Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आणखी 4 ते 6 महिने त्रास सहन करा’; 4 महिन्यांत 4 मृत्यू,...

‘आणखी 4 ते 6 महिने त्रास सहन करा’; 4 महिन्यांत 4 मृत्यू, नाशिकच्या रस्त्यांवर नेमकं काय घडतंय? – ग्राउंड रिपोर्ट

2
0

Source :- BBC INDIA NEWS

4 महिन्यांत 4 मृत्यू, नाशिकच्या रस्त्यांवर नेमकं काय घडतंय?

फोटो स्रोत, BBC/Prajwal Bhalerao

  • Published

  • वाचन वेळ: 6 मिनिटे

28 जुलैच्या सकाळी निलेश कोतकर कामासाठी बाहेर पडतात. त्यांचा देवीदेवतांच्या प्रतिमा असलेल्या टाईल्स बनवण्याचा व्यवसाय. सकाळी 11.30 वाजता त्यांच्या पत्नी ज्योतीसोबत त्यांचं फोनवरून बोलणं होतं आणि तो फोन कॉल त्यांचा शेवटचा ठरतो.

निलेश कोतकर यांचा नाशिकच्या एक्सएलओ पॉईंटजवळ अपघात होतो. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, रस्त्यात आलेला खड्डा चुकवायचा प्रयत्न करताना त्यांच्या बाईकचा तोल जातो, डोकं एका दुसऱ्या गाडीवर आदळतं आणि त्यानंतर त्यांचा दवाखान्यात मृत्यू होतो.

ज्या रस्त्यावर त्यांचा अपघात झाला त्या सातपूर-अंबड लिंक रोडवर अनेक मोठमोठे खड्डे आहेत. आम्ही तिथून प्रवास केला त्यावेळी त्या रस्त्यावर कसलंही डागडुजीचं, दुरुस्तीचं काम सुरू नव्हतं.

मागच्या काही महिन्यात नाशिकमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेले कोतकर एकटे नाहीत. याआधी अंबड लिंक रोडवर प्रभाकर निकम, जून महिन्यात श्रमिकमधले प्रवीण गायकवाड, जुलैमध्ये दीपाली बेळे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

सध्या संपूर्ण नाशिकभर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध विकासकामे भरपावसात केली जात आहेत. त्यामुळे नाशिकचे अनेक मुख्य रस्ते वळवण्यात आले आहेत.

अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रोज कुठल्या न कुठल्या रस्त्यावर अपघात किंवा गाडी अडकल्याचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत असतात.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत.

राज्य सरकारने या विकास आराखड्यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा दावा केला जात आहे.

मात्र या कामांदरम्यान शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते आहे.

कुंभमेळ्याचा प्रभार असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या म्हणण्यानुसार, “नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी आपण 35 ते 40 हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला 4 ते 6 महिने त्रास होणार आहे.”

“ही वस्तुस्थिती आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होणार आहे की आपल्याला पुढचे 30-40 वर्षं कुठे बघावं लागणार नाही,” असं गिरीश महाजन यांनी नमूद केलं.

‘वेळेत काम झालं असतं तर माझा मुलगा आज स्वर्गवासी झाला नसता’

28 जुलैच्या घटनेनंतर निलेश कोतकर यांच्या पत्नी ज्योती कोतकर यांनी आंदोलन केलं. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

निलेश कोतकर यांचे वडील प्रल्हाद कोतकर यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा मृत्यू हा अत्यंत मोठा धक्का आहे. त्यांच्या मते, वेळेत रस्त्यांची दुरुस्ती झाली असती, तर कदाचित आज त्यांचा मुलगा जिवंत असता.

ते म्हणाले, “आमच्या घरामध्ये ही फार वाईट घटना घडली आहे. तो आमच्या घराचा कुटुंबप्रमुख होता. घटना घडून गेल्यावर जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची कामं झाली असती तर कदाचित हा प्रसंग ओढवला नसता.”

“हे मात्र निश्चित आहे की, ते जर हे आधी दुरुस्त झालं असतं, तर कदाचित माझा मुलगा आज स्वर्गवासी झाला नसता,” असं प्रल्हाद कोतकर म्हणतात.

प्रल्हाद कोतकर म्हणतात की, 'वेळेत काम झालं असतं तर माझा मुलगा वाचला असता.'

फोटो स्रोत, BBC/Prajwal Bhalerao

निलेश कोतकर यांच्यावर केवळ त्यांच्या पत्नी आणि मुलीची जबाबदारी नव्हती. कुटुंबाचा व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेली आणखी काही कुटुंबं त्यांच्यावर अवलंबून होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीच्या अनुपस्थितीपेक्षा मोठी पोकळी निर्माण झाल्याचं त्यांच्या पत्नी ज्योती यांनी सांगितलं.

निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलन केलं. त्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी कोतकर कुटुंबीयांची भेट घेतली.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देत एका आठवड्यात शहरातील खड्डे बुजवण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्याचं महाजन यांनी सांगितलं.

संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.

‘जे आमच्यावर ओढावलं ते दुसऱ्या कोणावर ओढवू नये’

अपघाताच्या दिवशी सकाळी 11.30 च्या सुमारास ज्योती कोतकर यांचं निलेश यांच्याशी शेवटचं बोलणं झालं. “टिफिन खाल्ला का?” एवढाच त्यांचा संवाद झाला.

दुपारी जेवायला केव्हा येणार हे विचारण्यासाठी त्यांनी पुन्हा फोन केला. मात्र यावेळी फोन निलेश यांनी नाही, तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने उचलला.

काही मिनिटांतच अपघात झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.

ज्योती कोतकर

फोटो स्रोत, BBC/Prajwal Bhalerao

ज्योती कोतकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “तिथल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे आणि सीसीटीव्हीमध्ये दिसतं त्यानुसार खड्डा चुकवताना अपघात झाला. ते पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.”

त्यांच्या मते, या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न भविष्याचा आहे. “आम्ही 5 जण आहोत. पण फक्त आमचंच कुटुंब नाही, आणखी 2-3 कुटुंबांची जबाबदारी त्यांच्यावर होती.”

मात्र या सगळ्यातही त्यांची मागणी भरपाईपेक्षा वेगळी आहे.

“मला आता काही सांगायला उरलेलं नाही. फक्त एवढंच सांगायचंय की, पुढे अशा घटना घडू नयेत. जे काही खड्डे असतील ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत. जे आमच्यावर ओढावलं ते दुसऱ्या कोणावर ओढवू नये,” असं ज्योती म्हणतात.

नाशिक

फोटो स्रोत, BBC/Prajwal Bhalerao

‘रोजचा प्रवास, रोजची भीती’

सातपूर-अंबड लिंक रोड हा केवळ औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता नाही. सातपूर आणि अंबड एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांचा हा रोजच्या प्रवासाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा फटका दररोज हजारो लोकांना बसतो.

गेली 16 वर्षे या रस्त्यावरून प्रवास करणारे राहुल निकम म्हणतात, “या वर्षी रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झाली आहे. याआधी अशी परिस्थिती कधी नव्हती. कुंभमेळ्याच्या कामांमुळे आणि रस्त्यांच्या कामांमुळे ही अवस्था झालीय.”

राहुल निकम

फोटो स्रोत, BBC/Prajwal Bhalerao

राहुल निकम स्वतःला भाजपचा मतदार असल्याचं सांगतात.

“मी स्वतःही भाजपचा मतदार आहे. आम्ही भाजपलाच मतदान केलं. पण अशी अवस्था अपेक्षित नव्हती. मतदान करताना आम्ही चांगले रस्ते आणि सुविधा मिळतील अशी अपेक्षा ठेवली होती,” असं ते म्हणतात.

त्यांच्या मते, प्रश्न कुंभमेळ्याचा नाही, तर नियोजनाचा आहे.

“कुंभमेळा दर 12 वर्षांनी येतो हे माहितीच होतं. मग या कामांचं नियोजन आधी का झालं नाही? 2-3 वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने कामं केली असती, तर आज नागरिकांना असा त्रास सहन करावा लागला असता का?” असा प्रश्न ते उपस्थित करतात.

या रस्त्याने प्रवास करणारे जगदीश सावंत स्वतः हृदयविकाराचे रुग्ण आहेत. खड्ड्यांचा परिणाम केवळ वाहनांवर नाही, तर लोकांच्या आरोग्यावरही होत असल्याचं ते सांगतात.

“मी स्वतः हार्ट पेशंट आहे. जाता-येताना किती त्रास होतो हे मला माहीत आहे. सतत हॉर्न, धूर, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी. माणूस किती सहन करणार?” असा प्रश्न ते विचारतात.

त्यांच्या मते, या रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येकजण तणावाखाली असतो.

“हे फक्त रस्त्याचं प्रकरण नाही. सतत टेन्शन असतं. अचानक समोर खड्डा येतो, वाहनाचा तोल जातो आणि जीव जाण्याची भीती कायम असते,” असं ते म्हणतात.

दिलीप पाटील

फोटो स्रोत, BBC/Prajwal Bhalerao

रिक्षाचालक दिलीप पाटील यांच्यासाठी हा प्रश्न रोजच्या उदरनिर्वाहाशी जोडलेला आहे.

“पावसाचं पाणी साचलं की खड्डा किती मोठा आहे हे दिसत नाही. गाडी खड्ड्यात जाते. गाडीत प्रवासी असतात. अपघाताची भीती कायम असते,” असं ते सांगतात.

त्यांच्या मते, केवळ लिंक रोडच नाही, तर नाशिकमधील अनेक रस्त्यांची अशीच अवस्था आहे. त्यामुळे वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढतो, वाहतूक कोंडी होते आणि कामावर पोहोचायलाही उशीर होतो.

या अपघातानंतर सातपूर-अंबड लिंक रोड आणि संपूर्ण नाशिकमधली विकासकामं आणि रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मात्र नागरिकांच्या मते हा प्रश्न एका रस्त्यापुरता मर्यादित नाही. शहरातील विविध भागांतील नागरिक सोशल मीडियावर खड्ड्यांचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत आहेत. अनेक ठिकाणी वाहनचालकांना रस्ता बदलून प्रवास करावा लागतो. काही ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाजही येत नसल्याचं नागरिक सांगतात.

‘कुंभमेळा, रस्ते आणि प्रशासनाचं उत्तर’

निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाकडे राज्य सरकारचंही लक्ष गेलं. कुंभमेळ्याचे प्रभारी मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले.

“या घटनेची चौकशी करा. याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल द्या. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मग ते ठेकेदार असोत किंवा अधिकारी,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

गिरीश महाजन यांनी कोतकर कुटुंबीयांची भेट घेतली.

फोटो स्रोत, Girish Mahajan/Facebook

कोतकर यांच्या मृत्यूनंतर आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली. गिरीश महाजन यांनी महानगरपालिकेला एका आठवड्यात शहरातील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

त्यानंतर शहरातील काही भागांत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं सुरू झालेली दिसली. मात्र सातपूर-अंबड लिंक रोडसह अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे आणि अपूर्ण कामं कायम होती.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र या विकासकामांचा सर्वात मोठा परिणाम सध्या रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होत असल्याचं चित्र दिसतं.

निलेश कोतकर यांच्या कुटुंबाला आता न्याय आणि मदतीची प्रतीक्षा आहे. पण या घटनेने उपस्थित केलेला प्रश्न केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाही.

सातपूर-अंबड लिंक रोडवरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. त्यांच्यासाठी प्रश्न एवढाच आहे की, रस्त्यांची दुरुस्ती आणखी किती दिवसांनी पूर्ण होणार? आणि तोपर्यंत आणखी किती अपघात, किती जखमी आणि किती मृत्यूंची वाट पाहावी लागणार?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC