Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, HANIF KHOKHAR
“वाघ उपाशी राहील पण गवत खाणार नाही” ही म्हण आता साफ चुकीची ठरतेय की काय, असा प्रश्न पडलाय!
जुनागढच्या प्रसिद्ध सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंह आणि वाघ चक्क गवत खाताना दिसले. हा व्हीडिओ व्हायरल होताच लोक पुरते चक्रावून गेले.
अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एका रिपोर्टनुसार, यापूर्वी 2019 मध्येसुद्धा असाच एक आशियाई सिंह गवत खाताना कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सिंह खरंच गवत खातात का की हा केवळ एक योगायोग आहे की ही खोटी बातमी आहे, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मात्र, जे दिसत आहे तशी वस्तुस्थिती नाही.
सिंह आणि वाघासह मांजराच्या प्रजातीतील बहुतेक प्राणी कधीकधी गवत खाऊ शकतात.
मग मांसाहारी म्हणून ओळखले जाणारे सिंह आणि वाघ गवत का खातात, त्यामागील वैज्ञानिक सत्य काय आहे आणि वन्यजीव तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात, ते या रिपोर्टमध्ये जाणून घ्या.
जुनागडच्या शक्करबाग प्राणिसंग्रहालयामधील सिंह आणि वाघाने खरंच गवत खाल्ले का?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये चक्क जंगलाचा राजा सिंह आणि वाघ गवत खाताना दिसत आहेत.
सामान्यतः प्राणिसंग्रहालय असो वा जंगल लोकांनी सिंहाला गवत खाताना पाहिलं की त्यांच्या मनात लगेच शंका येते. लोकांना वाटू लागतं की, नक्कीच या प्राण्यांना पोटभर अन्न मिळत नसेल म्हणूनच बिचारे नाइलाजाने गवत खाऊन पोट भरत असावेत.
फोटो स्रोत, HANIF KHOKHAR
पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. उलट प्राण्यांनी असं गवत खाणं ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे.
जुनागढच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजदीपसिंह झाला यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं की, सिंह, वाघ, बिबटे आणि मांजर प्रजातीतील प्राणी हे ‘ऑब्लिगेट कार्निव्होर्स’ म्हणजेच पूर्णपणे मांसाहारी असलेले प्राणी असतात.
“ते कधीही शाकाहारी अन्न खात नाहीत, पण तरीही अधूनमधून ते गवत नक्कीच खातात.”
“यामुळे त्यांच्या आतड्यांची हालचाल वेगाने सुरू होते आणि पचनक्रिया एकदम सुरळीत होते.
कधीकधी घशात खवखव झाल्यास किंवा पोटातील अस्वस्थता दूर करण्यासाठी हे प्राणी गवत खातात. त्यामुळे न पचलेले अन्न उलटी वाटे बाहेर पडायला मदत होते.
“आशियाई सिंह (आणि इतर जंगली मांसाहारी प्राणी) अनेकदा गवत खाताना दिसतात. पण ते पोट भरण्यासाठी किंवा पोषण मिळवण्यासाठी नक्कीच गवत खात नाहीत,” असंही ते नमूद करतात.
राण्यांच्या या सवयीबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?
भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठातील ‘सेंटर ऑफ अचिव्हमेंट फॉर वाइल्डलाइफ अँड कन्झर्व्हेशन स्टडीज’चे संचालक निशीथ धारैया यांनी ‘बीबीसी गुजराती’शी बोलताना सांगितलं की, कोणत्याही मांसाहारी प्राण्याच्या आहारात मांसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या शरीरात फायबरचे प्रमाण कमी जाते.
“त्यामुळे शरीरात फायबरची कमतरता निर्माण झाल्यावर कधीकधी प्राणी पूरक आहार म्हणून गवतासारख्या कोणत्याही फायबरयुक्त गोष्टीचे सेवन करतात.”
फोटो स्रोत, HANIF KHOKHAR
“आशियाई सिंह, वाघ, लायगर यांसारखे सर्व मांसाहारी प्राणी फायबरचे सप्लीमेंट म्हणून गवत खात असतात.”
“खासकरून या ऋतूत सिंह भरपूर गवत खातात. कारण या काळात त्यांच्या शरीराला फायबरची जास्त गरज असते आणि यामुळे अपचनाचा त्रास कमी होतो.”
निशीथ धारैया म्हणतात, “बऱ्याचदा जास्त गवत खाल्ल्याने सिंहाच्या घशात घास अडकल्यासारखे होते म्हणूनच ते उलटी करून गवत बाहेर काढतात.”
कुत्रासुद्धा गवत खाऊ शकतो का?
याबद्दल अधिक माहिती देताना वन्यजीव अभ्यासक विवेक अवस्थी यांनी ‘बीबीसी गुजराती’ला सांगितले, “सर्वच कार्निव्होर प्राणी (ज्यांना जगण्यासाठी केवळ मांसाचीच गरज असते. जसे की वाघ, सिंह, मांजर) हे गवत खाऊ शकतात.”
कुत्रासुद्धा गवत खाऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे गवत या प्राण्यांच्या घशाच्या आतपर्यंत जाते.”
“त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागते आणि ते उलटी करतात. म्हणजेच सिंह किंवा वाघ हे केवळ पोट खराब असल्यावर किंवा अपचन झाल्यावरच गवत खातात असे नाही तर उलटी करण्यासाठीसुद्धा ते गवत खातात.”
“यामुळे त्यांच्या पोटातील सगळी घाण बाहेर पडून पोट साफ होते.”
फोटो स्रोत, HANIF KHOKHAR
वन्यजीव प्रेमी निमेष नंदोलिया यांनी ‘बीबीसी गुजराती’ला माहिती दिली की, मांसाहारी प्राणी शिकार करून मांस खातात तेव्हा प्राण्यांची कातडी आणि त्यांच्या अंगावरील केसही खाल्ले जातात.
“अनेकदा शाकाहारी प्राण्यांच्या पायांचे कडक खुरसुद्धा पोटात जातात. हे सर्व पचवण्यासाठी हे प्राणी गवत खातात.”
“गवतातील फायबर पचनासाठी मदत करते, जसे माणसालासुद्धा फायबरयुक्त किंवा तंतूमय भाज्या खाल्ल्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते.”
फोटो स्रोत, HANIF KHOKHAR
सिंहांचे बचावकार्य करणारे धर्मेंद्र त्रिवेदी यांनी ‘बीबीसी गुजराती’ला माहिती दिली की, मांसाहारी प्राणी अनेकदा चिखल लागलेले गवतसुद्धा खातात.
त्यांच्या मते, त्यातून सिंहाला क्षार (खनिजे) मिळतात, म्हणूनच फायबर आणि क्षार मिळवण्यासाठी सिंह गवत खात असतात.
खरं पाहता गवत खाल्ल्याने सिंहाच्या आतड्यात झालेले कीटक आणि जंत बाहेर पडतात आणि पोट साफ होते. त्यामुळे सिंह भुकेपोटी गवत खात नाहीत, तर आपली पचनसंस्था साफ आणि सुदृढ ठेवण्यासाठी ती त्यांची एक नैसर्गिक गरज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




