Source :- BBC INDIA NEWS

मानसशास्त्रज्ञ डॉ. क्लेअर सदरलँड यांनी हातात 2 फोटो धरले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये एका आंतरराष्ट्रीय संशोधन अभ्यासाचे नेतृत्व करणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्राध्यापकाचा चेहरा दिसत आहे. दुसरा फोटो एआयने तयार केलेला बनावट डीपफेक फोटो आहे.
एआयच्या माध्यमातून आता इतके खरे वाटणारे फोटो बनायला लागले आहे की, खरा फोटो कोणता आणि खोटा कोणता हे समजणे खूप अवघड झाले आहे.
पण कॉम्प्युटरने बनवलेला माणसाचा चेहरा ओळखण्याचे प्रशिक्षण लोकांना दिले जाऊ शकते का? ‘युनिव्हर्सिटी ऑफ एबर्डिन’च्या डॉ. सदरलँड आणि त्यांच्या ऑस्ट्रेलियन सहकाऱ्याने याच प्रश्नाचा अभ्यास केला आहे.
याचे उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही स्वतः ही छोटी चाचणी देऊन पाहा आणि तुम्हाला किती पॉईंट्स मिळतात ते लिहून ठेवा.
जर तुम्हाला ही चाचणी अवघड गेली असेल तर तसे वाटणारे तुम्ही एकटेच नाही आहात.
आधीच्या काळात कॉम्प्युटरने किंवा एआयने बनवलेले खोटे फोटो ओळखणे खूप सोपे असायचे. त्याचा वापर भामटे लोकांना फसवण्यासाठी करायचे. कारण पूर्वी एआय हाताला एखादे जास्तीचे बोट जोडणे किंवा अशाच काही विचित्र चुका करायचा.
पण आता एआय सुधारले आहे आणि ते स्वतःच्या चुकांमधून शिकून अधिक हुशार झाले आहे.
फोटो स्रोत, Getty Images/Nightingale
प्राध्यापक एमी डॅवेल यांनी सांगितलं, “फोटोंमधील त्रुटींवरून जसं की हाताला सहावे बोट किंवा विचित्र कानातले शोधून बनावट फोटो ओळखण्याचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला फारसं यश आलेलं नाही. याचं एक कारण म्हणजे एआय आता खूपच प्रगत होत चाललं आहे. फसवणूक करणारे लोकही स्वतःहूनच चुका असलेले फोटो वापरत नाहीत.”
सदरलँड यांनी हातात धरलेल्या फोटोमध्ये खांद्यापर्यंत केस असलेल्या जी महिला दिसत आहेत त्या प्रोफेसर डॅवेल आहेत.
तर त्यातील पुरुषाचा फोटो मात्र बनावट (डीपफेक) आहे. डॅवेल या ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी इमोशन्स अँड फेसेस लॅब’च्या संचालक आहेत.
कॉम्प्युटरने किंवा एआयने तयार केलेले खोटे चेहरे लोकांना ओळखता येऊ शकतात का, हे शोधण्यासाठी त्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि यूकेमधील संशोधकांसोबत मिळून काम करत आहेत.
सध्याच्या अभ्यासानुसार याचे उत्तर ‘हो’ असे आहे. पण एआयचे खोटे फोटो ओळखण्यासाठी आता अधिक सूक्ष्म आणि बारकाईने पाहण्याची पद्धत वापरावी लागेल.
बनावट चेहरे ओळखण्याची कला
डॉ. सदरलँड या एबर्डिन युनिव्हर्सिटीत या रिसर्चचे काम पाहत आहेत.
त्यांनी सांगितलं की, फोटोंकडे नुसते बघूनच कोणता चेहरा खरा आहे आणि कोणता एआयने बनवला आहे याचा अंदाज आम्हाला आपोआप येऊ लागला होता.
त्या म्हणाल्या, “यावरूनच आमच्या डोक्यात कल्पना आली की, आम्ही जसा हा अंदाज लावायला शिकलो तसा आपण दुसऱ्या लोकांनाही शिकवला तर किती छान होईल.”
फोटो स्रोत, Nightingale
या प्रयोगांसाठी ‘StyleGAN3’ नावाच्या एआय इमेज टूलचा वापर करून हजारो बनावट चेहरे तयार केले गेले. हे टूल अगदी खरे वाटणारे चेहरे बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
यामध्ये सहभागी झालेल्या लोकांची प्रशिक्षण देण्यापूर्वी आणि प्रशिक्षण दिल्यानंतर चाचणी घेण्यात आली.
प्रशिक्षणात लोकांना काय ओळखायला शिकवले?
या रिसर्चमध्ये लोकांना चेहऱ्याचे 6 मुख्य बारकावे ओळखण्याचे ट्रेनिंग दिले गेले:
- सममिती (सिमेट्री – दोन्ही बाजू सारख्या असणे) – माणसाच्या चेहऱ्यावर काही ना काही नैसर्गिक बदल असतात. जसे की किंचित झुकलेली पापणी किंवा एका बाजूला झुकलेले हसू, हे हुबेहूब तयार करण्यात एआय अनेकदा अपयशी ठरते. जर एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त अचूक दिसत असेल तर त्यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता असते.
- प्रमाणबद्धता (प्रपोर्शनॅलिटी): ही देखील वर दिलेल्या संकल्पनेसारखीच आहे. एआयच्या खोट्या फोटोंमध्ये सहसा खूप मोठे नाक किंवा बाहेर आलेले कान दिसत नाही. तिथे सगळे अवयव अगदी प्रमाणात दाखवलेले असतात. जे सामान्य माणसाच्या बाबतीत नेहमीच खरे नसते.
- आकर्षकपणा (अट्रॅक्टिव्हनेस): डॉ. सदरलँड सांगतात, “एआयने बनवलेले चेहरे नेहमीपेक्षा जास्त देखणे किंवा सुंदर दिसतात. सौंदर्य ओळखणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक दृष्टिकोन असला, तरी एआय शक्यतो पाहता क्षणी आवडतील असेच चेहरे बनवतो.”
- वैशिष्ट्यपूर्णता (डिस्टिंक्टिव्हनेस): “याचा अर्थ असा की, ‘गर्दीमध्ये एखादा चेहरा उठून कशामुळे दिसू शकतो?’ एआयने बनवलेले चेहरे खूपच साधे आणि सर्वसामान्य असतात. त्यामुळे ते थोडे जास्त सामान्य दिसतात.
- चेहऱ्यावरील भाव (एक्सप्रेसिव्हनेस): डॉ. सदरलँड सांगतात, “एआय फोटोंमध्ये चेहऱ्यावरचे हावभाव खूप कमी असतात. माणसाच्या चेहऱ्यासारख्या वेगवेगळ्या भावना त्यांच्यावर सहजपणे दिसून येत नाहीत.”
- लक्षात राहण्याजोगे असणे (मेमोरॅबिलीटी): “हे चेहरे लक्षात राहतील असे नसतात आणि लोक हे चेहरे लवकर विसरतात.”
एआयला जे ट्रेनिंग दिले गेले आहे त्यात बहुतांश तरुण आणि गोऱ्या लोकांचे फोटो वापरले गेले आहेत. त्यामुळे वयस्कर लोक, तरुण चेहरे किंवा आशियाई-आफ्रिकन लोकांचे चेहरे हुबेहूब बनवणे एआयला अजूनही नीट जमत नाही.
फोटो स्रोत, Getty Images/Nightingale
खोटे फोटो ओळखण्याच्या या काही टिप्स तुम्हाला वरवर सारख्याच आणि गोंधळाच्या वाटू शकतात, पण नेमके हेच इथे समजून घ्यायचे आहे.
एआयचा खोटेपणा लगेच उघड करेल अशी एखादी पक्की चूक फोटोत सहसा दिसत नाही. उलट अशा खोट्या फोटोंचे बारकावे समजून घेऊन केवळ बघूनच अंदाज लावण्याची स्वतःची समज वाढवणे गरजेचे आहे.
संशोधकांना असं आढळून आलं की, लोकांना खरे आणि एआयचे खोटे फोटो एकत्र दाखवले आणि त्यांना फरक समजावून सांगितला तर ते खूप चांगल्या प्रकारे खोटे फोटो ओळखू लागतात. अगदी 1 तासाच्या प्रशिक्षणानंतरही लोकांमध्ये हा बदल दिसून आला.
संशोधकांनी सांगितले की, यामुळे लोकांची फोटो ओळखण्याची अचूकता 40 टक्क्यांवरून थेट 80 टक्क्यांवर पोहोचली. काही लोकांनी तर 100 टक्के बरोबर उत्तरे दिली.
विशेष म्हणजे माणसाचा मेंदू इथे अगदी एआय सारखाच काम करतो. एआय मॉडेल्सना शिकण्यासाठी जितकी जास्त माहिती किंवा फोटो दिले जातात तितके ते वेळेसोबत अधिक अचूक काम करू लागतात. ते हे नेमके कसे करत आहेत, हे आपल्याला पूर्णपणे समजत नसले तरीही.
फोटो स्रोत, Getty Images/Nightingale
या अभ्यासात संशोधकांनी या गोष्टीचाही अभ्यास केला की, एआयने तयार केलेले फोटो ओळखताना सहभागी लोकांचा स्वतःवर किती आत्मविश्वास होता.
आधीच्या काही रिसर्चमध्ये असे दिसले होते की, लोकांना आपण एआयचे फोटो सहज ओळखू असा उगाचच अतिआत्मविश्वास असायचा. तेच सर्वात जास्त चुका करायचे.
पण आता प्रशिक्षण मिळाल्यानंतर मात्र खोटे डीपफेक फोटो अचूक ओळखण्याबाबत लोकांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढला.
डॉ. सदरलँड म्हणतात, “हे खरोखरच खूप फायदेशीर आहे, नाही का? कारण तुमचे उत्तर नक्की बरोबर आहे की चूक हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर त्या माहितीचा तुम्हाला काहीच उपयोग करता येणार नाही.”
चला तर मग, तुम्ही आणखी एक चाचणी देण्यासाठी तयार आहात का?
मग कशी झाली चाचणी? आता काहीसा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतोय का?
जर तुमचे उत्तर ‘नाही’ असेल, तर स्वतःला दोष देऊ नका किंवा नाराज होऊ नका. मानवी जग असो किंवा एआयचे जग, सरावच माणसाला परिपूर्ण बनवतो किंवा कमीत कमी सुधारणा तरी करतो.
एआयने बनवलेले खोटे फोटो-व्हीडिओ ओळखणे का महत्त्वाचे?
याचे साधे उत्तर म्हणजे होणारी आर्थिक फसवणूक.
या अहवालात एका मोठ्या फसवणुकीचे उदाहरण देण्यात आले आहे. हाँगकाँगच्या एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका भामट्याने व्हीडिओ कॉल केला. त्या कॉलवर दिसणारा चेहरा त्यांच्या बॉसचा होता, जो एआयचा वापर करून बनवलेला होता.
त्या हुबेहूब चेहऱ्याला खरा समजून कर्मचाऱ्याने चक्क 25 दशलक्ष पौंड त्या भामट्यांच्या खात्यात पाठवून दिले.
डीपफेक तंत्रज्ञानाचा दुसरा एक वाईट वापर म्हणजे राजकारणात हेरगिरी करणे.
जोन्स हिने स्वतःची ओळख रशिया आणि युरेशियाची तज्ज्ञ अशी करून दिली होती. तिचे वॉशिंग्टनमधील नामवंत थिंक टँक्स आणि राजकीय वर्तुळाशी संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते.
असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, ती महिला खरी नसून रशियाच्या गुप्तहेर खात्याने एआयच्या मदतीने तयार केलेले एक खोटे प्रोफाइल (डीपफेक) होते.
या खोट्या प्रोफाइलने अमेरिकेच्या मोठ्या नेत्यांशी आणि देशाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क तयार केला होता.
फोटो स्रोत, Linkedin
एआयच्या चांगल्या बाजूचा विचार केला तर सदरलँड यांच्या मते याचे काही फायदेही आहेत. जसे की, खूप वर्षांपूर्वी हरवलेले एखादे लहान मूल मोठे झाल्यावर कसे दिसत असेल हे एआयच्या मदतीने अगदी कमी खर्चात आणि लगेच दाखवता येऊ शकते.
त्या सांगतात की, जर लोकांनी याचा वापर प्रामाणिकपणे आणि चांगल्या कामासाठी केला आणि समोरच्यालाही याची कल्पना असेल की हे एआयने बनवले आहे, तर नवीन आणि क्रिएटिव्ह गोष्टी तयार करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.
म्हणजे चांगली गोष्ट ही आहे की, आपण अजून अशा वाईट जगात आलेलो नाही जिथे खरी गोष्ट कोणती आणि कॉम्प्युटरने बनवलेली कोणती हे ओळखणेच अशक्य होऊन बसेल.
पण यात एक वाईट गोष्ट आहे. ती अशी की, शास्त्रज्ञांनी खोटे फोटो ओळखण्याबद्दल या विषयावर प्रसिद्ध झालेले सर्व शैक्षणिक संशोधन अहवाल लिहिले आहेत ते कदाचित एआयने आधीच वाचून घेतले आहेत. त्यावरून एआय नवनवीन गोष्टी शिकत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




