Source :- BBC INDIA NEWS

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 2 मिनिटे

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

देशात उष्णतेचा कहर वाढलेला असताना पावसाच्या आगमनाच्या वृत्ताने सोशल मीडियावरही आनंद व्यक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुढील काही दिवसांत केरळ आणि कर्नाटकात तुरळक ठिकाणी 7 ते 20 सेमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच तामिळनाडूत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुढील 5-6 दिवसांत ईशान्य भारतात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. .

नैऋत्य मोसमी मान्सून पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

नैऋत्य मान्सूनची पुढील आगेकूच होण्यासाठी स्थिती चांगली आहे. मध्य अरबी समुद्र, पूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातील काही भाग, पश्चिम मध्यातील काही भाग, पूर्व-मध्य, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग आणि ईशान्येतील राज्यांमध्ये पुढली दोन तीन दिवसात नैऋत्य मान्सूनची आगेकूच होईल.

नेहमीच्या तुलनेत मान्सून यावेळी केरळमध्ये उशिरा दाखल झाला आहे

मान्सून साधारणपणे 5 जूनला दक्षिण महाराष्ट्रात आणि 10 जूनला मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात पोहोचणे अपेक्षित असते. पण मान्सून केरळमध्येच उशिरा पोहोचला त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र, मुंबईत मान्सून अपेक्षित वेळेपेक्षा थोडा उशिरा पोहचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

जूनमध्ये असं असेल हवामान

जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.

जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC