध्ये सुरू झालेलं युद्ध ही नव्हती. विशेष म्हणजे हे युद्ध बगदादजवळच्या वाळवंटात चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांतच सुरू झालं होतं.
या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञांना युद्धासाठी सैन्यात बोलावलं जात होतं आणि ते कोणतीही सूचना न देता सेटवरून अचानक गायब होत असत. परंतु, हा देखील सर्वात मोठा असा अडथळा नव्हता.
पहिल्या महायुद्धातील बनावट शस्त्रं (प्रॉप्स) तुर्कीच्या (सध्याचं तुर्कीये) सीमेवरून आणतानाही अडचण आली. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सिनेमाचे ट्रक थांबवले होते, कारण इराकी सैन्याला मदत करण्यासाठी खरी शस्त्रं आणली जात आहेत, असा त्यांना संशय आला होता.
या सिनेमाचं काम जवळपास बंद पडण्याची वेळ एका वेगळ्याच घटनेमुळे आली होती. सिनेमाचा मुख्य अभिनेता ऑलिव्हर रीडने दारूच्या नशेत हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये रिकाम्या वाइनच्या बाटलीत लघवी केली.
यानंतर त्याने ती बाटली वेटरला शेजारच्या टेबलवर नेऊन ठेवायला सांगितलं आणि, “माझ्याकडून भेट,” असंही म्हटलं.
…आणि सिनेमाचे रिळ गॅरेजमध्ये
या सिनेमाचे इराकमध्ये जन्मलेले ब्रिटिश निर्माते लतीफ जोरेफानी यांनी 2020 मध्ये बीबीसीच्या व्हिटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात सांगितलं की, इराकी अधिकाऱ्यांना या घटनेमुळे धक्का बसला होता. इराकमधील मंत्र्यांचे संदेश (टेलेक्स) त्यांना येत होते की, “या माणसाला आधी सिनेमातून काढून टाका, आम्हाला तो आता इथे नको आहे.”
परंतु, जोरेफानी यांच्यासमोर प्रश्न होता की, कोट्यवधी रुपये (डॉलर्स) खर्चाच्या या सिनेमाचं चित्रीकरण अर्ध्यावर असताना मुख्य अभिनेत्यालाच कसं काढायचं?
जोरेफानी यांनी अखेर इराकी अधिकाऱ्यांची कशीतरी समजूत काढली आणि ऑलिव्हर रीडला सिनेमात ठेवण्याची परवानगी मिळवली. नाहीतर त्यांना संपूर्ण सिनेमा पुन्हा शूट करावा लागला असता. पण हा होकार मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
ते म्हणाले, “यासाठी मला फार झगडावं लागलं.”
फोटो स्रोत, Getty Images
ही घटना म्हणजे 3 वर्षे चाललेल्या या सिनेमाच्या निर्मितीतील अनेक तणावपूर्ण प्रसंगांपैकी एक होती. या सिनेमावर सुमारे 3 कोटी डॉलर खर्च झाले होते. आजच्या हिशोबाने ही रक्कम सुमारे 10 कोटी डॉलर इतकी होईल. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या ‘रिटर्न ऑफ द जेडी’ या सिनेमाच्या बजेटइतकाच हा खर्च होता.
जुलै 1983 मध्ये मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला आणि त्याला एक पुरस्कारही मिळाला. त्यानंतर मात्र या सिनेमाच्या रिळांचे डबे इंग्लंडमधील सरे येथे जोरेफानी यांच्या गॅरेजमध्येच पडून राहिल्या.
या सिनेमाचा असा अपमानास्पद शेवट होईल, अशी सद्दाम हुसेनला अपेक्षा नव्हती.
इराकची प्रतिमा उंचावण्यासाठी सद्दाम हुसेनचे प्रयत्न
जुलै 1979 मध्ये इराकच्या सत्तेवर आल्यानंतर हुसेनची इच्छा इराकमध्ये मोठा सिनेमा उद्योग उभा करण्याची होती. पाश्चात्त्य प्रेक्षकांसाठी देशभक्तीपर भव्य सिनेमे बनवावेत, अशी त्याची कल्पना होती.
जोरेफानी यांनी बीबीसीला सांगितलं, “इराक हे आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीचं मोठं केंद्र बनावं, यासाठी हुसेन खूप उत्सुक होता. कदाचित एक दिवस बगदाद हे टायग्रिस नदीकाठचं ‘बॉलिवूड’ बनेल, असं त्याला वाटत असावं.”
इराकची जगभरात प्रतिमा उंचावण्यासाठी अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्याची सद्दाम हुसेनची योजना होती. सुरुवातीला त्याला हॉलिवूडच्या तोडीचा एक भव्य सिनेमा बनवायचा होता.
या चित्रपटातून त्याच्या बाथ पक्षाचा संबंध 1920 मध्ये ब्रिटिश राजवटीविरोधात लढलेल्या इराकी क्रांतिकारकांशी जोडण्याचा प्रयत्न होता.
‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’ किंवा ‘अल-मसाला अल-कुब्रा’ (द ग्रेट क्वेश्चन) या सिनेमात मेसोपोटेमियापासून इराक कसा तयार झाला, याची कथा सांगण्यात आली होती. या सिनेमातील एका अभिनेत्याने याला “सद्दाम हुसेनची ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया'” असं म्हटलं होतं.
“या सिनेमाची कथा 1920 मधील एका खऱ्या घटनेवर आधारित आहे,” असं जोरेफानी यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Getty Images
इराकमधून वसाहतवादी राजवट हटवण्यासाठी सुरू असलेल्या चळवळीदरम्यान, फाल्लुजा शहराजवळ एका बंडखोराने ब्रिटिश लेफ्टनंट कर्नल जेरार्ड लीचमनची हत्या केली होती. ‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’ या सिनेमातून सद्दाम हुसेनला देशाच्या जन्माची ही कथा एका भव्य सिनेमाच्या स्वरूपात सांगायची होती.
जोरेफानी 1950 च्या दशकापासून सिनेमा क्षेत्रात काम करत होते. त्यांनी मध्य पूर्वेत लो बजेटचे अनेक सिनेमे बनवले होते. सद्दाम हुसेनच्या सरकारमधील काही ओळखीच्या लोकांनी त्यांच्याशी या सिनेमाबाबत संपर्क साधला होता.
1970 च्या दशकात तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इराककडे भरपूर पैसा आला होता. त्यामुळे या सिनेमासाठी पैशांची अजिबात कमतरता नव्हती.
जोरेफानी म्हणाले, “बगदादमधील आमचे मित्र सद्दाम हुसेनकडे गेले आणि म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रात उतरायचं असेल तर भरपूर पैसा खर्च करावा लागेल. त्यावर हुसेन यांनी सांगितलं, ‘जेवढा खर्च लागेल, तेवढा करा.'”
मोठ्या बजेटच्या ‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’ या सिनेमासाठी हॉलिवूडसारखे मोठे सेट, विशेष तंत्रज्ञान आणि शेकडो कलाकार व तंत्रज्ञ बगदादला आणण्यात आले होते. ही सर्व जमवाजमव झाल्यानंतर अचानक सद्दाम हुसेनने इराणवर हल्ला केला.
2016 मधील ‘सद्दाम गोज टू हॉलिवूड’ या माहितीपटात जोरेफानी म्हणाले, “युद्ध सुरू असताना माझे 140 लोक इराकमध्ये होते. या लोकांना शेपर्टन, पाइनवूड आणि हॉलिवूडमध्ये सिनेमा बनवण्याची सवय होती. पण आता ते अशा ठिकाणी होते, जिथे आजूबाजूला खरी क्षेपणास्त्रं आणि बॉम्बचा मारा सुरू होता.”
युद्धक्षेत्रात शुटिंग
इराणवरील हल्ल्यामुळे सिनेमाच्या शुटिंगमध्ये अडचणी आल्या. जोरेफानी यांनी 2016 मध्ये बीबीसीच्या ‘आऊटलुक’ला सांगितलं, “आम्हाला चित्रीकरण थांबवावं लागलं. परंतु, वरून आदेश आला की, देशात सर्व नेहमीप्रमाणे सुरळीत असल्याचं दिसलं पाहिजे.”
इराकच्या नेतृत्वाला वाटत होतं की, “काही आठवड्यांत युद्ध संपेल. त्यामुळे शुटिंग सुरू ठेवा, सर्व ठीक होईल.” दोन आठवड्यांनंतर पुन्हा शुटिंग सुरू करण्यात आलं.
अधिकाऱ्यांना सर्व काही ठीक असल्याचं दाखवायचं होतं. परंतु कलाकारांना युद्ध सुरू असल्याचे काही संकेत मिळत होते.
एका अभिनेत्याने सांगितलं की, तो ऑलिव्हर रीड आणि इतर कलाकारांसोबत इराकला जात होता. इराकच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विमानासोबत एक लढाऊ विमान उडताना दिसलं. क्षेपणास्त्र हल्ला टाळण्यासाठी त्यांचं विमान विमानाचे दिवे बंद ठेवून उतरवण्यात आलं.
फोटो स्रोत, Getty Images
काही स्थानिक कलाकारांना अचानक सैन्यदलात बोलावण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यावर चित्रित केलेल्या काही दृश्यांचं पुन्हा शुटिंग करावं लागलं. तसेच, ब्रिटनमधून लष्करी उपकरणांसारख्या वस्तू (प्रॉप्स) तुर्कीच्या सीमेवरून इराकमध्ये आणतानाही भरपूर अडचणी आल्या.
जोरेफानी यांच्या म्हणण्यानुसार, तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं, “थांबा, आम्ही या युद्धात तटस्थ आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला हे सामान आमच्या देशातून नेऊ देऊ शकत नाही.”
त्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “हे पहिल्या महायुद्धावरच्या सिनेमासाठीचं साहित्य आहे. ही खरी शस्त्रास्त्रं नाहीत आणि त्यातून गोळीबारही करता येत नाही.” परंतु, अधिकाऱ्यांनी त्यांचं काही एक ऐकलं नाही.
त्यामुळे हे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना मोठा वळसा घालावा लागला. ते ग्रीसमार्गे जहाजातून लेबनॉन आणि सीरियामधून वाळवंट पार करत बगदादला पोहोचले (तेव्हा सीरियाचे इराकींपेक्षा इराणींशी अधिक मैत्रीपूर्ण संबंध होते). जोरेफानी म्हणाले की, या सर्व प्रकारामुळे मी खूपच हताश झालो होतो.
परंतु, या सिनेमाचं शुटिंग करताना सर्वात चर्चेत राहिलेली घटना स्फोट होणाऱ्या रेल्वेच्या दृश्याची होती.
जोरेफानी म्हणाले, “या दृश्यात सैनिक आणि दारूगोळा घेऊन जाणाऱ्या रेल्वेवर इराकी बंडखोर हल्ला करतात.”
फोटो स्रोत, PAN BOOKS
सिनेमाचं शुटिंग प्रत्यक्ष युद्ध सुरू असलेल्या भागांपासून दूर केलं जात होतं. पण त्यांना मिळालेली एक जुनी, वापरात नसलेली रेल्वे लाईन इराणच्या सीमेजवळ होती.
“शुटिंग झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराणच्या माध्यमांनी बातमी दिली की, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने इराकमध्ये घुसून एका लष्करी रेल्वेवर हल्ला केला आणि यात अनेक इराकी सैनिक मारले गेले.”
कलाकारांमध्येही या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान असेच भन्नाट, चित्रविचित्र प्रकार घडत होते. वाइनच्या बाटलीच्या घटनेशिवाय ऑलिव्हर रीड अनेकदा पंजा लढवत, हॉटेलचे दरवाजे लाथ मारून उघडत असत आणि लोकांशी विनाकारण भांडणंही काढत असत.
अभिनेता डोनाल्ड सिंडेन यांचा मुलगा मार्क सिंडेनने 2014 मधील एस्क्वायरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यानं रीडला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो बगदादमधील अल-मन्सूर मेलिया हॉटेलच्या पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पायाला धरून खाली लटकलेला होता. रीडने त्याच्यासोबत असलेल्या फ्रेंच माजी कमांडो सैनिकाला काहीतरी अपशब्द बोलल्यामुळे हा प्रकार घडला होता.
रीड मात्र या सगळ्या प्रकारात जोरजोरात हसत होता. सिंडेन म्हणाला, “ऑलिने त्याला नेमकं काय म्हटलं होतं, हे आम्हाला कधीच कळलं नाही.”
सिनेमातील आणखी एक अभिनेत्री व्हर्जिनिया डेनहॅमने ऑलिव्हरन रीडचं वर्णन ‘सामूहिक विनाशाचं शस्त्र’ अशा शब्दांत केलं होतं.
‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’च्या शुटिंगदरम्यान सिंडेनला आणखी एक वेगळाच अनुभव आला. 2014 मधील मुलाखतीत त्यानं सांगितलं की, इराकला जाण्यापूर्वी त्याला बगदादचे फोटो काढण्यासाठी एका गुप्त ब्रिटिश संस्थेने संपर्क साधला होता.
तो म्हणाला, “सूट घातलेली दोन माणसं माझ्याकडे आली. त्यांनी आपण ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयातून आलो असल्याचं सांगितलं. त्यांनी मला विचारलं की, मी इराकला जाणार आहे का. मी हो म्हणालो. मला इराकला जाण्याची तारीख सांगण्याची गरजही पडली नाही. मी कधी जाणार आहे, हे त्यांना आधीपासूनच माहीत होतं.”
सिनेमा प्रदर्शित झाला, पण नंतर बाजूला पडला
सिंडेनला सांगण्यात आलं होतं की, त्याच्या सुट्टीच्या (हॉलिडे) प्रवासातील फोटोंमध्ये लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या, तर ब्रिटिश सुरक्षा यंत्रणेला त्यामध्ये रस असेल. उदाहरणार्थ, संपर्कासाठी वापरले जाणारे अँटेना, सरकारी इमारती किंवा राजवाडे यांचे फोटो काढायचे होते.
परंतु, या फोटोंमुळेच सिंडेन अडचणीत आला. सद्दाम हुसेनच्या गुप्त पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्याला चौकशीसाठी इंट्रोगेशन केंद्रात नेलं. तिथे त्याची चौकशी सुरू झाली.
पण सिंडेनने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला काही तरी सांगून वेळ मारून नेली, “मी तुमचे महान नेते सद्दाम हुसेन यांच्या सांगण्यावरून इथे आलो आहे. मी काम करत असलेल्या सिनेमासाठी ते पैशांचा पुरवठा करत आहेत. पाहा, आठवडाभरापूर्वीच मी त्यांच्यासोबत जेवण केलं होतं.”
सिंडेनने हे सांगितल्यानंतर त्याला लगेचच सोडण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी सिंडेन इराकमधून बाहेर पडला. विशेष म्हणजे, त्यावेळी तो 1920 च्या दशकातील लष्करी गणवेश, डोक्यावरची टोपी आणि पिस्तूल अशा सिनेमातील वेशातच इराकमधून बाहेर गेला.
जोरेफानी यांनी ‘क्लॅश ऑफ लॉयल्टीज’चं एडिटिंग लंडनमध्ये केलं. त्यानंतर हा सिनेमा काही चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला, पण नंतर तो बासनात गुंडाळून ठेवण्यात आला.
सद्दाम हुसेनने 1990 मध्ये कुवेतवर कब्जा केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी इराकवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले. हे निर्बंध 2003 मध्ये हुसेनची सत्ता संपेपर्यंत लागू होते. त्यामुळे हा सिनेमा पुन्हा कधीच प्रदर्शित झाला नाही.
इराकमध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय सिनेमांची मालिका बनवण्याचं सद्दाम हुसेनचं मोठं स्वप्न अखेर एका सिनेमापुरतंच मर्यादित राहिलं. तो सिनेमाही केवळ मोजक्या लोकांनीच पाहिला.
“इराकच्या अपेक्षेप्रमाणे सगळं घडलं असतं, तर आजपर्यंत अशा प्रकारचे 6 ते 7 मोठे चित्रपट आम्ही बनवले असते,” असं जोरेफानी यांनी 2016 मध्ये बीबीसीचे निक एरिक्सन यांना सांगितलं.
इराकींसोबत पुन्हा एखादा चित्रपट बनवता आला नाही, याचं त्यांना वाईट वाटत होतं. 2020 मध्ये बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “30 हून अधिक वर्षे युद्ध, बॉम्बहल्ले, विध्वंस, हत्या आणि धार्मिक गटांतील संघर्ष पाहिल्यानंतर… चित्रपट निर्मिती म्हणजे काय? त्या सर्वांच्या तुलनेत तर काहीच नाही.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




