Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Purn Borse
“वावरात आलो, तर मन लागत नाही, घरी आलो, तर झोप लागत नाही. लेकरं म्हणतात की, बाबा, फीचे पैसे भरायचे आहेत. याचे पैसे भरायचे, त्याचे पैसे भरायचे. मास्तरचा फोन येतो.”
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरीचे शेतकरी नंदकिशोर साठवणे त्यांची हतबलता व्यक्त करतात.
अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 50 टक्के क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचं पावसाअभावी नुकसान झालंय.
पेरणीनंतर तब्बल 1.5 महिना पावसानं दडी मारल्यानं विदर्भावर दुष्काळाचं सावट आहे.
शिरसगाव मोझरीत आमची भेट शेतकरी राजकुमार बालपांडे यांच्याशी झाली. राजकुमार यांनी 3.5 एकर क्षेत्रावर सोयाबीन आणि कपाशीची लागवड केलीय.
‘सोयाबीनमध्ये दाणाच शिल्लक नाहीये’
शेतातली परिस्थिती दाखवत राजकुमार सांगायला लागले, “2 महिन्यांपासून पाऊसच येत नाहीये. या सोयाबीनमध्ये दाणाच शिल्लक नाहीये. मला एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च आला. पण आता सोयाबीनचा 1 रुपयाही खर्च निघू शकत नाही.
“आमच्या शेतीचं सर्वेक्षण करा, असं निवेदन आम्ही शासनाला दिलं. पण आमच्या बांधापर्यंत अजून एकही शासकीय कर्मचारी पोहोचला नाही.”
परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही अशीच परिस्थिती. नंदकिशोर साठवणे यांच्याकडे 4 एकर शेती. त्यापैकी 2 एकरांवर त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी संपूर्ण पीक हातातून गेलंय.
फोटो स्रोत, Purn Borse
शेतातली परिस्थिती पाहिली की, रात्रभर झोप लागत नसल्याचं नंदकिशोर सांगतात.
ते म्हणतात, “पाण्याअभावी पूर्णपणे सोयाबीन करपून गेलं. त्यात कोणताच दम राहिलेला नाही. आता जेवावं कसं, जगावं कसं, असा खूप मोठा विचार डोक्यात येतो. रात्रभर झोप लागत नाही.”
“मला 2 मुलं आहेत. घरात मी एकटाच कमाई करणारा आहे. वावरात आलो, तर मन लागत नाही, घरी आलो, तर झोप लागत नाही. लेकरं म्हणत राह्यते की, बाबा, फीचे पैसे भरायचे आहेत.”
50 टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचं नुकसान
दुष्काळग्रस्त भागाचे 23 सप्टेंबरपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, शेतात काही उरलंच नाही, तर पंचनाम्याचे सोपस्कार कशाला? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतकरी हितेंद्र वानखडे सरकारच्या आश्वासनांवर म्हणतात, “मला गेल्या वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर्षीच्या कर्जमाफी योजनेच्या यादीत गावातील 25 शेतकऱ्यांची नावं आहेत. यादी लागली, पण आमचं त्यात नाव नाही. सरकार फक्त आम्हाला आश्वासनच देत गेलं.”
शिरसगाव आणि परिसरात शेतांमधील फिरताना सोयाबीन पूर्णपणे पिवळं पडलेलं दिसतं. शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलेलं दिसतं.
अमरावती जिल्ह्यासह विदर्भात हीच परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज निर्माण झालीय.
अमरावती विभागात या खरीप हंगामात 30 लाख 12 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीय. यापैकी 14 लाख 63 हजार हेक्टरवर सोयानची लागवड करण्यात आलीय. त्यापैकी जवळपास 50 टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
फोटो स्रोत, Purn Borse
अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक गणेश घोरपडे सांगतात, “विभागात काही ठिकाणी 30 ते 35 दिवसांचा पावसाचा खंड आहे. त्यामुळे सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला आहे. साधारण 40 ते 50 टक्के सोयाबीनचं नुकसान आहे.”
“कापसालाही वाढीच्या अवस्थेत पाऊस नसल्यामुळे नुकसान होणारच आहे. येत्या 5 दिवसांत पाऊस झाला, तर त्याचा फायदा कपाशीच्या पिकांना होऊ शकतो. तिवसा तालुक्यात 52 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती गंभीर आहे.”
“जिथे हलकी जमीन आहे, तिथे नुकसानीची तीव्रता अधिक असू शकते. सोयाबीनचं पीक हिरवं दिसत असलं, तरी त्यात दाणे भरलेले नाहीत. अपुऱ्या पावसाचा सर्वच जिल्ह्यांना फटका बसला आहे. मात्र, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे,” असं घोरपडे पुढे सांगतात.
फोटो स्रोत, Purn Borse
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
ते सांगतात, “अमरावती जिल्ह्यात सोयाबीनचं संपूर्ण नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा विचार आम्ही सोयाबीन आणि दुष्काळाबाबत केलेला आहे. दुष्काळासाठी ज्या उपाययोजना असतात त्याची आम्ही प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे.”
‘दुष्काळ जाहीर करा’
विदर्भात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झालेत. अकोला इथं 22 सप्टेंबरला शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी केली.
शेतकरी आंदोलक प्रशांत कांबळे म्हणतात, “दुबार-तिबार पेरण्या करून सोयाबीन उगवलं, मात्र आता ते निर्सगाच्या कोपामुळे करपलं आहे. शेतकऱ्यांचे कापणीचेसुद्धा पैसे निघणार नाहीये. शेतकरी पुरता हवालदिल झालाय.”
फोटो स्रोत, mahasamvad
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 सप्टेंबर रोजी विदर्भातल्या अमरावती विभागातील पीक परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीन व तूर पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल.”
यावेळी त्यांनी यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असंही नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




