Home LATEST NEWS ताजी बातमी आंबेडकरांचे गुरू ते सत्यशोधक समाजाची प्रेरणा; कबिरांचा महाराष्ट्रावर एवढा प्रभाव कसा पडला?

आंबेडकरांचे गुरू ते सत्यशोधक समाजाची प्रेरणा; कबिरांचा महाराष्ट्रावर एवढा प्रभाव कसा पडला?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतीय टपाल खात्यानं प्रसिद्ध केलेलं संत कबिरांवरील तिकीट

कबीर. अडीच अक्षरांची थोरवी गाणारा महान संत. गेल्या शेकडो वर्षांपासून संपूर्ण भारतात कबिरांचा प्रभाव वाढत गेलेला आहे. कबिरांच्या विचारातून जगण्याची प्रेरणा घेणारे कोट्यवधी लोक जगभरात आपल्याला आढळतात.

कबिरांचा जन्म साधारणपणे 1398 साली झाला असा अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे. ते जन्माने मुस्लीम होते. काही लोक त्यांना जन्माने हिंदू मानतात. त्यांच्या जन्मासंबंधी विविध कहाण्या आहेत.

त्यातल्या काही कहाण्यांना चमत्काराची फोडणी दिलेली आहे. त्यांच्या जन्मासंबंधीच्या कोणत्याही कहाणीत रस नसला, तरी एक गोष्ट मात्र नीटपणे समजून घेतली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे त्यांच्या जुलाहा जातीची.

कबिरांच्या जडणघडणीत नामदेवांची भूमिका महत्त्वाची

कबिरांचा जन्म ज्या जुलाहा जातीत झाला. त्या जातीची एक ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे.

ती पार्श्वभूमी कबिरांच्या जडणघडणीचा एक वेगळा पैलू समोर आणते. त्यांच्या जुलाहा जातीविषयी काही निष्कर्ष हजारीप्रसाद द्विवेदी यांनी मांडलेले आहेत.

  • जुलाहा जात ही वयनजिवी जात आहे. वस्त्राशी संबंधित व्यवसाय करून उपजिवीका करणाऱ्या जातींना वयनजिवी जाती म्हणतात.
  • हे लोक निर्गुण निराकार स्वरुपात ईश्वराची उपासना करत. ते जातिभेद आणि ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे कडवे विरोधक होते.
  • एकूणच हिंदू समाजात त्यांना हिन, नीच आणि काहीवेळा अस्पृश्य मानलं जात होतं.
  • मुस्लीम धर्माच्या आगमनानंतर या जातीतील लोक मुस्लीम धर्मात धर्मांतरीत होऊ लागले.
  • या जातीतील लोकांची जातिभेद आणि ब्राह्मणवर्चस्वाला विरोध करण्याची जी भावना होती त्याचा संबंध बौद्ध आणि जैन धर्माशी आहे. बौद्ध आणि जैन धर्मातल्या या पूर्वाश्रमीच्या पुरोहित जाती असाव्यात.

कबिरांची जडणघडण समजून घेण्यासाठी त्यांच्या जुलाहा या वयनजिवी जातीची पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची आहे. कबिरांवर नाथ संप्रदायाचा प्रभाव होता. डाॅ. रा. चिं. ढेरे यांनी यासंदर्भात मांडणी केलेली आहे.

नाथपंथी योग्याचे स्वरुप, नाथपंथाचे दार्शनिक सिद्धांत, त्यांची साधना पद्धती आणि त्यांच्या भाषा – अभिव्यक्तीचा प्रभावही आपल्याला कबिरांच्या वाणीवर जाणवतो. कबिरांवर जसा नाथ संप्रदायाचा प्रभाव होता तसाच वैष्णव विचारांचाही प्रभाव होता.

कबिरांवर आपल्या नामदेवांचाही प्रभाव होता.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar

कबिरांवर रामानंदांमार्फत वैष्णव मताचा प्रभाव होता, अशी मांडणी पुरुषोत्तम अग्रवाल यांनी केलेली आहे. कबीरवाणी पाहिली असता, नाथ संप्रदायाचा प्रभाव अधिक असल्याचं जाणवतं. कबिरांवर आपल्या नामदेवांचाही प्रभाव होता.

कबिरांच्या जडणघडणीत नामदेवांची भूमिका फार महत्त्वाची आहे. नामदेवांचा उल्लेख कबिरांच्या अनेक रचनांमधून सापडतो.

कबिरांना सूफी संप्रदायाचाही परिचय होता. नाथ, रामानंदी वैष्णव, वारकरी, सूफी, शाक्त आणि त्याचबरोबर बौद्ध – सिद्ध या परंपरांचाही कबिरांवर प्रभाव होता.

या सर्व परंपरांमधील काही गोष्टी कबिरांनी ग्राह्य मानल्या, तर काही गोष्टी अग्राह्य मानल्या.

त्यांनी या सर्व परंपरांमधील वेषधाऱ्यांवर प्रखर टीका केली. कबिरांची वाणी फटकळ, आक्रमक, परखड, जहाल, सडेतोड आणि स्पष्ट होती.

ते कोणत्याही विशिष्ट तत्त्वप्रणालीच्या आणि संप्रदायाच्या चौकटीत अडकले नाहीत. ते प्रखरपणे सत्य मांडत राहिले.

धर्माच्या क्षेत्रातल्या ढोंगबाजीची त्यांनी अत्यंत निर्भयपणे चिकित्सा केली. लोकांना निर्मळ भक्तीचा मार्ग दाखवला.

त्यांचा मूर्तीपूजा, यज्ञयाग आणि श्राद्धकर्म अशा कर्मकांडाला नकार होता. त्यातल्या पुरोहितशाहीवर त्यांनी आसूड ओढले.

तुकोबांच्या अभंगात कबिरांचा उल्लेख

कबिरांचा काळ साधारणपणे 1398 ते 1518 असा जवळपास 120 वर्षांचा आहे. या अर्थानेही त्यांना दीर्घायुष्य लाभलं. कबिरांच्या हयातीतच त्यांची कीर्ती भारतभर पसरत होती.

साहजिकच त्यावेळी महाराष्ट्रातही कबिरांच्या वाणीचा प्रभाव गाजत होता. नामदेवांनंतर 48 वर्षांनी कबिरांचा जन्म झाला. त्यानंतर साधारणपणे पुढच्या 30 वर्षांत कबिरांची किर्ती आणि त्यांचा विचार महाराष्ट्रात पोचला असावा.

नेतृत्वविहिन झालेल्या वारकरी संप्रदायाला कबिरांच्या विचारांनी नवसंजीवनी मिळाली. त्यामुळेच पुढे एकनाथ महाराजांना बळ मिळालं.

एकनाथांनी जी कठोर धर्मचिकीत्सा केली त्यामागची पार्श्वभूमी कबिरांच्या विचारांची असावी.

सामाजिक समतेचा विचार कृतीशीलपणे एकनाथांनी पुढे नेला. त्यांच्यानंतर तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचं नेतृत्व केलं. त्यांच्यावर कबिरांचा लक्षणीय प्रभाव जाणवतो.

आज उपलब्ध असलेल्या तुकोबारायांच्या जवळपास 5-6 अभंगांमध्ये कबिरांचा उल्लेख आलेला आहे.

  • कबिराचे मागे विणू लागी शेले। मूल उठविले कुंभाराचे॥
  • कबीर मोमीन लतिफ मुसलमान। सेना न्हावी जाण विष्णूदास॥
  • चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागे शेले विणी॥
  • नागोजन मित्रा नरहरी सोनारा। रोहिदास कबिरा सोईरिया॥
  • रामा बसवंत कबीर खेळिया।जोडा बरवा मिळाला रे। पाचा सवंगडीया एकचि घाई। तेथे नाद बरवा उमटला रे। ब्रह्मादिक सुरवर मिळोनिया त्यांनी। तो ही खेळ निवडला रे॥
  • मागे काय जाणो आइकिली वार्ता। कबीर साते जाता घड्या वाटी॥
कबिरांचा काळ साधारणपणे 1398 ते 1518 असा जवळपास 120 वर्षांचा आहे. या अर्थानेही त्यांना दीर्घायुष्य लाभलं. कबिरांच्या हयातीतच त्यांची किर्ती भारतभर पसरत होती.

फोटो स्रोत, Getty Images

तुकोबारायांच्या या अभंगातून आपल्याला त्यांच्यावरचा कबिरांचा प्रभाव लक्षात येतो. यातील एक लक्षवेधक बाब म्हणजे तुकोबारायांनी खेळियाच्या अभंगात केलेला कबिरांचा उल्लेख.

या अभंगात त्यांनी वारकरी संप्रदायातील प्रमुख 4 संतांचा निर्देश केलेला आहे. ते संत, त्यांचे दैवत, त्यांचे संघटन आणि त्यांच्या कार्याची विशेषता तुकोबाराय सांगतात.

या प्रमुख 4 संतांच्या नावात त्यांनी कबिरांचा समावेश केला आहे.

नामदेवराय, ज्ञानोबाराय आणि एकनाथराय ही वारकरी संप्रदायातील मराठी संतांची 3 नावं आहेत. त्यात त्यांनी कबिरांचंही नाव नोंदवलं आहे.

याचा अर्थ तुकोबारायांच्या काळात कबीर हे वारकरी संप्रदायातील प्रमुख संत म्हणून स्वीकारले गेले होते असं दिसतं.

पुढच्या काळातही वारकरी संप्रदायात कबीर हे प्रमुख वारकरी संतांपैकी एक आहेत असं दिसतं.

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी तत्कालीन वारकरी संप्रदायाचे निरीक्षण करून काही नोंदी केल्या आहेत. त्यातील एका नोंदीत त्यांनी वारकरी संप्रदायात प्रमुख 5 संत मानले जातात, असं सांगितलं आहे.

त्यासाठी ‘कलीयुगी संत जाहले अनंत। परि पटाईत पाचजण॥’ अशा एका रचनेचा दाखला दिला आहे. त्या प्रमुख 5 संतांमध्ये नामदेवराय, ज्ञानोबाराय, कबीर, एकनाथराय आणि तुकोबाराय या संतांचा समावेश आहे.

‘ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबिराचा शेखा’

वारकरी संप्रदायात रामकृष्णहरि हा मंत्र आहे. या मंत्रातील हरीभक्ती नामदेवांनी, कृष्णभक्ती ज्ञानदेवांनी आणि रामभक्ती कबिरांनी वाढवली, असं तुकोबाराय म्हणतात.

कबिरांमुळेच वारकरी संप्रदायाचा मंत्र पूर्ण झाला. त्यातूनच ‘ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबिराचा शेखा’ ही लोकोक्ती महाराष्ट्रात रुजली.

ज्ञानोबारायांचा वारसा एकनाथांनी, नामदेवरायांचा वारसा तुकोबारायांनी आणि कबिरांचा वारसा शेख महंमदबाबांनी पुढे चालवला.

या लोकोक्तील कबिरांचा शेखा म्हणजे शेख महंमद. शेख महंमदबाबा म्हणजे आपल्या मराठी माणसांचे कबीरच. त्यांना कबिरांचा अवतार मानलं जातं.

तुकोबारायांच्या काळापासूनच वारकरी संप्रदायात मोठ्या प्रमाणात कबिरांचा विचार स्वीकारला गेला होता. पुढच्या काळात हा प्रभाव कमी – अधिक प्रमाणात वारकरी संप्रदायात दिसून येतो.

पंढरपुरात चंद्रभागा नदीवर कबिरांच्या नावाचा ‘श्रीराम कबीरमठ’ आहे. हा मठ बराच जुना आहे. या मठात पूर्वी कबीरपंथी साधू येत असत.

मठातल्या नित्योपासनेत कबिरांचे दोहे, पदे आणि अभंग म्हटले जातात. पूर्वी इतर वारकरी संतांप्रमाणे आषाढी वारीसाठी कबिरांची पालखी काशीहून पंढरपूरला येत होती. त्याची नोंद 1882 साली न्या. महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे.

पुरूषोत्तम अग्रवाल लिखित 'कबीर कबीर' पुस्तक

फोटो स्रोत, Facebook/Prof. Purushottam Agrawal

त्यांनी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या आणि दिंड्या यांचा अभ्यास करुन पंढरीची यात्रा या विषयावर प्रार्थना समाजात व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानात काशीहून पंढरपूरला येणाऱ्या कबिरांच्या पालखीचा उल्लेख आहे.

ही पालखी पंढरपुरातल्या कबीर मठात उतरत होती असं मठाचे प्रमुख ह.भ.प. विष्णू महाराज कबीर सांगतात.

पंढरपूरप्रमाणेच आळंदीतही कबीरमठ आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराच्या मागे पाण दरवाजाजवळ हा मठ आहे.

त्याचबरोबर या मठाच्या जुन्नर, ओतूर आणि आळे या ठिकाणी शाखा होत्या. त्यातील ओतूर आणि आळ्यातल्या कबीरपंथी मठांविषयी काही लिखीत उल्लेख सापडतात. आळंदीतला कबीरमठ वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे.

या मठातील पंढरीनाथ कबीरबुवा हे सत्यशोधक राजकारणी होते. त्यांच्या बहिणीचा विवाह तुकोबारायांचे वंशज भागवत महाराज देहूकर यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने झाला होता. हा विवाह वारकरी संप्रदायात गाजला होता.

कबीर आणि सत्यशोधक समाज

ओतूरलाही कबीरपंथीय वारकरी महंत होते. या कबीरपंथी वारकरी महंतांनीही सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

त्यात रामदासबाबा आणि त्यांचे पुत्र विठ्ठलबाबा लोंढे हे दोघे कबीरपंथी वारकरी पितापुत्र होते. ते सत्यशोधक विचार सांगणारी कीर्तनं करत.

त्यांनीच या काळात ‘सत्यशोधक कीर्तन’ हा नवा प्रकार उदयाला आणला. त्यातून संतांचा आधार घेऊन सत्यशोधक विचार सांगणारी वारकरी पद्धतीची कीर्तनं होत असत. त्यावेळी असे अनेक सत्यशोधक कीर्तनकार महाराष्ट्रभर तयार झाले होते.

रामदासबाबांनी जी सत्यशोधक कीर्तनं केली ती कीर्तनं छापील स्वरुपात उपलब्ध असल्याचं ‘सत्यशोधकांचे अंतरंग’ या जी. ए. उगले यांच्या पुस्तकात नोंदवलं आहे.

रामदासबाबांचे गुरू कबीरपंथी साधू रघुनाथबुवा होते. ते मूळचे आळ्याचे. त्यांची मुंबईत डोंगरी भागात समाधी आहे.

मुंबईच्या या डोंगरी परिसरातच महात्मा फुल्यांचा वावर होता. मुंबईतला हाच भाग सुरुवातीच्या काळात सत्यशोधकांचं केंद्र बनला.

संत कबीर

इथेच महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. मुंबईतल्या अशाच एका कबीरपंथी साधूच्या भेटीचा वृत्तांत स्वतः महात्मा फुल्यांनी दिला आहे. तो महात्मा फुले समग्र वाङ्मयात छापलेला आढळतो.

महात्मा फुल्यांना भेटलेले हे कबीरपंथी महंत वारकरीच होते. ते पंढरपूरच्या वाऱ्या करत असत असं महात्मा फुल्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुण्यात फुल्यांची भेट घेतली तेव्हा फुले शेतकऱ्यांचा आसूड लिहीत होते. त्या कबीरपंथी वारकरी महंताला महात्मा फुल्यांचे विचार मनोमन पटले. अशारितीने मुंबई आणि पुणे परिसरातल्या अनेक कबीरपंथी वारकरी महंतांनी सत्यशोधक समाजाला आधार दिला.

मुळात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तीच कबिरांच्या प्रेरणेतून. महात्मा फुले आणि त्यांचे इतर अनुयायी एकत्र बसून चर्चा करत. जातीभेद निर्मूलनाचा विषय त्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असायचा. यावेळी ज्ञानगिरीबुवा हे कबीरपंथी महंत असायचे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत कबिरांचा वाटा

ज्ञानगिरीबुवा कबिरांच्या बिजक ग्रंथातला विप्रमतीसी नावाचा भाग सर्वांना वाचून दाखवत. मूळ ग्रंथ ब्रज भाषेत असल्यानं ते त्याचा मराठीत अर्थ सांगत.

बीजक हा ग्रंथ आजही कबीरपंथातला सर्वोच्च तात्विक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात विप्रमतिसी हा भाग आहे.

विप्र म्हणजे ब्राह्मण, मती म्हणजे बुद्धी आणि तिसी म्हणजे तीस चौपाया. तीस चौपायातून कबीरांनी ब्राह्मणांच्या बुद्धीचं केलेलं वर्णन म्हणजे विप्रमतिसी.

याचा मराठी अर्थ ज्ञानगिरीबुवांनी सांगितला. त्यातूनच उच्चवर्णीयांच्या सामाजिक सांस्कृतिक गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सत्यशोधक समाजाची स्थापना कबिरांच्या प्रेरणेतून झाल्याचा हा प्रसंग तुकाराम हणमंत पिंजण यांनी नोंदवला आहे.

मुळात सत्यशोधक हा शब्दच कबिरांचा आहे, असं समाजवादी विचारवंत एस. एम. जोशी यांनी म्हटलं आहे.

गाडगेबाबांप्रमाणेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही कबिरांचा प्रभाव होता.

तुकोबारायांच्या काळापर्यंत आणि काही अंशी नंतरच्या काळातही कबीर हे वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते. त्यापुढच्या काळात मात्र वारकरी संप्रदायात कबिरांच्या वाङ्मयावर तितका भर दिला जात नव्हता असं आपल्याला दिसतं.

आधुनिक काळात वारकरी संप्रदायात कबिरांचा विचार नव्याने आणला तो गाडगेबाबांनी. गाडगेबाबांची जडणघडण जशी तुकोबारायांच्या अभंगांनी झाली होती तशीच ती कबिरांच्या दोह्यांनीही झाली होती.

गाडगेबाबांनी त्यांच्या 12 वर्षांच्या भ्रमंतीच्या काळात अनेक एकतारी भजनं ऐकली होती. ती एकतारी भजने प्रामुख्याने कबिरांची असावीत.

गाडगेबाबांच्या काळात महाराष्ट्रात कबिरांचा प्रभाव प्रामुख्याने दलित जनतेत जास्त होता. महाराष्ट्रातल्या दलित समाजात त्यावेळी महानुभाव आणि वारकरी संप्रदायाबरोबरच कबीर आणि रामानंदी पंथाचा प्रभाव होता.

त्या काळात गाडगेबाबांचा वावर दलित समाजातही होता. साहजिकच गाडगेबाबांनी या प्रकारे कबीरांचा विचार समजून घेतला. त्यांच्या कीर्तनात मुख्यत्वे तुकोबाराय आणि कबीर यांच्या वचनांवरच भर दिला जायचा. गाडगेबाबा आणि त्यांच्या परंपरेतील कैकाडीबाबांसारखे अनुयायीही कबिरांचे दोहे कीर्तनातून सांगत असत.

गाडगेबाबांप्रमाणेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही कबिरांचा प्रभाव होता. त्या काळात दलित जातीत प्रामुख्याने रामानंदी पंथ आणि कबीर पंथ असे 2 पंथ मोठ्या प्रमाणात होते.

विशेष म्हणजे या 2 पंथातील लोक एकमेकांच्या विरोधात असत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा मालोजीराव हे रामानंदी पंथी होते. बाबासाहेबांच्या वडिलांनी मात्र सातारला आल्यावर 1896 साली कबीरपंथाची दीक्षा घेतली.

त्यानंतर त्यांनी मांसाहार सोडला. कबीरपंथाच्या रिवाजाप्रमाणे ते दिवसातून 2 वेळा पंथाची बंदगी करत. त्याचबरोबर ते दररोज प्रार्थना करत.

या प्रार्थनेत कबिरांचे दोहे असत. त्याचबरोबर तुकारामांचे आणि चोखोबांचे अभंगही असत. इतर स्तोत्रे आणि श्लोकही असत.

या प्रार्थनेवेळी बाबासाहेबांसह त्यांची भावंडेही असत. बालपणीच्या वडिलांच्या या संस्कारांमुळे त्यांच्यावर संतांच्या अभंगांचा आणि कबिरांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता.

कबिरांचा हा प्रभाव त्यांच्यावर कायमच राहिला. त्यामुळे पुढे त्यांनी जे 3 गुरू मानले त्यात कबीरही होते.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदेही त्यांच्या प्रार्थना समाजाच्या प्रवचनांमधून कबीरपदांवर चर्चा करत असा उल्लेख त्यांच्या रोजनिशीत आहे.

कबीर आणि तुकाराम हे प्रार्थना समाजाचे अत्यंत आवडते कवी आहेत, असं विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक – सांस्कृतिक जडणघडणीत कबिरांचा महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदाय, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्या चळवळी यावर कबिरांचा मुख्य प्रभाव आहे.

महाराष्ट्र घडवणार्‍या या चळवळी ज्या विचारातून घडल्या त्यातील एक महत्त्वाची प्रेरणा कबीरच होते.

संदर्भ:

  • श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा
  • कबीर कबीर – पुरुषोत्तम अग्रवाल
  • कबीर : संत, समाजसुधारक आणि कवी – इंद्रजीत भालेराव – सॅम पब्लिकेशन
  • भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १ – चांगदेव भवानराव खैरमोडे
  • नाथ संप्रदायाचा इतिहास – डाॅ. रा. चिं. ढेरे – पद्मगंधा प्रकाशन
  • लोकसाहित्य शोध आणि समीक्षा – डाॅ. रा. चिं. ढेरे
  • महात्मा फुले समग्र वाङ्मय ( संपा. धनंजय किर, स. गं. मालशे आणि य. दी. फडके)
  • लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी श्री गाडगेबाबा – प्रबोधनकार ठाकरे
  • न्या. रानडे यांची धर्मपर व्याख्यान

(लेखक वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आहेत. ‘होय होय वारकरी’ या पुस्तकाचे लेखक आहेत. लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. )

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC