Home LATEST NEWS ताजी बातमी झोपेत दात खाण्याच्या सवयीचा या गंभीर समस्येशी असू शकतो संबंध, जाणून घ्या...

झोपेत दात खाण्याच्या सवयीचा या गंभीर समस्येशी असू शकतो संबंध, जाणून घ्या ‘ब्रुक्सिझम’ बद्दल सविस्तर माहिती

3
0

Source :- BBC INDIA NEWS

असं मानलं जातं की, साधारण 4 पैकी एका व्यक्तीला ब्रुक्सिझमचा (दात खाण्याची/चावण्याची सवय) त्रास असतो. परंतु, झोपेत आपण दात खात आहोत, याची बहुतेक लोकांना जाणीवच नसते.

फोटो स्रोत, Getty Images

एला’ला रात्री झोपेत दात खाण्याची (चावण्याची) सवय कधी लागली, हे आठवत नाही. परंतु, जबड्याला होणारा असह्य त्रास आणि वारंवार होणारी डोकेदुखी मात्र तिला चांगलीच आठवते.

एला सांगते, “माझ्या जबड्याला खूप वेदना होत होत्या. माझ्या चेहऱ्याचा आकारही बदलत होता आणि दात खराब होण्याचा, तुटण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे यावर काहीतरी उपाय करणं खूप गरजेचं आहे, याची मला जाणीव झाली.”

31 वर्षीय एलाला ब्रुक्सिझमचा त्रास आहे. या समस्येमुळे व्यक्तीला वारंवार आणि जोरात दात खाण्याची सवय लागते.

नुकत्याच घेतलेल्या उपचारांमुळे माझं आयुष्य ‘नक्कीच’ बदललं आहे, असं एला सांगते.

ब्रिटनमध्ये एलाप्रमाणेच लाखो महिला ब्रुक्सिझमच्या (दात खाण्याची सवय) त्रासाला सामोऱ्या जात आहेत. काही अभ्यासांनुसार, 4 पैकी एका व्यक्तीला या समस्येचा त्रास होतो.

ब्रिटिश डेंटल असोसिएशनच्या मते, दात घासण्याचा (दात एकमेकांवर घासण्याचा) त्रास वाढत असल्याचे काही थेट पुरावे आहेत. परंतु, हा त्रास नेमका किती वाढला आहे, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.

पण काही डेंटिस्ट्सनी बीबीसीला सांगितलं की, सतत दात खाण्यामुळे दातांच्या समस्यांचा सामना करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत असल्याची त्यांना चिंता आहे.

ब्रिटिश सोसायटी ऑफ डेंटल स्लीप मेडिसिनच्या (बीएसडीएसएम) अध्यक्षा डॉ. अदिती देसाई म्हणतात, “हा त्रास नक्कीच वाढत आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही, कारण आजकालचं जीवन हे खूपच तणावपूर्ण झालं आहे.”

ब्रुक्सिझमची कारणं काय?

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, तणावामुळे आपल्यापैकी अनेक जण नकळत दात खातात. परंतु, रोजच्या आयुष्यातील तणाव आपल्या जबड्यावरच का येतो?

यावर आपण काय करू शकतो? आणि काही प्रकरणांमध्ये दात खाण्याचा हा त्रास फायदेशीरही ठरू शकतो का?

ब्रुक्सिझम हा शब्द जबड्याच्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालींसाठी वापरला जातो.

यामध्ये जबडा घट्ट आवळून धरणे, दात खाणे किंवा घासणे, जबडा ताणून धरणे आणि जबडा पुढे ढकलणे या क्रियांचा समावेश होतो.

काही लोक रात्री झोपेत दात खातात, तर काही जण दिवसा दात खातात. काहींना आपण दात खात आहोत, याची कल्पनाही नसते. तर काही जण माउथगार्ड लावूनही दात खातात आणि त्यांच्या गाढ झोपलेल्या जोडीदाराचीही ते झोपमोड करतात.

मग तुम्ही दात खाता हे कसं ओळखायचं? यासाठी येथे काही लक्षणं दिली आहेत, ती लक्षात घ्या:

  • झिजलेले, तुटलेले किंवा चपटे किंवा सपाट झालेले दात
  • सकाळी उठल्यावर डोकं किंवा चेहरा दुखणे
  • जबडा आखडणे
  • झोपमोड होणे आणि दिवसभर थकवा जाणवणे
  • दातांची संवेदनशीलता वाढणे
  • कानात कोणताही संसर्ग (इन्फेक्शन) नसतानाही कान किंवा कानशिलाजवळ वेदना होणे
एला सांगते की, सतत दात खाण्याच्या सवयीमुळे तिच्या जबड्याच्या स्नायूंना (मॅसेटर मसल्स) सूज आली आणि तिचा जबडा रुंद झाला. (फोटोत डावीकडे उपचारापूर्वीचा आणि उजवीकडे उपचारानंतरचा फोटो आहे.)

फोटो स्रोत, Ella

ब्रिटिश असोसिएशन फॉर काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीनुसार, थेरपीदरम्यान दात खाण्याच्या समस्येचा उल्लेख आता अधिक वेळा केला जात आहे. यावरून लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याचा शरीरावरही कसा परिणाम होतो, याची आता अधिक जाणीव झाली आहे.

