Home LATEST NEWS ताजी बातमी सतत भांडणं होतायत? नातं वाचवायचं असेल तर आधी ‘हा’ एकच प्रश्न विचारा,...

सतत भांडणं होतायत? नातं वाचवायचं असेल तर आधी ‘हा’ एकच प्रश्न विचारा, तज्ज्ञांचा सल्ला

3
0

Source :- BBC INDIA NEWS

सतत भांडणं होतायत? नातं वाचवायचं असेल तर आधी 'हा' एकच प्रश्न विचारा, तज्ज्ञांचा सल्ला

जेव्हा नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असतं, तेव्हा ते वाचवण्यासाठी तुम्ही आधी काय समजून घेतलं पाहिजे? जाणून घ्या कपल्स थेरपिस्ट्सचा सल्ला.

तुम्ही जर नात्यात आनंदी नसाल तर तुम्हाला खरोखरच हृदयाशी संबंधित त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

सततची भांडणं झोप उडवू शकतात. इतकंच नाही तर छातीत आणि शरीरात दुखण्याचं कारणही बनू शकतात. अशा वातावरणामुळे लहान मुलांपासून घरातील सर्वांच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

सुखी नात्यामुळे आरोग्य सुधारतं आणि आयुष्यही वाढतं. याउलट नात्यात सतत कलह असतील तर आरोग्याची हळूहळू झीज होते आणि अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.

कुटुंब

खरं तर जवळच्या नात्यांमधील दुरावा ही धुम्रपान किंवा व्यायामाच्या अभावाइतकाच अथवा त्याहूनही मोठा आरोग्यासाठीचा धोका मानला जातो. आणि अर्थात, त्यानंतर येतो तो मानसिक पातळीवरचा हृदयभंग…म्हणजेच प्रेम हळूहळू विस्कटत जाण्याच्या वेदना.

मग बिघडलेलं नातं पुन्हा आनंदी कसं करायचं? आणि खरंच असं करणं शक्य असतं का?

वाढत्या संशोधनातून या प्रश्नांची काही थक्क करणारी उत्तरं मिळतात आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये एक नवी आशा निर्माण करतं.

जोडप्यांमध्ये वाद का होतात?

तुम्ही एखादं नवं नातं जोडलं आहे आणि तुमचा जोडीदारासोबतचा पहिलाच वाद सिंकमधल्या खरकट्या भांड्यांवरून झालाय? मग समजून जा, तुम्हाला तुमच्या नात्याच्या भविष्याची एक छोटीशी झलक आधीच दिसली आहे.

संशोधनातून असं समोर आलंय की, नात्यात सुरुवातीला ज्या क्षुल्लक गोष्टींवरून खटके उडतात, पुढे वर्षानुवर्षे त्याच त्याच मुद्द्यांवर भांडणं सुरू राहतात. पुन्हा पुन्हा समोर येणाऱ्या अशा वादांना ‘कधीही न संपणारे’ किंवा ‘कोंडीत अडकवणारे वाद’ म्हणतात.

अमेरिकेतील सिएटल येथील ‘द गॉटमन इन्स्टिट्यूट फॉर कपल्स थेरपी’च्या रिसर्च डायरेक्टर आणि मानसशास्त्रज्ञ कॅरी कोल सांगतात, “हे न सुटणारे वाद पैशांचे नियोजन, मुलांचे संगोपन, लैंगिक जीवन किंवा नात्यात कोणाचे चालणार यावरून असू शकतात.” पण त्याचबरोबर, घरात नीटनेटकेपणा ठेवण्यासारख्या अगदी वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टींवरूनही हे खटके उडू शकतात.

संशोधनातून असं समोर आलं आहे की, नात्यात सुरुवातीला ज्या क्षुल्लक गोष्टींवरून खटके उडतात, पुढे वर्षानुवर्षे त्याच त्याच मुद्द्यांवर भांडणं सुरू राहतात.

एका दीर्घकाळ चाललेल्या संशोधनात, मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमन आणि त्यांच्या टीमनं काही जोडप्यांमधील मतभेदांचं सुरुवातीला आणि त्यानंतर बरोबर 4 वर्षांनी बारीक निरीक्षण केलं.

त्यांच्या पाहणीत एक थक्क करणारी बाब समोर आली. जवळपास 69% प्रकरणांमध्ये जोडपी 4 वर्षांनंतरही अगदी त्याच जुन्या मुद्द्यांवरून एकमेकांशी भांडत होती ज्यांवरून त्यांचे आधी वाद झाले होते.

इतर संशोधनांतूनही असाच एक पॅटर्न समोर आला आहे. पैशांसारख्या काही मूळ मुद्द्यांवरून होणारे वाद हे केवळ घरोघरीच नव्हे तर जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्येही अगदी सारखेच पाहायला मिळतात. विशेषतः पैशांवरून होणारे मतभेद हे सगळ्यात जास्त ताणले जाणारे आणि टोकाचे ठरतात.

याशिवाय घरातील कामांची असमान वाटणी हेसुद्धा दोघांमधील तणावाचे आणखी एक मोठं कारण आहे ज्यामुळे अनेकदा घटस्फोटापर्यंत वेळ जाऊ शकते.

प्रत्यक्षात मतभेद होणं हे काही वाईट लक्षण नाही. एकमेकांच्या गरजा समजून घेणं आणि त्यांना प्रतिसाद देणं, या प्रवासातील हा एक स्वाभाविक भाग असू शकतो. शिवाय आनंदी असोत किंवा दुःखी, जोडप्यांमध्ये वाद हे होतातच.

संशोधनानुसार, आनंदी आणि नाखूश जोडप्यांमध्ये एकच महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे वादाच्या वेळी आणि वाद नसतानाही ते एकमेकांशी नेमकं कसं वागतात हा.

नातं संपवणारं 4 प्रकारचं वागणं

अभ्यासांनुसार कोल यांनी अशा 4 प्रकारच्या वागणुकींकडे लक्ष वेधलं आहे ज्यावरून नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं समजतं. …ते म्हणजे एकमेकांवर टीका करणं, अनादर दाखवणं, प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करणं आणि अबोला धरणं (म्हणजेच वाद सुरू असताना काहीही बोलण्यास नकार देणं).

“या 4 प्रकारच्या वागणुकीमुळे नातं संपून जातं,” असं कोल यांनी सांगितलं. मात्र त्या पुढे म्हणाल्या, “जर दोघांनाही नातं टिकवायचं असेल तर या सवयी बदलता येतात.” (नक्की काय करता येईल, ते पुढे वाचा.)

पैसे किंवा घरातील कामांवरून मतभेद झाल्यामुळे जोडप्यांमध्ये खटके उडू शकतात. मात्र वादाच्या वेळी ते एकमेकांशी कसे वागतात यावरच नात्याचं भविष्य अवलंबून असतं.

खरं तर यात फक्त नातंच धोक्यात येतं असं नाही तर जोडीदाराकडून सतत होणारी टीका ही लवकर मृत्यू ओढवण्याचं मोठं कारण ठरू शकते, असं एका स्वतंत्र अभ्यासात दिसून आलं आहे.

अशा प्रकारच्या सवयी, जोडीला आक्रमकता आणि शत्रुत्वाची भावना असणारे वाद हे ‘विध्वंसक’ मानले जातात आणि यामुळे अखेर घटस्फोटाचा धोका वाढू शकतो.

मात्र आदर, समजून घेण्याची इच्छा आणि चांगुलपणा दाखवून एकत्र मार्ग काढणारे सकारात्मक वाद नातं अधिक मजबूत बनवू शकतात.

यातला एक मुख्य घटक म्हणजे चांगला प्रतिसाद मिळणं. आपला जोडीदार आपलं ऐकून घेतो, आधार देतो आणि समजून घेतो ही जाणीव असणं. जोडीदाराकडून असा सकारात्मक प्रतिसाद मिळण्यामुळे वैवाहिक जीवनात केवळ आनंदच मिळतो असं नाही, तर यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य आणि आयुष्यमानही वाढू शकतं.

आपुलकी आणि एकमेकांना साथ देण्यामुळे नात्यात दीर्घकाळ टिकणारा विश्वास तयार होतो.

विवाहित जोडप्यांवर 20 वर्षे चाललेल्या एका अभ्यासात असं समोर आलं की, दोघांनी मिळून निर्णय घेतल्यानं आणि घरातील कामं वाटून केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद वाढला आणि भांडणं कमी झाली.

जोडप्यांमधील वादांचा परिणाम झोपेवरही होतो. संशोधनानुसार, नकारात्मक वादामुळे झोप बिघडते, तर समजुतदारपणानं काढलेल्या मार्गांमुळे झोप चांगली लागते.

नात्यात पुन्हा सहानुभूती निर्माण करणं

जर तुम्ही एखाद्या दुःखी नात्यातून जात असाल तर टोमणे आणि कटुता सोडून एकमेकांना समजून घेणं किंवा आधार देणं जवळपास अशक्य वाटू शकतं. मात्र भक्कम पुराव्यांच्या आधारे असं दिसलंय की हे शक्य आहे. उदाहरणार्थ मानसोपचाराच्या मदतीनं कटुता दूर करता येते.

संशोधनानुसार, कपल्स थेरपी घेणाऱ्या 70% जोडप्यांना याचा सकारात्मक फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे नात्यातील वाद आणि अडचणी दूर होण्यास मदत होते, नात्यात समाधान वाढतं, मानसिक तणाव टळतो आणि भावनिक जवळीक वाढते. यासोबतच दोघांच्याही वैयक्तिक मानसिक किंवा शारीरिक आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

जोडप्यांमधील वादांचा परिणाम झोपेवरही होतो. संशोधनानुसार, नकारात्मक वादामुळे झोप बिघडते, तर समजुतीने काढलेल्या मार्गांमुळे झोप चांगली लागते.

“ज्या जोडप्यांवर थेरपी घेण्याची वेळ येते, त्यांच्यातील एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती किंवा सहानुभूती आधीच संपलेली असते,” असं इलिनॉयमधील एव्हानस्टन येथील ‘नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी’च्या फॅमिली इन्स्टिट्यूटमधील वैद्यकीय मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि कपल्स थेरपिस्ट जे लेबो यांनी सांगितलं.

कपल्स थेरपी खरोखरच उपयुक्त ठरते, हे सिद्ध करणाऱ्या एका मोठ्या अभ्यासाचं सहलेखन त्यांनी केलंय.

ते पुढे सांगतात की थेरपीमध्ये, “आपण एकमेकांसाठी ती सहानुभूती परत कशी आणायची?” ही मुख्य अडचण असते.

थेरपीचा चांगला परिणाम होत आहे हे ओळखण्याचे काही संकेत असतात, असं त्यांनी सांगितलं.

“त्यातील एक संकेत म्हणजे दोघंही नीट बोलतात आणि एकमेकांचं ऐकतात. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण नात्यात दुरावा किंवा सतत भांडणं असतील, तर जोडीदाराचं म्हणणं शांतपणानं ऐकून घेणं अत्यंत कठीण असतं,” असं ते म्हणाले.

नात्यातील गोष्टी सुधारणं म्हणजे “स्वतःला थोडं थांबवून, माझ्या जोडीदाराच्या काय चुका आहेत? याऐवजी आमच्या दोघांमध्ये नक्की काय चाललं आहे? असा विचार करता येणं,” असं ते म्हणाले.

‘मला आणखी सांगा’

जोडप्यांसोबतच्या समुपदेशनाच्या सत्रांमध्ये कोल यांना अशा महत्त्वाच्या दोन गोष्टी दिसून येतात ज्यामुळे नातं टिकण्याची आशा वाटते ते म्हणजे, हे दोघे ही नातं टिकवून ठेवतील आणि आपल्या समस्या सोडवून मार्ग काढतील हे दाखवणारी ही लक्षणं असतात, असं त्या सांगतात.

यातील एक गोष्ट म्हणजे, एका जोडीदारानं दुसऱ्याला असं म्हणणं की, “तुला तसं का वाटलं, हे मी समजू शकतो.”

कोल यांच्या मते, समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याला किंमत देण्याचं हे एक लक्षण आहे. “याचा अर्थ असा होतो की, समोरच्याचे विचार स्वतःपेक्षा वेगळे असले, तरीही जोडीदार एकमेकांचं म्हणणं बरोबर मानून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात,” असं त्या सांगतात.

दुसरं मुख्य लक्षण म्हणजे, “दोघांना अजूनही एकमेकांचे विचार जाणून घेण्यात रस आहे का? जर थोडी जरी उत्सुकता शिल्लक असेल तर नातं सुधारण्याची आशा असते,” असं त्या म्हणतात. समोरच्याचं मत पटत नसलं, तरीही “ते साधारण असं म्हणू शकतात की, ‘मला याबद्दल आणखी ऐकायचं आहे, असा विचार तुझ्या मनात कसा आला?'”

जर दोघांनी मिळून अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तर “त्याचे चांगले परिणाम मिळतात हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत,” असं लेबो म्हणाले.

एकमेकांची स्वप्नं जाणून घेणं

ज्या वादांवर काहीच तोडगा निघत नाही अशा वादांमधून मार्ग काढायचा असेल तर एकमेकांची स्वप्नं आणि उद्दिष्टं समजून घेतल्याने मदत होते, असं कोल सांगतात.

या एका जोडप्याचं उदाहरण देतात.

हे जोडपं पैशांवरून सतत भांडणं होत असल्यामुळे थेरपीसाठी आलं होतं. दोघंही गरिबीत लहानाचे मोठे झाले होते. पण या गरिबीचा दोघांवर पूर्णपणे वेगळा परिणाम झाला होता.

पत्नीचा मुख्य उद्देश पैसे वाचवून, काटेकोर बजेट करून आर्थिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य मिळवणं हा होता. याउलट, पतीला आपल्या मेहनतीचे पैसे चांगल्या वस्तूंवर खर्च करायचे होते, समाजाच्या बरोबरीने जगण्याचा आनंद घ्यायचा होता आणि गरिबीची बंधनं तोडून मोकळं व्हायचं होतं.

या वेगवेगळ्या विचारांमुळे खर्चाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात सतत खटके उडत राहायचे.

संशोधनानुसार, कपल्स थेरपी घेणाऱ्या 70% जोडप्यांना याचा सकारात्मक फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.

“त्यांच्यात नेहमी याच विषयांवरून वाद व्हायचे. पण आपण नक्की कोणत्या कारणामुळे भांडतोय, या मुळापर्यंत ते कधी गेलेच नाहीत,” असं कोल यांनी सांगितलं.

थेरपीच्या सत्रांमध्ये त्यांनी गरिबीतले आपले कटू अनुभव एकमेकांना सांगितले आणि त्यामुळे दोघांचे दृष्टिकोन कसे बदलले हे समजून घेतलं. त्यांनी एकमेकांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली, आणि किती पैसे सेव्हिंग करायचे व किती रक्कम मनासारखी खर्च करायची, यावर दोघांनी मिळून तोडगा काढला.

“त्यांनी या समस्येतून एकत्र मार्ग काढलाच. मात्र एकमेकांचं म्हणणं मान्य करण्याआधी आणि दोघांची स्वप्नं जपली जातील असा सुवर्णमध्य गाठण्याआधी, प्रत्येकासाठी कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची होती हे दोघांनाही एकमेकांकडून समजून घ्यावं लागलं,” असं कोल यांनी सांगितलं.

लेबो यांनी दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भर दिला. “नातं सुधारण्यासाठी दोघांची स्वतःची किती तयारी आहे, याला फार महत्त्व असतं,” असं ते म्हणाले.

“तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम कपल्स थेरपिस्ट असला, तरी जोडप्याची स्वतःचीच इच्छा नसेल तर फायदा होण्याची शक्यता फार कमी असते. पण जर दोघांना स्वतःहून मनापासून प्रयत्न करायचे असतील आणि थेरपिस्ट तितका चांगला नसेल, तरीही नातं सावरू शकतं. या इच्छेमुळे खूप मोठा फरक पडतो.”

शांततेनं वेगळं होणं

अगदी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांनाही थेरपीचा उपयोग होऊ शकतो, असं लेबो म्हणाले. वेगळं होताना होणारा मानसिक त्रास सहन करण्यास आणि त्याचा मनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून काळजी घेण्यास ही थेरपी मदत करते.

यामुळे नातं तुटताना होणारे टोकाचे वाद आणि कटुता कमी होऊ शकते. आणि दोघांना मुलं असतील तर त्यांच्या मानसिक स्वास्थ्याला सांभाळणं जोडप्याला सोपं जातं, असं ते सांगतात.

ब्रेकअप किंवा घटस्फोट होणं अत्यंत दुःखद असलं, तरी “या काळात तुम्हाला स्वतःची खरी ओळख होते,” असं ते सांगतात. “या टप्प्यात अनेक लोक अशा गोष्टी शिकतात ज्या स्वतःसाठी आणि पुढील संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.”

” जोडीदाराचं ऐकून घेणं आणि त्याला समजून घेणं या सवयींचा उपयोग फक्त नात्यात दुरावा आलेल्यांनाच होतो असं नाही, तर “ज्यांचं नातं आधीच छान सुरू आहे, ती माणसंही आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू शकतात” असं लेबो सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC