Home LATEST NEWS ताजी बातमी सोन्याच्या किंमती वर्षभरातील नीचांकी पातळीवर; भविष्यात सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होतील?

सोन्याच्या किंमती वर्षभरातील नीचांकी पातळीवर; भविष्यात सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होतील?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ, महागाई वाढण्याची शक्यता आणि अमेरिकेत व्याजदर वाढवले जाण्याची भीती यांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळाली.

वाचन वेळ: 7 मिनिटे

गेल्या महिन्याभरात सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सोन्याचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले. चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या दरांतही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

तांत्रिक भाषेत सांगायचं तर या धातूंच्या किमती ‘ओव्हरसोल्ड’ पातळीवर पोहोचल्या.

कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (एआय) खर्चातून अपेक्षित परतावा मिळेल की नाही, याबाबत चिंता वाढल्याने टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्याच काळात मौल्यवान धातूंच्या किमतीही घसरल्या.

सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी सलग दुसऱ्या महिन्यात नकारात्मक परतावा दिला. कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ, महागाई वाढण्याची शक्यता आणि अमेरिकेत व्याजदर वाढवले जाण्याची भीती यांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळाली.

डीएचएफ कॅपिटलच्या बास कूइजमन यांनी म्हटलं की, “वित्तीय धोरण अधिक कठोर होण्याच्या भीतीमुळे ज्या गुंतवणूकीतून नियमित उत्पन्न किंवा व्याज मिळत नाही, त्याच्या किमतीवर परिणाम होताना दिसतो.

त्यांनी म्हटलं, “तेलाच्या किमती वाढत असल्याने महागाईचा दर हा दीर्घकाळासाठी उच्चांकी पातळीवर राहील. त्यामुळे अशा गुंतवणुकींवरचा ताण अधिक वाढत राहील.

धनत्रयोदशीला सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे.

तेलाच्या किमती घसरल्यास सोन्यावरचा ताण कमी होऊ शकतो. मात्र, पुरवठा साखळीतील अडथळे आणखी वाढले किंवा अमेरिकेतील ऑक्टोबर महिन्याचे रोजगारविषयक आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले, तर वित्तीय धोरण अधिक कठोर होऊ शकतं. त्यामुळे सोन्याच्या किमतीमधे घट पाहायला मिळू शकते.

ऑक्टोबरअखेरपर्यंत कॉमेक्सवर सोन्याचे दर 7.26 टक्क्यांनी घसरून 3,884.9 डॉलर प्रति औंस इतके झाले, तर चांदीचे दर गेल्या महिन्यात तब्बल 19.1 टक्क्यांनी घसरून 49.13 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरले.

कॉमेक्स हे अमेरिकेतील प्रमुख कमोडिटी एक्सचेंज असून तिथे सोने आणि चांदीचे व्यवहार होतात.

जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठांमध्येही दिसून आला. एमसीएक्सवर सोन्याचे दर 7.16 टक्क्यांनी घसरून 1,38,419 रुपये प्रति तोळा झाले, तर चांदीचे दर तब्बल 20 टक्क्यांनी घसरून एका किलोसाठी 1,78,900 रुपये इतके झाले.

कॉमेक्सप्रमाणेच एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) हे भारतातील कमोडिटी एक्सचेंज आहे. येथे सोने आणि चांदीच्या वायदे करारांची खरेदी-विक्री होते.

सोन्याचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर

30 ऑक्टोबरला कॉमेक्सवर सोन्याचे दर घसरून वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले. 4,000 डॉलर प्रति औंसपेक्षाही कमी किमतीवर ते स्थिरावले. सोन्याच्या किमती अजून घसरण्याचा हा एक संकेत मानला जात आहे. कारण सोन्याची किंमत आधीच 3,900 डॉलरपर्यंत पोहोचली.

आता कॉमेक्सवर सोन्याचे दर आणखी घसरून 3,650 ते 3,750 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.

गेल्या महिन्यात कॉमेक्सवर चांदीच्या किमतीतही घसरण झाली. चांदीचे दर 54 डॉलरच्या सपोर्ट पातळीखाली आले. त्यानंतरही चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण झाली आणि शुक्रवारी (30 ऑक्टोबर) चांदीची किंमत 48.9 डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या.

चांदीचा कल नकारात्मक राहण्याची शक्यता असून तिचे दर अजून घसरून 42 ते 43 डॉलरच्या पातळीवर येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. हा घसरणीचा कल बदलण्यासाठी चांदीच्या किमतीने 55 डॉलरची रेझिस्टन्स पातळी ओलांडणे आवश्यक आहे.

जानेवारीमध्ये सोन्याचे दर 5,595 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या किमतीत 30 टक्क्यांची घसरण झाली आहे.

30 ऑक्टोबरला कॉमेक्सवर सोन्याचे दर घसरून वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले. 4,000 डॉलर प्रति औंसपेक्षाही कमी किमतीवर ते स्थिरावले.

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे, “व्याजदर बराचकाळ चढे राहतील, अशी भीती या घसरणीमागे आहे. सध्या आशियातील मागणी कमकुवत असल्यानेही सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र, विश्लेषकांच्या मते, सोन्याचे दर जेव्हा जेव्हा 4,000 डॉलरच्या खाली जातात, तेव्हा मध्यवर्ती बँकांकडून त्याची खरेदी वाढण्याची शक्यता असते.”

दुसरीकडे, चांदीकडे आता औद्योगिक वाढीवर अवलंबून असलेली कमोडिटी म्हणून पाहिले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एचएसबीसीने म्हटले आहे की, उद्योग आणि दागिन्यांच्या क्षेत्रातून चांदीची मागणी कमी होत आहे. 2027 मध्ये चांदीची सरासरी किंमत 64 डॉलर प्रति औंस राहील, असा बँकेचा अंदाज आहे. यावर्षीसाठी हा अंदाज 71 डॉलर प्रति औंस होता.

सध्या एक औंस सोने खरेदी करायची असेल तर 79 औंस चांदीची आवश्यकता आहे. हे प्रमाण गेल्या 11 महिन्यांतील सर्वाधिक आहे. जानेवारीमध्ये चांदीचे दर 122 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, तेव्हा एक औंस सोने खरेदी करण्यासाठी 46 औंस चांदी लागत होती.

रॉयटर्सने म्हटलं आहे की, “ऐतिहासिक आकडेवारी पाहता सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. मेटल्स फोकस या सल्लागार कंपनीच्या मते, 2020 ते 2025 या काळात सोने आणि चांदीच्या किमतींचे सरासरी गुणोत्तर 82 होते.”

सोन्या-चांदीच्या किमती भविष्यात कशा असतील?

फायनान्शियल रिसर्च इन्स्टिट्यूट ‘सही’चे संशोधन प्रमुख गौरव अरोरा यांनी ‘द लाइव्ह मिंट’शी बोलताना म्हटलं की, अमेरिकेत व्याजदर वाढवले जाण्याच्या शक्यतेचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे.

अरोरा यांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने ऑक्टोबरमध्ये व्याजदर 3.75 ते 4 टक्क्यांच्या दरम्यान स्थिर ठेवले होते. मात्र, समितीच्या दोन सदस्यांनी व्याजदर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले. डिसेंबरमध्ये व्याजदरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अरोरा यांनी पुढं म्हटलं, “गेल्या महिनाभरात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाली आहे. सोन्याचा सध्याचा दर एका तोळ्यासाठी (10 ग्रॅम) 1,38,250 रुपये इतका आहे. किंमत या पातळीखाली गेल्यास विक्रीचा आणखी एक टप्पा सुरू होऊ शकतो. चांदीच्या किमतींमध्ये सामान्यतः अधिक चढ-उतार पाहायला मिळतात. चांदीसाठी 1,78,800 रुपये प्रति किलो ही सध्याची सपोर्ट प्राइस आहे.”

अरोरा यांच्या मते, “अलीकडच्या घसरणीनंतरही बाजाराचा एकूण कल कमकुवतच आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या आसपास सोन्यात एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा दोन किंवा तीन टप्प्यांत खरेदी करणं योग्य ठरू शकतं. चांदीच्या किमतींमध्ये अधिक चढ-उतार होत असल्याने सोन्याच्या तुलनेत चांदीतील गुंतवणुकीचे प्रमाण कमी ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.”

एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या कमोडिटी संशोधन विभागाच्या प्रमुख वंदना भारती यांच्या मते, मौल्यवान धातूंच्या किमतींमधील मोठी घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी निर्माण करू शकते.

यापूर्वीही बाजारात रोख रकमेची गरज निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याची उदाहरणे त्यांनी दिली.

सोने चांदी

1970 च्या दशकात सोन्याची किंमत 40 डॉलर प्रति औंसपेक्षाही कमी होती. मात्र, जानेवारी 1980 पर्यंत ती वाढून जवळपास 850 डॉलर प्रति औंस झाली होती.

त्याचप्रमाणे, 2008 साली जागतिक आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांनी रोख रक्कम उभी करण्यासाठी आपल्या मालमत्तांची विक्री केली होती. त्यामुळे सुरुवातीला सोन्याच्या किमतीत घसरण होऊन ती 700 डॉलर प्रति औंस झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आणि ऑगस्ट 2011 पर्यंत ती 1,917 डॉलर प्रति औंसवर पोहोचली.

मार्च 2020 मध्ये कोरोना संकटात बाजारात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. रोख रक्कम उभी करण्यासाठी गुंतवणूकदारांची धावपळ सुरू असताना सोन्याची किंमत घसरून 1,472 डॉलर प्रति औंस इतकी झाली. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी सोनं तसंच एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) यांमधली गुंतवणूक वाढवली. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वेगाने सुधारणा झाली.

भारती यांनी म्हटलं की, रोख रकमेच्या गरजेमुळे बाजारात घसरण होत असताना मौल्यवान धातूंमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू इच्छिणारे खरेदीदार सक्रिय होऊ शकतात.

सोन्याच्या किंमतीमध्ये अलीकडे झालेली घसरण ही टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची संभाव्य संधी असल्याचं भारती यांना वाटतं. सध्या देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 1.38 लाख रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) आहेत.

मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी, विनिमय दरातील चढ-उतार आणि महागाईत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याची भूमिका यांमुळे 2027 पर्यंत देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 1.65 लाख ते 1.80 लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतात, असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, हा केवळ अंदाज आहे, हे दर असेच वाढतील याची ठोस हमी नाहीये.

कॉमेक्स, एमसीएक्स आणि फ्युचर रेट म्हणजे काय?

कॉमेक्स हे अमेरिकेतील एक प्रमुख कमोडिटी एक्सचेंज आहे. येथे सोने आणि चांदीचे व्यवहार होतात. मात्र हे थेट सोन-चांदीचे व्यवहार नसतात, तर करारांची खरेदी-विक्री होते. फ्यूचर रेट किंवा वायदे दर म्हणजे एखाद्या करारानुसार भविष्यातील विशिष्ट महिन्यात वस्तू घेण्यासाठी आज ठरवलेली किंमत.

त्या महिन्यात सोन्याची किंवा चांदीची किंमत निश्चितपणे तेवढीच असेल, असा याचा अर्थ होत नाही. कॉमेक्समधील सोन्याच्या दराचा वापर आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीचं एक प्रमुख मानक म्हणून केला जातो.

कॉमेक्सकडे दागिन्यांच्या दुकानाप्रमाणे न पाहता एक संघटित घाऊक बाजार म्हणून पाहता येईल.

चांदीच्या किमती तुलनेने जास्त अस्थिर आहेत.

‘गोल्ड फ्यूचर्स रेट’ म्हणजे काय?

एक काल्पनिक उदाहरण घेऊ. डिसेंबर महिन्यासाठी सोन्याचा फ्यूचर रेट हा 4,000 डॉलर प्रति औंस आहे. म्हणजेच ट्रेडर्स डिसेंबर महिन्यासाठीच्या प्रमाणित सोन्याच्या करारांची या किमतीला किमतीला खरेदी किंवा विक्री करू शकतात.

याचा अर्थ डिसेंबरमध्ये सोन्याची किंमत निश्चितपणे 4,000 डॉलरच असेल, असा होत नाही.

हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊ. भविष्यात वस्तूचा पुरवठा कोणत्या किमतीला करायचा हे खरेदीदार आणि पुरवठादार आजच ठरवतात. ते व्यवहाराची किंमत निश्चित करतात; बाजारात सर्वत्र हीच किंमत असेल, असा अंदाज व्यक्त करत नाहीत.

सोन्याच्या बातम्यांमध्ये कॉमेक्सचा उल्लेख का होतो?

आंतरराष्ट्रीय बाजारासाठी कॉमेक्स किमतींचा एक प्रमुख मानक उपलब्ध करून देते, तर एमसीएक्स हे भारतातील एक्सचेंज असून इथं सोने आणि चांदीचे वायदे व्यवहार होतात.

कॉमेक्सवर डॉलरमध्ये दिसणारी किंमत, भारतातील दागिन्यांची किरकोळ किंमत किंवा एमसीएक्सवर रुपयांमध्ये दाखवली जाणारी किंमत सारखी नसते.

कॉमेक्स आणि फ्यूचर रेट यात काय फरक आहे?

कॉमेक्स हे एक एक्सचेंज आहे, जिथे व्यवहार होतात, फ्यूचर रेट त्या एक्सचेंज किंवा बाजारात ठरणारी किंमत.

हे भाजी मंडईच्या उदाहरणातून समजून घेऊ. मंडई ही बाजारपेठ आहे, तर 30 रुपये किलो हा भाजीचा दर आहे. त्याचप्रमाणे कॉमेक्स ही बाजारपेठ आणि ‘डिसेंबरमध्ये सोने 4,000 डॉलर प्रति औंस’ हा फ्यूचर रेट आहे.

एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) आणि कॉमेक्स (कमोडिटी एक्सचेंज इंक) यांमध्ये काय फरक आहे?

एमसीएक्स आणि कॉमेक्स हे दोन्ही एक्सचेंज असून इथं सोने आणि चांदीसारख्या वस्तूंचा व्यवहार होतो. या दोन्हींमधील सर्वांत सोपा फरक म्हणजे एमसीएक्स भारतात आहे आणि इथले दर रुपयांत ठरतात. तर कॉमेक्स अमेरिकेत असून तिथले दर डॉलरमध्ये असतात. या दोन्ही एक्सचेंमध्ये वायदे करारांचे (फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट) व्यवहार होतात.

तुम्ही या दोन काल्पनिक बातम्या पाहात आहात-

कॉमेक्सवर सोन्याचा दर 4,000 डॉलर प्रति औंस

एमसीएक्सवर सोन्याचा दर 1,20,000 रुपये प्रति तोळा

हे दोन वेगवेगळ्या बाजारपेठांमधील सोन्याचे दर आहेत. ते वेगवेगळ्या चलनांत आणि वजनाच्या वेगवेगळ्या एककांमधले आहेत. त्यामुळे या दोन्ही आकड्यांची थेट तुलना करता येत नाही. हे म्हणजे डॉलर प्रति गॅलन या एककातील पेट्रोलच्या किमतीची तुलना रुपये प्रति लिटर या एककातील किमतीशी करण्यासारखं आहे. याशिवाय, वायदे दरांची तुलना करताना दोन्ही करारांची डिलिव्हरी कोणत्या महिन्यात होणार आहे, हेही पाहणं आवश्यक आहे.

एमसीएक्स कॉमेक्सच्या दरांनुसार व्यवहार करतं का?

दोन्ही बाजारपेठा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणच्या किमतीमध्ये अगदी समान टक्केवारीने चढ-उतार होतीलच असं नाही.

भारतातील सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींबरोबरच रुपया आणि डॉलर यांच्यातील विनिमय दर तसेच देशांतर्गत बाजारातील इतर घटकांवरही अवलंबून असतात. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले, तर सामान्यतः एमसीएक्समध्येही सोन्याचे दर वाढताना दिसतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर असले, पण डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला, तर रुपयांच्या हिशेबात सोनं महागताना दिसतं.

कॉमेक्समधून तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतींचा अंदाज येतो, तर एमसीएक्समधून भारतीय वायदे बाजारातील किमतींची माहिती मिळते. मात्र, यांपैकी कोणताही दर हा ज्वेलर्सकडून ग्राहकांना सांगितल्या जाणाऱ्या अंतिम विक्री दरासारखा नसतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC