Home LATEST NEWS ताजी बातमी ‘विदेशात जाऊन मुस्लीम नेत्यांची गळाभेट घेतली जाते मग इथे गरब्यात बंदी कशासाठी’...

‘विदेशात जाऊन मुस्लीम नेत्यांची गळाभेट घेतली जाते मग इथे गरब्यात बंदी कशासाठी’ – संजय राऊत

4
0

Source :- BBC INDIA NEWS

संजय राऊत

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव आणि गरब्यामध्ये मुसलमानांच्या सहभागावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, तसेच ओळख तपासणी आणि टिळा लावण्याची मागणी केली आहे.

राज्यातील युती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी या मागणीचं समर्थन केलं असताना अभिनेता श्रेयस तळपदे आणि अमृता फडणवीस यांनी सर्व समाजातील लोकांनी शांततेनं सण साजरा करण्याची भूमिका मांडली आहे. याच मुद्द्यावर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनीही सरकारवर सवाल उपस्थित केला आहे.

या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत त्यांना टोला लगावला आहे.

यावर बोलताना राऊत म्हणाले, “पंतप्रधान परदेशात मशिदींमध्ये जातात आणि मुस्लीम नेत्यांना मिठी मारून ‘माझा भाऊ, माय ब्रदर’ म्हणतात. मग इथे गरब्यात आपल्या मुस्लीम बांधवांना रोखलं जाऊ नये. परदेशात भाऊ आणि इथे शत्रू, हे कसं चालेल?”

व्हीएचपीने नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुसलमानांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच प्रवेश देताना ओळखपत्र तपासावे आणि कपाळावर टिळा लावणं अनिवार्य करावं, असंही म्हटलं आहे.

याआधी अभिनेता श्रेयस तळपदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही गरब्याच्या मंडपांमध्ये सर्व समाजातील लोकांना प्रवेश मिळायला हवा, असं म्हटलं होतं.

गरब्यात मुसलमानांच्या प्रवेशावरून श्रेयस तळपदे म्हणाला…

गरबा आणि दांडियाबाबत मुसलमानांच्या प्रवेशावर व्हीएचपीने केलेल्या आवाहनावर अभिनेता श्रेयस तळपदे याने प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना श्रेयस म्हणाला, “आपण अनेक वर्षांपासून सर्व सण एकत्र साजरे करत आलो आहोत. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. हा मुद्दा जास्त करून राजकीय स्वरुपाचा आहे. मी नेहमीच सर्व सणांचा आनंद घेतला आहे आणि यापुढेही हे असंच सुरू राहील.”

अभिनेता श्रेयस तळपदे

फोटो स्रोत, ANI

या मुद्द्यावर राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं की, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात येणाऱ्यांचं केवळ आधार कार्ड तपासणं पुरेसं नाही. त्यांच्याकडून हनुमान चालिसा म्हणवून घ्यावी आणि त्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जावा.

दरम्यान, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी नवरात्रोत्सवात सर्व धर्मांच्या लोकांनी सहभागी व्हावं, असं म्हटलं आहे.

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावर अमृता फडणवीसांची भूमिका काय?

अमृता फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांच्या गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “नितेश राणे यांनी हा मुद्दा विचार करूनच मांडला आहे. मला त्यावर जास्त बोलायचं नाही. परंतु, गरबा हा आता राष्ट्रीय उत्सव आहे आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही साजरा केला जातो.”

“त्यामुळे एखाद्या धर्माचा किंवा समाजाचा व्यक्ती शांतपणे गरबा पाहण्यासाठी येत असेल आणि कोणताही गोंधळ घालत नसेल, तर त्याला येऊ द्यायला हरकत नाही. पण, यामागची इतर कारणं काय आहेत, याचा मी अभ्यास केलेला नाही.”

अमृता फडणवीस

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

याआधी नितेश राणे यांनीही व्हीएचपीच्या या मागणीचं समर्थन केलं होतं. ते म्हणाले होते की, विश्व हिंदू परिषदेने मांडलेल्या मागण्या आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा चुकीच्या नाहीत. जे लोक मूर्तीपूजा करत नाहीत आणि आपल्या धर्माला मानत नाहीत, त्यांना आमच्या नवरात्री किंवा गरबा उत्सवांमध्ये येण्याचा खरोखरच अधिकार आहे का?

“केवळ आधार कार्ड तपासण्याऐवजी, त्यांच्याकडून हनुमान चालिसा म्हणवून घ्यावी आणि त्यानंतरच त्यांना गरब्यात प्रवेश द्यावा,” असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC