Home LATEST NEWS ताजी बातमी विद्यानंद बापट वारंवार वापरत असलेले ‘लॉजिकल फॅलसी’ म्हणजे काय, ते ओळखण्याचे 7...

विद्यानंद बापट वारंवार वापरत असलेले ‘लॉजिकल फॅलसी’ म्हणजे काय, ते ओळखण्याचे 7 मार्ग

2
0

Source :- BBC INDIA NEWS

आपलं म्हणणं खरं असल्याचं पटवून देण्यासाठी लोक अनेकदा चुकीच्या तर्काचा म्हणजेच लॉजिकल फॅलसीचा वापर करतात.

गणेशोत्सवात लावण्यात येणारे डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोहीम सुरू झाली आहे. पुण्यातील या विरोधातील मोहीम सध्या विद्यानंद बापट यांच्यामुळे जास्त चर्चेत आहे. डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत ते तर्कशुद्ध मांडणी करताना दिसतात.

आपले मुद्दे पटवून देत असताना विद्यानंद बापट वापरत असलेले शब्द, संस्कृत श्लोकांचे दाखले, अस्खलित मराठी आणि इंग्रजीचाहा तितकाच प्रभावी वापर करताना ते दिसतात.

मी कोण आहे, कुठला आहे, काय करतो यापेक्षा मी उपस्थित केलेल्या मुद्यांवर बोला असं ते म्हणतात. हे सांगताना ते ‘लॉजिकल फॅलसी’ हा एक शब्द सातत्याने वापरताना दिसतात. हे लॉजिकल फॅलसी म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया.

बीबीसी फ्युचरने 2024 मध्ये एक लेख लिहिला होता. तो आताच्या संदर्भात वाचकांना उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे या लेखाचे भाषांतर प्रसिद्ध करत आहोत. मूळ लेख या ठिकाणी वाचू शकता.

आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी काही लोक कधी-कधी ‘माहिती नाही म्हणून ते चुकीचं आहे’ म्हणजेच अज्ञानाचा आधार घेतात किंवा ‘तुम्हीही पण असंच करता’ (व्हॉट- अबाऊटिझम) अशा चुकीच्या युक्त्या वापरतात.

त्यामुळे त्यांचा युक्तिवाद अधिक पटण्यासारखा वाटतो. अशा चुकीच्या तर्काच्या किंवा तार्किक चुकांच्या पद्धती ओळखायच्या कशा, हे अमांडा रुगेरी सांगतात.

सोशल मीडियावर स्क्रोल करा, बातम्या पाहा किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी वादग्रस्त विषयावर बोलायला सुरुवात करा. काही मिनिटांतच तुमचा अशा एका सापळ्याचा सामना होण्याची शक्यता असते. अशाप्रकारचे सापळे नवीन नाहीत; त्यांचा इतिहास थेट प्राचीन ग्रीसपर्यंत जातो.

यांनाच ‘चुकीचे तर्क’, ‘तार्किक दोष’ म्हणजेच लॉजिकल फॅलसी म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर, एखादा दावा खरा आहे की नाही याच्याशी काहीही संबंध नसतानाही, तर्कातील एखादी चूक तो दावा अधिक पटण्यासारखा वाटू शकते.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Javier Hirschfeld

चुकीचा तर्क म्हणजेच ‘लॉजिकल फॅलसी’ वापरला म्हणजे एखादी व्यक्ती चुकीचीच आहे, असं नाही. पण हा तर्क जाणीवपूर्वक न वापरता चुकून वापरला असेल, तर त्यामधून चुकीचा विचार किंवा तर्कातील त्रुटी दिसून येऊ शकते. आणि तो जाणीवपूर्वक वापरला असेल, तर आपलं म्हणणं अधिक पटवण्यासाठी सत्याचा चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न असू शकतो.

दोन्ही बाबतींमध्ये हा एक इशारा किंवा धोक्याची सूचना मानायला हवी. त्यामुळे अशा वेळी जास्त प्रश्न विचारून विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. हे केवळ इतरांच्या विचारांबाबतच नाही, तर आपल्या स्वतःच्या विचारांबाबत आणि आपल्याला पटणाऱ्या युक्तिवादांबाबतही तेवढंच महत्त्वाचं आहे.

एकदा का तुम्हाला चुकीचे तर्क ओळखता येऊ लागले की, ते तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील. हे महत्त्वाचं का आहे? कारण असे तर्क ओळखण्याची जितकी सवय होईल, तितकं लोकांच्या विचारांमधील दोष ओळखणं सोपं जाईल आणि चर्चेला पुन्हा मूळ मुद्द्याकडे वळवता येईल. यामुळे स्वतःचा विचारही अधिक चिकित्सक आणि तर्कशुद्ध पद्धतीने विकसित करण्याची सवय लागेल.

इथे अशा 7 चुकीच्या तर्कांच्या (फॅलसी) पद्धती सांगितल्या आहेत, ज्या ओळखता आल्या पाहिजेत. यातील काही तर्कशास्त्रातील चुका आहेत, ज्यांना ‘औपचारिक चुका’ म्हणतात. तर काही चुका भाषा किंवा पुराव्यांचा चुकीचा वापर केल्यामुळे होतात, ज्यांना ‘अनौपचारिक चुका’ म्हणतात. पण दोन्ही प्रकारांचा परिणाम एकच होतो तो म्हणजे चुकीचा किंवा सदोष युक्तिवाद तयार होतो.

सरडे खरंच जगावर राज्य करतात का? ‘माहितीच्या अभावाचा तर्क’ म्हणजे एखादी गोष्ट चुकीची आहे हे सिद्ध झालेलं नाही, म्हणून ती खरी असू शकते, असं मानणं.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld

1. माहिती नसल्याचा फायदा घेणारा तर्क (अपील टू इग्नोरन्स)

याचा अर्थ असा की, एखाद्या गोष्टीचा पुरावा नाही म्हणून ती खरीच आहे, असं मानलं जातं. परंतु, खरं तर त्या गोष्टीचा दावा करणाऱ्या व्यक्तीनेच ती खरी असल्याचा पुरावा द्यायला हवा.

कट-कारस्थानांच्या किंवा षड्यंत्राच्या अनेक सिद्धांतांमध्ये असा चुकीचा तर्क वापरला जातो. उदाहरणार्थ, जगावर सरडे किंवा पाली राज्य करतात, असं मानणाऱ्या कोट्यवधी लोकांना तुम्ही विचारलं की, “तुमच्याकडे याचा काय पुरावा आहे?” तर ते कदाचित म्हणतील, “हे प्राणी इतके हुशार आहेत की त्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही. म्हणूनच तर ही गोष्ट धोकादायक आहे! हे खरं नाही, असं तुम्ही खात्रीपूर्वक कसं सांगू शकता?”

हे ऐकून तुम्ही कदाचित गोंधळून जाल. पण याचा अर्थ तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला किंवा सहमत आहात असा होत नाही. उलट, त्यांनी तुम्हाला ‘पुरावा नाही म्हणून गोष्ट खरी मानण्याच्या’ चुकीच्या तर्काच्या सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

2. उत्तर देता येत नाही, म्हणून व्यक्तीवर टीका (ॲड होमिनेम)

एखाद्याचं म्हणणं चुकीचं ठरवण्यासाठी त्याच्या मुद्द्याला उत्तर न देता त्या व्यक्तीच्या स्वभावावर, ओळखीवर, हेतूंवर किंवा इतरांशी असलेल्या संबंधांवर टीका करणं, म्हणजे ‘ॲड होमिनेम’ हा चुकीचा तर्क.

उदाहरणार्थ, एखादा डॉक्टर लसीकरणाचा सल्ला देत असेल, तर “तुम्ही हे फक्त मोठ्या औषध कंपन्यांकडून (बिग फार्मा) पैसे घेत असल्यामुळे सांगत आहात,” असं म्हणणं. किंवा हवामान बदलावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं केवळ “त्यांचा स्वतःचा काही वैचारिक हेतू आहे,” असं म्हणून नाकारणं.

याहूनही स्पष्ट उदाहरण म्हणजे एखाद्या राजकीय उमेदवाराच्या बोलण्यावर उत्तर देण्याऐवजी त्याच्या कपड्यांवर, गोल्फ खेळण्यावर किंवा हेअरस्टाइलवर टीका करून तो चांगला नेता होऊ शकत नाही, असं म्हणणं.

म्हणजेच, मुद्द्याला उत्तर न देता व्यक्तीवर टीका करणं हा ॲड होमिनेम तर्काचा प्रकार आहे.

'स्लिपरी स्लोप' म्हणजे

फोटो स्रोत, Javier Hirschfeld

3. पुढे काय होईल, याची भीती दाखवणारा तर्क (स्लिपरी स्लोप)

‘स्लिपरी स्लोप’ म्हणजे एखादं पाऊल उचललं किंवा निर्णय घेतला, तर त्यानंतर हळूहळू आणखी मोठे आणि टोकाचे निर्णय घ्यावे लागतील, असा तर्क. जसं एखादी वस्तू उतारावरून घसरत गेली की ती खालीच जात राहते, तसंच काहीतरी होईल, असं यात सांगितलं जातं.

तज्ज्ञांचं मत महत्त्वाचं असतं, परंतु, 'अधिकाराचा आधार घेणे' (अपील टू ऑथॉरिटी) मध्ये फक्त एखादी व्यक्ती मोठी किंवा प्रसिद्ध आहे म्हणून तिचं म्हणणं खरं मानलं जातं.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld

अशा प्रकारचा तर्क धोरणांवर चर्चा करताना अनेकदा वापरला जातो. उदाहरणार्थ, अमेरिका किंवा युरोपमधील काही ठिकाणी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याला विरोध करणारे लोक म्हणत होते की, असा निर्णय घेतला तर समाजात लैंगिक स्वैराचार वाढेल आणि त्यामुळे त्यांची जीवनपद्धती धोक्यात येईल. 2016 मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस’मधील संशोधकांना असं आढळून आलं की, या भीतीमुळे अनेक लोकांचं मत या युक्तिवादामुळे बदललं होतं.

परंतु, हा चुकीचा तर्क आहे. कारण समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, या मूळ मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी, पुढे काय वाईट होईल या भीतीवरूनच या निर्णयाला विरोध केला जातो. म्हणजेच, प्रत्यक्ष मुद्द्याऐवजी त्यातून होऊ शकणाऱ्या परिणामांची भीती दाखवली जाते.

4. मुद्दा सोडून वेगळ्याच गोष्टीला उत्तर देणं (स्ट्रॉमॅन)

हा प्रकार सोशल मीडियावर आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतो. यात समोरच्या व्यक्तीने मांडलेला मुद्दा जसा आहे तसा समजून घेण्याऐवजी, तो मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला किंवा सादर केला जातो. तो मुद्दा हास्यास्पद किंवा मूर्खपणाचा वाटावा आणि त्याला सहज खोडून काढता यावं, हा त्यामागचा उद्देश असतो.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती म्हणते की, जास्त साखर खाल्ल्यामुळे हृदयविकारासारख्या आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. त्यावर ‘स्ट्रॉमन’ पद्धतीची प्रतिक्रिया अशी असू शकते, “म्हणजे काय, साखरेमुळे सगळेच मरत आहेत आणि साखरेवर बंदीच घालायला हवी, असं तुमचं म्हणणं आहे का? किती मूर्खपणाचं आहे हे!”

परंतु, प्रत्यक्षात पहिल्या व्यक्तीने असं काहीही म्हटलेलं नसतं. त्या व्यक्तीचा मूळ मुद्दा बदलून तो अतिशयोक्तीने मांडला जातो आणि नंतर त्याच मुद्द्यावर टीका केली जाते. यालाच ‘स्ट्रॉमन’ म्हणजेच समोरच्याचं म्हणणं बदलून त्यावर टीका करणं, असं म्हणतात.

याला टाळण्याचा आणि स्वतःची विचार करण्याची पद्धत अधिक चांगली करण्याचा एक मार्ग म्हणजे ‘स्टीलमन’ पद्धत. यात समोरच्या व्यक्तीचा मुद्दा चुकीचा ठरवण्याआधी, तो मुद्दा शक्य तितक्या चांगल्या आणि योग्य पद्धतीने मांडायचा. कदाचित समोरच्या व्यक्तीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने. त्यानंतर आपण त्या मुद्द्याशी का असहमत आहोत, हे सांगायचं.

5. मोठ्या नावाचा आधार घेणारा तर्क (अपील टू ऑथॉरिटी)

या चुकीच्या तर्कात एखाद्या व्यक्तीची पदवी, प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा पाहून ती व्यक्ती बरोबरच बोलत असणार, असं मानलं जातं. एखाद्या व्यक्तीला लोक तज्ज्ञ किंवा मोठी व्यक्ती मानत असतील, तर ती व्यक्ती प्रत्येक विषयात तज्ज्ञ असेलच, असं आपल्याला नकळत वाटू शकतं. अगदी ज्या विषयाचा तिला काहीच अनुभव किंवा पार्श्वभूमी नाही, त्या विषयातही.

परंतु, हा तर्क काही अंशी बरोबर वाटू शकतो. कारण एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयाचं चांगलं ज्ञान आणि अनुभव असेल, तर त्या विषयावरचं तिचं मत नक्कीच इतरांपेक्षा जास्त विश्वासार्ह असू शकतं. आणि ते खरंही आहे.

पण ही गोष्ट चुकीची ठरते, जेव्हा आपण एखाद्याचं म्हणणं केवळ ती व्यक्ती कोण आहे म्हणून खरं मानतो. तिच्या म्हणण्यामागे काय पुरावे आहेत किंवा तिचा तर्क किती योग्य आहे, हे न पाहता केवळ तिची प्रसिद्धी, पद किंवा प्रतिष्ठा पाहून तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे ‘अपील टू ऑथारिटी’ हा चुकीचा तर्क.

यापेक्षाही जास्त चुकीचा प्रकार म्हणजे ‘असंबंधित व्यक्तीच्या मताचा आधार घेणं’. उदाहरणार्थ, एखादा सेलिब्रिटी एखाद्या विषयावर काही सांगतो आणि आपण ते खरं मानतो, जरी त्या विषयाची त्याला काहीही माहिती नसली तरी. आजच्या इन्फ्लुएन्सरच्या काळात असा प्रकार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो.

परंतु, एखादी व्यक्ती या विषयाची तज्ज्ञ नाही, हे नेहमी लगेच लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, हवामान बदलाबद्दल चर्चा करताना काही लोक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञाचं मत तज्ज्ञाचं मत म्हणून सांगतात. पण सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा हवामानशास्त्राशी फारसा संबंध नाही.

म्हणजेच, एखादी व्यक्ती एका विषयात तज्ज्ञ आहे, म्हणून ती प्रत्येक विषयात तज्ज्ञ असूच शकेल असं नाही. त्यामुळे एखाद्याचं म्हणणं केवळ तो प्रसिद्ध आहे किंवा तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो म्हणून खरं मानणं अत्यंत चुकीचं ठरू शकतं.

6. फक्त दोनच पर्याय आहेत, असं दाखवणारा चुकीचा तर्क (फॉल्स डायकोटॉमी)

एखादा गुंतागुंतीचा विषय समजावून सांगताना केवळ दोनच पर्याय आहेत, असं दाखवणं म्हणजे ‘फॉल्स डायकोटॉमी’. म्हणजेच, ‘हे नाही तर तेच’ असं सांगणं, जरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असले तरी.

याचं एक प्रसिद्ध उदाहरण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी 9/11 हल्ल्यानंतर वापरलेल्या वाक्यात पाहायला मिळतं. ते म्हणाले होते, “एकतर तुम्ही आमच्यासोबत आहात किंवा आमच्या विरोधात.” याचा अर्थ असा घेतला गेला की, जगातील देशांनी अमेरिकेला पूर्णपणे पाठिंबा द्यावा, अफगाणिस्तानवरील अमेरिकेच्या हल्ल्यालाही पाठिंबा द्यावा; नाहीतर त्यांना अमेरिकेचा विरोधक मानलं जाईल.

परंतु, प्रत्यक्षात तसं नव्हतं. देशांकडे याशिवायही इतर अनेक पर्याय होते. ते अमेरिकेला काही बाबतीत पाठिंबा देऊ शकत होते, काही बाबतीत विरोधही करू शकत होते किंवा वेगळी भूमिकाही घेऊ शकले असते. म्हणजेच, प्रत्यक्षात अनेक पर्याय असताना केवळ दोनच पर्याय आहेत, असं दाखवणं हा ‘फॉल्स डायकोटॉमी’ म्हणजेच चुकीचा तर्क आहे.

'व्हॉटअबाउटिझम' म्हणजे मूळ मुद्द्यावर उत्तर न देता लक्ष दुसऱ्याच मुद्द्याकडे वळवण्याचा एक मार्ग आहे.

फोटो स्रोत, Javier Hirschfeld

7. मूळ मुद्दा टाळून दुसराच मुद्दा पुढे करणं (व्हॉटअबाउटिझम)

‘व्हॉटअबाउटिझम’ हा असा चुकीचा तर्क आहे, ज्यात मूळ मुद्द्यावर उत्तर न देता लक्ष दुसऱ्याच गोष्टीकडे वळवलं जातं. याला ‘रेड हेरिंग’ म्हणजेच चर्चेचा मुद्दा भरकटवण्याचा एक प्रकारही मानलं जातं.

सामान्यपणे एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारला किंवा त्याच्यावर आरोप केला, की तो त्याचं उत्तर देण्याऐवजी समोरच्याच्यावरच दुसरा आरोप करतो.

उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या जोडीदाराला म्हणता, “तू असं केलंस तेव्हा माझ्या भावना दुखावल्या, वाईट वाटलं.” त्यावर तो किंवा ती म्हणते, “पण तू कधीच घरातील कचरा बाहेर टाकत नाहीस!”

इथे तुमच्या मूळ तक्रारीचं उत्तर दिलं गेलेलं नाही. त्याऐवजी तुमच्याच एका वेगळ्या चुकीचा मुद्दा पुढे केला आहे. यालाच ‘व्हॉटअबाउटिझम’ म्हणतात.

राजकारणात व्हॉटअबाउटिझमचं एक प्रसिद्ध उदाहरण रशियाशी संबंधित आहे. रशियावर मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप झाला की, तिथले नेते अनेकदा उलट विचारतात, “मग पाश्चात्य देशांचे काय?”

असं केल्याने पश्चिमेकडील देशांकडून होणारा दुटप्पीपणा दाखवता येतो. परंतु, त्याचवेळी रशियावर झालेल्या मूळ आरोपापासून लक्ष दुसरीकडे वळतं.

सोप्या भाषेत सांगायचं तर, दुसऱ्यानेही चुकीचं केलं आहे, म्हणून आपली चूक बरोबर ठरत नाही. पण व्हॉटअबाउटिझममुळे तसं असल्याचा भास निर्माण होतो.

अशा चुकीच्या तर्कांना किंवा तार्किक दोषांना ओळखता आलं, तर आपण वाचत किंवा पाहत असलेल्या गोष्टींचा नीट विचार करता येतो. चर्चेत विषय भरकटला तर तो पुन्हा मूळ मुद्द्यावर आणणंही सोपं होतं.

परंतु, आपण सुरुवातीपासूनच बारकाईने विचार करण्याबद्दल बोलत आहोत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एखाद्याने चुकीचा तर्क वापरला, म्हणजे त्याचं म्हणणं चुकीचंच आहे, असंही नाही. उलट, असं मानणं हीसुद्धा एक चुकीची विचार करण्याची पद्धत आहे. यालाच ‘फॅलसी फॅलसी’ म्हणतात.

(अमांडा रुगेरी या पुरस्कार विजेत्या विज्ञान आणि फीचर क्षेत्रातील पत्रकार आहेत. त्या तज्ज्ञांचं मत, माध्यमांमधील माहिती आणि अशाच इतर विषयांवर इन्स्टाग्रामवर @mandyruggeri या अकाउंटवर त्या आपले मत मांडतात. )

SOURCE : BBC