मानसोपचारतज्ज्ञ राही पोपट सांगतात की, त्यांच्याकडे येणारे अनेक रुग्ण, विशेषतः तरुण, आपण दात खातो हे स्वतः किंवा इतरांनी त्यांना दात खाताना पाहिलं आहे.

राही पोपट सांगतात, “अनेकवेळा रुग्णांना त्यांच्या आयुष्यातील एखादा अत्यंत तणावाचा काळ आठवतो. त्याच काळात त्यांना दात खाण्याची सवय लागली किंवा ती वाढली, असं त्यांना जाणवतं.”

‘तणाव कमी करण्याचा एक उपाय’

राही पोपट सांगतात की, ट्रॉमा (आघात) आणि तणावामुळे शरीर ‘लढा किंवा पळा’ अशा स्थितीत जाऊ शकतं. अशावेळी हृदयाची धडधड वाढते, ॲड्रेनालाईन बाहेर पडतं आणि स्नायू ताणले जातात. म्हणजेच, शरीर बाहेरच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार होतं.

जबडा आणि मज्जासंस्था एकमेकांशी जवळून जोडलेले असल्यामुळे (क्रेनियल नर्व्हज) या काळात जबड्याचे स्नायूही सक्रिय होतात. त्यामुळे आपण नकळत दात घट्ट आवळतो किंवा खातो.

राही पोपट सांगतात, “जर आपण रात्रभर हे करत राहिलो, तर दिवसभर जाणवणारा तणाव आणि दबाव कमी करण्याचा शरीराचा हा एक प्रकारचा मार्ग असू शकतो.”

एलासाठी, झोपेत दात खाणे हा दिवसभर साचलेला ताण-तणाव आणि दबाव कमी करण्याचा एक मार्ग बनला होता.

ती म्हणते, “मला माहिती आहे की, याचा संबंध माझ्या तणावाशी आहे. मला सतत जाणवणारी चिंता (हाय-फंक्शनिंग अँझायटी) आहे, जर तुम्ही मला भेटलात, तर तुम्हाला त्याचा अंदाजही येणार नाही.”

एला सांगते की, सुरुवातीला तिने या वेदना ‘सहन’ केल्या. परंतु, काही वर्षांनी तिच्या डेंटिस्टने दातांना धोका असल्याचं सांगितल्यानंतर तिने उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

एला सांगते की, तिच्या डेंटिस्टने जबड्याच्या स्नायूंमध्ये बोटॉक्सची इंजेक्शन्स दिल्यानंतर तिची झोप आणि मानसिक आरोग्यात सुधारणा झाली आहे.

फोटो स्रोत, Ella

दात खालल्याने काय नुकसान होतं?

परंतु, ही सुविधा सहसा राष्ट्रीय आरोग्य सेवामध्ये (एनएचएस) उपलब्ध नसते. त्यामुळे एलाने आपल्या डेंटिस्टला पैसे देऊन जबड्याच्या स्नायूंमध्ये बोटॉक्सचं इंजेक्शन घेतलं. यामुळे तिचे स्नायू सैल झाले आणि चेहऱ्यावरील ताण कमी झाला. याचा परिणाम साधारणपणे 3 ते 4 महिने राहील.

ती म्हणते, “गेल्या काही महिन्यांपासून मला नीट झोप लागत आहे. सकाळी उठल्यावर माझ्यात खूप ऊर्जा असते, वेदना कमी झाल्या आहेत आणि आता माझा चेहरा पूर्वीसारखा चौकोनी दिसत नाही.”

खासगी आणि एनएचएस या दोन्ही ठिकाणी रुग्णांवर उपचार करणारे डेंटिस्ट डॉ. सायमन कोव्ह सांगतात की, सतत दात खाल्ल्याने दातांवर शारीरिक परिणाम होऊ शकतो.

ते आपल्या रुग्णांच्या दातांची तपासणी करण्यासाठी 3D स्कॅनरचा वापर करतात. त्यामुळे कालांतराने दात किती झिजले आहेत, हे पाहता येतं.

ते म्हणतात, “अनेकदा लोकांना आपण दात खातो, याची जाणीवही नसते. परंतु, नंतर त्याचा दातांवर झालेला परिणाम दिसून येतो. दात खूप झिजले गेले तर त्यावर उपचार करणं खूप गुंतागुंतीचे होऊ शकतं आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च येऊ शकतो.”

पण, अशी गंभीर प्रकरणं फार कमी असतात आणि ती होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

3D स्कॅनमुळे दात खालल्याने दातांचं किती नुकसान झालं आहे, हे समजू शकतं.

फोटो स्रोत, Simon Cove

डेंटिस्ट डॉ. अदिती देसाई सांगतात की, माउथगार्ड वापरल्याने दात खाण्याची किंवा कडकडण्याची लक्षणं कमी करता येतात. मात्र, दात खाण्यामागचं कारण शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

त्या म्हणतात, “अनेकदा डेंटिस्ट हे असं का होतंय, याचं कारण न तपासताच माउथगार्ड देतात.”

त्या म्हणतात की, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियासारख्या (ओएसए) गंभीर आजाराची शक्यता तपासणं खूप महत्त्वाचं आहे. ओएसएमध्ये श्वसनमार्गात अडथळा येतो. त्यामुळे श्वास नीट घेता यावा म्हणून शरीर हा अडथळा दूर करण्याच्या प्रयत्नात दात एकमेकांवर घासू शकतात म्हणजेच दात चावण्याची किंवा दात खाण्याची क्रिया होते.

या स्थितीबद्दल संशोधक प्रा. फ्रँक लोबेझू म्हणतात, “ब्रुक्सिझममुळे आपल्याला फायदा कसा होऊ शकतो याचं एक चांगलं उदाहरण आहे.”

ते सांगतात की, ब्रुक्सिझममुळे दातांचं नुकसान, झोपेत व्यत्यय आणि जबड्याचं दुखणं असे काही त्रास होऊ शकतात. पण, ते नेहमीच ‘वाईट’ असतं असं नाही.

लोबेझू म्हणतात, “दात खाल्यामुळे लाळ तयार होण्यासही मदत होते. जबड्याचे स्नायूंच्या हालचालीमुळे लाळ तयार करणाऱ्या मोठ्या ग्रंथी सक्रिय होतात. यामुळे तोंड स्वच्छ राहतं, दातांचं संरक्षण होतं आणि पचनासाठीही ते अत्यंत गरजेचं असतं.”

काही अभ्यासांनुसार, दात चावल्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

ते म्हणतात, “प्राण्यांवरील अभ्यासातून हे दिसून आलं आहे आणि माणसांवरील आमच्या सुरुवातीच्या संशोधनातूनही तेच दिसत आहे. जबड्याचे स्नायू हलवल्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.”

परंतु, दात खाल्यामुळे दीर्घकाळ वेदना होऊ शकतात आणि त्याचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

दात खाण्याच्या समस्येवर काय उपचार आहेत?

डेंटिस्ट रियाज यार हे प्रोस्थोडॉन्टिक्स तज्ज्ञ आहेत. ते ब्रुक्सिझममुळे दात झिजलेले, तुटलेले किंवा खराब झालेले आणि वारंवार दातांचे उपचार अयशस्वी होणाऱ्या रुग्णांवर उपचार करतात.

ते म्हणतात की, अनेक रुग्ण जबड्याच्या किंवा चेहऱ्याच्या सतत होणाऱ्या वेदना आणि झोप न लागण्याची तक्रार घेऊन येतात. अशावेळी केवळ दात खाण्याच्या सवयीला दोष न देता, या त्रासामागची इतर कारणंही म्हणजे स्वतःची वैयक्तिक तपासणी करून घेणंही आवश्यक आहे.

यार म्हणतात की, पूर्वी दात खाण्याची समस्या ही केवळ जबड्याशी संबंधित समस्या मानली जायची. परंतु, आता त्यापेक्षा ही समस्या खूपच गुंतागुंतीची असल्याचे ठोस पुरावे आहेत.

त्यांच्या मते, ही एक ‘जैविक आणि मानसिक कारणांशी संबंधित समस्या’ आहे. मेंदू आणि मज्जासंस्था यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि व्यक्तीच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचाही त्यावर परिणाम होतो.

ते म्हणतात, “आम्ही रुग्णाची झोपण्याची पद्धत, आहार, वजन, व्यायाम, तो घेत असलेली औषधं आणि झोपेशी संबंधित काही त्रासाची लक्षणं यांचा विचार करतो. दात खाण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे या समस्येवर उपचार करताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून उपाय करणं गरजेचं असतं.”

याचा सामना करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता? यासाठी काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात:

  • दातांच्या संरक्षणासाठी रात्री झोपताना वापरला जाणारा माउथगार्ड
  • जर हा त्रास स्लीप ॲप्नियामुळे होत असेल, तर सीपीएपी मशीन किंवा मॅन्डिब्युलर अॅडव्हान्समेंट डिव्हाइस (एमएडी) सारखी उपकरणं श्वसनमार्ग खुला ठेवण्यास मदत करतात.
  • फिजिओथेरपी
  • सीबीटीसारख्या समुपदेशनावर आधारित उपचारपद्धती
  • तणाव कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी जीवनशैलीमध्ये काही बदल करणे, जसं की नियमित व्यायाम करणे, मद्यपान कमी करणे, धूम्रपान सोडणे आणि सकस आहार घेणे.
  • गंभीर प्रकरणांमध्ये बोटॉक्स उपचाराचाही पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो.

स्नायूंना आराम देण्यासाठी घेतलेल्या इंजेक्शनसोबतच, एला सांगते की तिची चिंता, अस्वस्था कमी करण्यासाठी आणि रोजच्या तणावातून स्वतःला मोकळं करण्यासाठी ती ध्यानसाधनाही करत आहे.

एला म्हणते, “उपचार घेतल्यामुळे माझं आयुष्य बदललं आहे. आता मला या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC