Source :- BBC INDIA NEWS

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं मध्यरात्रीचं चित्र काहीसं असं होतं.
खरं तर, हे आंदोलन शनिवारी (20 जून) दुपारी एक वाजता सुरू झालं. पोलिसांनी या आंदोलनाला सायंकाळी पाच वाजेपर्यंतच वेळ दिली होती. पण दुपारी सुरू झालेलं हे आंदोलन मध्यरात्रीही सुरूच होतं.
दरम्यान, जंतर मंतर वर एकिकडे आंदोलन सुरू असताना, रविवारी देशभरात लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देत आहेत.

रात्र व्हायला लागली तसतशी गर्दी कमी झालेली असली तरीही बऱ्याच संख्येनं आंदोलक आंदोलनस्थळी उपस्थित होते.
मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उर्वरित आंदोलकांपैकी काहीजण याप्रकारे विश्रांती घेताना दिसून आले.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी मध्यरात्री एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “तुम्ही पाहतच आहात की, आम्ही अद्यापही जंतर-मंतरवरच आहोत. आमचं आंदोलन रात्रभर तसेच उद्याही चालूच राहील. मला तुमच्या पाठिब्यांची गरज आहे. तुमच्याशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही.”
या व्हीडिओत त्यांनी उद्या म्हणजेच रविवारी सकाळी नऊ वाजता अधिकाधिक लोकांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचं आवाहनदेखील केलं.

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही आंदोलन स्थळावरून हटणार नाही, अशी भूमिका सीजेपीने घेतली आहे.
संध्याकाळी आंदोलनाच्या ठिकाणी लाईट घालवण्यात आली असून माईकही बंद करण्यात आला आणि आंदोलकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप दिपके यांनी केला.

“पंतप्रधानांनी पाणी आणि लाईट बंद करण्यास सांगितलं आहे का? गृहमंत्र्यांनी असा आदेश दिला आहे का? तुम्ही (पोलीस कर्मचारी) मला सांगा, मी त्यांच्याकडे विनंती करतो. तुमच्यावर कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असं ते म्हणताना दिसतात.

काल शनिवारी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मी सध्या जंतरमंतर येथे असून पोलीस मला अटक करण्यासाठी येत आहे.”
या व्हीडिओत त्यांनी समर्थकांना आवाहन करत म्हटलं होतं की, “हा व्हीडिओ पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाने आपआपल्या जिल्ह्यांत ‘जेल भरो’ आंदोलन सुरू करावे. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी हे आंदोलन थांबता कामा नये.”

मात्र, हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीनेच व्हावे, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात सरकारने संवादाचे मार्ग खुले करावेत आणि चर्चेला सुरुवात करावी, अशी मागणीही दीपके यांनी केली होती.

शनिवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता करण्यात आलेल्या आणखी एका पोस्टमध्ये सीजेपीने म्हटलं की, “दिल्ली पोलीस एका शांततापूर्ण आंदोलनाला बेकायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. शांतता नेमकी कधीपासून बेकायदेशीर झाली, दिल्ली पोलीस?” असा सवालही त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केला होता.
पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “धर्मेंद्र प्रधान यांच्या कथित निष्काळजीपणामुळे ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही येथून हलणार नाही.”

दरम्यान, देशभरात वाढलेल्या पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील गोंधळ आणि निकालातील विलंब यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टी देशभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे.

दिल्लीत आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने पुण्यातील आंदोलनात लखनौ, अमृतसर, हैदराबाद आणि जयपूर येथेही आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच देशभरातील युवकांनी मोठ्या आंदोलनासाठी एकत्र यावे असे आवाहन केलं होतं.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंचावरून केंद्र सरकारकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच आंदोलनासाठी मुदतवाढ देण्याची विनंतीही त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती.
मागील आंदोलनाच्या तुलनेत यावेळी गर्दी काहीशी कमी असली, तरीही मोठ्या संख्येने लोक आंदोलनस्थळी उपस्थित झाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




