Home LATEST NEWS ताजी बातमी युकेच्या पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा; युकेच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

युकेच्या पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा; युकेच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

युकेच्या पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

युनायटेड किंगडमचे (UK)पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी आज सकाळी किंग चार्ल्स यांच्याशी बोलून त्यांना कळवलं आहे की ते राजीनामा देत आहेत.

ते दोघेही एकमेकांशी फोनवर बोलले.

सत्ता हस्तांतरण सुरळीतपणे पार पडेल यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करू आणि आपल्या उत्तराधिकाऱ्याला पूर्ण पाठिंबा देऊ, असं किअर स्टार्मर यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, आता राज्य दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक सक्षम आणि अधिक न्याय्य आहे.

गेल्या सहा वर्षांपासून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले मित्र आणि सहकारी, तसेच ‘नंबर 10’ (पंतप्रधान कार्यालय) मधील कर्मचारी आणि “असाधारण प्रशासकीय सेवा” (सिव्हिल सर्व्हिस) देणाऱ्यांचे स्टार्मर यांनी आभार मानले आहेत.

स्टार्मर म्हणाले की, पुढील सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी ते सर्वात योग्य व्यक्ती आहेत का? असा प्रश्न त्यांचा स्वत:चा पक्ष त्यांना विचारत आहे.

ते म्हणाले की, त्यांनी या प्रश्नावर आपल्या पक्षाचं ‘उत्तर ऐकलं आहे’ आणि ‘ते उत्तर ते आनंदानं स्वीकारत आहेत’.

आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा ‘माझ्या प्रिय देशाला प्रथम स्थान देण्या’साठीच होता, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, “मी लेबर पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा देईन.”

यूकेचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

फोटो स्रोत, Reuters

राजीनाम्याच्या भाषणात स्टार्मर काय म्हणाले?

पुढील सार्वत्रिक निवडणुकीत देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपण सर्वात योग्य व्यक्ती आहोत, असं आपल्या पक्षाला वाटत नाही, हे मान्य करून किअर स्टार्मर यांनी आपण लेबर पक्षाचे नेते आणि पंतप्रधानपद सोडणार असल्याचं म्हटलं आहे.

त्यांच्या राजीनाम्याच्या भाषणातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • पंतप्रधान होणं हा आपल्या आयुष्यातील ‘सर्वात अभिमानास्पद क्षण’ असल्याचं स्टार्मर यांनी सांगितलं.
  • त्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे जेव्हा नेतृत्व आलं तेव्हा ‘लेबर पक्ष’ हा “राजकीय, आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या दिवाळखोर” अवस्थेत होता आणि तो पक्ष ‘संपला’ आहे, असं त्यांना ‘वारंवार’ सांगितलं जात होतं.
किअर स्टार्मर

फोटो स्रोत, PA Media

  • पुढील निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी आपणच सर्वात योग्य व्यक्ती आहोत का, असा प्रश्न पक्ष उपस्थित केला जात आहे, असं सांगून स्टार्मर म्हणाले की, त्यांना या प्रश्नाचं “उत्तर मिळालं आहे” आणि ते “उत्तर त्यांनी आनंदानं स्वीकारलं आहे”.
  • स्टार्मर यांनी जाहीर केलं की, त्यांनी किंग चार्ल्स यांच्याशी चर्चा केली आहे आणि जर त्यांच्या जागी नवीन नेता निवडण्यासाठी निवडणूक झाली, तर सप्टेंबरमध्ये संसदेचं कामकाज पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबर पक्षाला नवीन नेता मिळेल.
  • युकेच्या पंतप्रधानांनी पुढे सांगितलं की, सत्तेचं हस्तांतरण सुरळीतपणे व्हावं, यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि आपल्या उत्तराधिकार्याला पूर्ण पाठिंबा देतील.
  • भाषणाच्या शेवटी भावूक होत स्टार्मर म्हणाले की, आता ते त्यांच्या ‘सर्वोत्कृष्ट पत्नी’ आणि ‘सुंदर मुलांसाठी’ एक उत्तम पती आणि वडील म्हणून भूमिका बजावतील. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला मिठी मारली आणि ‘नंबर 10’ (पंतप्रधान निवासस्थान) कडे परतले.

खासदार मागत होते राजीनामा

युकेचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच खासदारांकडून होत होती.

दिवसेंदिवस या मागणीत वाढ होत होती. मात्र, दुसऱ्या बाजूला किअर स्टार्मर यांनी ते ‘सरकार चालवत राहतील’ असं म्हटलं होतं.

ज्या व्यक्तीनं 2 वर्षांपूर्वी निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर लोकांमध्ये अप्रिय ठरलेल्या धोरणांवरून अनेक वेळा यू-टर्न घेतले आणि अनेक घोटाळ्यांना सामोरं गेला, अशा व्यक्तीसाठी हा नाट्यमय बदल आहे.

युकेचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच खासदारांकडून होत होती.

फोटो स्रोत, PA Media

संपूर्ण इंग्लंडमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत लेबर पार्टीच्या जवळपास 1500 नगरसेवकांचा पराभव झाला आहे.

त्यानंतर वाढत्या असंतोषाचं चिन्ह म्हणून सरकारमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत.

माजी उपपंतप्रधान अँजेला रेनर, माजी आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग आणि ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम हे युकेचं नेतृत्व करण्यासाठीचे म्हणजे पंतप्रधानपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत.

ही परिस्थिती का निर्माण झाली?

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांच्या एका फेरीनंतर सध्याचं हे नेतृत्वाचं संकट निर्माण झालं.

अर्थात, काही काळापासून सर किअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी किंवा असंतोष वाढतच होता.

गेल्या वर्षी, किअर स्टार्मर यांच्या सरकारनं एकाच महिन्यात 3 प्रमुख धोरणं बदलली होती. त्यांच्या स्वत:च्याच पक्षात अंतर्गत दबाव निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

तर या वर्षाच्या सुरुवातीला असं उघड झालं की, लॉर्ड मँडेलसन यांची राजदूत म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पडताळणी किंवा छाननी झाली असता त्यात ते अपात्र ठरले होते. मात्र तरीदेखील त्यांची अमेरिकेतील ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांच्या एका फेरीनंतर सध्याचं हे नेतृत्वाचं संकट निर्माण झालं.

फोटो स्रोत, PA Media

दोषी ठरलेला लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्यासोबत लॉर्ड मँडेलसन यांचे संबंध असल्याचं समोर आल्यानंतर किअर स्टार्मर यांच्या निर्णयक्षमतेबद्दल लोक आधीच प्रश्न उपस्थित करत होते किंवा त्याबद्दल शंका उपस्थित करत होते.

त्यातून स्थानिक निवडणुकीत लेबर पार्टीला मोठा फटका बसण्याची पार्श्वभूमी तयार झाली.

त्यातच रिफॉर्म युके या नायजेल फराज यांच्या पक्षाला आणि डाव्या विचारसरणीच्या ग्रीन पार्टीला मिळत असलेल्या मोठ्या पाठिंब्यामुळे लेबर पार्टीला बसलेल्या या फटक्यात आणखी भर पडली. ‘रिफॉर्म युके’ ही पारंपारिक विरोधी पक्षाला आव्हान देणारी एक नवीन राजकीय शक्ती आहे.

कॅथरिन वेस्ट या लेबर पार्टीच्या एक खासदार आहेत. लेबर पार्टीचा पराभव होत असताना कॅथरिन यांनी जाहीर केलं होतं की, जर सोमवारपर्यंत (18 मे) एखाद्या दुसऱ्या उमेदवारानं किअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं नाही, तर त्या स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान देतील.

त्यानंतर, कॅथरिन वेस्ट यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, जवळपास 90 खासदारांनी किअर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांच्या राजीनाम्याबाबत एक वेळापत्रक जाहीर करावं, अशी मागणी केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC