Home LATEST NEWS ताजी बातमी शौचालयात दिसला 1 मीटर लांबीचा जंत, काही वर्षांनी महिलेच्या मेंदूत आढळले 38...

शौचालयात दिसला 1 मीटर लांबीचा जंत, काही वर्षांनी महिलेच्या मेंदूत आढळले 38 परजीवी

2
0

Source :- BBC INDIA NEWS

लोअरी डेनमन

“शौचानंतर टॉयलेट फ्लश केला तेव्हा मला जवळजवळ 1 मीटर लांबीचा पट्टकृमी (Tapeworm) दिसला.”

ब्रिटनमधील कार्मार्थेन येथे राहणाऱ्या 42 वर्षीय लोअरी डेनमन या त्यांच्या आजारबद्दल सांगत होत्या.

“तो जीव पाहिल्यानंतर मला किळसच वाटली. एका सेलोटेपसारखा त्याचा आकार होता,” असं डेनमन सांगतात.

हा प्रकार म्हणजे लोअरी डेनमन यांना झालेल्या न्यूरोसिस्टिसर्कोसिस (Neurocysticercosis) आजाराचं पहिलं लक्षण होतं.

या दरम्यान त्यांच्या मेंदूत तब्बल 38 परजीवींनी प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखी, झटके आणि मानसिक गोंधळाचा त्रास सुरू झाला.

ब्रिटनमध्ये दरवर्षी अशा प्रकारच्या मेंदूच्या संसर्गाचं निदान होणाऱ्या मोजक्या रुग्णांपैकी डेनमन एक आहेत.

हा आजार पोर्क टेपवर्मच्या अळ्यांमुळे होतो. हा टेपवर्म डुकराच्या मांसातून मानवी शरीरात जातो. अनेक वर्षांच्या उपचारांनंतर आणि प्रकृतीत सुधारणा त्यांच्या तब्येतीत सुधारणा झालीय.

आता डेनमन त्यांचा अनुभव इतरांसोबत शेअर करत आहे, जेणेकरून लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी आणि या आजाराबद्दल अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचावी असं त्यांना वाटतं.

तीन महिन्यांचा भारत दौरा

मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या डेनमन यांनी 2007 मध्ये तीन महिन्यांसाठी भारताचा दौरा केला होता.

त्यांच्यावर उपचार करणारे संसर्गजन्य आजार आणि सूक्ष्मजीवशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. ब्रेंडन हिली यांच्या मते, त्यांना याच काळात संसर्ग झाला असावा.

अन्नातून विषबाधा होऊ नये म्हणून डेनमन यांनी या दौऱ्यात मांसाहार टाळण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, डॉ. हिली यांच्या मते, त्यांनी नकळत डुकराच्या मांसात असणाऱ्या टेपवर्मची सूक्ष्म अंडी असलेलं अन्न खाल्लं असावं.

2010 मध्ये म्हणजे तीन वर्षांनंतर एका रेस्तरॉच्या शौचालयात डेनमन यांना पट्टकृमी जंतू दिसला. हा एक परजीवी आहे. त्यांनी तो फ्लश करून टाकला.

त्यानंतर डेनमन यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र, त्यांच्या शौचाच्या नमुन्याची तपासणी सामान्य आली. त्यावेळी त्यांची प्रकृतीही चांगली होती. त्यांचं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू राहिलं.

पण, पुढील वर्षभरात त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. तर 2011 मध्ये त्यांना पहिला झटका किंवा पॅनिक अटॅक आला.

2007मधील लोअरी डेनमन यांचा भारतात असतानाचा फोटो

फोटो स्रोत, Lowri Denman

डेनमन म्हणाल्या, “मला एक शब्दही बोलणं कठीण जात होतं. शुद्धीवर आले तेव्हा मी अँब्युलन्समध्ये होते. हे माझ्यासोबत कसं घडलं, असा प्रश्न मला पडला होता.”

यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांचा सीटी स्कॅन आणि MRI तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल सांगण्यासाठी त्यांना पुन्हा बोलावण्यात आलं.

डेनमन पुढे सांगतात, “दुसऱ्या भेटीत डॉक्टर म्हणाले की आम्ही तुमचा सीटी स्कॅन तपासला आहे. त्यामध्ये तुमच्या मेंदूत 38 परजीवी आढळले आहेत. हे ऐकून मी आणि माझी आई दोघीही हादरलो. नेमकं काय घडलंय, हेच आम्हाला समजत नव्हतं.”

सुरुवातीला डॉक्टरांना त्यांना टॉक्सोप्लाझ्मोसिस (Toxoplasmosis) हा संसर्ग झाल्याचा संशय होता. संक्रमित मांजरीच्या विष्ठेच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो.

पण डेनमन यांच्या आईने वर्षभरापूर्वी सापडलेल्या पट्टकृमी जंतूचा आणि झटक्यांचा काही संबंध असू शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यानंतर करण्यात आलेल्या सविस्तर तपासण्यांमध्ये डेनमन यांना न्यूरोसिस्टिसर्कोसिस झाल्याचं निश्चित झालं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, कच्चं किंवा पूर्णपणे न शिजलेलं डुकराचं मांस खाणे, टेपवर्मची अंडी असलेलं दूषित अन्न किंवा पाणी सेवन करणे किंवा अस्वच्छतेमुळे हा संसर्ग होऊ शकतो.

ब्रिटनमध्ये हा आजार अत्यंत दुर्मीळ आहे. बहुतेक रुग्ण हे संसर्गाचं प्रमाण जास्त असलेल्या भागांतून आलेले असतात.

आजार निश्चित झाल्यानंतर डेनमन यांना दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्यावर औषधं आणि स्टेरॉइड्सद्वारे उपचार करण्यात आले.

फोटो स्रोत, Lowri Denman

डेनमन म्हणाल्या, “त्या काळात माझ्या मनात असंख्य प्रश्न होते. माझ्या आरोग्याचं पुढे काय होणार, याची मला काहीच कल्पना नव्हती. पुढे काय होईल? कोणत्या अडचणी येतील? कोणती औषधं घ्यावी लागतील? मी पुन्हा कामावर जाऊ शकेन का? इत्यादी इत्यादी.”

आजार निश्चित झाल्यानंतर डेनमन यांना दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. त्यांच्यावर औषधं आणि स्टेरॉइड्सद्वारे उपचार करण्यात आले.

काही काळ उपचारांचा चांगला परिणाम होत असल्याचं दिसून आलं.

पुढील काही वर्षे त्यांची प्रकृती चांगली होती. त्या बहिणीसोबत न्यूझीलंडला गेल्या. तसंच ब्रिस्टलमध्ये राहिल्या, सर्कसचं प्रशिक्षण घेतलं आणि हाफ मॅरेथॉन स्पर्धेतही सहभागी झाल्या.

पण एके दिवशी काम करत असताना त्या अचानक बेशुद्ध पडल्या.

मानसिक आरोग्यावर परिणाम

पुढील तपासण्यांमध्ये डेनमन यांच्या मेंदूतील परजीवींभोवती मोठ्या प्रमाणात सूज आढळली.

बेशुद्ध पडल्याच्या घटनेनंतर त्यांचा वारंवार मानसिक गोंधळ होऊ लागला. तसेच शरीरात बधिरपणा आणि मुंग्या आल्यासारखा त्रासही सुरू झाला.

डेनमन यांना नोकरी सोडावी लागली आणि त्या वेल्समधील कार्मार्थेन येथे वडिलांसोबत राहू लागल्या.

त्यांच्यावर स्टेरॉइड्सचे उपचार सुरू करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या शरीरात आणि चेहऱ्यावर बदल झाले. आयुष्य अधिक मर्यादित होत गेल्याने त्या तीव्र नैराश्यात गेल्या.

त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. डेनमन यांनी न्यूरोसायकियाट्रिक हॉस्पिटलमध्ये सहा आठवडे उपचार घेतले.

त्या म्हणाल्या, “मला सतत भ्रम होऊ लागले आणि मानसिक गोंधळ वाढला. मी खूप चिंताग्रस्त झाले आणि मला पॅनिक अटॅक येऊ लागले. माझी प्रकृती सतत खालावत होती.”

2015मध्ये लोअरी डेनमन आपल्या बहिणीसोबत हॉस्पिटलमध्ये तपासणीची वाट पाहत असताना.

फोटो स्रोत, Lowri Denman

त्या पुढे सांगतात, “माझी अवस्था इतकी का बिघडली, हे माझ्या कुटुंबीयांनाही समजत नव्हतं. माझे मित्र-मैत्रिणी मला भेटायला यायचे आणि माझी अवस्था पाहून अस्वस्थ व्हायचे.”

त्यांना भेटणाऱ्यांमध्ये त्यांची 20 वर्षांपासूनची मैत्रीण निकोला ब्राउन यांचाही समावेश होता.

आजाराचं निदान झाल्याच्या एक महिन्यानंतर डेनमन यांना भेटायला गेलेल्या निकोला यांना त्यांची अवस्था पाहून धक्का बसला.

निकोला म्हणाल्या, “मी खोलीत गेले तेव्हा डेनमन अगदी लहान मुलीसारखं वागत होती.”

त्या म्हणाल्या, “ती जमिनीवर रांगत होती, पडद्यामागे लपत होती आणि पाच वर्षांच्या मुलीसारखं ती वडिलांच्या मांडीवर बसत होती.”

निकोला यांच्या मते, भेट संपल्यानंतर डेनमन यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि पुन्हा कधीही भेटायला येऊ नकोस, असं सांगितलं.

नंतर डेनमन यांनी त्यांना एक मेसेज केला. त्यात लिहिलं होतं, “मला भेटायला आल्याबद्दल खूप धन्यवाद. आज रात्री तुम्ही मला बातम्यांमध्ये पाहाल. पोलीस माझ्या मागावर आहेत.”

निकोला म्हणाल्या, तो काळ अत्यंत भीतीदायक आणि अनिश्चिततेने भरलेला होता.

त्या म्हणाल्या, “माझ्या मनात एकच प्रश्न होता. लोअरी कायम अशीच राहील का? आम्हाला आमची आधीची लोअरी पुन्हा पाहायला मिळेल का?”

डेनमन यांनी ब्रिटनमधील न्यूरोसायकियाट्रिक हॉस्पिटलमध्ये सहा आठवडे उपचार घेतले.

फोटो स्रोत, Lowri Denman

दरम्यान, पूर्णपणे बरं होण्याचा डेनमन यांचा प्रवास खूप लांब आणि आव्हानात्मक ठरला आहे.

हॉस्पिटलमधून परतल्यानंतरही त्यांची प्रकृती चांगली नव्हती. त्या पुन्हा वडिलांच्या घरी राहू लागल्या.

त्या म्हणाल्या, “मी पूर्वीसारखी राहिले नव्हते. मी पूर्वीसारखी दिसतही नव्हते. मला कुठेही बाहेर जावंसं वाटत नव्हतं.”

त्यानंतर डेनमन यांनी कार्मार्थेन येथे आर्ट फाउंडेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 2018 पर्यंत त्यांची प्रकृती इतकी सुधारली की त्या पुन्हा कार्डिफ येथे राहायला गेल्या आणि इंटिरिअर डिझाइनचं शिक्षण सुरू केलं.

अखेरीस, 2022 मध्ये त्यांनी पुन्हा काम सुरू केलं.

दुर्मीळ आजारातून डेनमन कशा बऱ्या झाल्या?

डेनमन यांच्यावर उपचार करणारे डॉ. ब्रेंडन हिली म्हणाले की, “माझ्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत मी असा रुग्ण फक्त एकदाच पाहिला आहे.”

डॉ. हिली यांच्या मते, डेनमन यांच्या प्रकरणावर ब्रिटन आणि अमेरिकेतील अनेक आघाडीच्या तज्ज्ञांनीही चर्चा केली होती.

ते म्हणाले, “माझ्या उर्वरित कारकिर्दीत मला पुन्हा असा रुग्ण पाहायला मिळेल, असं वाटत नाही. देशभरातील अनेक संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत असा एकही रुग्ण पाहणार नाहीत. हा आजार इतका दुर्मीळ आहे.”

अनेक वर्षे आरोग्याच्या समस्यांचा सामना केल्यानंतर आता डेनमन यांच्या मेंदूतील परजीवींचं कॅल्सिफिकेशन झालं आहे.

लोअरी आणि त्यांची मैत्रीण निकोला

याविषयी अधिक माहिती देताना डेनमन सांगतात, “ते (परजीवी) काढण्यासाठी माझ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही. डॉक्टर सांगतात की कालांतराने हे परजीवी निष्क्रिय होतात आणि त्यांचं कॅल्सिफिकेशन होतं. सध्या त्यांची तीच अवस्था आहे.”

डेनमन यांच्यावर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले की सर्व परजीवींची अंडी नष्ट झाली आणि आता त्यांची प्रकृती चांगली सुधारत आहे, असं डॉ. हिली म्हणाले.

2017 नंतर डेनमन यांना एकदाही झटका आलेला नाही. मात्र, त्यांना आयुष्यभर काही औषधं घ्यावी लागणार आहेत.

सध्या कार्डिफ येथे राहणाऱ्या डेनमन म्हणतात की, त्यांच्या कठीण अनुभवातून काहीतरी सकारात्मक घडावं, अशी त्यांची इच्छा आहे.

“आता मला आयुष्यात पुढे जायचं आहे, या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आहे आणि माझ्या अनुभवाचा चांगल्या कामासाठी उपयोग करायचा आहे,” असं डेनमन यांना वाटतं.

त्या पुढे सांगतात, “आयुष्य पुढच्या क्षणी कोणतं वळण घेईल, हे कुणालाच माहीत नसतं. आज मी जिवंत आहे, निरोगी आहे आणि पुन्हा एकदा सामान्य आयुष्य जगू शकते. ही गोष्ट मी कधीही गृहीत धरणार नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC