Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Handout
10 एप्रिल 1912 रोजी त्या काळातील सर्वात अत्याधुनिक जहाज टायटॅनिक आपल्या पहिल्या प्रवासासाठी इंग्लंडमधील साउथॅम्प्टन बंदरातून निघाले.
न्यूयॉर्कला निघालेल्या ‘आरएमएस टायटॅनिक जहाजा’वर 2201 लोक होते. हे जहाज 4 दिवसांनंतर उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर आदळले आणि समुद्रात बुडाले.
टायटॅनिकची ही कहाणी अनेक वेळा आणि विविध प्रकारे सांगितली गेली आहे. त्या काळातील वृत्तपत्रांपासून ते लिओनार्डो डिकॅप्रिओच्या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटापर्यंत, या दुर्घटनेवर खूप काही लिहिलं गेलं आणि दाखवलं गेलं आहे.
परंतु, या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 1500 लोकांपैकी एका व्यक्तीची कहाणी बराच काळ जवळजवळ विस्मृतीत गेली होती. एके दिवशी एक समाजशास्त्रज्ञ लिव्हरपूलमधील एका संग्रहालयात गेल्या. तिथे त्यांना या व्यक्तीची माहिती मिळाली.
तो प्रवासी कोण होता आणि कुठे जात होता?
त्यांचं नाव जोसेफ फिलिप लेमर्सियर लारोश हे होतं. टायटॅनिक जहाजावर प्रवास करणारा तो एकमेव कृष्णवर्णीय प्रवासी होते. उपलब्ध कागदपत्रांमध्ये त्याच्या नावाची नोंद आढळून येते.
परंतु, लारोश नेमका कोण होता? नशिबाने असं कोणतं वळण घेतलं की 25 वर्षीय लारोश आपल्या कुटुंबासह व्हाइट स्टार लाइनच्या त्या जहाजावर पोहोचला, जे कधीही बुडणार नाही, असं म्हटलं जात होतं?
लारोशचा जन्म 1886 मध्ये हैतीमधील कॅप-हैतियन येथे झाला होता.
लारोश हा हैतीचे पहिले सम्राट जाँ-जाक देसालिन यांचा पणतू होता. देसालिन यांनी फ्रेंचांच्या वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा देऊन हैतीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
फोटो स्रोत, National Museums Liverpool
लारोशचं बालपण एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात गेलं. वयाच्या 15व्या वर्षी तो एका शिक्षकासोबत फ्रान्सला गेला. तिथे त्याला विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायचं होतं.
फ्रान्समध्ये आल्यानंतर साधारण 11 वर्षांनी टायटॅनिक दुर्घटनेत लारोशचा मृत्यू झाला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, तो टायटॅनिकवर प्रवास करणारा एकमेव कृष्णवर्णीय प्रवासी होता.
विस्मृतीत गेलेली लारोशची कहाणी
बराच काळ विस्मृतीत गेलेली लारोशची कहाणी अखेर समोर आली. लिव्हरपूलमधील मेरिटाइम म्युझियमला भेट देताना डॉ. कारलेट नॉरवुड यांना लारोशबद्दल माहिती मिळाली.
वॉशिंग्टन डीसीमध्ये जन्मलेल्या नॉरवुड यांनी यानंतर लारोशच्या आयुष्याचा अभ्यास सुरू केला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लारोशच्या जीवनावर नाटक लिहिलं आणि त्याचे दिग्दर्शनही केले.
या नाटकाचा 17 ऑक्टोबर रोजी लिव्हरपूलमध्ये पहिल्यांदाच प्रयोग होणार आहे. त्याआधी नॉरवुड यांनी बीबीसीशी बोलताना लारोशच्या आयुष्यातील गुंतागुंतीची कहाणी सांगितली.
ही कहाणी एका प्रतिष्ठित, प्रभावशाली कुटुंबापासून सुरू होते. पुढे त्यात धाडसी प्रेमकहाणी घडते आणि शेवटी तिचा दुःखद अंतही होतो.
लारोश 1901 मध्ये फ्रान्समध्ये आला. त्यावेळी फ्रान्सच्या वसाहतींमध्ये गुलामगिरी बंद होऊन जेमतेम 50 वर्षे झाली होती.
त्याने पॅरिसजवळील बोवे येथे विद्यापीठीय शिक्षण घेतले आणि तो अभियंता झाला.
फोटो स्रोत, Handout
नॉरवुड सांगतात, “1900 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये कृष्णवर्णीय व्यक्तींना वर्णभेदाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत होता.”
“त्या काळात फ्रान्समधील लोकांचा खरंच असा समज होता की कृष्णवर्णीय लोकांना शेपूट असते.”
“तिथे त्यांना त्यांच्या वर्णामुळे खूप त्रास आणि भेदभावाचा सामना कारावा लागला.”
त्या काळात फ्रान्समध्ये वेगवेगळ्या वर्णांच्या व्यक्तींनी (भिन्न वांशिक पार्श्वभूमी) एकमेकांशी लग्न केल्यास, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.
अशा परिस्थितीतही लारोशची ज्युलिएट लाफार्गशी ओळख झाली. ती श्वेतवर्णीय फ्रेंच महिला होती. पुढे जाऊन दोघांनी विवाह केला.
नॉरवुड म्हणतात, “त्या काळात एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचं धाडस दाखवणारी ज्युलिएट ही नक्कीच असाधारण महिला असावी.”
“इतकंच नाही, तर ज्युलिएटच्या कुटुंबानेही त्यांना साथ दिली. कारण हे दोघे ज्युलिएटच्या वडिलांसोबत राहत होते.”
वर्णद्वेषाला कंटाळून मायदेशी जायचं होतं
“लाफार्गच्या कुटुंबाने त्यांच्या नात्याला पाठिंबा दिला होता, हे निश्चित आहे. कारण लारोशबद्दल लाफार्गने आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हे पत्र आजही जतन करून ठेवलेलं आहे.”
“लारोशच्या त्वचेचा रंग काय आहे, यापेक्षा तो शिकलेला, सुशिक्षित आहे, ही गोष्ट तिच्या वडिलांसाठी जास्त महत्त्वाची होती.”
या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. त्यांची नावे सिमोन मेरी ॲन आंद्रे लारोश आणि लुईझ लारोश अशी होती. सिमोनचा जन्म 1909 मध्ये, तर लुईझचा जन्म 1910 मध्ये झाला होता.
परंतु, काही काळानंतर लारोशने आपल्या कुटुंबासह मायदेशी हैतीला परतण्याची योजना आखली.
नॉरवुड सांगतात, “लारोशने पदवी मिळवली होती, पण त्याला नोकरी मिळवणं खूप कठीण होतं.”
“त्याला अनेकवेळा नोकरीवरून काढून टाकलं जायचं. नोकरी मिळाली तरी वर्णद्वेषामुळे त्याला अपमानास्पद वागणूक सहन करावी लागायची.”
फोटो स्रोत, Public Domain
या कुटुंबाने 1912 च्या अखेरीस फ्रान्स सोडण्याची योजना आखली होती. पण, लाफार्ग तिसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याने त्यांनी लवकरच फ्रान्स सोडण्याचा निर्णय घेतला.
“आपल्या बाळाचा जन्म फ्रान्समध्ये व्हावा आणि त्याचं बालपणही तिथेच जावं, असं लारोशला वाटत नव्हतं,” असं नॉरवुड सांगतात.
“त्याला हैतीला परत जायचं होतं. तो आपल्या आईच्या खूप जवळचा होता आणि त्याला तिची खूप आठवण येत होती.”
नॉरवुड यांच्या म्हणण्यानुसार, लाफार्गला मात्र आपल्या वडिलांना फ्रान्समध्ये सोडून जाण्याची चिंता होती.
परंतु, त्यावेळी हैतीचे राष्ट्राध्यक्ष असलेले आणि लारोशचे काका असलेले सिनसिनॅटस लेकोंत यांनी त्याच्यासाठी गणिताच्या शिक्षकाच्या नोकरीची सोय केली होती. त्यामुळे लारोशच्या कुटुंबाने हैतीला परतण्याचा निर्णय घेतला.
नशिबाने लारोशला टायटॅनिकवर कसं आणलं?
पण हे कुटुंब टायटॅनिकवर कसं पोहोचलं?
ठरलेल्या वेळेआधीच फ्रान्स सोडण्याचा निर्णय, दुसऱ्या जहाजाची काढलेली तिकिटं आणि टायटॅनिकवर चढण्याची जवळपास हुकलेली संधी, या सर्व गोष्टी पाहता नॉरवुड म्हणतात, “लारोश कुटुंब टायटॅनिकवर असणारच नव्हतं.”
“लारोशच्या आईने कुटुंबासाठी एसएस फ्रान्स या जहाजाची फर्स्ट क्लासची तिकिटं पाठवली होती.”
“पण, एसएस फ्रान्स जहाजावर मुलांना आई-वडिलांसोबत बसून जेवण करता येणार नाही, हे त्यांना समजलं. त्यामुळे त्यांनी फर्स्ट क्लासची तिकिटं बदलून टायटॅनिकच्या सेकंड क्लासची तिकिटं घेतली.”
फोटो स्रोत, Photo12/Universal Images Group via Getty Images
प्रवासाला निघताना या कुटुंबाच्या नशिबाने पुन्हा एकदा वेगळंच वळण घेतलं. कारण त्यांचा प्रवास ज्या जहाजावर सुरू होणार होता, त्याचा शेवट एका मोठ्या दुर्घटनेत होणार होता.
टायटॅनिक फ्रान्समधील शेरबुर्ग बंदरावर थांबणार होतं. परंतु हे जहाज खूप मोठं असल्यामुळे ते बंदरापर्यंत येऊ शकत नव्हतं.
म्हणून शेरबुर्ग बंदरातून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना एसएस नोमॅडिक नावाच्या छोट्या जहाजातून टायटॅनिकपर्यंत नेण्यात आलं.
नॉरवुड सांगतात, “त्यांना एका छोट्या बोटीतून जहाजापर्यंत जावं लागलं.”
“ते ज्या बोटीत बसले होते, तिचं इंजिन बिघडलं. त्यामुळे टायटॅनिकवर चढण्याची संधी त्यांना थोडक्यात हुकली असती.”
“खरंच, हा नशिबाचा खेळ होता.”
टायटॅनिक बुडालं, त्या रात्री नेमकं काय घडलं?
14 एप्रिल 1912 रोजी रात्री सुमारे 11 वाजून 40 मिनिटांनी टायटॅनिक जहाज एका हिमनगाला धडकलं.
लारोशने आपल्या पत्नीला उठवलं. दोघांनी काही मौल्यवान वस्तू घेतल्या आणि झोपलेल्या मुलींना कडेवर घेऊन जहाजाच्या सर्वात वरच्या डेकवर पोहोचले.
गर्भवती लाफार्ग आणि त्यांच्या दोन्ही मुलींना बचावनौकेत (लाइफबोट) जागा मिळाली. दुसऱ्या दिवशी आरएमएस कार्पेथिया या जहाजाने त्यांची सुखरूप सुटका केली.
परंतु, लारोश जोसेफचं पुढे काय झालं, हे कधीच समजू शकलं नाही.
फोटो स्रोत, Getty Images
नॉरवुड यांच्यासाठी लारोशची कहाणी ‘कोणतीही अतिशयोक्ती न करता’ सांगणं महत्त्वाचं आहे. कारण ही गोष्ट केवळ एका व्यक्तीचा इतिहास जाणून घेण्यापुरती मर्यादित नाही.
त्या म्हणतात, “ही गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेते, कारण ती टायटॅनिकच्या इतिहासाचा एक भाग आहे.”
“परंतु, आपल्यापैकी अनेक कृष्णवर्णीय लोकांना आपला इतिहास माहिती नाही.”
“गुलामगिरीच्या काळात माणसांना मालमत्ता समजलं जायचं. त्यामुळे त्यांची नोंदही ठेवली जात नसायची.”
“त्यामुळे आपल्याला आपला भूतकाळ आणि आपली ओळख याबद्दल खूपच कमी माहिती आहे.”
नॉरवुड पुढे म्हणतात, “लारोशची गोष्ट सांगते की, कृष्णवर्णीय लोकांच्याही अशा महत्त्वाच्या कथा आहेत. आपली ओळख केवळ गुलामगिरीपुरती मर्यादित नाही.”
“असेही लोक होते, जे आयुष्यात पुढे जात होते आणि यशस्वी होत होते.”
“ही गोष्ट आपल्याला आपल्या भूतकाळाशी जोडते.”
“आपलं जोसेफ लारोशशी नातं असायलाच हवं असं नाही, तरीही आपण त्याच्याशी जोडलं गेल्यासारखं वाटू शकतं.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




