Home LATEST NEWS ताजी बातमी रोज जेवणाला 50 किलो तांदूळ, रविवारी एक मेंढरू आणि 10 किलो चिकन;...

रोज जेवणाला 50 किलो तांदूळ, रविवारी एक मेंढरू आणि 10 किलो चिकन; 83 जणांचं हे कुटुंब ‘एकत्र’ कसं राहिलंय? वाचा

3
0

Source :- BBC INDIA NEWS

अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली येथे सहा पिढ्यांचे एक मोठे संयुक्त कुटुंब राहते.

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात सहा पिढ्यांचं एक मोठं संयुक्त कुटुंब राहतं. या घरात एका दिवसाच्या जेवणासाठी 50 किलो तांदळाच्या पोत्याची गरज असते. रविवारी मांसाहारी जेवणासाठी एक मेंढरू कापावं लागतं. संध्याकाळी भजी करायची असतील तर 15 किलो बेसन लागतं, कारण या कुटुंबात तब्बल 83 सदस्य आहेत.

बीबीसीची टीम या संयुक्त कुटुंबासोबत पूर्ण दिवस घालवण्यासाठी कुरलापल्ली येथे पोहोचली. इतके सदस्य एकत्र कसे राहतात आणि ते एकत्र काय करतात, हे जाणून घेतलं.

कुरलापल्ली हे कल्याणदुर्गपासून सात किलोमीटर अंतरावर आहे.

या गावात 400 घरं आणि एकूण लोकसंख्या 2,000 इतकी आहे. गावात प्रवेश करताच उजवीकडे वळल्यावर रस्त्याच्या समोरासमोर दोन मोठी घरं दिसतात. या दोन्ही घरांमध्ये एकच संयुक्त कुटुंब राहतं.

या संयुक्त कुटुंबात 83 सदस्य आहेत.

रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुमजली घरात प्रवेश करताच सर्वप्रथम स्वयंपाकघर दिसतं. त्याच्यामागं दोन मजली बैलगाडीचं शेड आहे. त्या घरासमोरच आणखी एक तिमजली घर आहे आणि त्याच रस्त्यावर पुढे गेल्यावर आणखी एक घर आहे, त्याच्या शेजारी मोठा मोकळा प्लॉट आहे. तिथे ट्रॅक्टर आणि बस उभ्या आहेत. आता ही तीन घरंही अपुरी पडत असल्याने कुटुंब चौथं घर बांधत आहे.

या मोठ्या कुटुंबाची मुख्य उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. घरातील सर्व सदस्य मिळून शेती करतात. त्याचबरोबर दुभत्या गायी आणि मेंढ्यांचं पालनही करतात.

दोन्ही ज्येष्ठांवर अवलंबून असतात निर्णय

या संयुक्त कुटुंबात 83 सदस्य आहेत आणि त्याचे प्रमुख हनुमंथा रायडू आणि मुत्यालप्पा आहेत.

दूध काढण्यापासून ते शेती आणि व्यवसायापर्यंत प्रत्येक गोष्टीचा निर्णय हेच दोघे घेतात.

कुटुंबप्रमुख हनुमंथा रायडू म्हणाले की, “इतक्या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणं ही त्यांची जबाबदारी आहे. ते म्हणाले की, त्यांच्या मेव्हण्यासह घरातील कोणीही त्यांच्या विरोधात बोलत नाही आणि त्यांचा आदर करतात.”

कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे महेश सांगतात की, कुटुंबातील दोन्ही प्रमुख सकाळी चहा घेतानाच कोणाला कोणतं काम द्यायचं हे ठरवतात.

ते सांगतात, “माझे वडील आणि आजोबा यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. तेव्हापासून मी एकटाच या कुटुंबाची काळजी घेत आहे. आम्ही मुलांना शिक्षण देतो आणि बाकीच्यांना शेतीची कामं देतो.”

“आम्ही एकमेकांचा आधार बनून आयुष्य जगतो. आतापर्यंत आमच्यात कोणतीही समस्या किंवा मतभेद झालेले नाहीत. आम्ही सर्वांनी मिळून खूप मेहनत घेतली आहे. ते माझं प्रत्येक म्हणणं ऐकतात. माझे मेव्हणेही माझं म्हणणं ऐकतात. माझे आणि माझ्या मेव्हण्याचे इतके मुलगे असूनही कोणी काही म्हणत नाही.”

सगळ्यांसाठी एकच मार्ग

मुत्यालप्पा म्हणाले की, त्यांच्या आजी-आजोबांच्या काळापासून ते अशाच प्रकारे एकत्र राहत आले आहेत आणि भविष्यातही तसेच राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते पुढे म्हणाले, “आमचे चार मेव्हणे आहेत आणि आम्ही दोघं भाऊ आहोत. आम्ही आमच्या आजोबांच्या काळापासून अशाच प्रकारे एकत्र राहत आलो आहोत. भविष्यातही आम्ही असेच राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्वजण सकाळी एकत्र बसतो आणि प्रत्येकाला त्याचं काम देतो. आम्ही घरातील सर्व कामं, खाणं-पिणं, कपडे इत्यादींची काळजी घेतो. काही बाहेरचे लोकही कामासाठी ठेवतो. आम्ही आमच्या मेव्हण्यांच्या मुलांना आमच्या घरात वाढवतो आणि त्यांच्या मुलांनाही आमच्याच घरात ठेवतो. हीच आमची पद्धत आहे.”

हनुमंत रायडू (डावीकडे) आणि मुत्यालप्पा (उजवीकडे) कोणते काम कोण करणार हे ठरवत आहेत.

मुत्यालप्पा म्हणाले की, या सामूहिक व्यवस्थेमुळेच एकेकाळी गरिबी पाहिलेलं हे कुटुंब आज चांगलं जीवन जगू शकत आहे.

ते म्हणाले, “सुरुवातीला आम्ही खूप गरिबी पाहिली. पांघरण्यासाठी चादर नव्हती. खायला फक्त एका वेळचं अन्न मिळायचं. त्या परिस्थितीतून बाहेर पडून आज आम्ही इथवर पोहोचलो आहोत. हे फक्त आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून शक्य झालं. आम्ही वेगवेगळे असतो, तर कधीच या टप्प्यापर्यंत पोहोचलो नसतो.”

“आम्ही सध्या ज्या घरात राहतो, ते बांधण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च झाले. एकटं राहून हे शक्य झालं असतं का? माझ्या वडिलांकडे 60 एकर जमीन होती आणि त्यांच्या निधनानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आणखी 75 एकर जमीन विकत घेतली. म्हणूनच आम्ही सगळ्यांना सांगतो, ‘वेगळं होऊ नका. आपण असे एकत्र राहिलो तर सगळं ठीक होईल.'”

या मोठ्या कुटुंबाची मुख्य उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.

कुटुंबाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे महेश सांगतात की, कुटुंबातील दोन्ही प्रमुख सकाळी चहा घेतानाच कोणाला कोणतं काम द्यायचं हे ठरवतात.

ते म्हणाले, “माझ्या वडिलांचं नाव हनुमंथा रायडू आहे. सर्व मोठी माणसं सकाळी चहा पितात आणि अर्धा तास चर्चा करतात. त्यानंतर कोणाला कोणतं काम द्यायचं ते ठरतं. माझं काम वाहनांची देखभाल करणं आणि घरासाठी लागणारं सामान आणणं आहे. माझा दुसरा भाऊ टोमॅटोसारखी आमची पिकं छोट्या ट्रकमध्ये भरून बाजारात नेतो. अशा प्रकारे आम्ही शेती, मेंढ्या चारणं, गायींची देखभाल करणं अशी आपापली कामं करतो. आतापर्यंत आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय जीवन जगत आहोत.”

कुटुंबाचा इतिहास

कुटुंबप्रमुख हनुमंथा रायडू यांचे आजोबा चिम्मला नागप्पा हे या कुटुंबाच्या पहिल्या पिढीचे प्रमुख होते. त्यांच्या दोन पत्नी होत्या आणि त्यांनी पहिल्या पत्नीच्या मुलीचं लग्न येल्लप्पा यांच्याशी लावून दिलं होतं.

त्यानंतर येल्लप्पा कायम या घरात जावई म्हणून राहिले.

नंतर दुसऱ्या पत्नीला दोन मुलगे आणि दोन मुली झाल्या. येल्लप्पा यांचे चार मुलगे आणि दोन मुलीही एकत्र राहत होते.

येल्लप्पा आणि नागप्पा यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार हनुमंथा रायडू आणि मुत्यालप्पा हे आता घरातील ज्येष्ठ आहेत आणि निर्णय घेतात.

मुत्यालप्पा यांनी टपालवाहक म्हणून काम केलं असून त्यांच्याकडे त्याव्यतिरिक्त दुसरी नोकरी नाही.

कामांची विभागणी

सकाळची रोजची कामं आटोपल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य शेतात कामाला जातात. काही जण जनावरांची काळजी घेतात. काही जण दूध काढतात, तर काही मेंढ्यांची देखभाल करतात, शेण गोळा करतात आणि गोठा स्वच्छ करतात. घरातील महिलांवर स्वयंपाकाची जबाबदारी असते. सर्व मुलं सकाळी शाळेला जातात.

घरातील काही सदस्य गायींचे दूध काढतात, तर इतर जण मेंढ्या सांभाळतात आणि शेण गोळा करतात.

हनुमंथा रायडू म्हणाले की, कुटुंबात कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्यासाठी ते विवाहही एकत्रच लावतात.

ते म्हणाले, “मी माझ्या मुलांची आणि माझ्या मेव्हण्यांच्या मुलांची लग्नं एकाच दिवशी 9 धार्मिक स्थळांवर लावली. माझा मुलगा महेशचं लग्न तिथेच लावायचं अशी मी प्रतिज्ञा केली होती. जर मी फक्त एका मुलाचं लग्न लावलं असतं, तर भांडणं झाली असती. ‘त्याने फक्त आपल्या मुलाचं लग्न लावलं, बाकीच्यांना सोडलं,’ असं म्हटलं गेलं असतं. म्हणून आम्ही कुटुंबातील सर्व 9 मुलांना एकाच वेळी धार्मिक स्थळी नेलं आणि त्यांची लग्नं एकाच वेळी लावली.”

पारंपरिक पद्धतीनं स्वयंपाक

83 लोकांसाठी स्वयंपाक करण्याचं सगळं काम एकाच स्वयंपाकघरात होतं. आणि तेही लाकडाच्या चुलीवर, ही या संयुक्त कुटुंबाची खासियत आहे. या घरात सहा पिढ्यांपासून स्वयंपाकाच्या पारंपरिक पद्धती पाळल्या जात आहेत.

महेश सांगतात की, त्यांच्या कुटुंबात एकच स्वयंपाकघर आहे. एकाच परिसरात तीन घरं असूनही ते जिथं जागा मिळेल तिथे झोपतात. पण 83 लोकांसाठीचं जेवण एकाच भांड्यात बनवलं जातं.

महेश म्हणतात, “आमच्याकडे 83 लोकांसाठी एकच भांडं आहे. आम्ही आजही लाकडाची चूल वापरतो. जे काही बनवायचं ते स्वतः लाटूनच करतो. आम्ही सर्व काही नैसर्गिक पद्धतीने करतो. आम्ही आजवर गॅस किंवा गिरणीचा वापर केलेला नाही. आम्ही आजही जुन्या पद्धती पाळतो. आम्ही सहा पिढ्यांपासून एकत्र स्वयंपाक करतो आहोत, त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण होत नाही. सर्वजण एकच प्रकारचं अन्न खातात. आजही काहीही झालं तरी आम्ही सगळ्यांसाठी एकच प्रकारचं जेवण बनवतो.”

या घरात नाश्त्याची सुरुवात नाचणीचे उंडे (मुद्दे) बनवण्यापासून होते.

या घरात नाश्त्याची सुरुवात नाचणीचे उंडे (मुद्दे) बनवण्यापासून होते. शेतात कामाला जाणारे लोक हे उंडे डब्यात भरून घेऊन जातात. घरातील अनुराधा सांगतात की, हे उंडे बनवण्यासाठी दोन महिलांना मोठ्या दगडावर ते कुटावं लागतं.

अनुराधा म्हणाल्या, “आम्ही सर्वांसाठी एकसारखंच जेवण बनवतो. एकच प्रकारची भाजी, भात आणि दलिया बनवतो. आता आमच्या घरात मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी चपाती, दलिया आणि भाकरी बनवतो. आठवड्यातून एकदा सर्वांसाठी भजी, वडा आणि गोड पदार्थ करायचे असतील, तरी सर्वांसाठी करतो. आम्ही थोडं-थोडं करून बनवतो. आमच्या घरासाठी रोज 50 किलो तांदूळ लागतो.”

राजेश्वरी या इतक्या मोठ्या संयुक्त कुटुंबाच्या स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. इतर दोन जणींसह त्या शेतात जाणाऱ्यांसाठी वाहन पाठवण्यापासून दिवसातून तीन वेळा स्वयंपाक करणं आणि सर्व मुलांची काळजी घेणं ही कामं करतात.

राजेश्वरी म्हणाल्या, “आम्ही एका दिवसात तेलाचं पाकिट संपवतो. घरात 80 लोकांव्यतिरिक्त आणखी 20-30 लोक असतात. त्यांच्यासाठीही आम्हाला जेवण बनवावं लागतं. 3 किलो डाळ शिजवावी लागते, चटणी करावी लागते. चटणी आम्ही उखळात तयार करतो. नंतर ती लाकडी चुलीवर शिजवतो. सकाळी दलिया आणि दुपारी भात बनवतो. टिफिन करायचं असेल तर रात्री बनवतो. चपाती आणि भजी बनवण्यासाठी 15 किलो मैदा लागतो.”

‘रविवारी एक मेंढरू आणि 10 किलो चिकन’

महेश सांगतात, “आम्ही सकाळी रागी मुद्दे नक्की बनवतो. दुपारी भात आणि भाजी बनवतो. काही खास खायचं असेल तर ते रात्री बनवतो. सकाळी आम्ही सगळे आपापल्या कामाला निघून जातो. कारण आम्ही सगळे रात्री एकत्र येतो, त्यामुळे खास जेवण, मांसाहार किंवा टिफिन असेल तर ते रात्रीच बनवलं जातं. आम्ही जे काही खातो, ते सगळ्यांसाठी सारखंच बनवलं जातं.”

राजेश्वरी म्हणाल्या की, सण आणि जत्रांच्या वेळी त्यांना दोन मेंढरे आणि 20 किलो चिकन आणावं लागतं.

राजेश्वरी म्हणाल्या की, सण आणि जत्रांच्या वेळी त्यांना दोन मेंढरे आणि 20 किलो चिकन आणावं लागतं.

“सण आला की आम्हाला दोन मेंढरं आणि 20 किलो चिकन शिजवावं लागतं. रविवारी बनवायचं असेल तर एक मेंढरू आणि 10 किलो चिकन शिजवावं लागतं.”

सरकारी शाळांमध्ये मुलांचं शिक्षण…

या संयुक्त कुटुंबातील सर्वजण घरी कन्नड भाषा बोलतात. इतक्या मोठ्या कुटुंबात कोणीही सरकारी किंवा खासगी नोकरी करत नाही.

त्यांच्याकडे संयुक्त मालमत्तेच्या स्वरूपात 4 ट्रॅव्हल बसही आहेत. महेश यांनी सांगितलं की, इंटरमिजिएट आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करूनही कुटुंबातील मोठ्या सदस्यांसाठी इतक्या मोठ्या कुटुंबाची काळजी घेणं कठीण होत असल्याने त्यांनी पुढील शिक्षण सोडून घरची कामं हाती घेतली.

ते पुढे म्हणाले, “आमच्या कुटुंबात कुणीही नोकरी केलेली नाही. आम्ही उच्च शिक्षण घेतलेलं नाही. आम्ही इंटरमिजिएट आणि पदवीपर्यंत शिकलो. आम्ही शेती करून जगायचं ठरवलं आणि आता आम्ही सगळ्यांनी शिक्षण सोडून शेती आणि घरच्या कामांत स्वतःला झोकून दिलं आहे. आमचे ज्येष्ठही आता वयस्कर होत आहेत आणि त्यांची काळजी घेणं कठीण होत आहे, त्यामुळे आम्ही इथे राहून त्यांची काळजी घेत आहोत.”

महेश म्हणाला की, तो त्याच्या कुटुंबातील सर्व मुलांना शिकवतो आणि त्या सर्वांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये पाठवतो.

ते म्हणाले की, ते त्यांच्या कुटुंबातील सर्व मुलांना शिक्षण देत आहेत आणि त्यांना सरकारी शाळा व महाविद्यालयांमध्ये शिकवत आहेत.

महेश म्हणाले, “आम्ही आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देत आहोत. त्यांच्या काळजीसाठी आम्ही आहोत, त्यामुळे ते पुढे जावेत असं आम्हाला वाटतं. 32 मुलं शिकत आहेत. त्यापैकी 6 इंटरमिजिएटमध्ये आहेत. काहीजण पदवी घेत आहेत. आम्ही पहिलीपासून पदवीपर्यंत सर्वांना सरकारी शाळा आणि महाविद्यालयांत शिक्षण देत आहोत. आम्ही एक-दोन मुलांशी वेगळा आणि इतरांशी वेगळा असा व्यवहार करत नाही. 8 लहान मुलं अंगणवाडीत जातात. बाकी सर्वजण पहिलीपासून पदवीपर्यंत शिकत आहेत.”

‘आम्ही गरजेपुरतंच उत्पादन करतो’

हे कुटुंब आपल्या गरजांनुसार धान्य आणि भाज्यांची लागवड करतं.

महेश यांनी सांगितलं की, ते गरजेपुरतं उत्पादन स्वतःजवळ ठेवतात आणि उरलेलं बाजारात विकतात.

या कुटुंबातील काही स्त्रिया घरी काम करतात तर काही शेतात.

महेश म्हणतात, “आमच्याकडे एकूण 120 एकर जमीन आहे. आम्ही मुख्यतः मिरची, वांगी, टोमॅटो, कलिंगड, पपई आणि शेंगदाण्याची लागवड करतो. आम्ही स्वतःच विक्रीही करतो. आम्ही कलिंगड आणि पपई दिल्लीला पाठवतो, तर टोमॅटो आणि वांगी चेन्नईला पाठवतो. आम्ही ती दलालांकडे देत नाही. आम्ही ती स्वतःच्या वाहनांत भरून थेट बाजारात नेतो आणि विकतो. आमचा उदरनिर्वाह आमच्या कमाईवरच चालतो. आमच्या घरासाठी आम्ही 5 एकर जमिनीवर भाताचं पीक घेतो. तांदूळ गिरणीत दळून गरजेइतका घरी ठेवतो. उरलेला तांदूळ बाजारात पाठवतो.”

कधीच भांडण होत नाही

या संयुक्त कुटुंबात 6 सासवा आणि 14 सुना आहेत. महेश म्हणतात की, त्यांनी आपल्या घरातील महिलांमध्ये कधीही भांडण पाहिलेलं नाही.

कुटुंबातील ज्येष्ठ महिला अनुराधा म्हणाल्या, “आम्ही 6 सासवा आणि 14 सुना खूप चांगल्या प्रकारे राहतो. काहीजणी बागेत काम करतात, काहीजणी घरात काम करतात. कोणीही कोणासाठी समस्या निर्माण करत नाही. काही घडलं तर आम्ही ते लगेच सोडवतो. काहीजणी खूप बोलतात, पण त्यापलीकडे काही होत नाही. कधी वाद किंवा भांडण झालंच, तरी नंतर त्या पुन्हा पूर्वीसारख्याच एकत्र राहतात.”

कुटुंब या घरांमध्ये राहते.

राजेश्वरी म्हणाल्या की, जरी कधी थोड्यावेळासाठी मतभेद झाले, तरी संध्याकाळी सगळे पुन्हा एकत्र येऊन आनंदात वेळ घालवतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या घरातून इतर गावांत सासरी गेलेल्या महिलांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून या कुटुंबाचं कौतुक ऐकून अभिमान वाटतो.

राजेश्वरी म्हणाल्या, “मी या घरातील पाचव्या पिढीची आहे. मी या घरातील सर्वांत मोठी नात आहे आणि माझ्या आजोबांनी मला लहानपणापासून इथेच शिकवलं आहे. माझे काका आणि काकूही संयुक्त कुटुंबात राहून खूप आनंदी आहेत. आजकाल एक-दोन भाऊ असले तरी मालमत्तेसाठी वेगळे होतात. पण आमच्या गावातील लोकांना आजही 83 लोक एकत्र राहतात याचा अभिमान वाटतो.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC