Home LATEST NEWS ताजी बातमी सचिन अहिर : अरुण गवळीचे भाचे, वरळीचं राजकारण आणि आता शिंदेंच्या शिवसेनेकडून...

सचिन अहिर : अरुण गवळीचे भाचे, वरळीचं राजकारण आणि आता शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतीचे उमेदवार

2
0

Source :- BBC INDIA NEWS

विधान परिषद उपसभापती निवडणूक : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

फोटो स्रोत, Sachin Ahir/FACEBOOK

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आज (30 जून) अचानक विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

2019 साली सचिन अहिर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंचा विधानसभेचा मार्ग सोपा केला होता. त्याचं फळ शिवसेनेला सलग 2 निवडणुकांमध्ये मिळालंही.

मात्र आता ज्या सचिन अहिर यांच्या भरवशावर ठाकरेंच्या शिवसेनेने वरळीची निवड केली होती त्यांनीच आता शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधान परिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “ते आज सकाळी माझ्याशेजारी बसले होते. आम्ही एकाच बाकावर बसत होतो. काहीच आम्हाला कळवलं नाही. सकाळी 11.30 ला मेसेज आला. “मला एक राजकीय निर्णय घ्यायचा आहे, जो माझ्यासाठी कठीण आहे. पण माझ्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. मला राजकीय पार्श्वभूमी नाही. माझी ताकद म्हणजे माझं काम. मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. शुभेच्छा. सभागृहातील प्रिय मित्राची उणीव भासेल” एवढाच मेसेज आला आहे.”

“उपसभापतीसाठी आम्ही अभ्यंकर सरांचा फॉर्म भरलेला आहे. उद्या पाहू काय होतं ते. वरळीत आव्हान वगैरे काही निर्माण झालेलं नाही.”

शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत अशा बातम्यांवर तुमचं मत काय आहे? असं विचारल्यावर अंबादास दानवे म्हणाले, ” ते कालरात्रीपर्यंत आमच्याबरोबर होते. अगदी रात्री 9 पर्यंत होते. सकाळी त्यांनी असं केलं, त्याला आपण काय करू शकतो, आपण कोणाच्या आत शिरून तर समजून घेऊ शकणार नाही.”

वरळी मतदारसंघाचा इतिहास

वरळी हा मराठी मतदार, कोळी बांधव, आणि उच्चभ्रूंची वस्ती असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. जैन आणि गुजराती मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.

वरळी मतदारसंघात 1962 ते 1980 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व निर्माण केलं होतं.

तर 1990 ते 2004 पर्यंत सलग 3 कार्यकाळ या मतदारसंघातून शिवसेनेचे दत्ताजी नलावडे निवडून आले.

यानंतर 2009 ते 2014 आता शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार असलेले सचिन अहीर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते.

सचिन अहिर

फोटो स्रोत, UGC

2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस शिवसेनेचाच उमेदवार वरळीतून निवडून आला. परंतु 2019 मध्ये ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते या मतदारसंघातून निवडूनही आले.

2024 सालीही आदित्य ठाकरे इथून निवडून आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना अहिर काय म्हणाले होते?

2019 साली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेत प्रवेश करताना सचिन अहिर यांनी त्यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, “खरं तर खूप आनंद होतोय अशातला भाग नाही. एका विशिष्ट विचारानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारणात काही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. ते निर्णय योग्य आहेत की नाही हे काळच ठरवतो.”

या प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी असंही म्हटलं होतं, “आदित्य तरुण आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवलं, की विकासाच्या वेगळ्या कल्पना त्यांच्या मनात आहेत. त्यामुळेच त्याला साथ देण्याची माझी जबाबदारी आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना अहिर काय म्हणाले होते?

फोटो स्रोत, SHARAD BADHE

राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना काय भावना आहेत, याबद्दल माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी त्यावेळी सांगितलं होतं, “शरद पवार माझ्या हृदयामध्ये आहेत. त्यांचं ते स्थान कायम राहील.”

या निर्णयाबद्दल सांगण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट होऊ शकली नसल्याचंही सचिन अहिर यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

सचिन अहिर यांनी आधीच त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या भावी वाटचालीची कल्पना कार्यकर्त्यांना दिली होती. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशी पुढेही द्या, असं आवाहन त्यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना केलं होतं.

त्यानंतर सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाचं समर्थन करणारे बॅनर्सही कार्यकर्त्यांनी लावले होते.

सचिन अहिर यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटलं होतं, “राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पण पक्ष फोडाफोडीची संस्कृती शिवसेनेला मान्य नाही. आम्ही माणसं जिंकत आहोत. आम्हाला फोडलेली माणसं नको आहेत, मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत.”

उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी असंही म्हटलं होतं, “नवीन माणसं येत असताना आपण त्यांना का पक्षात घेत आहोत, त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल याचा विचार करूनच आम्ही त्यांचं स्वागत करतो.”

मात्र आता याच सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोण आहेत सचिन अहिर?

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सचिन अहिर छगन भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

चिन अहिर हे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे ते भाचे आहेत. वरळीच्या प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर, बीडीडी चाळींमध्ये अरूण गवळींच्या असलेल्या प्रभावाचा सचिन अहिर यांनी पुरेपूर फायदा करून घेतला.

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

अरुण गवळी यांनी स्वतः अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला होता. पण सचिन अहिर यांनी कधीही त्या पक्षात प्रवेश केला नाही. अरुण गवळींच्या पाठिंब्याचा मात्र त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी वापर करून घेतला.

2009 साली आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते. मात्र या काळात बीडीडी चाळींचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आलं होतं.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता.

सचिन अहिर यांना वरळी परिसरातून पाठिंबा आहे. सचिन अहिर यांची श्री संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईमधल्या प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक आहे.

सचिन अहिर यांचं बॉलिवूड कनेक्शनही आहे. त्यांची पत्नी संगीता अहिर या बॉलिवूड चित्रपट निर्मात्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांची भागीदारी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC