Source :- BBC INDIA NEWS

कॉक्रोच जनता पार्टीनं सरकारला दिली 7 दिवसांची मुदत, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबद्दल काय म्हणाले पक्षाचे प्रवक्ते?

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 9 मिनिटे

सोशल मीडिया चळवळ ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या समर्थकांचं जंतरमंतरवरील आंदोलन आता संपलं आहे.

दुपारी सव्वाचारच्या सुमारास अभिजीत दिपके जंतर मंतर वरून बाहेर पडले. “पुढच्या आंदोलनाबद्दल नेमकं काय करायचं याची माहिती घेतोय.”, असं ते म्हणाले.

भाषणात त्यांनी म्हटलं की, “5 वाजेपर्यंत जर प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर हे आंदोलन देशभर पसरेल.” पुढच्या शनिवारी पुन्हा येणार का असं गर्दीला विचारलं आणि मग गर्दीने जोरदार आवाज केला.

आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “आजचं आंदोलन तर फक्त एक ट्रेलर होतं.”

त्यांनी एक्सवर लिहिलं, “मी माझ्या आई-वडिलांना भेटायला घरी जात आहे, त्यांना शेवटचं भेटून एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. गेल्या 15 दिवसांत त्यांना खूप त्रास झाला आहे आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावं लागलं. आता मी त्यांना पुन्हा घरी घेऊन जाणार आहे.

“तुमच्या माहितीसाठी, आजचं आंदोलन फक्त एक ट्रेलर होतं. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद!”

7 दिवसांची मुदत

आंदोलनानंतर पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हीडिओ पोस्टमध्ये सौरभ दास म्हणाले, “तुम्हा सर्वांनी पाहिलं की आज जंतरमंतरवर हजारो लोक जमले आणि त्यांनी शांततेत आंदोलन केलं. या सर्व ‘कॉक्रोचेस’चे मनापासून आभार.”

अभिजीत दिपके

फोटो स्रोत, Getty Images

तर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “आज जंतरमंतरवर हजारो लोकांची गर्दी जमल्यानंतरही सरकारकडून आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही बातमी आलेली नाही. पंतप्रधानांनीही अद्याप धर्मेंद्र प्रधानांना पदावरून दूर केलेलं नाही.”

“ज्यांना वाटत आहे की आज फक्त एक आंदोलन होतं, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा फक्त ट्रेलर होता. आम्ही या सरकारला सात दिवसांचा वेळ देत आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्यात देशाच्या लोकशाहीबद्दल थोडीशी जरी जबाबदारी वाटत असेल तर त्यांनी सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पदमुक्त करावं. अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू.”

दिवसभरात काय काय झालं?

पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावर त्यांची भेट घेतली होती. यानंतर अभिजीत दिपके यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या समर्थकांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनकडे न येता थेट जंतरमंतरवर येण्याचे आवाहन केले होते.

अभिजीत दिपके आज (6 जून) सकाळी भारतात दाखल झाले. यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तसेच समर्थकांना आवाहन केलं.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी, काय म्हणाले अभिजित दिपके?

फोटो स्रोत, Cockroach Janta Party/Instagram

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते आंदोलन करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी सांगितलं होतं.

सकाळी अभिजित दिपके समर्थकांशी बोलताना ते म्हणाले होते, “गेल्या 5 ते 10 दिवसांपासून लोक मला विचारत आहेत की, सोशल मीडिया पेज चालवून काय साध्य होणार आहे. कॅमेरा चालू करा आणि त्यांना दाखवा की, जंतर मंतरवर किती झुरळे त्यांच्या घरातून बाहेर आली आहेत.”

यावेळेस अभिजित दिपके म्हणाले होते, “माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल. या देशात, जेव्हा एखादं मूल या सरकारविरोधात आवाज उठवतं, तेव्हा प्रत्येक आईला अशीच भीती वाटते. आपण या सरकारच्या भीतीमध्ये किती दिवस जगायचं?”

आंदोलनाला किती दिवसांसाठी परवानगी?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीपत्रानुसार, त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 6 जूनरोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी देण्यात आली.

सोशल मीडिया चळवळ 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके दिल्ली विमानतळावर पोहचल्यावर

फोटो स्रोत, Getty Images

कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत शांततापूर्व आंदोलन करण्याचं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं.

‘पक्षाचे नाव कोणतेही असो, देश हा पक्षापेक्षा मोठा’

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) कडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

योगेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हीडिओ शेअर केला आहे.

या व्हीडिओत त्यांनी कवी विनोद कुमार शुक्ल यांची कविता वाचत म्हटलं , “मी तुम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, पण तुमच्या भावना, संताप आणि उद्दिष्ट समजतो. कॉक्रोच जनता पार्टी, त्यांचे नेते किंवा तुम्हा सर्वांना मी ओळखत नसलो तरी एकत्र चालण्याचा अर्थ मला कळतो. मी तुम्हा सर्वांना सलाम करतो.”

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) कडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो स्रोत, Samir Jana/Hindustan Times via Getty Images

“देशातील सर्व विरोधी पक्षांना माझे आवाहन आहे की, आज आपले कर्तव्य एकत्र उभे राहण्याचे आहे. पक्षाचे नाव कोणतेही असो, देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. देश वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे,” असं आवाहन योगेंद्र यादव यांनी केलं.

@Cockroachisback

फोटो स्रोत, @Cockroachisback

‘दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदाच योग्य काम केलं असावं’

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (सीजेपी) आंदोलनाची परवानगी देण्याचा दिल्ली पोलिसांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

प्रियंका चतुर्वेदी

फोटो स्रोत, ANI

“आता पाहायचे आहे की, सोशल मीडियावरील पाठिंबा प्रत्यक्ष मैदानातही ताकदीत रूपांतरित होतो का,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे योग्य नाही- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात पुढील निवेदन जारी केले आहे. याबद्दलचे ट्वीट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत.

सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘रोज उघड होणारे घोटाळे गंभीर समस्या’

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सीजेपीच्या आंदोलनाला विचारपूर्वक पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितलं आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, “देशात परीक्षा प्रश्नपत्रिका फुटणे, भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी आणि रोज उघड होणारे घोटाळे ही गंभीर समस्या बनली आहे. नैसर्गिक संसाधनांची लूट सुरू असून अर्थव्यवस्था काही मोजक्या उद्योगपतींच्या हाती सोपवली जात आहे.”

'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनात सहभागी एक तरुण

फोटो स्रोत, @Cockroachisback

प्रशांत भूषण पुढे म्हणाले, “देशाचे परराष्ट्र धोरण कमकुवत झाले आहे आणि अमेरिकेवरील अवलंबित्व वाढत आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, माध्यमे आणि इतर संस्थांची विश्वासार्हताही कमी होत आहे.”

“आपण सध्या मोठ्या संकटाच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. कॉकरोच जनता पार्टी हा त्या परिस्थितीतून निर्माण झालेला स्वाभाविक प्रतिसाद आहे. या जेन-झेड आंदोलनाच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्याला सुज्ञ पाठिंबा तसेच योग्य दिशा मिळण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार काय म्हणाले?

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

बीबीसीसोबत बोलताना ते म्हणाले, “तरुण मुलांना सगळं समजतं. युवा चिडलेला आहे. त्याच्या मनात जो राग होता, त्याचा उद्रेक झालेला आहे. हे वादळ आणखी किती फोफावतं, हे बघावं लागेल. या आंदोलनाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की, ते दाबणं किंवा त्याचं शमन करणं हे सरकारसाठी फार धोकादायक ठरू शकतं.”

हे आंदोलन जरी युवकांचं असलं तरी यातून जो प्रश्न निर्माण झालाय तो फक्त युवकांचा नाही तर देशातल्या संपूर्ण नागरिकांचा आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार बीबीसीसोबत बोलताना म्हणाले

“आधीच लोकांचा विश्वास उडाला आहे, तो आणखी उडेल. तसेच, आमच्यासारखे जे सिनिअर्स येथे आले आहेत, त्यावरून असं लक्षात येतं की हे आंदोलन जरी युवकांचं असलं तरी यातून जो प्रश्न निर्माण झालाय तो फक्त युवकांचा नाही तर देशातल्या संपूर्ण नागरिकांचा आहे. म्हणून आम्ही आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहोत.”

सीजेपी हा आम आदमी पार्टीची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला जातोय, त्यावर आपलं मत काय? यावर प्रतिक्रिया देताना कुंभार म्हणाले, “हे घडलं सुप्रीम कोर्टात, झुरळ म्हणाल्यानंतर जो काही उद्रेक झाला त्याला कुणाचाही पाठिंबा असण्याचा काही संबंध नाही. मी देखील इथे एक सामान्य नागरिक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उपस्थित झालो आहे, कुठल्याही पक्षाकडून नव्हे.”

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

SOURCE : BBC