Home LATEST NEWS ताजी बातमी आता मोबाईल नंबर नसला, तरीही व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार; कसं ते जाणून घ्या

आता मोबाईल नंबर नसला, तरीही व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार; कसं ते जाणून घ्या

3
0

Source :- BBC INDIA NEWS

व्हॉट्सअ‍ॅप

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

जर तुमची मैत्रिण किंवा मित्राने तुम्हाला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं, त्यातले मेंबर्स वेगवेगळ्या विषयांवर इंटरेस्टिंग माहिती, लेख वगैरे शेअर करत आहेत. पण यात अनेक अनोळखी नंबर्स आहेत. त्यामुळे या ग्रुपमध्ये राहावं की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो.

तसंच, अशा एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आपल्या नंबरचा गैरवापर झाला तर? तुम्हालाही कधी ना कधी असा प्रश्न पडला असेल. ही चिंता दूर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला आता नंबरऐवजी युझरनेमने वापरता येणार आहे.

म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि हे सोयीचं होईल की आणखी धोक्याचं? जाणून घेऊयात.

ब्रायन अक्टन आणि यान कूम यांनी सुरू केलेलं व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपला 2014 साली फेसबुकने विकत घेतलं. हे दोन्ही प्लॅटफॉर्म आता मेटा नावाच्या एका मोठ्या कंपनीचे आहेत.

जगभरात सुमारे 300 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅप युझर्स आहेत, ज्यातले सर्वात जास्त भारतात आहेत. ऑफिसातलं काम असो, घरातल्या लोकांसोबत व्हीडिओ कॉल किंवा मित्रमंडळींसोबतचा टाईमपास, आपण सगळेच दररोज या ऍपवर असतो.

व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला एक फोन नंबर लागतो, आणि हा नंबरच मग तुमची ओळख बनतो. त्यामुळे एखाद्या ग्रुपमधल्या सगळ्यांनाच तुमचा फोननंबर माहिती होतो. कुणीही तुम्हाला मेसेज किंवा कॉल करू शकतं, कुठलंही बंधन नाही, प्रायव्हसी नाही.

पण आता हाच फोन नंबर लोकांना न दाखवताही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करू शकणार आहात. तसंच एखाद्याला व्यक्तीला भेटल्यावर त्याचा नंबर घेऊन व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क साधण्यऐवजी आता युझरनेमनेही तुम्ही त्याच्याशी चॅट करू शकाल.

व्हॉट्सअ‍ॅप

फोटो स्रोत, Getty Images

29 जूनपासून मेटाने हे फीचर रोलाऊट केलं आहे, जे टप्प्याटप्प्यानं जगभरात लागू होईल. म्हणजे फक्त एका युझरनेमच्या आधाराचे तुम्ही एकमेकांशी कनेक्ट करू शकाल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट सुरू करण्यासाठी फोन नंबर द्यावा लागेलच. पण तो आता इतरांना थेट दिसणार नाहीये.

तसंच सोशल मीडियाप्रमाणे यूझरनेम्सची कुठली यादीही जाहीर केली जाणार नाही.

याशिवाय एखाद्या नको असलेल्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा किंवा एखादा मेसेज रिपोर्ट करण्याचा पर्यायही कायम ठेवला आहे.

सुरक्षेच्या आणि गोपनीयता म्हणजे प्रायव्हसीच्या दृष्टीनं नंबर इतरांना दिसू नये, असं यूझर्सना वाटत असल्यानं हे पाऊल उचलल्याचं व्हॉट्सअ‍ॅपच्या हेड ऑफ प्रोडक्ट अ‍ॅलिस न्यूटन-रेक्स सांगतात.

नवीन लोकांशी संपर्क साधताना किंवा नवीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करताना याचा फायदा होणार आहे.

गोपनीयतेच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युझरनेम कसं तयार करायचं?

तुम्ही अँड्रॉईड वापरत असाल तर सेटिंग्समध्ये जा आणि प्रोफाईलवर टॅप करा. तिथे तुम्हाला Create Username हा पर्याय दिसेल.

आयफोन वापरत असाल तर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये तळाशी असलेल्या तुमच्या फोटोवर म्हणजे You या ऑप्शनवर क्लिक करा. पुन्हा आतमध्ये तुमच्या फोटोवर क्लिक करा, तिथे Create Username हा पर्याय दिसेल.

तुम्हाला तुमचं इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवरचं यूझरनेमही व्हॉट्सअ‍ॅप यूझरनेम म्हणून वापरता येईल.

हे यूझरनेम तयार करताना त्याला 35 कॅरेक्टर्सची मर्यादा असेल.

पण काही हायप्रोफाईल व्यक्ती आणि सेलिब्रिटीजची नावं तुम्हाला तुमचं युझरनेम म्हणून ठेवता येणार नाही. अशी काही नावं राखीव ठेवली जातील, म्हणजे इतर कुणी त्याचा गैरवापर करणार नाही.

तुम्हालाही तुमचं नाव आरक्षित करण्याचा पर्याय मिळेल. नंतर तुम्हाला तुमचं यझरनेम बदलताही येईल आणि डिलीटही करता येईल.

मग तुम्ही नवीन कुणाशी कनेक्ट करताना तुमचं यूझरनेम देऊ शकता. तसंच यूझरनेमचा क्यूआर कोड किंवा लिंक तयार करून इतरांसोबत शेअर करू शकता, जसं की अनेकदा इन्स्टाग्राम अकाउंट्सच्या बाबतीतही केलं जातं.

पण असं फीचर आणणारं व्हॉट्सअ‍ॅप हे पहिलं मेसेजिंग अ‍ॅप नाही.

सिग्नल या मेसेजिंग अ‍ॅपनेही 2024 सालीच अशी सुविधा लागू केली होती. गेल्या दशकात ब्लॅकबेरी आणि इतर काही मेसेंजर्समध्ये हेच फीचर असायचं.

व्हॉट्सअ‍ॅप

फोटो स्रोत, Getty Images

खोटी ओळख आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी, व्हॉट्सॲपने काही काळासाठी अस्तित्वात असलेली फेसबुक आणि इंस्टाग्राम युझरनेम त्यांच्या मूळ वापरकर्त्यांसाठी राखीव ठेवली आहेत.

न्यूटन-रेक्स म्हणाल्या की, फसवणूक करणाऱ्यांना त्यांचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी सेलिब्रिटी आणि सरकारी संस्थांशी संबंधित काही प्रसिद्ध युझरनेम कायमस्वरूपी संरक्षित केले जातील.

व्हॉट्सॲपवर तिनशे कोटींहून अधिक अधिक युझर्स आहेत. त्यामुळे अनेकांची नावे सारखी असू शकतात.

याच कारणासाठी कंपनीने सुरुवातीला आरक्षण प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या पसंतीचे युझरनेम निवडण्याची संधी मिळेल.

बऱ्याच लोकांना वाटू शकतं की आपलं व्हॉट्सॲप युझरनेम वेगळं असावं आणि ते फक्त ज्यांच्याशी संपर्क साधायचा आहे अशा लोकांनाच माहीत असावं. आता तुम्हाला ती पण सुविधा उपलब्ध झाली आहे.

जर तुम्हाला युझरनेम निवडण्यात अडचण येत असेल, तर व्हॉट्सॲपमध्ये युझरनेम जनरेटरची सुविधादेखील आहे. हेे फीचर तुम्हाला योग्य युझरनेम सुचवण्यास मदत करू शकतं.

तर दुसरीकडे, व्हॉट्सॲपने दिलेल्या माहितीनुसार, “कंटेंट क्रिएटर, छोटे व्यवसाय करणारे आणि काही संस्थांना अनेकदा त्यांची ऑनलाइन ओळख एकसारखीच ठेवावी वाटते. त्यांना व्हॉट्सॲपवर त्यांचे सध्याचे इंस्टाग्राम किंवा फेसबुक युझरनेम आरक्षित करण्याचा पर्याय दिला जातो.”

युझरनेम फीचर हे व्हॉट्सॲपला अधिक खाजगी बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक नवीन पाऊल आहे.

यापुढे एखाद्याशी पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी समोरच्या वापरकर्त्याला तुमचे अचूक युझरनेम माहीत असणे आवश्यक असेल.

एकदा हे फीचर सुरू झाल्यावर, जर तुम्ही तुमचे युझरनेम ॲक्टिव्हेट केले असेल, तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसायाला मेसेज कराल, तेव्हा त्यांना तुमचा फोन नंबर दिसणार नाही.

व्हॉट्सॲप युझरनेमशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

युझरनेम हा तुमच्या फोन नंबरचा पर्याय आहे. त्यामुळे लोक तुम्हाला शोधू शकतात आणि संदेश पाठवू शकतात.

युझरनेमसोबत एक ऐच्छिक चार-अंकी सुक्युरिटी कोडदेखील असेल. पहिल्यांदाच संपर्क साधणाऱ्यांसाठी तो सुरक्षेचा आणखी एक स्तर म्हणून काम करेल.

व्हॉट्सअ‍ॅप

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही युझरनेम आणि सुक्युरिटी कोड या दोन्ही गोष्टी इतरांसोबत शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना तुमचा फोन नंबर माहीत नसतानाही ते तुम्हाला व्हॉट्सॲपवर शोधू शकतील आणि संपर्क साधू शकतील.

हा सिक्युरिटी कोड पिनप्रमाणे काम करेल.

तुम्ही हा पर्याय सुरू केल्यास, अनोळखी लोक केवळ तुमचे युझरनेम माहीत असल्यामुळे तुम्हाला मेसेज करू शकणार नाहीत.

तुमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी त्यांना तुमचे युझरनेम आणि चार-अंकी सिक्युरिटी कोड या दोन्हींची आवश्यकता असेल.

जेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीने तुमच्याशी संपर्क साधावा असे वाटते, तेव्हा तुम्ही तुमचे युझरनेम आणि सिरक्युरिटी कोड दोन्ही शेअर करू शकता.

हा सिक्युरिटी कोड फक्त अशा लोकांसाठी आवश्यक असेल, जे तुमच्या युझरनेमचा वापर करून तुमच्याशी पहिल्यांदाच संपर्क साधत आहेत.

सिक्युरिटी कोडची कुठे गरज नाही?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्याच लोकांना तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी कोडची गरज भासणार नाही.

जसं की –

  • ज्या लोकांकडे तुमचा फोन नंबर आधीपासूनच सेव्ह केलेला आहे.
  • तुम्ही ज्यांच्याशी आधी गप्पा मारल्या आहेत.
  • जे तुमच्यासोबत आधीच एका व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये आहेत.
  • ज्यांनी तुमचा QR कोड स्कॅन केला आहे.
  • ज्यांना तुम्ही यापूर्वी मेसेज केला आहे.

यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्यांदा युझरनेम तयार करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या मोबाइलचा वापर करावा लागेल.

व्हॉट्सॲप

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही तुमच्या युझरनेम कीसाठी स्वतः वेगळा कोड निवडू शकत नाही. व्हॉट्सॲप तो स्वतः तयार करेल. पण नंतर तुम्ही तो बदलू शकता.

युझरनेम की पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्ही ती कधीही तयार करू शकता, बदलू किंवा काढून टाकू शकता.

पण हे फीचर खरंच किती सुरक्षित आहे?

ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि Privacy is Power या पुस्तकाच्या लेखिका कॅरिसा वेलिझ सांगतात, “यूझरनेम हे चांगलं फीचर आहे. ते थोडी आणखी प्रायव्हसी देतं. पण व्हॉट्सअ‍ॅप हे पूर्ण प्रायव्हसी राखणारं अ‍ॅप नाही. ते तुमचा मेटाडेटा गोळा करतं, आणि त्याचा वापर मार्केटिंगसाठी करतं. व्हॉट्सअ‍ॅपची मालकी मेटा कंपनीकडे आहे, आणि त्यांचा प्रायव्हसीविषयीचा रेकॉर्ड चांगला नाही.”

हे लक्षात घ्यायला हवं, की व्हॉट्सअ‍ॅप end-to-end encryption पुरवण्याचा दावा करतं, म्हणजे तुमच्या मित्रांशी किंवा कुणाशीही तुम्ही काय बोलताय, काय लिहिताय हे इतर कुणाला, अगदी कंपनीलाही वाचता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

पण तुम्ही कुणाशी, कधी आणि किती वेळ चॅट करता आहात, याची माहिती त्यांच्याकडे जमा होते आणि ती जाहिरातींसाठी वापरली जाऊ शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC