Home LATEST NEWS ताजी बातमी 13 वर्षांनंतर मोठा निकाल; ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी

13 वर्षांनंतर मोठा निकाल; ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी

4
0

Source :- BBC INDIA NEWS

यापूर्वी 2021 मध्ये सत्र न्यायालयाने या प्रकरणात तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

मुंबई उच्च न्यायालयाच्या (बॉम्बे हायकोर्ट) गोवा खंडपीठाने गुरुवारी (6 ऑगस्ट) ‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील बलात्कार प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.

लाइव्ह लॉ ने दिलेल्या माहितीनुसार तरुण तेजपाल यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2013 मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 2021 मध्ये सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. परंतु, आता उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला आहे.

लाइव्ह लॉ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने गोवा सरकारचे अपील मंजूर करत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलं आहे.

न्यायालयाने निर्णय जाहीर केला त्यावेळी तरुण तेजपाल न्यायालयात उपस्थित होते.

हे अपील सीआयडीने दाखल केले होते. या प्रकरणी राज्य सरकारची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मांडली.

खंडपीठाने काय म्हटलं?

बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने म्हटलं की, सत्र न्यायालयाचा आधीचा निर्णय आम्ही रद्द केला आहे आणि तरुण तेजपाल यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना भारतीय दंड संहितेतील कलम 376(2)(एफ) आणि (के), 354 ए आणि 354 बी अन्वये दोषी ठरवलं आहे.

भारतीय दंड संहितेतील कलम 354 ए अन्वये लैंगिक छळाला गुन्हा मानले गेले आहे. यात परवानगी नसताना केलेला शारीरिक स्पर्श, लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकणे किंवा अशा प्रकारच्या लैंगिक मागण्या करणं यांचा समावेश होतो.

कलम 354 बी हे एखाद्या महिलेला कपडे काढण्यासाठी भाग पाडणे किंवा त्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे अथवा जबरदस्ती करणे हा गुन्हा मानला जातो.

तरुण तेजपाल यांना नोव्हेंबर 2013 मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, STR/AFP via Getty Images

लाइव्ह लॉने दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती गोखले यांनी आज दुपारी शिक्षेच्या कालावधीबाबत निर्णय दिला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार हा कालावधीचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी तेजपाल यांना 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. तोपर्यंत त्यांना ताब्यात घेऊ नये असे देखील न्यायमूर्तींनी सांगितले होते.

तरुण तेजपाल यांच्यावतीने वकिलांनी म्हटलं की, “त्यांना या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. जर वरच्या न्यायालयाने आत्मसमर्पण करण्यास सांगितले तर ते तसे करतील, आणि जामीन देण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पालन करतील. अपील करण्याचा अधिकार कायम ठेवण्यासाठी त्यांना लगेच तुरुंगात पाठवू नये.”

तेजपाल यांच्या वकिलांनी सांगितलं की, ते (तेजपाल) कधीही फरार झाले नाहीत आणि त्यांनी न्यायालयाच्या सर्व आदेशांचे आतापर्यंत पालन केले आहे. त्यांचा पासपोर्ट अजूनही सरकारी अधिकाऱ्यांकडे आहे. निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही त्यांनी तो परत घेतलेला नाही. अटक झाल्यापासून ते आजपर्यंत कधीही परदेशात गेलेले नाहीत, याचीही न्यायालयाने नोंद घ्यावी.

हे संपूर्ण प्रकरण काय आहे?

गोवा पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 3 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात तेजपाल यांच्यावर चुकीच्या पद्धतीने नियंत्रण ठेवणे, जबरदस्तीने रोखून ठेवणे, लैंगिक छळ, हल्ला आणि पदाचा गैरवापर करून लैंगिक शोषण केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

तरुण तेजपाल यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी केला होता.

सरकारी पक्षाने 156 साक्षीदारांची यादी दिली होती. परंतु, शेवटी त्यापैकी सुमारे 70 साक्षीदारांचीच न्यायालयात उलटतपासणी करण्यात आली.

नोव्हेंबर 2013 मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘तहलका’ मासिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमादरम्यान एका तरुण महिला सहकाऱ्याने (भारतीय कायद्यानुसार त्यांचे नाव जाहीर करता येणार नाही) तरुण तेजपाल यांनी हॉटेलच्या लिफ्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.

सुरुवातीला तेजपाल यांनी म्हटलं होतं की, ‘निर्णय घेताना त्यांच्याकडून चूक झाली’ आणि ‘परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावला’ गेला, त्यामुळे ‘ही दुर्दैवी घटना’ घडली.

अटक झाल्यानंतर तरुण तेजपाल यांनी हे प्रकरण गोव्यातील तत्कालीन भाजप सरकारच्या 'राजकीय सूडभावनेचा' भाग असल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

परंतु, प्रकरण वाढल्यानंतर तेजपाल यांनी एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी ‘या संपूर्ण घटनेचं सत्य स्पष्टपणे समोर येईल म्हणून अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली’.

हे प्रकरण समोर आले तेव्हा दिल्लीत एका तरुणीवर झालेल्या निर्घृण सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर देशभरात लैंगिक हिंसाचाराबाबत मोठी चर्चा सुरू होती.

लैंगिक भेदभाव आणि महिलांवरील अन्यायाविरोधात बातम्या करणाऱ्या ‘तहलका’ने या प्रकरणात दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप टीकाकारांनी केला.

महिला संघटना तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तरुण तेजपाल यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

त्यांना 30 नोव्हेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली होती आणि 7 महिन्यांनंतर जुलैमध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती.

नंतर तेजपाल यांनी त्यांच्यावरील आरोप रद्द करण्यासाठी गोवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, त्यांना त्यावेळी दिलासा मिळू शकला नाही.

तरुण तेजपाल कोण आहेत?

भारतातील प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक असलेल्या तरुण तेजपाल यांनी देशातील काही मोठ्या वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये अनेक दशकं काम केले होते. त्यानंतर 2000 मध्ये त्यांनी ‘तहलका’ हे मासिक सुरू केले होते.

‘तहलका’ने खूप कमी वेळात उत्कृष्ट शोध पत्रकारितेसाठी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि भारतीय पत्रकारितेतील काही मोठ्या बातम्या जगासमोर उघड केल्या.

‘स्टिंग ऑपरेशन्स’ ही ‘तहलका’ची खास ओळख होती. ‘तहलका’चे पत्रकार आपली ओळख लपवून गुप्त कॅमेऱ्यांच्या मदतीने भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणत असत.

तेजपाल यांनी 2000 मध्ये तहलका नावाचे एक मासिक सुरू केले होते.

फोटो स्रोत, Ulf Andersen/Getty Images

2001 मध्ये केलेल्या ‘ऑपरेशन वेस्ट एंड’मुळे ‘तहलका’ मासिकाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. तब्बल 8 महिने त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं.

या स्टिंगमध्ये तहलकातील काही पत्रकार गुप्त कॅमेरे घेऊन शस्त्रास्त्रांचे व्यापारी बनून भारतीय सैन्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना भेटले.

या स्टिंगमध्ये बंगारू लक्ष्मण यांनीही एका शस्त्रास्त्र डीलसाठी लाच घेतल्याचं उघड झालं. तहलकाच्या या स्टिंगने तत्कालीन अटल बिहारी सरकारला अडचणीत आणलं होतं. तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

ज्यावर्षी तहलकाने हे स्टिंग प्रसिद्ध केलं त्याचवर्षी ‘एशियावीक’ने तरुण तेजपाल आशियातील 50 सर्वांत शक्तीशाली पत्रकारांपैकी एक असल्याचं म्हटलं होतं. तर ‘बिझनेस वीक’ने त्यांना आशियात होणाऱ्या परिवर्तनाचे धुरिणी असणाऱ्या 50 नेत्यांपैकी एक म्हटलं होतं.

हे स्टिंग ऑपरेशन समोर आल्याच्या 20 महिन्यांनतंर ब्रिटनच्या ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने या स्टिंगची तुलना अमेरिकेतील ‘वॉटरगेट’शी करत तरुण तेजपाल भारतातील सर्वात सन्मानित पत्रकार असल्याचं म्हटलं होतं.

तरुण तेजपाल यांचं खासगी आयुष्य

पांढरी दाढी आणि पोनी यामुळे वेगळी ओळख असणारे सेलिब्रिटी पत्रकार तरुण तेजपाल यांनी तहलका सुरू करण्याआधी प्रतिस्पर्धी ‘इंडिया टुडे’ आणि ‘आउटलुक’ या मासिकांमध्ये काम केलं होतं.

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तेजपाल यांनी गीतम यांच्याशी विवाह केला. त्यावेळी गीतम 19 वर्षांच्या होत्या. गीतम या सलाम बालक ट्रस्टच्या बोर्ड ऑफ ट्रस्टींपैकी एक आहेत. त्यांना टिया आणि कारा, या दोन मुली आहेत. त्यांनीही तहलकासाठी काम केलंय.

‘वेस्ट एन्ड’ या स्टिंग ऑपरेशननंतर तत्कालीन सरकारने तहलकाची चौकशी सुरू केली. हा तहलका प्रकाशनावर हल्ला असल्याचं तरुण तेजपाल यांनी म्हटलं होतं. 2003 साली तहलकाचे मुख्य फायनान्सर आणि स्टिंग करणारे पत्रकार यांना अटक झाली. त्यानंतर तेजपाल यांच्यासोबत काम करण्यासाठी खूपच कमी सहकारी उरले.

त्यावेळी त्यांनी ‘गार्डियन’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “संघर्ष करावा लागेल, याची कल्पना मला होती. पण तो या थराला जाईल, असं वाटलं नव्हतं.”

अखेर तहलका वेबसाईट बंद करावी लागली. 2004 साली तहलका वृत्तपत्राच्या रुपाने रिलाँच करण्यात आलं. “स्वतंत्र, निष्पक्ष आणि निडर पत्रकारितेला चालना देऊ”, असं म्हणत तहलका वृत्तपत्राची सुरुवात झाली. तीन वर्षांनंतर तहलका साप्ताहिक रुपात वाचकांच्या भेटीला आलं.

तरुण तेजपाल

फोटो स्रोत, Narendra bisht/outlook

2001 साली तेजपाल यांनी ‘सेमिनार’ मासिकासाठी एक लेख लिहिला होता. त्यात भारत विकसनशील राष्ट्र असल्यामुळे इथे आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणं सेक्स स्कँडलपेक्षा जास्त लक्ष वेधतात, असं त्यांनी म्हटलं होतं.

तेजपाल यांनी त्या लेखात लिहिलं होतं, “पैशाचा गैरवापर, पैसे लाटणे आणि उडवणे, ही अशी काही कृत्यं आहेत ज्याचा आम्हाला जास्त त्रास होतो.”

या लेखात ते पुढे लिहितात, “सेक्स स्कँडलला काही अर्थ नसतो. ते खरंतर विकसित राष्ट्रांचे चोचले आहेत. यातून त्यांना ‘ग्रुप वॉरिझम’ आणि ‘आर्टिफिशिअल एक्साइटमेंट’ मिळते.”

मात्र, हे लिहिताना एक दिवस आपणही अशाच एका सेक्स स्कँडलमध्ये अडकू याची त्यांना जराही कल्पना नसेल. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर देशभरातून महिला सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर आवाज उठू लागले होते आणि सरकारही महिलाविरोधी अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत होतं.

तेजपाल यांनी तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांची शेवटची कादंबरी 2011 साली प्रकाशित झाली होती. ‘द अलकेमी ऑफ डिझायर’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीला बॅड सेक्स पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. लैंगिक कृत्याचं अत्यंत लाजीरवाणं वर्णन करणाऱ्या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC