Source :- BBC INDIA NEWS

अफगाणिस्तानमध्ये मोठी कुटुंबं आणि अनेक मुलं असलेली जोडपी सामान्य मानली जातात. मात्र, उरुझगान प्रांतातील मोहम्मद सादिक यांचं कुटुंब कदाचित देशातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी एक असावं.
मोहम्मद सादिक यांना चार पत्नींपासून 58 मुलं आहेत. त्यांचं सर्वांत लहान मूल काही आठवड्यांपूर्वीच जन्माला आलं आहे.
मुलांसाठी दररोज खाण्या-पिण्याची सोय करता यावी, यासाठी दिवसभर त्यांचे सर्व प्रयत्न सुरू असतात, असं ते सांगतात.
एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ आणि उदरनिर्वाह करणं हे मोहम्मद सादिक यांच्यासाठी मोठं आव्हान बनलं आहे. आर्थिक चणचणीमुळे कुटुंबातील लहान मुलांनाही अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगावं लागत आहे.
या कुटुंबातील चारही महिलांनी अनेक वर्षे सलग गर्भधारणा, प्रसूती आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळली आहे. मोहम्मद सादिक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या चारही पत्नींची लग्नं कमी वयात झाली होती. निकाह (लग्न) झाला तेव्हा त्यांचं वय 13 ते 16 वर्षांच्या दरम्यान होतं.
मोहम्मद सादिक हसत सांगतात की, कधीकधी त्यांना स्वतःच्या सर्व मुलांची नावंही आठवत नाहीत. मात्र, दररोज रात्री झोपण्यापूर्वी ते मुलांची मोजणी नक्की करतात. यामुळे घरातील सर्व मुलं उपस्थित असल्याची खात्री त्यांना करता येते.
घरात सदैव कल्लोळाचं वातावरण
लहान मुलं जेव्हा वडिलांभोवती गोळा होतात, तेव्हा संपूर्ण घर गोंगाट, हशा आणि गडबडीने भरून जातं. जणू काही घरात लग्नसोहळाच सुरू आहे, असं वाटतं, असं मोहम्मद सादिक सांगतात.
मात्र, या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदासोबतच गंभीर आर्थिक अडचणीही आहेत. गरिबी कधीकधी इतकी तीव्र होते की, काही मुलांना रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच वेळी स्वयंपाक केला जातो. घरातील दोन महिला स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात.

57 वर्षीय मोहम्मद सादिक एका कार शोरूममध्ये काम करतात. अधिक मुलं जन्माला घालण्यामागचा त्यांचा उद्देश केवळ ‘उम्मत-ए-मुहम्मदीचा विस्तार करणे’ हा होता, असं ते सांगतात.
आपल्या एका मुलीच्या निकाहाशी संबंधित एक रंजक प्रसंग सांगताना ते म्हणतात, “निकाह लावणाऱ्या मौलवींनी जेव्हा मला माझ्या मुलीचं नाव विचारलं. तेव्हा मी काही वेळ विचार करत राहिलो आणि चुकून दुसऱ्याच मुलीचं नाव सांगितलं. यावर मौलवी हसून म्हणाले, ‘घरी जाऊन पुन्हा एकदा खात्री करून घ्या. तुम्ही चुकीचं नाव तर सांगितलं नाही ना?'”
‘मुलांची नावंही लक्षात राहत नाहीत’
मोहम्मद सादिक सांगतात की, इतकी मुलं असल्यामुळे अनेकदा सर्वांची नावं लक्षात ठेवणं कठीण जातं. त्यामुळे ते बहुतांश मुलांना ‘बेटा’ म्हणूनच हाक मारतात.
एक प्रसंग आठवताना ते म्हणतात, “एकदा रात्री आम्ही सर्वजण जेवणासाठी टेबलाभोवती बसलो होतो. मी मुलांची मोजणी सुरू केली, तेव्हा एक मूल कमी असल्याचं लक्षात आलं. मात्र, घरात नसलेलं मूल मुलगा आहे की मुलगी, हेही मला माहीत नव्हतं. मग मी त्यांच्या आईंना विचारलं. त्यापैकी एकीने सांगितलं की तिने आपल्या मुलाला किंवा मुलीला आजीकडे पाठवलं आहे आणि ते मूल त्या रात्री तिथेच राहणार आहे.”

मोहम्मद सादिक यांचं पहिलं लग्न झालं, तेव्हा त्यांचं वय 20 वर्षं होतं. अल्पवयीन मुलींशी लग्न करण्यामागचं कारण त्यांना बीबीसीने विचारलं असता, प्रत्येक लग्नासाठी वधूच्या कुटुंबाला द्यावी लागणारी ‘तुवियाना’ ही रक्कम जमवण्यासाठी त्यांना अनेक वर्षं लागायची, असं त्यांनी सांगितलं.
एवढं मोठं कुटुंब आणि मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारीविषयी विचारलं असता, त्यांनी सांगितलं की त्यांच्या पत्नींची लग्नं अगदी कमी वयात झाली होती. पौगंडावस्थेतच त्यांच्यावर लग्न, गर्भधारणा, प्रसूती आणि मुलांच्या संगोपनासारख्या मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. पुढे या जबाबदाऱ्या त्यांच्या जीवनाचा कायमचा भाग बनल्या.
मोहम्मद सादिक आणि त्यांच्या पत्नींना आयुष्यात आणखी एका मोठ्या दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या 14 मुलांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही आई-वडिलांसाठी ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.
कोणत्या आव्हानांचा करावा लागतो सामना ?
तज्ज्ञांच्या मते, कमी वयात लग्न झालं तर गरोदरपणात आई आणि नवजात बाळ या दोघांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. दरवेळच्या गरोदरपणामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यांना गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो.
अफगाणिस्तान अशा देशांच्या यादीत येतो जिथं गर्भावस्था आणि प्रसूतीदरम्यान होणाऱ्या महिलांचे प्रमाण अपेक्षापेक्षा अधिक आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे त्या ठिकाणी ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवते.
दुसऱ्या बाजूला, गरिबी देखील या कुटुंबाला प्रभावित करत आहे. थंडीच्या दिवसात कुटुंबातील लोक घरात आणि उन्हाळ्यात अंगणात एकत्र बसून जेवतात. पण त्यांच्याकडे पायाभूत सुविधांची कमतरता आहे. ज्या ठिकाणी अंघोळ केली जाते त्याच ठिकाणी कपडे आणि भांडी धुतली जातात. हीच जागा स्वच्छतागृह म्हणून देखील वापरली जाते.
कुटुंबाच्या वाढत्या गरजांना पूर्ण करण्यासाठी फक्त मोहम्मद सादिकच नाही तर त्यांची अनेक मुलं काम करतात. काही मुलं कागद, प्लास्टिक आणि इतर वस्तू गोळा करतात. या वस्तूंचा वापर एकतर इंधन म्हणून केला जातो किंवा या गोष्टी विकून घरखर्च भागवला जातो.
सर्व अडचणींचा सामना करत हे कुटुंब रोजच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. या ठिकाणी दररोज जेवण, राहण्याचा खर्च, आरोग्य इत्यादी गोष्टींचा खर्च भागवणे देखील एक आव्हान म्हणून समोर येतं.
मोहम्मद सादिक यांचं स्वप्न
थंडीच्या दिवसात कधी कधी सहा-सात लोक एक पातळ ब्लँकेट घेऊन झोपतात. साध्या गाद्या सोडल्या तर या कुटुंबाकडे झोपण्यासाठी काही खास सुविधा नाहीये.
घराच्या खोल्यांना ना खिडक्या आहेत ना मजबूत दरवाजे. दारावर फक्त पातळ पडदे लटकलेले दिसतात.
इंधन म्हणून बहुतेक वेळा कागद आणि इतर उपलब्ध वस्तू वापरल्या जातात. या अडचणी असून देखील मोहम्मद सादिक हे देखील आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. पण मर्यादित उत्पन्नामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलले काही सोपे नाही.
सादिक हे एका कार शोरूममध्ये काम करतात. त्यांचं म्हणणं आहे की एक कार विकल्यानंतर त्यांना केवळ एक हजार अफगानी कमिशन म्हणून मिळतात.
पण त्यांच्या गरजा या त्यांच्या उत्पन्नाहून खूप अधिक आहेत. त्यामुळेच मोहम्मद सादिक सरकार, NGO आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांकडे मदतीचं आवाहन करत आहेत. जेणेकरुन, त्यांच्या मुलांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील.
जीवनात केवळ दोन इच्छा असल्याचं मोहम्मद सादिक सांगतात.
माझी पहिली इच्छा आहे की मुलांना शिक्षण मिळावे म्हणजे त्यांना धर्म आणि जगाचे ज्ञान मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर कधी उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




