Home LATEST NEWS ताजी बातमी वेलनेस रिट्रीटचा खर्च परवडत नाही? निरोगी आरोग्यासाठीच्या ‘या’ सवयी जाणून घ्या…ज्या आहेत...

वेलनेस रिट्रीटचा खर्च परवडत नाही? निरोगी आरोग्यासाठीच्या ‘या’ सवयी जाणून घ्या…ज्या आहेत एकदम मोफत

3
0

Source :- BBC INDIA NEWS

निरोगी आरोग्यासाठीच्या सवयी ज्या तुम्ही आत्ताच सुरू करू शकता - अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात

फोटो स्रोत, Getty Images

‘वेलनेस’ हा सध्याचा एक मोठा ट्रेंड बनला असला, तरी या निरोगी जीवनशैलीसाठी मोठी किंमत मोजावी लागते हेही तितकेच खरे.

आलिशान स्पा, पंचतारांकित हॉटेल्समधील महागडे साऊंड बाथ सेशन्स आणि हजारो रुपयांची उधळपट्टी करायला लावणारे वेलनेस रिट्रीट्स… हे सर्व अनुभव आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या लोकांसाठी ठीक आहेत.

परंतु सामान्य माणसाने काय करावे? तुमचे बँक खाते रिकामे न करताही मन, शरीर आणि आत्मा तंदुरुस्त कसे ठेवावे, याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी दिलेले काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत.

वेलनेस ग्रुप्समध्ये सामील व्हा

महागड्या फिटनेस किंवा योग स्टुडिओचे सदस्यत्व प्रत्येकालाच परवडते असे नाही म्हणूनच लोक एकत्र येऊन मोफत किंवा कमी खर्चात वेलनेस मीट-अप्स आयोजित करण्याचा नवा मार्ग निवडत आहेत. सोशल मीडियावरील स्थानिक कम्युनिटी ग्रुप्स आणि ‘Meetup’ ॲपच्या माध्यमातून अशा उपक्रमांचा सहज शोध घेता येतो.

उदाहरणादाखल सांगायचे तर योग शिक्षिका अनस्तासिया मिरास्लावस्का लंडनमध्ये ‘संडे रिसेट’ या संकल्पनेखाली अशा मेळाव्यांचे आयोजन करतात. यात सहभागी होणारे लोक योगा आणि ध्यानासाठी दरमहा शहरातील निरनिराळ्या उद्यानांमध्ये भेटतात.

शिवाय झूम ॲपवरही त्यांचे ऑनलाइन मेडिटेशन सेशन्स चालतात. यातील काही सत्रांसाठी सुमारे £10 (अंदाजे 1,100 रुपये) इतकी माफक फी असते, तर बाकीची सर्व सत्रे सर्वांसाठी अगदी मोफत असतात.

निरोगी आरोग्यासाठीच्या सवयी ज्या तुम्ही आत्ताच सुरू करू शकता - अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी बीबीसीला सांगितले की, “लोकांना योगासने आणि ध्यानधारणा अगदी सोप्या आणि सहज उपलब्ध होईल अश्या मार्गाने अनुभवता यावी, अशी एक जागा मला तयार करायची होती.”

लिव्हरपूलमध्ये मॉडेल एरिका कोरियाही अशाच प्रकारचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ‘सॉफ्ट संडे’ नावाच्या एका नियमित मीट-अपचे आयोजन सुरू केले आहे. जिथे लोक खास निवडक वेलनेस अनुभवांसाठी एकत्र येतात. त्यांच्या मागील सत्रात पिलेट्स व्यायाम क्लास आणि त्यानंतर सौंदर्यविषयक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यांनी बीबीसीला सांगितले, “‘सॉफ्ट संडे’चा संपूर्ण भर हा खर्चापेक्षा हेतूवर अधिक आहे. वेलनेस म्हणजे तुम्ही आयुष्यात कोणते निर्णय घेता आणि तुमचा वेळ कसा सांभाळता यावर बरेच काही अवलंबून असते.”

सध्या हे सत्र केवळ निमंत्रितांसाठीच मर्यादित असले तरी लवकरच ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची इच्छा आहे.

बागकामाला सुरूवात करा

बागकाम हे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते; आणि यासाठी झाडे किंवा साहित्यावर शेकडो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज नसते.

‘रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी’च्या संशोधनात असे आढळून आले आहे की, दररोज बागकाम करणाऱ्या लोकांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहते आणि त्यांचा मानसिक ताणतणावही खूप कमी होतो.

निरोगी आरोग्यासाठीच्या सवयी ज्या तुम्ही आत्ताच सुरू करू शकता - अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात

फोटो स्रोत, Getty Images

स्वतःचे स्वतंत्र अंगण किंवा बाग नसेल तरी चिंता नको.. अनेक स्थानिक संस्था अगदी नाममात्र वार्षिक शुल्कात बागकामासाठी लहान प्लॉट भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देतात.

याशिवाय ‘कम्युनिटी गार्डन्स’चा पर्यायही उत्तम ठरतो. ‘गुड टू ग्रो’ मॅप किंवा आरएचएसच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या जवळच्या अशा बागांची सहज माहिती मिळवू शकता. अशा ठिकाणी स्वयंसेवक म्हणून विनामूल्य सहभागी होता येते. तिथे लागणारी सर्व साधने आणि अवजारे मोफत पुरवली जातात. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, नवीन लोकांशी मैत्री करणे आणि नवी कौशल्ये आत्मसात करणे प्रत्येकाला सहज शक्य होते.

लोकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारण्यासाठी बागकामाचा वापर करणाऱ्या ‘थ्राइव्ह’ या चॅरिटी संस्थेच्या मते, सामुदायिक बागा ही संकल्पना केवळ झाडे लावण्यापुरती मर्यादित नाही.

याविषयी बोलताना संस्थेचे प्रशिक्षण आणि शिक्षण व्यवस्थापक डेमियन न्यूमन यांनी सांगितले, “या उपक्रमांमुळे लोकांना प्रत्यक्ष निसर्गाशी जोडले जाण्याचा आनंद तर मिळतोच शिवाय एका आपुलकीच्या आणि नव्या मित्रपरिवाराशी जुळण्याची हक्काची संधीही उपलब्ध होते.”

ते पुढे म्हणाले, “हे आपल्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक अशा सर्वच पातळ्यांवर याचा चांगला परिणाम होतो.”

एखादा ‘पारंपरिक’ किंवा जुन्या धाटणीचा छंद जोपासा

पक्षीनिरीक्षणापासून ते विणकामापर्यंत एकेकाळी जुन्या पद्धतीचे मानले जाणारे छंद आता नव्याने लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

खिशाला कात्री न लावता मानसिक शांतता आणि आनंद मिळवण्यासाठी लोक या पारंपरिक पर्यायांकडे वळत आहेत.यूके मध्ये अशा हौशी पक्षीप्रेमींचे अनेक ग्रुप्स आणि ऑनलाइन कम्युनिटीज आहेत. तुमच्या जवळचे पक्षीनिरीक्षण गट शोधण्यासाठी तुम्ही थेट आरएसपीबीच्या (RSPB) वेबसाईटची मदत घेऊ शकता.

निरोगी आरोग्यासाठीच्या सवयी ज्या तुम्ही आत्ताच सुरू करू शकता - अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात

फोटो स्रोत, Getty Images

पक्षीनिरीक्षणाचे मोल केवळ निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. एका अभ्यासानुसार दिवसातील केवळ 30 मिनिटे पक्षी पाहण्यात घालवल्यास मन प्रसन्न होते, मानसिक आरोग्य सुधारते आणि निसर्गाशी एक अनोखे बंध जुळल्याची अनुभूती मिळते.

त्याचप्रमाणे, विणकामाची कला पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आली आहे आणि अवघ्या किरकोळ खर्चात ती सुरू करता येते. यासाठी केवळ एक सुई आणि लोकरीचा साधा गुंडा एवढेच साहित्य पुरेसे ठरते.

विविध अभ्यासांनुसार, विणकाम हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीव्र मानसिक ताण, एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने झालेले दुःख, दीर्घकालीन आजारपण आणि जीवनातील कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी या विणकामाने थेरपीसारखे काम केल्याचा अनुभव अनेक लोकांनी व्यक्त केला आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात करा व्यायामाची सुरुवात…

फिटनेससाठी महागड्या जिमवरच अवलंबून राहावे असे अजिबात नाही. बॉडीवेट वर्कआउट्स, मोकळ्या हवेतील योगासने किंवा साधे धावणे…खिशावर कोणताही अतिरिक्त भार न टाकता स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेक सहज आणि विनामूल्य पर्याय आपल्यासमोर आहेत.

बॉडीवेट ट्रेनिंग, ज्याला ‘कॅलिस्थेनिक्स’ असेही म्हटले जाते. यामध्ये शरीराची ताकद वाढवण्यासाठी पुश-अप्स, स्क्वॅट्स आणि पुल-अप्ससारख्या व्यायामांमध्ये स्वतःच्याच शरीराच्या वजनाचा वापर केला जातो. यासाठी उपकरणांची फारशी किंवा कोणतीही गरज भासत नसल्याने घरी अथवा परिसरातील स्थानिक उद्यानात शारीरिक ताकद, लवचिकता आणि शरीराचा तोल सुधारण्याचा हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे.

निरोगी आरोग्यासाठीच्या सवयी ज्या तुम्ही आत्ताच सुरू करू शकता - अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात

फोटो स्रोत, Getty Images

धावण्याची आवड लोकांमध्ये वेगाने वाढत असून आता सुमारे 71 लाख प्रौढ व्यक्ती यात सहभागी होत आहेत. गेल्या वर्षभरात या संख्येत 5 लाखांहून अधिक वाढ झाली आहे. अनेकजण स्थानिक ‘रन क्लब’मध्ये सामील होत आहेत किंवा स्वतःहून धावण्याचा सराव करत आहेत.

नवीन शिकणाऱ्यांसाठी ‘NHS Couch to 5K’ हा 9 आठवड्यांचा मोफत कार्यक्रम आहे. याद्वारे स्टॅमिना टप्प्याटप्प्याने वाढवून सलग 5 किलोमीटर धावण्यास मदत होते. हा टप्पा गाठल्यानंतर, यूकेमध्ये दर शनिवार-रविवार मोफत होणाऱ्या सुमारे 1,500 ‘पार्क रन’ उपक्रमांपैकी एखाद्या ठिकाणी तुम्ही धावण्याचा सराव करू शकता. तुमच्या जवळचा असा रनिंग स्पॉट शोधण्यासाठी पार्क रनच्या वेबसाइटवर जाऊन पाहा.

‘साउंड बाथ’च्या माध्यमातून शोधा मनाची शांतता

साउंड बाथ’ सध्या 2026 मधील सर्वात मोठा ट्रेंड ठरत आहे.

ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी साउंड बाथ म्हणजे अशी थेरपी, जिथे तज्ज्ञ व्यक्ती क्रिस्टल किंवा तिबेटी ‘साउंड बाऊल्स’, गॉन्ग म्हणजे थाळीसारखे वाद्य आणि घंटांचा वापर करून शांत आणि सुखद नाद निर्माण करतात. हा नाद मन शांत करतो, ताण कमी करतो आणि यातील ध्वनीलहरी तुम्हाला खोल ध्यानधारणेत नेण्यास मदत करतात.

हे अत्यंत रिलॅक्सिंग असते आणि त्या ध्वनीकंपनांमुळे मन शांत होऊन मेडिटेशनच्या स्थितीत जाणे सोपे होते.

मात्र तुम्ही कुठे राहता त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन ही सत्रे घेणे खिशाला परवडणारे नसते किंवा सहजासहजी मिळतही नाहीत.

निरोगी आरोग्यासाठीच्या सवयी ज्या तुम्ही आत्ताच सुरू करू शकता - अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात

फोटो स्रोत, Getty Images

यावर खिशाला परवडणारा उपाय म्हणजे तुम्ही युट्यूब किंवा स्पॉटिफायवर साउंड बाथचे ऑडिओ शोधून घरबसल्या रिलॅक्स होऊ शकता. काही मेडिटेशन अ‍ॅप्समध्येही असे ऑडिओ उपलब्ध असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही ध्यानधारणा करू शकता. मात्र त्यासाठी काही वेळा सबस्क्रिप्शन शुल्क द्यावे लागू शकते.

‘ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ साउंड थेरपी’च्या संस्थापिका लिझ कूपर यांनी बीबीसीला सांगितले की, ऑनलाइन मिळणाऱ्या रेकॉर्डिंग्जच्या क्वालिटीमध्ये फरक असू शकतो. तरीही इंटरनेटवर उत्तम दर्जाचे पर्याय नक्कीच उपलब्ध आहेत. फक्त ते अनुभवी तज्ज्ञ किंवा प्रतिष्ठित संस्थांनी तयार केलेले आहेत का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

“शांत वातावरणात झोपून, डोळे मिटून मोठ्या हेडफोन्सच्या माध्यमातून हे ध्वनी ऐकल्यास त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आश्चर्यकारक उपचारात्मक लाभ मिळू शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी त्या म्हणाल्या, “महत्त्वाचे हेच आहे की, प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीला अनुकूल ठरेल आणि प्रत्यक्षात सातत्य ठेवता येईल अशीच वेलनेस पद्धत शोधून ती अंगीकारली पाहिजे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC