Home LATEST NEWS ताजी बातमी पत्नी, मुलगा आणि दोन पुजाऱ्यांची हत्या; कमांडोंना बोलावण्याची वेळ; आझमगडमध्ये पूजेदरम्यान काय...

पत्नी, मुलगा आणि दोन पुजाऱ्यांची हत्या; कमांडोंना बोलावण्याची वेळ; आझमगडमध्ये पूजेदरम्यान काय घडलं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कमांडोंना पाचारण करण्यात आलं, मात्र पोलिसांनी दावा केला आहे की कमांडोंनी घरात प्रवेश केला नाही.

फोटो स्रोत, Aman Gupta

उत्तर प्रदेशातील आझमगड इथं एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पाच जण ठार झाले आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभुपूर गावात अरविंद सिंग नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी, मुलगा आणि पाच दिवसांच्या गायत्री मंत्रोच्चारासाठी घरी आलेल्या दोन पुजाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

अरविंद सिंग यांच्या वृद्ध आईनं माध्यमांशी बोलताना या घटनेला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की, “घरात गायत्री मंत्राचा जप सुरू असताना ही घटना घडली.”

मिळालेल्या माहितीनुसार, हा धार्मिक विधी पाच दिवसांचा होता, परंतु चौथ्या दिवशी अरविंद सिंग आणि विधीमध्ये सहभागी असलेल्या पुजाऱ्यांमध्ये वाद झाला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “अरविंद सिंगनं त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने पुजाऱ्यांवर हल्ला केला. पुजाऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या पत्नीचाही गोळी लागून मृत्यू झाला.”

त्यानंतर त्यानं आपल्या तीन मुलांसह स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी एसओजी कमांडोंनाही पाचारण केलं.

पोलिसांनी सांगितलं की, “सुमारे सात तास चाललेल्या संघर्षानंतर पोलिसांनी खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.”

पोलिसांचा असाही दावा आहे की, “या दरम्यान अरविंदनं एका मुलावर गोळी झाडली आणि पोलिसांवरही गोळीबार केला.”

वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. अनिल कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आरोपीनं मुलांना घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं आणि पोलीस व कुटुंबीयांवर गोळीबार करण्याची धमकी दिली. त्यानं आपल्या मुलावर गोळी झाडली आणि पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्युत्तर दिलं. जखमी आरोपी आणि त्याच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू झाला.”

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस रात्री उशिरापर्यंत घराबाहेर थांबले होते आणि त्यांनी अरविंदला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Aman Gupta

नेमकं काय प्रकरण आहे?

आझमगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद सिंग मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी पोहोचले.

त्यावेळी घरी पूजा सुरू होती. त्यांची पत्नी, बबिता सिंग, आणि दोन पुजारी उपस्थित होते.

आझमगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण), चिराग जैन यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की, अरविंद गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अस्वस्थ होता. तो चिडचिडा झाला होता आणि भांडणं करत होता. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. याच कारणांमुळे त्याची पत्नी घरी पाच दिवसांचा विधी करत होती.”

अरविंद सिंग आणि त्यांची पत्नी बबिता सिंग

फोटो स्रोत, Aman Gupta

पुढे ते म्हणाले की, “चौथ्या दिवशी, त्याच्या (अरविंद सिंगच्या) मनात अचानक काहीतरी आलं आणि तो पंडितांना विचारू लागला की ते कोण आहेत आणि कुठून आले आहेत. तो त्यांना शिवीगाळ करू लागला. जेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं तिच्यावर गोळी झाडली. जेव्हा पंडितांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं त्यांच्यावरही गोळी झाडली. एक पंडित भिंतीवरून उडी मारून पळून गेला.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुजाऱ्यांची ओळख महेंद्र पाठक आणि अखिलेश मिश्रा अशी पटली आहे.

तीन जणांना ठार मारल्यानंतर, अरविंदनं आपल्या तीन मुलांना घरातील एका खोलीत नेलं आणि आतून दरवाजा बंद केला.

माहिती मिळताच, गावात मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला आणि त्यांनी घराला वेढा घातला, पण तो खोलीतून बाहेर यायला तयार नव्हता. हा तणाव बराच काळ सुरू राहिला.

यानंतर, अरविंद सिंग आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात अरविंद सिंग यांचा मृत्यू झाला.

पुजाऱ्यानं बीबीसीला सांगितली संपूर्ण कहाणी

पुजारी अखिलेश मिश्रा यांच्यासोबत त्यांचा मुलगा हिमांशू मिश्रा होता. तो पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि त्यानं स्वत:चा जीव वाचवला.

त्यानं सांगितलं की हा गायत्री जपाचा धार्मिक विधी होता.

हिमांशू मिश्रानं बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “हा पाच दिवसांचा विधी होता. तीन दिवस सर्व काही सुरळीत पार पडलं, पण चौथ्या दिवशी ही घटना घडली. त्याला (अरविंद सिंगला) या पूजेमध्ये एक टक्काही रस नव्हता. तो आपल्या पत्नीलाही पूजेत बसू देत नव्हता.”

त्यानं आपला जीव कसा वाचवला, असं विचारल्यावर हिमांशू मिश्रानं बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “त्या दिवशी, पूजेनंतर आम्ही उठणार होतो, तेवढ्यात तो (अरविंद सिंग) लगेच आला. आल्याबरोबर त्यानं विचारलं, ‘तुम्ही कोण आहात? माझ्या घरी कसं काय आलात?’ माझे वडील म्हणाले, ‘तुमच्या आईनं मला बोलावलं आहे.’ तो म्हणाला, ‘माझ्या परवानगीशिवाय कसं काय आलात?'”

पुजारी अखिलेश मिश्रा यांच्यासोबत त्यांचा मुलगा हिमांशू मिश्रा होता. तो पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि त्यानं स्वत:चा जीव वाचवला.

फोटो स्रोत, Aman Gupta

त्यानं पुन्हा म्हटलं की, “मला तुमचं आधार कार्ड दाखवा.” तेव्हा माझे वडील म्हणाले की, “आमच्या कपड्यांवरून आम्ही कोण आहोत, हे तुला समजत नाहीये का? उद्या आधार कार्ड आणतो. ते आणल्यावर बघ. ” तेवढ्यात तो काठी घेऊन आला आणि त्यानं हल्ला केला. जेव्हा त्याची पत्नी, भाची आणि आई मध्ये आडव्या आल्या, तेव्हा त्यानं आपली रिव्हॉल्वर काढून गोळी झाडली. पहिली गोळी त्याची पत्नी बबिता सिंग हिला लागली.

हिमांशूनं बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “दुसरे पुजारी, महेंद्र पाठक हेदेखील पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यानं त्यांच्यावर मागून गोळी झाडली. त्यानं माझ्या वडिलांवर (अखिलेश मिश्रा) गोळी झाडली, पण ती त्यांच्या डोक्याला चाटून गेली. मी भिंतीवरून उडी मारून पळून गेलो. तो पुन्हा आला आणि त्यानं माझ्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली.”

जेव्हा पोलिसांची कारवाई झाली, तेव्हा प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ हरिशंकर यादव तिथं उपस्थित होते.

त्यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “मी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तिथं पोहोचलो. तिथं 200 हून अधिक पोलीस उपस्थित होते. कॅप्टन साहेबसुद्धा या कारवाईत सहभागी होते. आम्ही सर्वजण पोलिसांपासून सुमारे 40 मीटर अंतरावर होतो. पोलीस आणि त्याच्या (अरविंद सिंग) मध्ये काय बोलणं चाललं होतं, ते आम्हाला ऐकू येत नव्हतं, पण किमान 25-30 गोळ्या झाडल्या गेल्या असाव्यात.”

मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या

ही घटना मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आझमगडच्या शंभुपूर गावात घडली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिराग जैन यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “शंभुपूर गावात तीन हत्या झाल्याची माहिती आम्हाला अहरौला पोलीस स्टेशन आणि 112 वर मिळाली. स्टेशन प्रभारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. सर्कल ऑफिसर सायंकाळी 7 वाजेपर्यंत घटनास्थळी पोहोचले आणि रात्री साडेआठपर्यंत एसएसपी, डीआयजी आणि एडीजी घटनास्थळी पोहोचले होते.”

ही घटना आझमगडमधील अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभुपूर गावात घडली.

फोटो स्रोत, Aman Gupta

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अरविंद सिंगला अनेक तास आत्मसमर्पण करण्याचा आग्रह करण्यात आला, पण त्यानं नकार दिला. तो मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत राहिला.

हा संघर्ष किती काळ चालला? अरविंदच्या अल्पवयीन मुलाचा (शौर्यचा) मृत्यू कसा काय झाला?

चिराग जैन म्हणाले की, “पोलिसांनी आणि त्याच्या परिसरातील लोकांनी त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना वारंवार धमक्या देत राहिला. अचानक आतून गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे एसओजीचे दोन सदस्य आणि एसएसपी यांनी दरवाजा तोडून पलंगामागे आश्रय घेत आतमध्ये प्रवेश केला. त्यानं तिथून गोळीबार केला, पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं आणि तो जखमी झाला.”

या कारवाईत कमांडोंची मदतही घेण्यात आली होती का?

चिराग जैन म्हणाले की, “या कारवाईसाठी कमांडोंना बोलावण्यात आलं होतं, पण ते आतमध्ये गेले नाहीत.”

दिवंगत पुजारी महेंद्र पाठक यांचे पुतणे बजरंगी पाठक यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, “जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मी एका धार्मिक विधीसाठी गेलो होतो. मला फोन आला की तुमच्या काकांना गोळी लागली आहे. आम्ही थोड्या वेळानं तिथं पोहोचलो. जेव्हा आम्ही पोहोचलो, तेव्हा अरविंदनं स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं आणि तिथं पोलीसही उपस्थित होते.”

माझ्या काकांच्या डोक्यात गोळी लागली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळी त्यांना मागून लागली.

आझमगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिराग जैन

फोटो स्रोत, Aman Gupta

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे.

वाराणसीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक नवीन अरोरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “आमच्या शक्य त्या सर्व प्रयत्नांनंतरही, तो (अरविंद) घर सोडायला किंवा मुलांना बाहेर सोडायला तयार नव्हता. आम्ही त्याला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलायला लावलं, पण प्रत्येक वेळी त्याचं उत्तर हेच होतं की, ‘मुलं माझ्यासोबत आहेत आणि ते माझी ढाल आहेत, तुम्ही सर्वांनी परत जा.’ एका मर्यादेनंतर सात तास उलटून गेले होते. मग आम्ही असं ठरवलं की किमान आपण घराला वेढा घालून ठेवू, जेणेकरून त्यानं पळून जायचा प्रयत्न केला तर तो सापडेल.”

पुढे ते म्हणाले, “आम्ही तयारी करत होतो, तेव्हा अचानक आतून गोळीबाराचा आवाज आला आणि त्यानंतर आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. कारण, आतमध्ये तीन मुलं होती. एक गोळीसुद्धा झाडली जाणं म्हणजे काहीही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.”

यानंतरच पथक आतमध्ये गेलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC