Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तन कर्करोग) रुग्णांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अशा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
शास्त्रज्ञांनी एक डीएनए चाचणी (टेस्ट) विकसित केली आहे. त्याद्वारे ब्रेस्ट कॅन्सरच्या कोणत्या रुग्णांना किमोथेरपीचा फायदा होईल आणि कोणाला नाही, हे समजू शकेल. त्यामुळं लाखो रुग्णांना गरज नसल्यास किमोथेरपी टाळता येऊ शकते.
आंतरराष्ट्रीय अभ्यासात असं आढळून आले आहे की, दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्णांना किमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून वाचवता येऊ शकतं. त्यांच्यावर फक्त हार्मोन थेरपीने उपचार केले जाऊ शकतात.
किमोथेरपीमुळे थकवा, मळमळ, केस गळणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
’40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचा अभ्यास’
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) यांनी केलेल्या या अभ्यासात 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 4 हजारहून अधिक नवीन ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांचा समावेश होता.
हे रुग्ण ब्रिटन, नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि थायलंड या देशांतील होते.
शास्त्रज्ञांनी प्रोसिग्ना नावाची जीन (जनुक) टेस्ट वापरली. या टेस्टमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढीशी संबंधित 50 जीन्सची क्रिया (ॲक्टिव्हिटी) मोजली जाते. त्यातून रुग्णाला आजार पुन्हा होण्याचा धोका किती आहे, हे ठरवलं जातं.
ज्या रुग्णांना कमी धोका असल्याचे स्कोअर मिळाले, (गटातील सुमारे दोन-तृतीयांश) त्यांना किमोथेरपी देण्यात आली नाही.
तरीही त्यांच्या 5 वर्षांच्या जगण्याचा दर 93.7 टक्के होता. तर किमोथेरपी घेतलेल्या रुग्णांचा जगण्याचा दर 94.9 टक्के होता.
ब्रेस्ट कॅन्सरचा मुख्य उपचार म्हणजे गाठ (ट्यूमर) काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे. त्यानंतर आजार पुन्हा होऊ नये म्हणून अनेकदा किमोथेरपी करण्याची शिफारस केली जाते.
जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असतो आणि जवळच्या लिम्फ नोड्सपर्यंत पसरलेला असतो, तेव्हा अनेकदा किमोथेरपी केली जाते.
डॉक्टरांना चिंता आहे की ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्वात सामान्य प्रकारात या उपचाराचा फारसा फायदा होत नाही, असं यूसीएलने सांगितलं.
…तर किमोथेरपी टाळता येऊ शकेल
या चाचणीमुळे दरवर्षी 5 हजारांपेक्षा जास्त एनएचएस रुग्णांना किमोथेरपी टाळता येऊ शकते, असं विद्यापीठाने म्हटलं आहे.
कार्डिफ येथील कॅरेन बोनहॅम या चाचणीत सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, या निकालांमुळे त्यांना खूप ‘मोठा दिलासा’ मिळाला आहे आणि त्यांना ‘ख्रिसमससारखं आनंदी’ही वाटत आहे.
64 वर्षांच्या या रुग्णाला प्रोसिग्ना टेस्टमुळे किमोथेरपी घ्यावी लागली नाही. त्याऐवजी त्यांना रेडिओथेरपी आणि हार्मोन थेरपी दिली गेली.
फोटो स्रोत, Getty Images
“कॅन्सरचे निदान आणि त्यावरील उपचार हे खूप धक्कादायक असू शकतात,” असं त्या म्हणाल्या.
“यामुळे तुम्ही अचानक अनिश्चिततेच्या जगात ढकलले जाता. जीवनातील प्राधान्यक्रम बदलतात आणि तुम्हाला फक्त जगायची इच्छा उरते.”
या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकेतील शिकागो येथे होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कर्करोग परिषदेत, अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या वार्षिक बैठकीत शनिवारी (30 मे) सादर केले जातील.
दीर्घकालीन दुष्परिणाम टाळता येतील
यूसीएल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ आणि या ट्रायलचे मुख्य संशोधक प्रोफेसर रॉब स्टाइन म्हणाले की, “हे निष्कर्ष अधिक वैयक्तिक उपचारांच्या दिशेने एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल आहे.”
“या चाचणीमध्ये ट्यूमरच्या जैविक (बायोलॉजी) गुणधर्मांचा वापर करून उपचाराचे निर्णय घेतले गेले. केवळ पारंपरिक तपासण्यांवर (क्लिनिकल फिचर्स) अवलंबून न राहता असे निर्णय घेण्यात आले.”
“रुग्णांसाठी याचा अर्थ असा की, अनेक रुग्णांना किमोथेरपीचा शारीरिक आणि मानसिक त्रास तसेच त्याचे संभाव्य दीर्घकालीन दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.”
“आरोग्य व्यवस्थेसाठी याचा अर्थ असा की, संसाधनांचा अधिक योग्य आणि पुराव्यावर आधारित वापर होतो.”
यूसीएलच्या मते, 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांवर हे निष्कर्ष लागू होतात का, हे अद्याप माहीत नाही. त्याचा परिणाम येण्यासाठी आणखी काही वर्षे लागू शकतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC







