Home LATEST NEWS ताजी बातमी सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप; जयपूरमध्ये शाळा पाहणीदरम्यान ग्रामस्थांचा विरोध

सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप; जयपूरमध्ये शाळा पाहणीदरम्यान ग्रामस्थांचा विरोध

5
0

Source :- BBC INDIA NEWS

अभिजीत दीपकने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आरोप केला आहे की, भाजप सदस्यांनी आशुतोष रांका यांना मारहाण केली (फाइल फोटो).

फोटो स्रोत, Arun SANKAR / AFP via Getty Images

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

आज (21 ऑगस्ट) जयपूर जवळच्या एका गावात सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पक्ष (सीजेपी)चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं

‘ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना गावाबाहेर जाण्यास भाग पाडलं’, असा आरोप करण्यात आला आहे.

एका व्हीडिओमध्ये ग्रामस्थ ‘जय श्री राम’च्या घोषणा देत सीजेपी कार्यकर्त्यांना गावाबाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत.

सीजेपीच्या महिला कार्यकर्त्यांनाही ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले, “गावात भाजपने बोलावलेले लोक विरोध करण्यासाठी आले होते” .

रांका म्हणाले, “अशा प्रकारच्या विरोधाला ते घाबरणार नाहीत.”

आशुतोष रांका यांनी एक्सवर लिहिले, “रामपुरा, कंवरपुरा येथील सरकारी शाळा गेली अनेक वर्षे म्हशींच्या गोठ्यात भरवली जात आहे. मी सध्या तिथे जात आहे. मात्र, आमच्या टीममधील काही सहकारी आधीच तिथे पोहोचले असताना त्यांच्यावर भाजपच्या गुंडांनी पुन्हा मारहाण केली. आमची मुलं म्हशींच्या गोठ्यात शिकत राहावीत, हे भाजपला मान्य आहे; पण आम्ही या शाळांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो, हे त्यांना मान्य नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते?”

सीजेपी कार्यकर्त्या रेखा शर्मा यांनी सांगितले, “आम्ही शाळेची पाहणी करण्यासाठी गावाकडे जात होतो, तेव्हा संपूर्ण गावातील लोक तिथे उभे होते. त्यामध्ये बागडा समाजाचे लोक, भाजप कार्यकर्ते आणि गुंडही होते. आम्ही गावात प्रवेश करताच त्यांनी आमच्यावर हल्ला सुरू केला. आशुतोष रांका आणि इतर सहकाऱ्यांवरही हल्ला झाला. माझ्याशीही धक्काबुक्की करण्यात आली. वयोवृद्ध लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती की ते आमच्याशी गैरवर्तन करतील.”

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, ते अशा प्रकरणांना घाबरत नाहीत.

फोटो स्रोत, Mohar Singh Meena

ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या आणि त्यांना ‘पाकिस्तानी’ म्हणून संबोधलं, असा आरोप सीजेपीच्या कार्यकर्त्यानं केला आहे.

दरम्यान, सीजेपीचा विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थानं दावा केला की शाळेच्या दुरुस्तीसाठी 12 लाख रुपये मंजूर झाले आहेत आणि हे काम भाजप करून दाखवेल.

तो म्हणाला की ते भाजपसाठी काम करत राहतील आणि नेहमी भाजपसोबत राहतील.

या घटनेनंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक्सवर पोस्ट करून आशुतोष रांका यांच्यासोबत भाजपच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला.

राजस्थान पोलिसांना टॅग करत त्यांनी एक्सवर लिहिले, “सरकारी शाळांची पाहणी करणाऱ्या सीजेपी स्वयंसेवकांवर गुंड हल्ला करतात तेव्हा राजस्थान पोलीस केवळ मूकदर्शक बनून राहतात, असं दिसतं. म्हशींच्या गोठ्यांमध्ये चालणाऱ्या शाळांबाबत त्यांना काहीच समस्या नाही; मात्र सीजेपी स्वयंसेवक त्या शाळांमध्ये गेले की त्यांना त्रास होतो. अखेर ते नेमकं कोणत्या गोष्टीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत?”

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, ANI

दरम्यान, आशुतोष रांका यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट करून या प्रकरणासाठी गावकऱ्यांना दोष देऊ नये, असे आवाहन केलं.

त्यांनी एक्सवर लिहिले, “माध्यमांना विनंती आहे की आज घडलेल्या घटनेसाठी गावकऱ्यांना दोष देऊ नका. हिंसा भडकवण्यासाठी बाहेरून लोकांना पाठवण्यात आले होते. गावकऱ्यांनीच आम्हाला शाळेची पाहणी करण्यासाठी येण्याची विनंती केली होती. मला सांगण्यात आले आहे की स्थानिक भाजप नगरसेवक काही गुंडांमध्ये पैसे वाटताना दिसले होते.”

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “ते गावकरी नव्हते, तर भाजपचे कार्यकर्ते होते. भाजप कार्यकर्ते जनहिताशी संबंधित प्रत्येक कामाचा विरोध करतात. ते फक्त वरून मिळालेल्या आदेशांचे पालन करतात. जर एखाद्याला शाळेत जाण्यापासून रोखले जात असेल किंवा त्यांच्यावर हल्ला केला जात असेल, तर आम्ही त्याचा निषेध करतो. या सरकारमुळे त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत काँग्रेस ठामपणे उभी राहील.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC