Home LATEST NEWS ताजी बातमी वजन कमी करण्याच्या औषधांमुळे दारूचं व्यसनही कमी होतंय का?

वजन कमी करण्याच्या औषधांमुळे दारूचं व्यसनही कमी होतंय का?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

वजन कमी करायला औषध घेताय?

फोटो स्रोत, Peter Cade/Getty Images

लिसा रीस यांनी जेव्हा एप्रिल महिन्यात वजन कमी करायचं औषधं घ्यायला सुरुवात केली, तेव्हा फक्त काही किलोग्रॅम वजन कमी होईल, असं त्यांना वाटलं होतं.

पण या औषधामुळे असा एक साईड इफेक्ट दिसेल, ज्याला त्या औषधाचा ‘सर्वात मोठा फायदा’ मानतील, अशी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. या औषधामुळे त्या केवळ कमी जेवतच नाहीत, तर त्यांनी दारू पिणंही खूपच कमी केलं आहे.

आधी जेव्हा जेव्हा लिसा बाहेर जायच्या, तेव्हा दोन बाटल्या वाईन सहज संपवायच्या. पण आता त्या सांगतात की, “दोन ग्लास वाईन झाल्यावर पुढे एक थेंबही पिणे शक्य होत नाही.”

लिसा रीस युकेच्या साऊथ वेल्स भागात राहतात. त्या 46 वर्षीय आहेत.

वजन कमी करणारी औषधे आणि दारू पिण्याची सवय यातील संबंध समजून घेण्यासाठी आता वेगाने संशोधन सुरू आहे.

Wegovy, Mounjaro आणि Ozempic यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या औषधांमध्ये ‘सेमाग्लुटाईड’ किंवा ‘तिर्झेपाटाईड’ हे घटक असतात, जे शरीरातील नैसर्गिक ‘GLP-1’ हॉर्मोनसारखे काम करतात. यामुळे भूक कमी लागते आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे वजन सहज कमी होतं.

साउदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे डॉ. ख्रिश्चन हेंडर्शॉट यांच्या मते, सुरुवातीच्या संशोधनानुसार ही औषधे मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’वर काम करतात. त्यामुळे दारू, सिगारेट किंवा निकोटीनसारख्या व्यसनांची तलफ कमी होण्यास मदत होते.

यांनी 2025 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, दारूचं व्यसन असलेल्या लोकांनी Ozempic औषध घेतल्यावर त्यांची दारू पिण्याची इच्छा कमी झाली.

NHS च्या मते, स्वतःच्या आरोग्याला त्रास होईल अशा प्रकारे दारू पिण्याला ‘अल्कोहोल युज डिसऑर्डर’ म्हणजेच दारूचे व्यसन मानले जाते.

गेल्याच आठवड्यात ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो अँशुट्झ’चा एक नवीन अभ्यास समोर आला. त्यात असं आढळलं की, गोळ्यांच्या रूपातील ‘GLP-1’ औषधं घेतल्यामुळे दारूचं व्यसन असलेल्या लोकांचं भरपूर दारू पिण्याचं प्रमाण कमी झालं.

ही औषधं घेणाऱ्या लोकांनी ‘BBC न्यूज’ला सांगितलं की, दारूचा त्यांच्यावर वेगळाच प्रभाव पडतोय. काही लोक म्हणाले की त्यांची दारू पिण्याची इच्छाच गायब झाली. काहींना दारू पिल्यावर मळमळ किंवा पोट गच्च झाल्यासारखं वाटलं, तर काही जण नेहमीपेक्षा लवकर नशेत गेले. पण काही लोकांच्या मते, त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीत या औषधामुळे कोणताही बदल झालेला नाही.

Wegovy औषध घ्यायला सुरुवात करण्याआधी लिसा सांगतात की, त्या मित्रांसोबत आठवड्याला 6 ते 8 बॉटल वाईन संपवायच्या. पण हे जरा जास्तच होतंय का आणि यामुळे आरोग्याचं काही नुकसान तर होणार नाही ना अशी भीती त्यांना मध्येच वाटायची.

लिसा म्हणतात की, आधीसारखी वाईन पिणं आता त्यांना जमतच नाही.

फोटो स्रोत, Albane McGuinness

NHS च्या नियमांनुसार, आठवड्याला 14 युनिट्सपेक्षा जास्त दारू पिणं टाळलं पाहिजे म्हणजे साधारण 6 ग्लास वाईन किंवा 6 पिंट्स बिअर. जास्त प्रमाणात दारू पिण्याची सवय राहिल्यास पुढे जाऊन लिव्हर खराब होणे, उच्च रक्तदाब आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

लिसा सांगतात की, हे औषध घ्यायला लागल्यापासून त्यांचं दारू पिणं निम्म्यापेक्षा कमी झालं आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी पूर्ण 9 तासांत फक्त 3 ग्लास वाईन घेतली. आधी सारखं असतं तर त्यांनी दोन बॉटल वाईन आणि सोबत व्होडकाचे दोन पेग सहज मारले असते, असं त्या म्हणतात

मद्यपान हा नेहमीच त्यांच्या सामाजिक जीवनाचा एक मोठा भाग राहिला आहे. 2010 च्या आसपास जेव्हा त्यांनी काही आठवडे दारू सोडली होती तेव्हा मित्रांनी त्यांना पार्ट्यांना बोलावणं सोडून दिलं होतं. शेवटी याच भीतीपोटी त्यांनी परत दारू प्यायला सुरुवात केली होती.

या वेळी मात्र आपण अजूनही वाईन पिण्याची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं लिसा सांगतात. परंतु दोन ग्लास प्यायल्यानंतर पुढे पिणे त्यांना अजिबात सहन होत नाही.

“माझं दारू पिणं पूर्ण बंद झालेलं नाहीये, त्यामुळे मी पार्ट्यांमध्ये अजूनही सर्वांसोबत रमते, पण आता माझं पिणं खूपच कमी झालंय,” असं लिसा म्हणतात.

कोल्चेस्टरचे 45 वर्षीय वॉरेन थॉमस यांना अनेक वर्षांपासून काम उरकल्यावर घरच्यांसोबत कधीतरी बिअर पिण्याची आणि महिन्यातून 1-2 वेळा मित्रांसोबत बसून खूप दारू पिण्याची सवय होती.

पण जेव्हा वॉरेन यांनी ‘Mounjaro’ औषध घ्यायचा विचार केला आणि वजन कमी करणारी औषधं घेणाऱ्या आपल्या मित्रांशी बोलले, तेव्हा मित्रांनी त्यांना आधीच सावध केलं होतं की यामुळे त्यांच्या दारू पिण्यावर परिणाम होऊ शकतो.

जूनच्या मध्यावर पहिला डोस घेतल्यावर अवघ्या 24 तासांत हा बदल जाणवल्याचं वॉरेन म्हणतात. “मला आता दारू पिण्याची अजिबात इच्छा होत नाही,” वॉरेन सांगतात, “माझी दारू पिण्याची इच्छाच पूर्णपणे संपली आहे.”

गेल्या महिन्यात मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेल्यावर फक्त 2 बिअर प्यायल्यावरच “डोकं फिरल्यासारखं आणि थोडं गरगरल्यासारखं” वाटल्याचं वॉरेन म्हणतात.

“माझी दारू सहन करायची क्षमता आता झिरो झाली आहे,” असं ते सांगतात.

किंग्स कॉलेज लंडनचे डॉक्टर आणि वैद्यकीय प्राध्यापक रसेल हर्न यांच्या मते, डॉक्टर आणि औषधनिर्मात्यांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘ब्रिटिश नॅशनल फॉर्म्युलेरी’ या मार्गदर्शिकेमध्ये वजन कमी करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी मद्यपान पूर्णपणे बंद करावे की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही.

परंतु, ते आपल्या रुग्णांना योग्य सल्ला नक्की देतात. “दारूमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन घटवायचं असेल, तर GLP-1 औषधांसोबत खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आणि दारू कमी पिणे याचा मोठा फायदा होईल,” असं डॉक्टर सांगतात.

लिसा आणि वॉरेनसारख्यांसाठी दारू पिणं कमी होणं हा एक चांगलाच फायदा ठरला. पण नुकतीच ग्रॅज्युएट झालेल्या 20 वर्षीय फे गुडविनला मात्र वाटतं की, यामुळे तिचं फ्रेंड सर्कल आणि पार्ट्यांमध्ये जाणं कमी झालं आहे.

फे यांच्या मते, जेव्हा जेव्हा त्या दारू पितात तेव्हा त्यांना लगेच मळमळायला होतं. कधीकधी उलट्या होतात किंवा भयंकर ॲसिडिटी होते.

‘बीबीसी युअर व्हॉईस’द्वारे समोर आलेल्या फे या 18 वर्षांच्या असल्यापासून ‘Mounjaro हे औषध घेत आहेत.

त्यामुळे वजन कमी करणाऱ्या औषधांच्या प्रभावाशिवाय दारू पिणे कसे असते, याचा अनुभव त्यांना फारसा नाहीच. परंतु, त्या सांगतात की त्यांनी एकदा एक महिना या औषधाचे इंजेक्शन घेणं बंद केलं होतं तेव्हा त्यांना मळमळीचा कोणताही त्रास न होता मद्यपान करता आले होते.

 फे म्हणते की, दारू प्यायली की तिला मळमळायला होतं आणि ॲसिडिटी होते.

फोटो स्रोत, Faye Goodwin

तिच्या सध्याच्या वयात मित्रांसोबत पार्ट्या करणं आणि पिणं हा तिच्या लाईफस्टाईलचा मोठा भाग आहे.

यामुळे ज्या दिवशी इंजेक्शन घ्यायचंय त्याच रात्री जर बाहेर पार्टीचा प्लॅन असेल तर ती इंजेक्शन घेणं एक दिवस पुढे ढकलते. कारण तिच्या मते इंजेक्शन घेतल्यानंतरच्या 1-2 दिवसांतच औषधामुळे दारूचा असा त्रास जास्त जाणवतो.

या दिवशी फे यांनी औषधाचा डोस घेतलेला असतो त्या दिवशी त्या मित्रांसोबत बाहेर जायचे प्लॅन्स सरळ कॅन्सल करून टाकतात.

जेव्हा त्या दारू पितात तेव्हा बाकीच्यांपेक्षा खूपच कमी पितात. यामुळे नवीन मित्र बनवणं आणि मैत्री टिकवणं अवघड जात असल्याचं त्यांना वाटतं. केंब्रिज युनिव्हर्सिटीत असताना बऱ्याच पार्ट्या आणि कार्यक्रम दारूशीच जोडलेले असायचे त्यामुळे तिथे त्यांना सर्वांमध्ये मिसळताना मोठा त्रास सहन करावा लागला.

“बाकी सगळे पिऊन मज्जा करत असताना मला तिथे न पिता शांत बसावं लागणार हे माहीत असल्यामुळे कशातच रस वाटायचा नाही. बऱ्याचदा मी अगदी एक ग्लास वाईन किंवा दुसरं काही प्यायचा प्रयत्न केला तरी तीव्र मळमळीमुळे माझ्याने ते पूर्ण संपवलंच जायचं नाही,” असं त्या सांगतात.

सामान्य लोकांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसतं की, वजन कमी करण्याची औषधं घेताना लोकांचं दारू पिणं एकंदरीत कमी होतं. पण आत्तापर्यंतचे वैद्यकीय चाचण्या हे कधीतरी पिणाऱ्यांपेक्षा दारूचं व्यसन असलेल्या लोकांवरच जास्त केंद्रित होते.

या संदर्भातील आकडेवारी आणि माहिती “खूप वेगाने गोळा होत आहे,” असे हेंडर्शॉट सांगतात. तसेच अमेरिकेतील काही वैद्यकीय संस्था दारूचे व्यसन असलेल्या लोकांना आधीपासूनच हे औषध ‘ऑफ-लेबल’ (इतर उपचारांसाठी) देण्यास सुरुवात करत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

वजन कमी करणारी औषधं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी वापरणे कितपत योग्य आहे याबद्दल लोकांच्या मनात काही शंका आहेत, या विषयावर डॉ. डॅरिन क्वेल्च यांनी व्यसनमुक्तीचे उपचार घेणाऱ्या लोकांशी संवाद साधला आहे.

फोटो स्रोत, Dr Darren Quelch

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी या औषधाचा वापर करण्यास सरकारी किंवा अधिकृत मंजुरी मिळण्यापूर्वी, जास्त लोकांवर आणि दीर्घकाळ चालणारे मोठे अभ्यास होणे गरजेचे आहे, असे वजन कमी करण्याच्या गोळ्या आणि दारूच्या सवयीवर संशोधन करणारे डॉ. जोसेफ शाख्ट सांगतात.

वजन कमी करणारी औषधं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी वापरणे कितपत योग्य आहे याबद्दल लोकांच्या मनात काही शंका आहेत, या विषयावर डॉ. डॅरिन क्वेल्च यांनी व्यसनमुक्तीचे उपचार घेणाऱ्या लोकांशी संवाद साधला आहे.

साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीत व्यसनावर रिसर्च करणारे डॉ. डॅरिन क्वेल्च म्हणतात की, ज्यांना लठ्ठपणा किंवा मधुमेह नाही अशा लोकांनी व्यसन सोडवण्यासाठी ही औषधं घेणं सुरक्षित आहे का आणि ती औषधं सामान्य लोकांना परवडतील का, या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजून बाकी आहे.

या औषधांचे काही दुष्परिणाम देखील असू शकतात ज्यामध्ये दुर्मिळ परंतु गंभीर स्वरूपाचा ‘पँक्रियाटायटिस’ म्हणजे स्वादुपिंडाला सूज येणे हा आजारही होऊ शकतो.

धूम्रपान आणि ड्रग्ससारख्या इतर व्यसनांवर उपचारासाठी ‘GLP-1’ औषधं उपयोगी पडतील का यावरही संशोधन सुरू आहे.

वजन कमी करण्याचे इंजेक्शन्स घ्यायला लागल्यापासून मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये जाण्याचा मूडच संपल्याचं वॉरेन सांगतात. “मला आता खरोखरच तिथे जावेसे वाटत नाही… माझ्या मनात दारू पिण्याची कोणतीही तीव्र इच्छा उरलेली नाही.”

जरी त्यांनी आपल्या दारू पिण्याला कधीही समस्या किंवा अडचण मानले नव्हते. तरीही हा बदल त्यांच्यासाठी आनंददायी ठरला आहे. “कोणतेही विशेष प्रयत्न न करता दारू पिणे पूर्णपणे सुटणे हा खरोखरच खूप छान आणि नवा अनुभव आहे,” असं ते म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC