Home LATEST NEWS ताजी बातमी स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी AIची मदत; ‘लाखो महिलांचे आयुष्य वाचू शकतं’, संशोधकांना...

स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी AIची मदत; ‘लाखो महिलांचे आयुष्य वाचू शकतं’, संशोधकांना विश्वास

4
0

Source :- BBC INDIA NEWS

या चाचणीचे सह-नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापिका फिओना गिल्बर्ट, एआयमुळे स्तनाच्या कर्करोगाच्या निदानात सुधारणा होऊ शकते का, याचे मूल्यांकन करतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात रोजच नवं काहीतरी घडताना दिसत आहे. AI मधील नव्या प्रयोगांमुळे आरोग्य क्षेत्रातही मोठी क्रांती घडण्याची चिन्हं आहेत.

युनायटेड किंगडममध्ये अंदाजे 7 लाख महिलांना एका प्रयोगात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं ओळखण्यासाठी जगातील सर्वांत मोठी मोहीम राबवण्यात येत आहे ज्यात AI चे सहकार्य घेतले जाणार आहे.

मॅमोग्राम्सचे (स्तनांचे परीक्षण करण्यासाठी घेण्यात येणारे एक्स रे) परीक्षण करण्यासाठी AI चा वापर करण्यात येईल. त्यातून सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाच्या निदानात सुधारणा होईल का, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील तणाव कमी होईल का, तसेच ज्यांना लक्षणं नाहीत तरी वारंवार चाचणी करण्यास सांगण्यात येते, अशी अतिनिदानाची संख्या कमी होईल का, हे या माध्यमातून पाहण्यात येईल.

केंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल इथे EDITH trail ( Early Detection Using Information Technology in Health) साठी महिला स्वयंसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी युकेत तीस केंद्र उभारली जाणार आहेत. त्यापैकी हे एक सुरुवातीचे केंद्र आहे.

युकेत 50 ते 71 वर्षे वयोगटातील महिलांना दर तीन वर्षांनी तपासणीसाठी बोलवण्यात येते. दरवर्षी 20 लाख महिला यात सहभागी होतात.

सध्या NHSचे (National Health Service- युकेतील राष्ट्रीय आरोग्य सेवा) दोन तज्ज्ञ ब्रेस्ट एक्स रे (मॅमोग्राम) चे परीक्षण करतात. पण या मोहिमेत दोन ऐवजी एक तज्ज्ञ काम करणार आहे आणि एका जणाचे काम AI करणार आहे.

याआधी झालेल्या छोट्या अभ्यासातून हे समजले आहे की, AI मुळे स्तनाच्या कर्करोगाच्या निदानातील प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, हा प्रयोग करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की या अभ्यासातून हे स्पष्ट व्हायला हवे की ज्या महिलांना गरज नसतानाही तपासण्या करण्याचा सल्ला दिला जातो, त्यांनी अशा अनावश्यक चाचण्या करण्याची आवश्यकता भासू नये.

सिआन टेलर फिलिप्स या वारविक विद्यापीठात लोकसंख्या आरोग्याच्या प्राध्यापक आहेत. आणि या प्रयोगाच्या सह-संशोधक आहेत त्या सांगतात की “AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या चाचण्यांमुळे कॅन्सरचे सुरुवातीच्या टप्प्यातील निदान सुधारण्याची शक्यता आहे. पण आपल्याला ही काळजी घेण्याची देखील आवश्यकता आहे की अतिनिदान सुद्धा टळले पाहिजे.

“अनेकदा काही महिलांमध्ये सौम्य आजार उद्भवतात ज्यातून कधीही कर्करोगांची लक्षणं पुढे येत नाहीत, तेव्हा अशा प्रकारचे निदान अतिनिदान टळले पाहिजे,” असे त्यांना वाटते.

युकेत महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगातील रुग्णांत सर्वाधिक रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे असतात. दरवर्षी युकेत 59,000 केसेसचे निदान होते.

यापैकी एकतृतीयांश प्रकरणं नियमित मॅमोग्रामच्या चाचणीतून समोर येतात. ही प्रकरणं सुरुवातीच्या टप्प्यातील असतात तेव्हा त्यांच्यावर सहज उपचार होऊ शकतात.

या तपासण्यांमुळे वर्षाला अंदाजे 1,300 महिलांचे प्राण वाचतात, असं आकडेवारीतून समोर आलं आहे.

शर्ली एसेक्स सांगतात की, नियमित स्तन तपासणीमुळे त्यांचा जीव वाचला.

प्राध्यापक फियोना गिल्बर्ट या केंब्रिज विद्यापीठातील रेडियोलॉजी विभागात कार्यरत आहेत. तसेच त्या अ‍ॅडनब्रूक रुग्णालयात मानद सल्लागार आहेत तसेच या प्रयोगाच्या सह-संशोधक आहेत. त्या सांगतात “दरवर्षी लाखो महिला मॅमोग्राम करतात. आणि त्यातील अगदी छोट्या प्रमाणात म्हणजेच एक टक्का महिलांना कॅन्सर असतो.”

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या एक्स-रेंचे परीक्षण अधिक कार्यक्षमतेने करता येईल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा वाचलेला वेळ ज्यांना जास्त आवश्यकता आहे अशा रुग्णांना देता येईल. यात सुरुवातीच्या काळातील निदान आणि उपचारांचा समावेश आहे.

गिल्बर्ट यांनी बीबीसीला सांगितलं, रेडिओलॉजिस्टची मोठ्या प्रमाणात कमतरता होती आणि चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या दरवर्षी आठ टक्क्याने वाढत होती.

तपासणीमुळे ‘जीव वाचवला’

सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यामुळे प्राण वाचल्याची भावना अनेक महिला व्यक्त करतात.

केंब्रिजशायरमधील शर्ली एसेक्स सांगतात की त्यांना गेल्या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. नियमित चाचणी त्यांचे निदान झाले होते.

त्यानंतर त्यांचे ऑपरेशन आणि रेडिओथेरपी झाली होती. पण त्यांना किमोथेरपीची आवश्यकता भासली नाही.

त्यांनी बीबीसीला सांगितले की, मॅमोग्रामनेच त्यांचे आयुष्य वाचवले.

“मला आश्चर्याचा जबर धक्का बसला जेव्हा मला हे मला हे सांगण्यात आलं की मला कॅन्सर आहे. कारण मला काहीच लक्षणं नव्हती.”

शर्ली या मोहिमेत सहभागी होणार नाहीयेत, पण त्या तपासणीच्या पुरस्कर्त्या आहेत.

“माझे कॅन्सरचे निदान लवकर झाल्याचा मला आनंद आहे. ही माझी शेवटची रुटीन मेमोग्राम चाचणी होती. जर समजा, मी ती केली नसती तर माझा कॅन्सर वाढत राहिला असता,” असं त्या सांगतात.

ही मोहीम कशी राबवली जाणार आहे?

महिलांना तपासणीसाठी निमंत्रण दिले जाईल आणि त्यांना संशोधनाची माहिती दिली जाईल. पण त्यांना यात सहभागी होण्याचे बंधन नसेल.

ब्रेस्ट स्क्रिनिंग अपॉइंटमेंटवेळी जी प्रक्रिया असते ती बदलली जाणार नाही. परंतु, त्याऐवजी AI असिस्टेड टुल्स वापरले जातील. मॅमोग्रामच्या तपासणीचे काम दोन जण करतात. त्याऐवजी एक जणाकडून ते केले जाईल.

संशोधकांनी सांगितले की, मशिन लर्निंग सॉफ्टवेअरला प्रशिक्षणासाठी लक्षावधी इमेजेस दिल्या जातील. त्यातून ते पॅटर्न ओळखतील आणि ब्रेस्ट टिश्यूत जर काही बदल झालेला दिसला तर त्यातील बदल लगेच सांगतील. जे मानवी डोळ्यांना दिसू शकणार नाहीत, असे बदल ते चटकन ओळखतील.

चाचणीच्या एका प्रकारात AI प्रोग्रॅमकडून इमेजेसला मानांकन दिलं जाईल. त्यानंतर ते NHS तज्ज्ञांकडे पाठवले जाईल. तर चाचणीच्या दुसऱ्या प्रकारात ते इमेजेसचे परीक्षण नंतर करणार आहेत.

नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्चने या चाचणीसाठी 10 मिलियन पाउंड (अंदाजे 121 कोटी रुपये) निधी दिला आहे.

हा प्रकल्प वारविक विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल NHS फाउंडेशन ट्रस्ट यांच्या सह NHS England यांच्या नेतृत्वात राबवला जाणार आहे.

‘अफाट क्षमता’

“उपचारांत सुधारणा करण्याची AI ची क्षमता अफाट आहे. त्यामुळेच, आपल्याला अशा मोहिमा राबवण्याची आवश्यकता आहे, ज्यातून कार्यक्षम पद्धतीने आणि सुरक्षितरीत्या हे काम पार पाडता येईल,” असं आरोग्य सचिव युवेट कूपर यांनी अ‍ॅडनब्रूक हॉस्पिटलला भेट दिली असता म्हटले.

ब्रेस्ट स्क्रिनिंगच्या निमित्ताने त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली होती.

“NHS ब्रेस्ट स्क्रिनिंगमुळे अनेकांचे प्राण वाचतील आणि प्रत्येक महिलेने यात सहभागी व्हावे,” असे NHS इंग्लंडचे नॅशनल क्लिनिकल डायरेक्टर फॉर कॅन्सर प्रा. पीटर जॉन्सन यांनी म्हटले.

“प्रत्येक स्कॅन तज्ज्ञाकडून पाहिला जाईल आणि जर त्यातून पुढील गोष्टी समजल्या तर महिलांचे लवकर निदान आणि लवकरात लवकर उपचार सुरू केले जातील,” असे त्यांनी सांगितले.

या चाचण्यांमध्ये चार AI कंपन्या सहभागी होतील. ही मोहीम तीन वर्षं चालण्याची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC