Home LATEST NEWS ताजी बातमी वैभव सूर्यवंशीवरून श्रेयस अय्यरला चाहते म्हणाले, ‘इतका अहंकार बरा नाही कॅप्टन साहेब’

वैभव सूर्यवंशीवरून श्रेयस अय्यरला चाहते म्हणाले, ‘इतका अहंकार बरा नाही कॅप्टन साहेब’

2
0

Source :- BBC INDIA NEWS

नुकतंच सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरची भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 4 मिनिटे

पत्रकार : सध्या सगळीकडे वैभव सूर्यवंशीचीच चर्चा सुरू आहे. प्रशिक्षक आणि कर्णधारांसाठी ही परिस्थिती खूपच कठीण असेल, ना?

या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय टी-20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या बोलण्याच्या शैलीवर अनेकांनी टीका केली असून, काही जण त्याला ट्रोलही करत आहेत.

भारताने अलीकडेच आयर्लंडविरुद्धची 2 सामन्यांची टी-20 मालिका 0-2 अशी गमावली.

या दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे या निर्णयावर क्रिकेट तज्ज्ञ, माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी कर्णधार तसेच संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते.

भारताने बुधवारी (1 जुलै) इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला.

याच मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी आणि त्याच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रश्न विचारण्यात आले.

त्यावर दिलेल्या उत्तरांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा घडवून आणली आहे. अनेकांनी त्याच्या वक्तव्यावर टीका केली आहे, तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.

अय्यरनं काय म्हटलं?

एका पत्रकाराने श्रेयस अय्यरला विचारलं, “वैभव सूर्यवंशीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत कर्णधार आणि प्रशिक्षकासाठी ती चर्चा हाताळणं कठीण होत असेल?”

यावर अय्यर म्हणाला, “मला असं काहीच दिसत नाही. मी तुमच्या बातम्या पाहत नाही, फॉलो करत नाही. इन्स्टाग्राम किंवा इतर कोणतंही सोशल मीडिया वापरत नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही चर्चा मी ऐकलेली नाही.”

यानंतर दुसऱ्या पत्रकाराने त्याला विचारलं, “जेव्हा एका खेळाडूला खोऱ्याने धावा काढूनही बेंचवर बसावं लागेत असेल, तर अशावेळी त्याला संधी कधी द्यायची हा निर्णय घेणं कर्णधार आणि संघ व्यवस्थापनासाठी कठीण जातं का?”

नेट प्रॅक्टिसदरम्यान वैभव सूर्यवंशी आणि ईशान किशन.

फोटो स्रोत, Getty Images

यावर अय्यर म्हणाला, “संघातील प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. केवळ एकच खेळाडू चांगला खेळला, असं नाही. प्रत्येकाला संधी द्यावी लागते. तसेच, संघातील त्याच्या भूमिकेबाबत त्याचा आत्मविश्वास कायम राहील, याचीही काळजी घ्यावी लागते.

ज्यांनी मागील विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांना टी-20 क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. ते या फॉरमॅटमधील आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे.”

‘टीम कॉम्बिनेशन’बाबत विचारलं असता श्रेयस अय्यर म्हणाला, “काय होणार आहे, हे तुम्हाला माहीत नसतं. आम्ही काय करणार आहोत हे आधीच सांगता येत नाही. ही माहिती संघापुरतीच मर्यादित असते. त्याबाबतची चर्चा आम्ही संघामध्येच करतो.”

“आमचं कॉम्बिनेशन काय आहे, हे आम्ही सर्वांना सांगू शकत नाही. प्रतिस्पर्धी संघालाही आम्हाला हे सांगायचं नाही. निश्चितच, वैभव हा खूप चांगला आणि प्रचंड गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. त्याला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.”

हॅरी ब्रुकने केलं सूर्यवंशीचं कौतुक

दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने वैभव सूर्यवंशीचं भरभरून कौतुक केलं. सूर्यवंशीसाठी त्यांच्या संघाने खास रणनीती आखली आहे का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.

त्यावर ब्रुक म्हणाला, “वैभव हा जबरदस्त खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्यासाठी आम्ही खास रणनीती तयार केली आहे. त्याला सर्वोत्तम खेळ करता येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू.”

श्रेयस अय्यर झाला ट्रोल

वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयस अय्यरने दिलेली उत्तरं क्रिकेट चाहत्यांना पसंत पडलेली नाहीत. सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्यावर टीका होऊ लागली आहे.

एक्सवरील @MARCUS907935 या युजरने लिहिलं, “ही कसली वृत्ती आहे? हा आहे आपला नवीन कॅप्टन, जो अशा प्रकारचं वक्तव्यं करतो.”

एक्सवरील @RanjanSinghh_ या युजरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “वैभवचं नाव ऐकताच आपला नवीन कॅप्टन किती अहंकारी पद्धतीने उत्तर देत आहे.”



वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयस अय्यरने दिलेली उत्तरं क्रिकेट चाहत्यांना पसंत पडलेली नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

एक्सवरील @Param_117 या युजरने लिहिलं, “आत्मविश्वास असणं चांगली गोष्ट आहे, पण हे उत्तर सगळ्याच गोष्टी नाकारण्यासारख्या वाटतात. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीमुळे चाहते आणि प्रसारमाध्यमं उत्साहित आहेत. तो उत्साह मान्य करण्यात काहीच चुकीचं नाही. रागाने बोलण्यापेक्षा थोडासा नम्रपणा नेहमीच माणसाचा मान वाढवतो.”

आयर्लंडविरुद्धच्या 2 आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवची जागा अय्यरने घेतली आहे.

यावर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्या संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवने केलं होतं. परंतु, सध्याच्या मालिकेसाठी सूर्यकुमारला केवळ कर्णधारपदावरूनच हटवण्यात आलं नाही, तर त्याला संघातही स्थान मिळालं नाही.

त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या निर्णयावर चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC