Home LATEST NEWS ताजी बातमी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची रॅली; कॉक्रोच जनता पार्टीचाही पाठिंबा; पहा सध्या काय...

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची रॅली; कॉक्रोच जनता पार्टीचाही पाठिंबा; पहा सध्या काय आहे परिस्थिती?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची रॅली होणार आहे.

वाचन वेळ: 4 मिनिटे

दिल्लीतील रामलीला मैदानावर आज 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी दहा लाख लोक राजधानीत पोहोचतील, असा दावा करण्यात आला आहे.

हा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपा) खासदार जॉन ब्रिटास यांनी केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)नंही या रॅलीला पाठिंबा जाहीर केला आहे.

सीजेपीनं 28 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात विशेष सखोल तपासणी (SIR) प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांची नावं मतदार याद्यांमधून वगळली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आहे.

रामलीला मैदानावर सध्या काय आहे परिस्थिती?

दरम्यान, रॅलीच्या ठिकाणी सुरक्षा दलांची तैनाती आणि तयारीची छायाचित्रेही समोर आली आहेत.

रामलीला मैदान परिसरात सुरक्षा दलांची मोठी तैनाती.

दरम्यान, भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सभेसाठी चुकीची तारीख निवडल्याचा आरोप केला आहे. भाजप नेत्यांनी असा आरोप केला आहे की, 1 नोव्हेंबर ही तारीख 1984 च्या शीखविरोधी दंगलींची आठवण करून देते.

विरोधी पक्षांच्या या भव्य रॅलीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, लोक जमायलाही सुरुवात झाली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचाही पाठिंबा

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीदेखील एक्सवर या रॅलीला पाठिंबा जाहीर केला. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संघटनांना आपण पाठिंबा देत राहू, असं संघटनेचं म्हणणं आहे.

मात्र, या रॅलीला दिलेला पाठिंबा म्हणजे काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची घोषणा किंवा काँग्रेसच्या संपूर्ण राजकीय कार्यक्रमाशी सहमती दर्शवणं नव्हे, असंही संघटनेने स्पष्ट केलं आहे.

रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सांकेतिक संसद भरवण्यात आली. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

रामलीला मैदानावर सुरू असलेली तयारी

राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं की, जनतेचा आवाज संसदेत पोहोचू दिला जात नाही. त्यामुळेच विरोधकांना संसदेबाहेर एकत्र येऊन आपली भूमिका मांडावी लागत आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावरील रॅलीला येणाऱ्या लोकांना दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून खरेदी करून त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक व्हीडिओ जारी करत ही विनंती केली.

ते म्हणाले, “उद्या लाखो लोक रामलीला मार्चसाठी दिल्लीत येत आहेत. सध्या सणांचा हंगाम आहे. दिवाळी, छठ आणि भाऊबिजेचा काळ आहे. बाहेरून दिल्लीत येणाऱ्या लोकांनी इथल्या व्यापाऱ्यांना मदत करावी, अशी माझी इच्छा आहे.”

ते पुढे म्हणाले, “आंदोलन करा, मोर्चात आणि रॅलीत सहभागी व्हा; पण त्याचबरोबर थोडी खरेदीही करा. त्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. मला माहिती आहे की या रॅलीमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही. भाजप घाबरला आहे, म्हणून अफवा पसरवत आहे.”

राहुल गांधी म्हणाले, “ही दोन्ही कामं एकत्र होऊ शकतात. उद्या मोर्चा आणि रॅली होईल, तसेच लाखो लोक आपल्या व्यापाऱ्यांच्या छोट्या-छोट्या दुकानांतून खरेदीही करतील.”

दरम्यान, दिल्लीच्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेने राहुल गांधी यांना 1 नोव्हेंबर 2026 रोजी रामलीला मैदानावर होणारी इंडिया आघाडीची रॅली पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

सणासुदीच्या काळात ही रॅली दिवाळीनंतर, म्हणजे 10 नोव्हेंबरनंतर आयोजित करावी, अशी विनंती या संघटनेने केली होती.

प्रतिसंसदेत काय झालं?

काल 31 ऑक्टोबर रोजी विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आरोप प्रतिसंसदेत मांडले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी भूषवलं. समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनी उपाध्यक्ष म्हणून भूमिका बजावली.

खर्गे यांनी ठराव मांडताना मुख्य निवडणूक आयुक्तांवर मतदार याद्यांमधील कथित गोंधळ आणि निष्पक्षपणे काम न करण्यासह सहा आरोप केले. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह खासदार तसेच सामाजिक आणि युवा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

समारोपाच्या भाषणात राहुल गांधी यांनी संसदेत जनतेचा आवाज पोहोचू दिला जात नसल्याचा आरोप केला.

काल 31 ऑक्टोबर रोजी विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आरोप प्रतिसंसदेत मांडले.

ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांच्या मते, हा प्रकार विरोधाच्या जुन्या सांकेतिक पद्धतींचाच एक भाग आहे. ते डाव्या संघटनांच्या पथनाट्यांचा आणि बोफोर्स प्रकरणाच्या काळातील निदर्शनांचा दाखला देतात. बोफोर्स प्रकरण राजीव गांधी सरकारच्या काळातील असून, 1986 मधील तोफ खरेदी करारात कथित लाचखोरीचे आरोप एप्रिल 1987 मध्ये समोर आले होते.

किदवई यांच्या या तुलनेतून सांकेतिक कार्यक्रमांचा वापर जनतेपर्यंत मुद्दे पोहोचवण्यासाठी कसा केला जातो, हे समजण्यास मदत होते. काँग्रेस आणि तिचे सहयोगी पक्षही मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आपले आरोप अशाच पद्धतीने जनतेसमोर मांडू इच्छित असून, त्यावर व्यापक चर्चा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC