Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
8 जानेवारी 1996 रोजी मर्सेड गुइमारेस डॉस अँजोस आपल्या घराच्या विस्ताराचं काम मोठ्या उत्सुकतेनं पाहत होत्या. हे घर 1866 साली बांधलेलं होतं.
रिओ दि जानेरियोच्या बंदर परिसरातील हे त्यांचं आयुष्यातलं पहिलंच स्वतःच्या मालकीचं घर होतं.
6 वर्षांची बचत केल्यानंतर अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं होतं.
फोटो स्रोत, IPN
नूतनीकरणाचं काम सुरू असतानाच काही तासांतच अचानक अनपेक्षित गोष्ट समोर आली. खोदकामादरम्यान तिथे मानवी हाडं सापडली.
तिथं काम करणाऱ्या कामगारांना सुरुवातीला ही हाडं एखाद्या प्राण्याची असावीत असं वाटलं. पण मर्सेड यांचा त्यावर विश्वास बसला नाही.
माती आणि ढिगारा नीट पाहत असताना त्यांना एका प्रौढ व्यक्तीच्या तोंडातील सर्व दातांचा पूर्ण संचच सापडला.
“मी बांधकाम करणाऱ्याला म्हटलं, ‘हे कुत्र्याचं नाही, हे माणसाचं आहे.’
हे ऐकताच त्याने लगेच क्रॉसची खूण केली,” असं मर्सेड यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलला सांगितलं.
काही क्षणांनंतर मर्सेड यांना आणखी एक आकाराने लहान असलेला संच सापडला.
“मी त्याला सांगितलं, ‘हे एका लहान मुलाचं आहे.’ हे ऐकताच तो रडू लागला. तिथे उपस्थित असलेले सर्वचजण क्षणभर स्तब्ध झाले.”
घराखाली मृतदेहांचे अवशेष आणि अफवा
आणखी मानवी अवशेष सापडू लागले (त्यापैकी अनेक तुटलेल्या अवस्थेत) होते. मर्सेड यांनी ते वेगळे करून बॉक्समध्ये ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेबाबत विविध तर्कवितर्क, अफवा सुरू झाल्या.
“यादरम्यान आमच्या मनात अनेक विचार येऊ लागले. आधीच्या घरमालकाने लोकांची हत्या करून त्यांना इथेच पुरलं असावं किंवा एखाद्या सिरीयल किलरचं हे काम असावं, असंही आम्हाला वाटलं.”
या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळाली. परिसराच्या इतिहासाची माहिती असलेले एक शेजारी जुन्या काळातील नकाशा घेऊन तिथे आले.
“त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटलं, ‘तुम्ही ज्या घरात राहता, ते घर एका जुन्या स्मशानभूमीवर बांधलेलं आहे. इथे गुलाम बनवलेल्या लोकांना पुरलं जात होतं.”
फोटो स्रोत, Divulgação
मर्सेड यांना नकळत अनेक वर्षांपासून हरवलेल्या ‘सिमेट्री ऑफ द न्यू ब्लॅक्स’चा शोध लागला होता. साधारण 1770 ते 1830 या काळात या ठिकाणी सुमारे 40 हजार लोकांना दफन करण्यात आलं होतं.
चर्चच्या जुन्या नोंदींमुळे इतिहासकारांना या स्मशानभूमीच्या अस्तित्वाची माहिती होती. परंतु, शहराचा विस्तार होत गेल्याने त्याचे नेमकं ठिकाण काळाच्या ओघात हरवलं होतं.
‘न्यू ब्लॅक्स’ हा शब्द ब्राझीलमध्ये नुकतेच आणलेल्या आफ्रिकन गुलामांसाठी वापरला जात असत. त्यापैकी अनेकांना तेव्हा पोर्तुगीज भाषा बोलताही येत नव्हती.
आफ्रिकन गुलामांची तस्करी
“मला इथे कृष्णवर्णीयांचा (ब्लॅक) नरसंहार दिसला,” असं मर्सेड सांगतात. स्वतःच्या घराच्या जमिनीखाली मानवी अवशेष सापडल्याचा धक्का त्यांना आजही आठवतो. त्यामध्ये दातही पूर्ण न आलेल्या लहान मुलांचे अवशेषही मोठ्या प्रमाणात होते.
“आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हती. इथे पूर्वी लोकांची विक्री केली जायची आणि त्यांना इथेच पुरलं जायचं, हे आम्हाला कधीच कुणीही सांगितलं नव्हतं. हा इतिहास अनेक वर्षं लपवून ठेवला गेला होता.”
या ठिकाणाजवळच ‘वालॉन्गो वार्फ’ (बंदर) होतं. आफ्रिकेतून गुलाम बनवून आणलेल्या लोकांना घेऊन येणारी जहाजं इथे थांबत असत.
संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) माहितीनुसार, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 1831 मध्ये हे बंदर बंद होईपर्यंत सुमारे 9 लाख आफ्रिकन लोकांची या मार्गाने ब्राझीलमध्ये तस्करी करण्यात आली होती.
फोटो स्रोत, Júlia Dias Carneiro
ब्राझीलमधील इतर कोणत्याही शहरापेक्षा रिओ दि जानेरियोमध्ये सर्वाधिक आफ्रिकन गुलाम आणले गेले होते.
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘ट्रान्स-अटलांटिक स्लेव्ह ट्रेड डेटाबेस’नुसार, 300हून अधिक वर्षांच्या काळात सुमारे 48 लाख आफ्रिकन लोकांना जबरदस्तीने ब्राझीलमध्ये आणण्यात आले होते. अमेरिकेतील इतर कोणत्याही देशांपेक्षा हा आकडा सर्वाधिक होता.
अमेरिकेतील एमोरी विद्यापीठाच्या संशोधनानुसार, सुमारे 3 लाख लोकांचा ब्राझीलच्या किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
ब्राझीलमध्ये आल्यानंतर अनेक जण आजारपण, उपासमार आणि प्रचंड थकव्यामुळे मरण पावले. त्यांना ज्या गोदामांमध्ये ठेवून गुलाम म्हणून विकलं जात होतं, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अशा अनेकांना नंतर या स्मशानभूमीत (मर्सेड यांच्या घराखाली असलेल्या) पुरण्यात आलं.
‘इतिहास उलगडणारा खजिना’
1888 मध्ये गुलामगिरीची प्रथा रद्द करणारा ब्राझील हा पाश्चात्य जगातील शेवटचा देश ठरला.
परंतु, या प्रदेशातील या काळ्या इतिहासाची अनेक वर्षे फारशी दखल घेतली गेली नाही. 1990 च्या दशकात मर्सेड यांना हा शोध लागला, तेव्हाही या भागाचा गुलामगिरीशी असलेला संबंध फार कमी लोकांना माहीत होता. तो प्रामुख्याने इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांपुरताच मर्यादित होता.
2011 मध्ये परिस्थिती बदलू लागली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीवेळी सुरू असलेल्या पुनर्विकासादरम्यान वालॉन्गो वार्फचा पुन्हा शोध लागला. त्यानंतर या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या भागाच्या इतिहासाकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं.
आपल्या घरात ‘इतिहासाचा अमूल्य ठेवा’ असल्याची मर्सेड यांना जाणीव होती. पण त्याचं पुढे काय करायचं, हे त्यांना काही समजत नव्हतं.
फोटो स्रोत, IPN
सुरुवातीला मर्सेड या केवळ काही विशेष दिवशीच, जसं की ‘ब्लॅक कॉन्शसनेस डे’ (कृष्णवर्णीय जागृती दिन ) आणि ‘ॲबॉलिशन डे’ (गुलामगिरी निर्मूलन दिन) या दिवशी आपल्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवत असत.
मर्सेड सांगतात, “ते खूप कठीण होतं, स्मशानभूमी पाहायला कोण येईल, असंच मला वाटायचं.”
हळूहळू या ठिकाणाबद्दल लोकांची उत्सुकता वाढू लागली. तसेच हे ठिकाण जतन करून ठेवावं, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिलं.
2005 मध्ये मर्सेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड मेमरी ऑफ प्रेटोस नोव्होस’ (आयपीएन) या संस्थेची स्थापना केली.
फोटो स्रोत, IPN
हे ठिकाण हळूहळू विकसित होत गेलं. घरातील गॅरेजचं रूपांतर कायमस्वरूपी प्रदर्शन असलेल्या एका स्मारकात करण्यात आलं. जिथे एकेकाळी जलतरण तलाव उभारण्याचा त्यांचा विचार होता, त्या मागच्या अंगणात आता कॅफे, एक छोटंसं दुकान आणि अटलांटिक गुलाम व्यापार व आफ्रिकन वंशाच्या लोकांच्या इतिहासावरील एक विशेष ग्रंथालय कायमस्वरुपी उभारण्यात आलं आहे.
एके काळी स्मशानभूमी, आज स्मृती आणि संस्कृतीचं केंद्र
मर्सिड यांच्या मते, या जागेला केवळ स्मशानभूमी म्हणणं योग्य ठरणार नाही.
“हे मृतदेह टाकण्याचे खड्डे होते,” त्या सांगतात. “काही मृतदेहांना दुर्गंधी येऊ लागल्यामुळे जाळून टाकलं जायचं. अनेकदा एकावर एक मृतदेह टाकले जात आणि त्यामुळे खालचे मृतदेह चिरडले जात,” त्या पुढे म्हणतात.
चर्चच्या नोंदींमधून हे स्पष्ट होतं की, हे सर्व काही गुप्तपणे घडत नव्हतं. अनेकांचा मृत्यू अनामिक अवस्थेत झाला असला तरी त्यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद केली जात होती. मात्र त्यांची ओळख बहुतेक वेळा केवळ मृत्यूची तारीख, ते ज्या जहाजातून आले होते आणि त्यांचा मूळ प्रदेश यावरूनच पटवली जात असे. जर एखादं नाव नोंदीत आढळलं, तर ते सहसा गुलामांच्या मालकाचंच असायचं.
“या दफनभूमीवर आज चार घरं उभी आहेत. या ठिकाणी अंगोला, काँगो आणि मोझांबिकमधून आणलेल्या लहान मुलांना, अर्भकांना, तरुणांना आणि गर्भवतींना दफन करण्यात आलं होतं,” मर्सिड सांगतात.
आता 69 वर्षांच्या असलेल्या मर्सिड आजही स्मारक केंद्राशेजारील त्याच घरात राहतात.
“तुम्ही इथली जमीन खोदली, तर अजूनही हाडं सापडू शकतात,” त्या म्हणतात.
या परिसराला आतापर्यंत जवळपास तीन लाख लोकांनी भेट दिली असल्याचा अंदाज आहे. शिवाय, हजारो पर्यटक मार्गदर्शकांसह ऐतिहासिक आफ्रिकन हेरिटेज सर्किटची सफर करतात.
संस्थेच्या स्थापनेला 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ठिकाणाच्या शेजारीच एक नवीन सांस्कृतिक केंद्रही सुरू करण्यात आलं आहे.
मर्सिड यांच्या म्हणण्यानुसार, या केंद्रात कवी संमेलने, सांबा नृत्याचे कार्यक्रम, कला प्रदर्शने, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन सोहळे आणि मुलांसाठी वाचन क्लब आयोजित केले जाणार आहेत. अशा प्रकारचे काही उपक्रम सध्या शाळांच्या वेळेत सुरू असले, तरी आयपीएनमध्ये त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.
सध्या त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या पुनर्बांधणीसाठी निधी गोळा करत आहेत आणि यासाठी त्यांनी सर्वांना मदतीचं आवाहन केलं आहे.
मात्र त्यांचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही.
“हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. जर तुम्ही याबद्दल बोलणं थांबवलं, तर लोक हळूहळू ते विसरुन जातील,” मर्सिड म्हणतात.
त्यांच्या मते, हे काही साधं ठिकाण नाही. या जागेला एक ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व आहे.
“मला अनेकदा असं वाटतं की, आफ्रिकेतून इथे आणलेल्या त्या लोकांचे आवाज मला सांगत आहेत ‘आम्हाला विसरू नका’,” मर्सिड भावूक होत म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




