Home LATEST NEWS ताजी बातमी पेनिस फिलर्स काय आहेत? लिंगाच्या आकारात बदल करण्याचा हा ट्रेंड का वाढतोय?

पेनिस फिलर्स काय आहेत? लिंगाच्या आकारात बदल करण्याचा हा ट्रेंड का वाढतोय?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

जगाच्या काही भागांमध्ये पुरुषांमध्ये लिंगवर्धक शस्त्रक्रिया अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, परंतु या प्रक्रियेत धोकेही आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

जेसनला ‘कोक कॅन’ नको होता. हे अशा लिंगासाठी वापरले जाणारे टोपणनाव आहे, ज्यामध्ये इतके जास्त फिलर्स भरले जातात की ते जाड पेयाच्या कॅनसारखे दिसू लागते.

जेसनने मँचेस्टरमध्ये माझ्याशी बोलताना सांगितलं की, “काही लोक याचा अतिरेकच करतात.”

या प्रक्रियेमुळे त्यांच्या लिंगाची जाडी 16 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे ते आणि त्यांची जोडीदार दोघेही आनंदी आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे ते सांगतात.

जेसन म्हणतात, “सगळं अजूनही सामान्यपणे काम करतंय. फक्त आता ते थोडं जाड झालंय.”

जेसनसारखे किती पुरुष पेनिस फिलर्स घेत आहेत, हे स्पष्ट नाही.

रस्त्यावरून चालताना त्याची लोकप्रियता ओठांच्या फिलर्सप्रमाणे सहज लक्षात येत नाही.

या प्रक्रियेवर फारच कमी नियमन आहे. याची कोणतीही अधिकृत नोंदही नाही, कारण ही प्रक्रिया कोणताही सर्जन करू शकतो.

मात्र, गेल्या हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान एका विचित्र कट-कारस्थानाच्या सिद्धांताची चर्चा झाली होती. पुरुष स्की-जम्पर्स आपला सूटचा आकार वाढवण्यासाठी फिलर्सचा वापर करत आहेत, जेणेकरून ते अधिक लांब अंतरावर उडी मारू शकतील, अशी अफवा पसरली होती.

चुकीच्या पद्धतीने केलेल्या प्रक्रियेनंतर काही पुरुषांच्या लिंगाचा रंग काळा पडला, त्वचा सोलली गेली आणि त्यांना आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.

ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरोलॉजिकल सर्जन्सने अशा प्रकारच्या प्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांना इशारा दिला आहे.

मग पुरुष अशा प्रकारचे फिलर्स का घेत आहेत? आणि त्याचे धोके काय आहेत?

पेनिस फिलिंगची प्रक्रिया काय असते?

जेसन यांनी आपली ओळख गुप्त ठेवून का होईना, पण या विषयावर आमच्याशी मोकळेपणाने चर्चा केली.

ते आपल्या लिंगाच्या लांबीबाबत समाधानी होते. मात्र, त्यांना थोडी अधिक सममिती आणि जास्त जाडी हवी होती, जेणेकरून ‘लूक चांगला आणि संतुलित’ दिसेल.

जेसन म्हणतात, “तुम्हाला तुमच्या लिंगामध्ये काही कमतरता वाटत असेल, तर मग शस्त्रक्रिया का करून घेऊ नये?”

त्यांनी वर्षभर विविध पर्यायांचा विचार केला. अखेर शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार त्यांनी सोडून दिला.

त्यांनी हायलुरोनिक अ‍ॅसिड या एका प्रकारच्या फिलरची निवड केली. हा तात्पुरत्या स्वरूपाचा फिलर आहे. त्यांना माहिती होते की, लिंगाचा लूक आवडला नाही, तरी हा फिलर विरघळवून काढता येतो.

जेसन सांगतात की, त्यांना ‘दिखाऊ पुरुषत्वा’ने प्रेरित केले नव्हते.

लिंग फिलर प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणारी उपकरणे, ज्यामध्ये कॅन्युला आणि सिरिंज यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, BBC/James Gallagher

ते म्हणतात, “तुमचं लिंग किती मोठं आहे आणि तुम्ही किती मोठे पुरुष आहात, यावर माझा विश्वास नाही.”

त्यांच्या मते, पुरुषांच्या सौंदर्याविषयीच्या अपेक्षा बदलल्या आहेत.

“फक्त महिलांनीच नाही, तर पुरुषांनीही पुढे जाण्याची गरज आहे.”

ते म्हणतात, “खरंच, समाजात बदल होत आहे. मीडिया ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट सादर करतो, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पडतो.”

ते पुढे म्हणतात, “तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला एखादी तरी अगदी परिपूर्ण दिसणारी व्यक्ती (पुरुष) नक्की दिसेल, असं वाटतं.”

लिंगाचा आकार वाढवण्याची सेवा देणाऱ्या क्लिनिकच्या वेबसाइट्स पाहिल्या तर त्यांच्या जाहिरातींमध्ये “तुम्हाला तुमच्या लिंगाच्या आकाराची लाज वाटते का?” अशी वाक्ये दिसतात.

काही क्लिनिक या असुरक्षिततेचा फायदा कसा घेतात, हे यातून दिसून येते.

डॉ. जावेद हुसैन ग्रेटर मँचेस्टरमधील प्रेस्टविच येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये एका वर्षाहून अधिक काळ पेनिस फिलर्सची सेवा देत आहेत.

फोटो स्रोत, BBC/James Gallagher

लिंगाचा आकार वाढवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेशिवाय केल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रक्रिया तसेच लिंगामध्ये इंजेक्ट केल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचा समावेश आहे.

सर्वात सामान्य पद्धत म्हणजे जेलसारखा पदार्थ असलेले हायलुरोनिक अ‍ॅसिड इंजेक्ट करणे. हाच पदार्थ ओठांच्या फिलर्समध्येही वापरला जातो.

हायलुरोनिक अ‍ॅसिड शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे शुगर मॉलिक्यूल आहे. ते पाणी शोषून घेते, त्यामुळे त्याला ‘मॉइस्चर मॅग्नेट’ असेही म्हटले जाते.

डॉ. जावेद हुसैन ग्रेटर मँचेस्टरमधील प्रेस्टविच येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये एका वर्षाहून अधिक काळ पेनिस फिलर्ससंबंधी काम करतात.

कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये येण्यापूर्वी हुसैन यांनी डॉक्टर म्हणून प्रशिक्षण घेतले होते. मात्र, पेनिस फिलिंग करण्यासाठी विशिष्ट वैद्यकीय प्रशिक्षणाची आवश्यकता नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पेनिस फिलिंगची मागणी वाढत आहे. त्यांनी सर्व वयोगटातील पुरुषांवर उपचार केले आहेत. काहींचे वय 20 ते 25 वर्षांदरम्यान आहे, तर त्यांचे सर्वात वयस्कर ग्राहक 72 वर्षांचे आहेत.

या प्रक्रियेची सुरुवात सल्लामसलतीपासून होते. यामध्ये रुग्णाचे आरोग्य, ही प्रक्रिया करून घेण्यामागची कारणे, अपेक्षित परिणाम आणि संभाव्य धोके याबाबत चर्चा केली जाते. त्यांना फिलिंग का करून घ्यायचे आहे, हेही विचारले जाते.

काय धोके आहेत?

यानंतर फिलरची मालिश केली जाते, जेणेकरून त्वचा एकसमान दिसेल. रुग्ण घरीही ही प्रक्रिया सुरू ठेवतो.

हुसैन यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 3500 पौंड खर्च करून पुरुष पुढील सहा ते नऊ महिन्यांसाठी आपल्या लिंगाच्या जाडीमध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा करू शकतात.

मात्र, यामध्ये धोकेही आहेत. वेदना, निळे डाग पडणे आणि फिलर असमान पद्धतीने बसणे यांसारख्या किरकोळ समस्यांपासून ते संसर्गासारख्या गंभीर समस्यांपर्यंत धोके असू शकतात.

फिलर वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांमध्ये हे धोके लागू होतात.

मात्र, लिंगातील महत्त्वाच्या संरचना आणि रक्तवाहिन्यांना इजा होण्याचाही धोका असतो. या रक्तवाहिन्या इरेक्शनसाठी आवश्यक असतात.

प्रोफेसर वैभव मोदगिल यांनी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया झालेल्या पुरुषांना रुग्णालयात उपचारासाठी आलेले पाहिले आहे.

फोटो स्रोत, BBC/James Gallagher

जेव्हा हुसैन यांना विचारलं गेलं की, सर्जन ज्या प्रक्रियेबाबत काहीसे काळजीत दिसतात, त्या तुम्हाला इतक्या सोप्या का वाटतात? त्यावर ते म्हणाले की, मला पूर्णपणे कल्पना आहे की, लोक याबाबत काळजीत का असतात.

हुसैन म्हणतात, “ही भीती, काळजी स्वाभाविक आहे. मात्र, अधिकाधिक पुरावे समोर येत आहेत आणि आम्हाला परिणाम मिळत आहेत. यामुळे ‘पुरुषांना फायदा होतो’, असे दाखवणारे पुरावेही मिळत आहेत.”

हुसैन यांच्या म्हणण्यानुसार, “आमच्याकडे इमर्जन्स अ‍ॅक्शन प्लॅन आहे. काही चुकीचे झाल्यास फिलर तातडीने विरघळवण्यासाठी आवश्यक औषधे आहेत.”

ते म्हणतात, “सुदैवाने, आम्हाला त्याची कधीच गरज पडली नाही.” मात्र, बीबीसी स्वतंत्रपणे याची पुष्टी करू शकत नाही.

मात्र, त्यांना एका अशा रुग्णाची आठवण आहे, जो दुसरीकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी आला होता. त्याच्या मते, त्याच्यावरचा उपचार चुकीचा झाला होता.

त्या व्यक्तीने सांगितले की चुकीचा फिलर वापरण्यात आला होता. फिलिंग प्रक्रियेदरम्यान लिंगातील रक्तवाहिन्यांना इजा झाली आणि त्वचा खराब झाल्यामुळे लिंगाचा पुढचा भाग काळा पडू लागला होता. त्याला तातडीने आपत्कालीन विभागात नेण्यात आले.

चुकीची प्रक्रिया झाल्यास काय होते?

मँचेस्टरमध्ये एनएचएससाठी अँड्रोलॉजिस्ट आणि सल्लागार युरोलॉजिकल सर्जन प्रोफेसर वैभव मोदगिल यांनी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया झालेल्या पुरुषांना रुग्णालयात उपचारासाठी आलेले पाहिले आहे.

ते म्हणतात, “जेव्हा असं होतं, तेव्हा ते रुग्णासाठी नुकसानकारक ठरू शकतं.”

त्यांना अशा पुरुषांची आठवण आहे, ज्यांच्या ‘टिश्यूज कुजल्या होत्या’. यात त्वचेचा काही भाग नष्ट होतो. तो खूप काळा पडतो आणि नंतर हळूहळू गळून पडतो.

अशावेळी पुरुषांना असं वाटतं की, ‘अरे, हे खूप भारी होणार आहे’, पण प्रत्यक्षात याचा परिणाम नेमका उलट होऊ शकतो आणि निराशा पदरी पडू शकते.

लिंगाचा आकार वाढवणाऱ्या प्रक्रियांची संख्या किती आहे, याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही

फोटो स्रोत, Getty Images

एलेक्स (नाव बदलले आहे) लिंगाचा आकार वाढवण्यासाठी एका वेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून घेण्यासाठी जर्मनीला गेले होते. त्यांना त्यांच्या लिंगाची लांबी वाढवायची होती. यासाठी त्यांनी लिंगाला प्यूबिक बोनशी जोडणारा लिगामेंट कापण्याची शस्त्रक्रिया करून घेतली.

याशिवाय, स्वतःच्या शरीरातील फॅट सेल्स काढून ते लिंगामध्ये इंजेक्ट करून घेतले, जेणेकरून त्याचा आकार वाढेल.

ऑपरेशननंतर शुद्धीवर आल्यानंतर त्यांना इतका त्रास होत होता की ते उभेही राहू शकत नव्हते.

ते म्हणतात, “मला खूप जखमा झाल्या होत्या आणि माझी संपूर्ण मांडी पिवळी पडली होती.”

एलेक्स म्हणाले, “जवळपास महिनाभर मला नीट चालताही आले नाही.”

एलेक्स यांच्यावर मोदगिल यांच्या क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले. अखेर त्यांना पूर्णपणे बरे झाल्याचे सांगण्यात आले.

ते म्हणतात, “अनेकांना असे भाग्य लाभत नाही. मी नशीबवान होतो.”

एलेक्स सांगतात की सुरुवातीपासूनच त्यांना माहिती होते की त्यांचे लिंग लहान नव्हते. मात्र, समाज आणि पॉर्नोग्राफीने त्यांच्या मनात मोठे लिंग म्हणजे ‘पुरुषत्व आणि सर्वोत्तम’ अशी धारणा निर्माण केली होती.

ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरोलॉजिकल सर्जन्सच्या शिफारशी

लिंगाचा आकार वाढवणाऱ्या प्रक्रियांची संख्या किती आहे, याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी मोदगिल यांच्या मते ऑनलाइन सर्च ट्रेंड, जाहिराती आणि सोशल मीडिया हे सर्व ही संख्या वाढत असल्याचे संकेत देतात.

याच कारणामुळे ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरोलॉजिकल सर्जन्सने या प्रक्रियांविरोधात नव्या शिफारशी जारी केल्या आहेत.

मोदगिल म्हणतात, “आम्ही अलीकडे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, यापैकी कोणतीही प्रक्रिया करण्याची आम्ही शिफारस करू शकत नाही, कारण त्याबाबतचे पुरावे अत्यंत कमकुवत आहेत.”

या मार्गदर्शक तत्त्वांसाठी 3750 पुरुषांचा समावेश असलेल्या 36 अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले. मात्र, या प्रक्रियांची ‘सेफ्टी प्रोफाईल’ अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले.

याचे एक कारण म्हणजे लिंगावर फिलर्सचे दीर्घकालीन परिणाम काय होतात, याबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नाही.

तसेच, ओठांच्या फिलर्सप्रमाणे ही प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट पात्रतेची आवश्यकता नसल्याचीही चिंता आहे.

मोदगिल यांच्या मते, “पूर्णपणे बंदी घालणे कदाचित खूप कठोर ठरेल. मात्र, या प्रक्रिया सुरू राहणार असतील तर या क्षेत्राला कडक नियमनाची गरज आहे.”

लिंग फिलिंगच्या प्रक्रिया कधी करण्यात आल्या, याची नोंद ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक रजिस्ट्री तयार करण्याची त्यांनी मागणी केली आहे. तसेच, दीर्घकालीन डेटा गोळा केला जावा, जेणेकरून पुरुषांना या प्रक्रियेचे धोके आणि फायदे समजून घेऊन निर्णय घेता येईल.

मँचेस्टरला परतल्यानंतर जेसन आपल्या प्रक्रियेच्या परिणामांबाबत आनंदी आहेत. त्यांच्या सध्याच्या फिलर्सचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया करून घेण्याचा ते विचार करत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC