Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मला पुढचा जन्म ‘गे’ म्हणूनच पाहिजे, कारण…’; उतारवयात क्विअर समुदायातील व्यक्तींना काय...

‘मला पुढचा जन्म ‘गे’ म्हणूनच पाहिजे, कारण…’; उतारवयात क्विअर समुदायातील व्यक्तींना काय वाटतं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रतिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBC/PuneetKumar

“मुंबईत कशिश प्राईड फिल्म फेस्टिवल सुरू आहे, मला नुसतं कुणी खाली जरी घेऊन गेलं असतं ना, तर मी एक फेरफटका मारून आलो असतो. आज सर्वांचे तिथले फोटो पाहून मला फार भरून येतंय. कुणालाही वाटलं नाही की मला बरोबर घेऊन जावं.”

मुंबईत राहणाऱ्या 65 वर्षांच्या धवल (नाव बदललं आहे) यांचा चेहरा मला हे सांगताना फार रडकुंडीला आला होता. पण हेच माझ्या जीवनाचं वास्तव आहे आणि मी ते आता स्वीकारलं आहे, असं सांगून त्यांनी विषय बदलला.

2022 मध्ये ब्रेनस्ट्रोक आल्यानंतर धवल यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय. 2022 पर्यंत सतत लोकांच्या गराड्यात असलेलं आयुष्य चार भिंतींमध्ये बंदिस्त झालंय.

खरंतर उतार वयात एकटं आयुष्य जगणं अनेकांच्या वाट्याला येतं. मुलंबाळं त्यांच्या आयुष्यात रमलेली आणि जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाला असेल, तर एकटं आयुष्य जगणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात.

पण क्विअर समुदायातील व्यक्तींची कहाणी उतारवयात थोडी वेगळी असते. अनेकदा कुठलाही पार्टनर नसलेली, रोजगाराचं कुठलंही ठोस साधन नसलेली ही मंडळी उतारवयात एकटेपणा बरोबरच उदरनिर्वाहासाठी छोटामोठा रोजगार करण्याच्या धडपडीतदेखील असतात.

धवल त्यांचं घर चालवण्यासाठी शोभेच्या वस्तू तयार करून विकतात. पण त्यांची मागणीसुद्धा सणासुदीच्या काळातच असते.

या लेखासाठी जेव्हा मी धवल यांची भेट घ्यायला गेलो तेव्हा 65 वर्षांच्या एका वयस्कर व्यक्तीनं दार उघडलं.

“धवल तुम्हीच का?” असं मी विचारल्यावर त्यांनी होकारार्थी मान डोलवली. ब्रेन स्ट्रोकच्या आजारामुळे थकलेलं शरीर, पांढरे झालेले केस आणि पावलं टाकतानाही त्रास होत असलेल्या धवल यांनी मला बसायला खुर्ची दिली आणि आमचं बोलणं सुरू झालं.

मुंबईतल्या भुलेश्वर या गजबजलेल्या भागात एका जुन्या इमारतीत दहा बाय दहाच्या खोलीत ते राहतात. 2000 मध्ये त्यांच्या आईचं निधन झाल्यापासून ते एकटेच राहत आहेत.

“मग तुमच्या आयुष्यात कधीच कुणी नाही आलं का?” या प्रश्नानंतर त्यांनी उत्तर दिलं की, “आलं होतं ना.”

“मी किशोर वयात असताना माझं 21 वर्षांच्या एका मुलावर प्रेम जडलं होतं. तो रोज माझ्या घरी यायचा. 10 वर्षं आम्ही एकत्र होतो. पण नंतर त्याने एका मुलीशी लग्न केलं आणि परदेशात कामासाठी निघून गेला. तेव्हापासून मात्र मी एकटाच आहे,” धवल सांगतात.

मग त्यांनी परत कधीच तुम्हाला संपर्क केला नाही का? मी विचारलं.

त्यावर धवल म्हणाले, “हो. परदेशातून परत आल्यावर त्यांनी परत संपर्क केला. आता त्याची मुलंबाळं मार्गाला लागली आहे. त्यामुळे तो एकटा पडला आहे. म्हणून पुन्हा माझ्या आयुष्यात येता येईल का हे चाचपण्यासाठी त्याने संपर्क केला होता. पण मी नकार दिला.”

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

“या वयात आता मला आणखी कुणाची जबाबदारी नकोय. मला कधीच वाटलं नव्हतं की, मी एवढा आजारी पडेन आणि चार भिंतींमध्ये अडकून पडेन.”

हे सांगताना धवल यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे दुःख, एकटेपणा आणि आपल्याच माणसांनी दिलेल्या धोक्याचे होते.

या लेखानिमित्त मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा कितीतरी दिवसांनी आपल्याला कुणीतरी भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं.

दररोज येणारा स्वयंपाकी आणि कामवाली बाई सोडली, तर अनेक दिवस त्यांचा तिसऱ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद होत नाही.

बहिण, तिचा नवरा आणि भाची सोडली तर कुणीच फारसं त्यांना भेटायला येत नाही.

“मी क्विअर कम्युनिटीतल्या अनेकांना मदत केली आहे. पण आता मात्र मला जेव्हा मदतीची गरज आहे, तर सर्व जण विसरून गेलेत,” धवल यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘संगत’ या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेनं 2024 मध्ये केलेल्या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, LGBTQIA+ व्यक्तींना उतार वयात एकटेपणाची भीती वाटते.

वाढत्या वयामुळे आरोग्यसेवा आणि इतर कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागण्याची त्यांना धास्ती असते. अशा व्यक्तींसाठी भावनिक, सामाजिक आणि काही गरज पडल्यास काळजी घेणारा सर्वांत मोठा आधार मित्रमैत्रिणींचा असतो, असंही या संशोधनात म्हटलं आहे.

हा अभ्यास करण्यासाठी ‘संगत’ या संस्थेने भारतातल्या 50 पेक्षा जास्त वय असलेल्या 20 क्विअर व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.

2020 मध्ये भारतातील मध्यमवयीन आणि ज्येष्ठ समलैंगिक पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर करण्यात आलेल्या एका संशोधनातूनही एकटेपणाच्या समस्येची तीव्रता समोर आली आहे.

40 वर्षांवरील 200 हून अधिक सहभागींपैकी 60 टक्क्यांहून अधिक जणांनी आपण एकटेपणाचा अनुभव घेत असल्याचं सांगितलं आहे.

“तुम्ही क्विअर असाल तर तुमच्या आयुष्यात फिजिकल आणि मेंटल फिटनेस फार महत्त्वाचा आहे,” असं मानसोपचार तज्ज्ञ निलेश मोहिती यांचं म्हणणं आहे.

सुशील आणि पीयूष गेले 30 वर्षं एकत्र राहत आहेत. दोघांचं वय 61 आहे. दोघंही दररोज न चुकता जिमला जातात.

“काहीही झालं तर मला आणि पियुषला शेवटपर्यंत फिट राहावंच लागेल, काहीही झालं तरी आम्ही व्यायाम सोडत नाही,” सुशील बोलता बोलता म्हणाले.

“पण असं का” असा प्रश्न जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला.

ते म्हणाले, “कोव्हिडच्या काळात पियुषला हार्ट अटॅक आला. तेव्हा मी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सर्व कागदपत्रांवर मी मित्र म्हणून सही केली. पण काही तपासण्या करताना रुग्णालयातल्या स्टाफला रक्ताच्या नातेवाईकांचीच सहमती पाहिजे होती.”

“त्यावेळी आम्ही एकत्रच राहतो, असं मी सांगूनसुद्धा हॉस्पिटलचा स्टाफ रक्ताच्या नातेवाईकांच्या सहमतीसाठी अडून राहिला.”

“यांचं कुणी नाहीये की हा अनाथ आहे? असा प्रश्नही स्टाफने केला. त्यांच्या या वागण्यामुळे मी पार रडकुंडीला आलो होतो,” असंही त्यांनी नमूद केलं.

प्रतिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBC/PuneetKumar

सुशील यांना हा अनुभव परत कधीच नकोय. त्यासाठीच ते फिट राहण्यासाठी जिमला जातात, स्विमिंगला जातात, टेबल टेनिस खेळतात आणि डान्सही करतात.

पण असं असलं तरी पियुष यांना आणखी एक चिंता सतावत आहे.

ते सांगतात, “आमच्या नात्याला कुठलंही लीगल स्टेटस नाही. एवढे वर्षं एकत्र राहूनसुद्धा आम्ही हॉस्पिटलमध्ये एकमेकांसाठी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. समजा आमच्यापैकी एक गंभीर आजारानं ग्रस्त आहे आणि अशावेळी मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा तो आम्ही घेऊ शकत नाही.”

“तसंच स्ट्रेट जोडप्याच्या लग्नात एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्याकडे त्याच्या संपत्ती आणि इतर सर्व गोष्टींचे अधिकार आपोआप जातात. इथं आम्हाला मृत्यूपत्र लिहून एकमेकांचं आयुष्य सोपं करावं लागेल. त्यातसुद्धा कुणी आक्षेप घेतला, तर दुसऱ्याच्या नशिबी या वयात कोर्टाच्या वाऱ्या आल्याच समजा.”

“आमच्यापैकी कुणाच्याही कुटुंबियांनी किंवा रक्ताच्या नातेवाईकांनी संपत्ती आणि वारस हक्कांसाठी एकमेकांच्या मृत्यूपश्चात त्रास द्यायचंच ठरवलं, तर ते त्रास देऊच शकतात.”

त्यासाठी पीयूष त्यांच्याच एका मित्राचं उदाहरण देतात.

ते सांगतात “आमच्या 2 क्विअर मित्रांनी एकत्र व्यवसाय सुरू केला होता. पण त्यातल्या एकाचा दुर्दैवानं मृत्यू झाला. आता दुसऱ्या पार्टनरला त्याच्या हक्कांसाठी लढावं लागतं. त्यात त्याची पुरती दमछाक झालीय. जो मानसिक त्रास आणि दुःख होतंय त्याची गणनाच करता येत नाहीये.”

पण पीयूष यांच्या मते क्विअर व्यक्तीची आर्थिक बाजू भक्कम असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे थोडा का होईना आधार मिळतो असं, ते सांगतात.

“आयुष्यभर आपण स्वीकारार्हता आणि वेगवेगळ्या नात्यांच्या मागे धावत असतो. नातेवाईक शेवटी पाहतील म्हणून त्यांच्यासाठी पैसे खर्च करत असतो. जवळच्या लोकांसाठी पैसा खर्च करावा, पण ते करताना उतार वयात कुणी पाहिलं नाही तर काय होईल याचासुद्धा विचार करून योग्य गुंतवणूक करून ठेवावी,” असं 55 वर्षांच्या रवी (नाव बदलेलं) यांना वाटतं.

रवी यांचा इंटिरिअरचा स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे. अंधेरीमध्ये छोट्याशा घरात राहणारे रवी सतत त्यांच्या मित्रांच्या गराड्यात असतात. मित्र तेही त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयाचे.

तुमचे सर्व मित्र तुमच्यापेक्षा अर्ध्या वयाचे का आहेत? यावर ते सांगतात, “माझ्या वयाच्या सर्व माझ्या मित्रांची लग्न झाली आहेत. ते त्यांच्या आयुष्यात आणि मुलाबाळांमध्ये रमले आहेत. मी एकटा आहे.”

“माझ्याकडे बराच वेळ आहे आणि तरूण मुलांकडेसुद्धा वेळ आहे. शिवाय जेन झीच्या मुलांना क्विअर मित्राला बरोबर घेऊन वावरण्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही.”

सुशील आणि पीयूष यांनीसुद्धा मला सांगितलं की, त्यांची मित्र मंडळी आणि उठबस ही तरुण मुलांमध्ये जास्त आहे.

काही मदत लागली तर ही मुलं लगेच धावून येतात, असा अनुभव रवी सांगतात.

रवी यांना सुद्धा साठीनंतर आयुष्यात एकटं पडण्याची भीती वाटते. वयाच्या साठीनंतर रत्नागिरीतल्या आपल्या गावाला जाऊन राहण्यासाठी पैशांची जमवाजमव करत आहेत.

“कधीकधी असं वाटतं वेळेत लग्न केलं असतं, तर आता एकटा नसतो. उतारवयाची फार चिंता नसती,” असं रवी यांना वाटतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

याच चिंतेतून पीयूष यांच्या एका मित्रानं त्यांचं एका मुलाबरोबरचं रिलेशनशिप वर्कआऊट झालं नाही म्हणून मग वयाच्या 40व्या वर्षी मुलीबरोबर लग्न केलं.

2018 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढलं. त्यानंतर 2020 मध्ये करण्यात आलेल्या एका ऑनलाईन सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक क्विअर व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

त्यातील 40 टक्के सहभागी हे 45 पेक्षा जास्त वयाचे होते आणि त्यातल्या 30 टक्के व्यक्तींनी महिलांशी विवाह केला असल्याचं समोर आलं होतं.

वयाची पासष्ठी पार केलेले आणि वेगवेगळे अनुभव घेतलेले सुशील चर्चेच्या शेवटी सांगतात, “माझी तर देवाला विनंती असेल की, मला पुढचा जन्मसुद्धा ‘गे’ म्हणूच दे. कारण माझ्या समुदायासाठी मला खूप काम करणं बाकी आहे.”

मुंबईतील डॉ. प्रसाद दांडेकर आणि अशोक राव कवी यांनी मिळून 50 पेक्षा जास्त वय असलेल्या क्विअर पुरुषांसाठी ‘सिनएजर्स’ नावाचा एक सपोर्ट ग्रुप सुरू केला आहे. जे एकमेकांना मदत करतात. महिन्यातून एकदा लंच, डिनर, मूव्ही किंवा पिकनिकसाठी भेटतात. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आयोजित करतात.

प्रोफेसर शैलेश ठाकूर या ग्रुपचे सदस्य आहेत. ते सांगतात, “आम्ही वेळोवेळी भेटत असतो. एकमेकांना मदत करत असतो. पण मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता ‘बडी सिस्टिम’ (Buddy System) आम्हाला म्हणावी तशी सुरू करता आलेली नाही.”

“बडी सिस्टिम म्हणजे प्रत्येक वयस्कर आणि एकट्याने राहणाऱ्याला त्याच्या जवळच्याच भागातून कुणीतरी तात्काळ मदतीसाठी येईल अशी व्यक्ती मिळवून देणे. त्यावर आमचं काम सुरू आहे.

“केअर गिव्हींग सिस्टम कशी नीटनेटकी करता येईल यावरसुद्धा आम्ही विचार करत आहोत. असं असलं तरी ज्या ज्या वेळी कुणाला मदतीची गरज आहे त्या त्या वेळी आम्ही एकमेकांना मदत करत असतो.”

‘सिनएजर्स’ ग्रुपचे सध्या 150 पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि ते भारतभरात वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत.

पण, हे सगळं झालं शहरी जीवनाबाबत. एखादी क्विअर व्यक्ती छोट्या खेड्यात राहत असेल आणि जन्माने महिला असेल, तर मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते.

वयाची साठी पूर्ण केलेल्या सोनू यांना त्यांचे नातेवाईक आजही लग्नासाठी गळ घालतात. (नाव बदलेलं आहे.)

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBC/PuneetKumar

“माझे नातेवाईक अजून मला म्हणतात की, लग्न कर, एकट्यानं जीवन जगणं कठीण आहे. तर त्यावर मी म्हणते की जीवन सोपं असेल की कठीण हे तर परमात्मा ठरवतो. लग्न करणं काही अजिबात महत्त्वाचं नाही.”

सोनू राजस्थानच्या एका छोट्याशा खेड्यात त्यांच्या लहान भावाबरोबर राहतात.

एकतर मुलगी आणि त्यातही मुस्लीम. शिवाय पुरुषांसारखा पेहराव आणि तसंच वागणं. त्यामुळे गावातले लोक त्यांची थट्टा करायचे.

ते म्हणायचे, “ही मुलगी नाहीये हा तर मुलगा आहे. मुलांसारखे केस ठेवते. बुरखा खालत नाही.”

पण आता या गावानंही त्यांचा स्वीकार केला आहे.

बीएपर्यंत शिक्षण झालेल्या सोनू यांनी सुरुवातीला एका कंपनीमध्ये काम केलं. पण आता पार्टटाईम ड्रायव्हिंगचं काम करतात.

“वय वाढत जातं तसं एकटेपण जाणवतं. पण मी आता एकटेपणाचा फार विचार करत नाही. माझे मोठे भाऊ आणि त्यांची मुलं माझ्या शेजारीच राहतात. संपूर्ण कुटुंबच तसं माझ्या जवळ राहतं. त्यांना सर्वांना माझ्याबाबत माहिती आहे आणि त्यांनी माझा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे कुठलीही गरज लागली तर त्यांची फार मदत होते.”

सोनू सांगतात की, त्यांना आठवीत असल्यापासूनच मुली आवडायच्या. त्यांची तेव्हा एक गर्लफ्रेंडसुद्धा होती. तसंच त्यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीपासूनच त्यांचा स्वीकार केला आहे.

“माझे पालक सरकारी नोकरीत होते. आई नर्स होती. तिला सुरुवातीपासूनच माझ्याबाबत कल्पना होती. तिने मला कधीच रोखलं नाही. मी माझ्या मर्जीने पुरुषांचे कपडे घालायचे. मी कायम बिनधास्त जगत आले आहे. माझ्या कुटुंबाने कायम मला पाठिंबाच दिला आहे.”

त्यामुळेच सोनू बिनधास्त आयुष्य जगत गेल्या आणि आजही जगत आहेत.

धवल, सोनू, रवी, सुशील आणि पीयूष ही काही प्रातिनिधीक उदाहरणं आहेत. क्विअर कम्युनिटीतील अनेक वयस्क मंडळी आजच्या घडीला छुपं किंवा दुहेरी आयुष्य जगत आहेत.

उतार वयात आल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागणं हे प्रत्येकाच्याच वाट्याला येतं. ते कुणालाच चुकलेलं नाही. पण क्विअर मंडळींच्या या समस्यांना थोडे आणखी आणि कठोर कंगोरे असतात.

‘सिनएजर्स’सारखे काही उपक्रम नक्कीच सुरू आहेत. पण त्याची आणखी किती आणि कशी गरज आहे हे तेव्हाच लक्षात येईल जेव्हा अशा मंडळींची एकूण संख्या लक्षात येईल. त्यासाठी या विषयावर सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे.

काही संस्था आणि व्यक्ती यावर संशोधन करून खारीचा वाटा नक्की उचलत आहेत. पण अजूनही मोठं काम होणं बाकी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC