Source :- BBC INDIA NEWS

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बेकी जोन्सला मेंदूचा असाध्य असा कर्करोग झाल्याचं समजलं होतं. त्यामुळं त्यांच्याकडं आयुष्यातले काही महिनेच शिल्लक असल्याचं तिला सांगण्यात आलं.
हा धक्का बसण्यापूर्वीच त्यांना आयुष्याचा जोडीदार भेटला होता. पोलीस सेवेत जाण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण एका क्षणात त्यांचं संपूर्ण भविष्य जणू अंधारात होतं.
एका अनुभवी कॅन्सर तज्ज्ञाने केलेल्या त्या एका निदानाने त्यांचं संपूर्ण आयुष्यच पार बदलून टाकलं. पुढची तब्बल 11 वर्षं त्यांना केमोथेरपीच्या भयंकर चक्रातून जावं लागलं.
त्या उपचारांमुळे त्यांना सतत मळमळायचं आणि आजारी वाटायचं. घरातल्या कोणत्याही कार्यक्रमांत त्यांना सहभागी होता येत नव्हतं, करिअर अक्षरशः ठप्प झालं आणि त्यांच्या मनात सतत एक अनामिक धाकधूक, एक भीतीची टांगती तलवार असायची.
पण आता वयाच्या 34 व्या वर्षी त्यांच्यासमोर एक धक्कादायक वास्तव आलं आहे. त्यांना कॅन्सर कधी नव्हताच!
त्यांच्या मेंदूला आलेली एक साधी सूज स्टेरॉइड्सच्या गोळ्यांनी सहज बरी होऊ शकली असती. पण त्यासाठी त्यांना 11 वर्षे यातना भोगाव्या लागल्या.
दोन मुलांची आई असणाऱ्या बेकी या अशा 40 पेक्षा जास्त रुग्णांपैकी एक आहेत, ज्यांनी गरज नसताना किंवा नको तितका काळ कॅन्सरचे भयंकर उपचार दिल्याप्रकरणी ‘युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स कोव्हेंट्री अँड वॉरविकशायर’ (UHCW) एनएचएस ट्रस्टविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
“तू केमोथेरपी घेतली नाहीस, तर तुझा मृत्यू होईल हेच मला वारंवार सांगितले गेले,” असे त्या सांगतात.
‘त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’
बेकी सांगतांत की, त्या तरुण असताना कोव्हेंट्री येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ प्रा. इयान ब्राउन यांनी त्यांना उर्वरित आयुष्यभर ‘टेमोझोलोमाइड’ हे केमोथेरपीचे औषध चालूच ठेवावे लागेल असा सल्ला दिला होता.
वास्तविक पाहता, वैद्यकीय नियमांनुसार हे औषध 6 महिन्यांत फक्त 6 सायकल्समध्येच दिले जाणे अपेक्षित असते.
जेव्हा त्यांनी पुन्हा पुन्हा केलेल्या स्कॅन्समध्ये ट्यूमरचा साधा डागही दिसत नसल्याबाबत विचारणा केली तेव्हा “ट्यूमर इतका सूक्ष्म आहे की, तो उघड्या डोळ्यांना दिसणार नाही,” असे सांगून कन्सल्टंटने समजूत काढल्याचं त्या सांगतात.
अखेर 2025 मध्ये जेव्हा त्या हॉस्पिटल ट्रस्टने डॉ. ब्राउन यांनी हाताळलेल्या कॅन्सरच्या जुन्या केसेसची नव्याने तपासणी सुरू केली, तेव्हा कुठे त्यांच्यासमोर हे सत्य उघडकीस आलं.
“मला कधीच ब्रेन ट्यूमर झाला नव्हता. माझे चुकीचे निदान झाले होते आणि काहीही कारण नसताना माझ्या संपूर्ण तारुण्यात मला या असह्य उपचारांमधून जावे लागले,” असे त्या म्हणाल्या.
“त्यांनी अक्षरशः माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले,” असं त्यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Becky Jones
डॉ. ब्राउन यांच्याकडे उपचार घेणाऱ्या आणखी बऱ्याच रुग्णांनी बीबीसीशी बोलताना हीच व्यथा मांडली. त्यांनाही अनेक वर्षे सतत ‘TMZ’ दिले गेले, ज्यामुळे आज ते विविध गंभीर आजारांशी आणि शारीरिक व्याधींशी झगडत आहेत.
या औषधाच्या अतिवापरामुळे मातृत्व कायमचे हिरावले गेले, अशी व्यथा एका महिला रुग्णाने मांडली. तर गरज नसताना 100 सायकल्स दिल्यामुळं दुसऱ्या एका रुग्णाला थेट रक्ताचा कॅन्सर जडला.
‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स’च्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार, या रुग्णालयात रुग्णांना या औषधाचा काहीही फायदा झाल्याचा पुरावा नसतानाही वर्षानुवर्षे सर्रासपणे हे औषध दिले जात होते.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हा भोंगळ कारभार म्हणजे थेट “रुग्णांचा विश्वासाचा घात” केल्याचे या अहवालात स्पष्टपणे म्हटले गेले.
रुग्ण सलग 10 ते 15 वर्षे केमोथेरपीच्या गोळ्या घेत राहिले तरी हॉस्पिटलच्या कॅन्सर फार्मसी टीमने त्यावर कधी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही यातून उपस्थित करण्यात आला.
फोटो स्रोत, Supplied
2012 मध्ये बेकी जोन्स यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होत होती. त्यावेळी त्या कोव्हेंट्री सिटी स्टेडियममध्ये सीसीटीव्ही ऑपरेटर म्हणून काम करत होत्या.
कामाच्या ठिकाणीच त्यांची ओळख स्टीवर्ड म्हणून काम करणाऱ्या पीटशी झाली. मात्र काही काळातच त्यांना तीव्र मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि त्यांनी यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला.
त्यानंतर एका खासगी न्यूरोसर्जननं त्यांच्या मेंदूची बायोप्सी केली.
पण ‘ब्रॅबनर्स’ या लॉ फर्मच्या पार्टनर फिओना टिन्स्ली यांच्या म्हणण्यानुसार, बायोप्सीचे निकाल येण्याआधीच प्रा. ब्राउन यांनी बेकी यांना ‘ग्रेड फोर ग्लिओब्लास्टोमा’ झाल्याचे सांगितले होते. हा मेंदूच्या कॅन्सरचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे.
बीबीसीने या निवृत्त प्राध्यापकांशी संपर्क साधण्यासाठी वारंवार प्रयत्न केले.
केमोथेरपीची औषधं घेत घालवलेली ती वर्षं “अत्यंत भयानक” असल्याचं जोन्स सांगतात.
त्या म्हणाल्या की, “सतत मळमळायचं, पोटात सारख्या कळा यायच्या, तोंडात अल्सर यायचे आणि रोज अंगात गळून टाकणारा थकवा असायचा की विचारू नका, हे सगळे फारच वाईट होते.”
त्या औषधांचा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर खोल परिणाम झाला. कुठलंही इन्फेक्शन पटकन जडेल या सततच्या भीतीपोटी त्यांनी चारचौघांत जाणं, सामाजिक कार्यक्रम आणि कौटुंबिक समारंभांना जाणे पूर्णपणे बंद केले होते.
सुरुवातीला त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आला. आणि नंतर त्यांच्या गाडी चालवण्यावर बंधने आणली गेली.
“उपचार सुरू व्हायच्या आधी मी सतत जिममध्ये जायचे, रनिंग करायचे आणि मी आणि पीट नेहमी एकत्र बाहेर जेवायला जायचो. पण औषधे सुरू झाल्यावर हे सगळे बंद करावे लागले,” असं त्या सांगतात.
हे जोडपे कधीही आई-वडील होऊ शकणार नाही, असेही त्यांना सांगण्यात आले होते.
त्या पुढं म्हणाल्या, “पुढे जाऊन मी 2 मुलांना जन्म दिला, ज्यावर त्या डॉक्टरांनी दोन्ही वेळा केवळ चमत्कारच घडल्याचं म्हटलं होतं.”

तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ त्यांच्यावर हे उपचार सुरूच राहिले. त्यानंतर 2024 मध्ये अचानक एका डॉक्टरांचा त्यांना फोन आला आणि त्यांनी त्यांची केमोथेरपी आता बंद केली जात असल्याचे सांगितले.
“असे का केले जात आहे याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. फक्त इयान ब्राउन निवृत्त झाले आहेत एवढेच त्यांनी मला सांगितले. आणि त्यांच्या निवृत्तीबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होते,” असे जोन्स म्हणाल्या.
त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नवे कॅन्सरतज्ज्ञ देतील असे सांगण्यात आले खरे, पण ते नवे डॉक्टर कोण याचे नाव मात्र सांगितले नाही.
“मला पुढे काय करावे, नेमके कोणाकडे जावे किंवा कोणाशी बोलावे हेच कळत नव्हते. कारण त्या संपूर्ण काळात हॉस्पिटलकडून मला कोणताही आधार मिळाला नाही,” असं त्या म्हणाल्या.
अखेर मे 2025 मध्ये तिच्या वकिलांच्या सांगण्यावरून न्यूरोसर्जन आणि रेडिओलॉजिस्टनी केलेल्या स्वतंत्र तपासणीनंतर त्यांना मेंदूचा कॅन्सर कधी झालाच नव्हता हे सत्य त्यांना सांगण्यात आले.
त्यांना प्रत्यक्षात ‘ट्युमफॅक्टिव्ह डिमायलिनॅशन’ नावाचा आजार झाला होता. मेंदूला येणाऱ्या या सुजेवर न्यूरोलॉजिस्ट उपचार करतात आणि त्यासाठी हाय-डोस स्टेरॉइड्सची औषधे देतात.
जोन्स यांना ही माहिती त्यांचे वकील आणि वैद्यकीय तज्ज्ञांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉलवर समजली.
अनेक रुग्णांची बाजू मांडणाऱ्या टिन्स्ली यांनी म्हटलं की, “जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.”

केमोथेरपीच्या त्या उपचारांनी आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकल्याचे कोव्हेंट्री येथे राहणाऱ्या बेकी यांचे म्हणणे आहे.
‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स’ने (RCP) केलेल्या तपासणीत थेट प्रा. इयान ब्राउन यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख ‘डॉक्टर वाय’ असा केला आहे.
तपासण्यात आलेल्या 20 प्रकरणांपैकी 15 प्रकरणे एकंदरीत असमाधानकारक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. या तपासणी प्रक्रियेत संबंधित कन्सल्टंट स्वतः सहभागी झाले नव्हते.
हे औषध दिल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, याची माहिती रुग्णाला दिली होती का किंवा त्याची काही लेखी नोंद ठेवली होती का, याचे जवळपास कोणतेही पुरावे नाहीत, असे तपासणी पथकाच्या पाहणीत समोर आले.
या प्राथमिक अहवालानुसार, काही रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांनी आजाराची योग्य शहानिशा करण्याची किंवा मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच इतर सहकारी डॉक्टरांशी चर्चा करून निर्णय घेण्याची पद्धतही पाळली नाही. यामुळे निदानातील संभाव्य चुका तशाच पुढे चालू राहिल्या.
अहवालातील हे निष्कर्ष ऐकून “हे थरकाप उडवणारे आहे,” अशी प्रतिक्रिया जोन्स यांनी दिली.
ती पुढे म्हणाली, “त्या एका डॉक्टरने काय केले एवढाच हा विषय नाही. तर हॉस्पिटलने त्यांना इतका प्रदीर्घ काळ स्वतःच्या मर्जीने कारभार कसा करू दिला, हा मुख्य प्रश्न आहे.”
“ते जणू स्वतःचाच स्वतंत्र कारभार हाकत होते आणि ते नेमके काय करत आहेत यावर लक्ष ठेवायला तिथे कोणीच नव्हते.”
पुढील चौकशी सुरू
UHCW च्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, या सर्व बाधित रुग्णांची तपासणी ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्ण झाली असून “त्यांच्यासाठी योग्य ती उपचार योजना लागू करण्यात आली आहे.”
पुढे ते म्हणाले, “हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोणतीही शंका किंवा गैरप्रकार निर्भयपणे मांडता यावा आणि त्यांना यंत्रणेचा पाठिंबा मिळावा, यासाठी एका स्वतंत्र संस्थेमार्फत आमच्या अंतर्गत तक्रार निवारण व्यवस्थेची चौकशी केली जात आहे.”
“आरसीपीचा सविस्तर अहवाल समोर आल्यानंतर ट्रस्ट त्याची पडताळणी करेल आणि त्या निष्कर्षांनुसार पुढची पावले उचलेल.
रुग्णांची सुरक्षा, त्यांना मिळणारी योग्य वागणूक आणि त्यांचे स्वास्थ्य हीच आमची पहिली प्राथमिकता आहे, असा विश्वास आम्ही जनतेला देतो,” असेही ट्रस्टने स्पष्ट केले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




