Home LATEST NEWS ताजी बातमी नरेंद्र विरुद्ध नरेंद्र; दाभोलकरांच्या 7 थेट प्रश्नांवर नरेंद्र महाराजांनी काय कबुली दिली...

नरेंद्र विरुद्ध नरेंद्र; दाभोलकरांच्या 7 थेट प्रश्नांवर नरेंद्र महाराजांनी काय कबुली दिली होती? वाचा

8
0

Source :- BBC INDIA NEWS

'नरेंद्र दाभोलकर विरूद्ध नरेंद्र महाराज' असा आमने-सामने झालेला संघर्ष हा महाराष्ट्रातील बुद्धीप्रामाण्यवादाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा संघर्ष मानला जातो.

  • वाचन वेळ: 12 मिनिटे

‘चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि त्याला विरोध न करणारे भ्याड असतात.’

अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर रॅशनॅलिस्ट अब्राहम कोव्हूर यांचं हे वाक्य नेहमी उद्धृत करायचे.

आज, 1 नोव्हेंबर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जन्मदिन.

डॉ. दाभोलकरांनी अनेक भोंदू बाबा-बुवांना उघडं पाडलं. देवा-धर्माचं नाव घेऊन शोषण करणाऱ्या बऱ्याच जणांना रंगेहातही पकडलं. काही बाबांशी तर ते आमने-सामने भिडले.

केरळमधील विवेकवादी बी. प्रेमानंद यांच्यासोबत डॉ. नरेंद्र दाभोलकर.

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ या कार्यक्रमामध्ये बाबा-बुवांविरोधात झालेल्या संघर्षाबाबत विचारलेल्या एका प्रश्नात दाभोलकरांनी या किस्स्याबाबत सांगितलं होतं.

‘आपण चमत्कार करत असल्याचं आव्हान कुणी तुमच्यासमोर ठेवलं, तर ते तुम्ही स्वीकाराल का?’ या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. दाभोलकरांनी म्हटलं होतं की, “तुम्हाला हे माहीत असेलच, एक महाराज असा दावा करायचे की, ‘मी अमुक अमुक एवढे चमत्कार करतो.’ त्यांच्या लीलामृतात ते लिहिलेलं होतं.”

पुढे दाभोलकर म्हणाले होते की, “त्या महाराजांचं नाव मी एवढ्यासाठी घेत नाही, कारण, त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे मला माझंच नाव घ्यावं लागतं. तर मी त्या महाराजांच्याकडे नाणीजला गेलो. त्यांची-माझी आमने-सामने चर्चा झाली. त्या चर्चेची 20 मिनिटांची चित्रफीत उपलब्ध आहे. ‘कोणताही चमत्कार मला येत नाही,’ असं त्यांनी त्या चर्चेत कबूल केलं आहे.”

‘नरेंद्र विरूद्ध नरेंद्र’ हा आमने-सामने संघर्ष कसा झाला होता?

खरं तर, ही 1998 सालची गोष्ट आहे, जेव्हा संपूर्ण कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नरेंद्र महाराज यांचं प्रस्थ वेगानं वाढत होतं.

लोक मोठ्या आशेपोटी विविध रोगांच्या उपचारांसाठी म्हणून नाणीजला जात होते.

महाराजांवर लिहिलेलं आणि त्यांच्या ट्रस्टनेच प्रकाशित केलेलं ‘नरेंद्र लीलामृत’ हे पुस्तक खरं तर या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेलं होतं.

हे पुस्तक नरेंद्र महाराज विश्वस्त असलेल्या नरेंद्र महाराज ट्रस्ट, नाणीज यांच्यातर्फे महाराजांच्या पत्नी सुप्रिया सुर्वे यांनी प्रकाशित केलेलं होतं.

‘या पुस्तकात कोणत्याही सुरस आणि चमत्कारिक गोष्टींवर ताण करतील असे चमत्कार महाराजांच्या नावे लिहिलेले होते. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या भोंदूगिरीच्या दाव्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तीव्र आक्षेप घेतले होते,’ असं डॉ. नरेंद्र दाभोलकर लिहितात.

त्यांनी आपल्या ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या पुस्तकातील ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या लेखामध्ये हा सगळा किस्सा नोंदवला आहे.

डॉ. दाभोलकर या पुस्तकात लिहितात की, ‘नरेंद्र लीलामृतात जाहीर झालेल्या चमत्कारांबाबत महाराजांनी कधीच उत्तर न दिल्यानं एकदा समोरासमोर येऊन महाराजांचे समर्थक सांगत असलेल्या चमत्कारांमागील सत्यासत्यतेचा निर्णय व्हावा, अशी भूमिका चळवळीनं घेतली होती.’

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या 'तिमिरातुनी तेजाकडे' या पुस्तकातील 'ऐसे कैसे झाले भोंदू' या लेखामध्ये हा सगळा किस्सा नोंदवला आहे.

खरं तर, संपूर्ण कोकणात गावागावांत या आमनेसामने कार्यक्रमाची उत्कंठा होती.

यासंदर्भात आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आणि डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांच्याशी चर्चा केली.

त्यादेखील या सगळ्या घटनाक्रमाच्या साक्षीदार आहेत. या घटनाक्रमाचं व्हीडिओ शुटींगही उपलब्ध आहे. या व्हीडिओमध्ये, तेव्हा वयाच्या पंचविशीत असणाऱ्या मुक्ता दाभोलकर दोन्ही बाजूंचे ऑडिओ रेकॉर्डिंग करत असताना दिसतात.

तेव्हाच्या त्या सगळ्या वातावरणाविषयी मुक्ता दाभोलकर बीबीसीला सांगतात की, “तेव्हा वातावरणात कुतूहलाबरोबर बराचसा तणाव देखील होता. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि महाराजांचे भक्तगण यांची संयुक्त बैठक घेऊन या सवाल-जवाबासाठी दोघांच्याही मान्यतेनं नियमावली ठरवली होती.”

त्यावेळी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या राधा वणजू या देखील या घडामोडींमध्ये आघाडीवर होत्या.

त्या सांगतात की, अंनिसनं सात लेखी प्रश्न द्यावेत आणि महाराजांनी त्यांची लेखी उत्तरे द्यावीत. तसेच दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष चर्चेच्यास्थळी 25 जण उपस्थित रहावेत, असं ठरलं.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, तेव्हा महाराजांचा आग्रह होता की, प्रश्न आजच द्या. पण, अंनिसची भूमिका होती की, प्रश्न ‘नरेंद्र लीलामृत’ या ग्रंथावरच असतील, त्यामुळे ते आधी दिले जाणार नाहीत. शेवटी कार्यक्रमाच्या आधी 15 मिनिटं प्रश्न देण्याचं ठरलं होतं.

प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि हजारो भक्तगणांची हजेरी

आमने-सामने सवाल-जवाबाची ही घटना 25 सप्टेंबर 1998 रोजी घडली.

‘तिमिरातुनी तेजाकडे’ या पुस्तकात डॉ. दाभोलकर लिहितात की, ‘दुपारी 12 च्या सुमारास आम्ही 25 कार्यकर्ते ज्या ठिकाणी आमनेसामने कार्यक्रम झडणार होता, तिथं पोहोचलो. त्या कुंजवनाच्या बाजूनं असलेल्या मठाच्या डोंगरावर दहा हजार भक्तगण दूरदूरहून येऊन थांबलेले होते.’

पोलीस बंदोबस्तही प्रचंड होता. पावणेबाराच्या सुमारास आम्ही तहसीलदार यांच्या उपस्थितीत महाराजांच्या प्रतिनिधीकडे प्रश्नावली दिली. लगबगीनं ती आत नेण्यात आली. 12 वाजून 2 मिनिटांनी प्रश्नांची उत्तरं लिहिलेली टिपणवही घेऊन नरेंद्र महाराज कुंजवनात आले.

या घटनाक्रमाचं व्हीडिओ शुटींगही उपलब्ध आहे.

त्यानंतर डॉ. दाभोलकरांनी एकेक प्रश्न विचारणं आणि त्यावर महाराजांनी उत्तर देणं असा सिलसिला सुरू झाला. असे एकूण सात सवाल-जवाब झाले.

डॉ. दाभोलकर लिहितात की, सुरूवातीला त्यांनी प्रास्ताविक करून या प्रश्नांना सुरूवात केली.

“प्रिय नरेंद्र महाराज, गेल्या दोन वर्षांत अनेक जाहीर सभांतून, वृत्तपत्रांतून पत्रे पाठवून आपणांस ‘नरेंद्र लीलामृत’ या ग्रंथातील सत्यता सिद्ध करण्याबाबत आव्हान केले आहे; परंतु एकाही प्रश्नाचे एकदाही आपण उत्तर दिलेले नाही. सबब या ठिकाणी येऊन हे प्रश्न आपणांस समोरासमोर लेखी स्वरूपात विचारत आहोत. याची उत्तरे आपण योग्य प्रकारे देऊ शकला नाही किंवा उत्तरेच देण्याचे टाळून निघून गेलात; तर आपण या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही असे मानले जाईल, हे जाहीर करून पुढील प्रश्न विचारत आहोत.”

“आपले उत्तर त्वरित, नेमके व लेखी द्यावे. त्याच्या झेरॉक्स प्रती पत्रकारांना उपलब्ध करून दिल्या जातील. म्हणजे कोणालाच नंतर तक्रारीला कारण राहणार नाही. ही भेट महाराजांच्या वर समितीने सतत घेतलेल्या आक्षेपांना उत्तर मिळण्यासाठी आहे. महाराजांना समितीला प्रश्न विचारावयाचे असतील, तर त्यांनी समितीच्या सातारा येथील मध्यवर्ती कार्यालयात जरूर यावे. त्यांचे स्वागत केले जाईल व त्यांच्या सर्व प्रश्नांना लेखी उत्तरे दिली जातील. याची तारीख याच बैठकीत ठरवण्यात यावी.”

दाभोलकरांनी नरेंद्र महाराजांना विचारलेले प्रश्न काय होते?

डॉ. दाभोलकरांनी जे सात प्रश्न विचारले होते, ते थोडक्यात पुढीलप्रमाणे होते,

  • प्रश्न क्रमांक 1 : नरेंद्र लीलामृतामध्ये नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे नवा अवतार आहेत, असा उल्लेख आहे. यासाठी नरेंद्र महाराजांनी ते स्वत:ला गजानन महाराजांचे अवतार मानतात काय, हे सांगावं तसेच, शेगावच्या श्री गजानन संस्थानाने गजानन महाराजांचा अवतार म्हणवून घेणारी व्यक्ती भोंदू असल्याचं जाहीर केलं आहे, याबद्दल आपले मत द्यावं.
  • प्रश्न क्र. 2 : श्री नरेंद्र लीलामृत या पुस्तकात महाराजांनी एका स्त्रीला फटका मारला व त्यानंतर त्यांच्या त्वचेवर पडलेले पांढरे डाग बरे झाले, असा उल्लेख आहे. त्या स्त्रीनं हा मजकूर पूर्ण खोटा असल्याचं भाषणात तसेच वृत्तपत्रांच्या लेखी निवेदनात जाहीर केलेलं आहे. आपण खोटा दावा का केलात व एखाद्या स्त्रीला असा फटका मारणं योग्य आहे का?
  • प्रश्न क्र. 3 : श्री नरेंद्र लीलामृतात एक व्यक्ती मृत झाल्यानंतर महाराजांनी पुन्हा जिवंत केल्याचा उल्लेख आहे. सदरहू व्यक्ती मृत होती, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासून जाहीर केलं, नंतर नरेंद्र महाराजांनी त्या व्यक्तीला जिवंत केले याबाबतचा कोणताही पुरावा समितीनं वारंवार मागूनही दोन वर्षांत सादर केला गेला नाही. आजही या बैठकीत नरेंद्र महाराजांनी हा पुरावा न दिल्याने त्यांचा हा दावा पूर्णतः खोटा आहे, असं समितीचं मत आहे. यावर ते काय सांगू इच्छितात?
आमने-सामने सवाल-जवाबाची ही घटना 25 सप्टेंबर 1998 रोजी घडली होती.

  • प्रश्न क्र. 4 : नाणीजमधील काही स्त्रियांच्या डोक्यावरचे पूर्ण केस गेले व नरेंद्र महाराजांच्या कृपाप्रसादानं केस येऊ लागले, असं नरेंद्र लीलामृताच्या पाचव्या अध्यायात म्हटलं आहे. याबाबत आम्ही नरेंद्र महाराजांना टक्कल पडलेली पाच माणसं देऊ इच्छितो. त्यांना महाराजांच्या कृपाप्रसादानं वीतभर केस आल्यास समिती महाराजांचं शिष्यत्व पत्करेल; परंतु तसं न झाल्यास महाराजांनी दिशाभूल केल्याबद्दल सर्व लोकांची माफी मागावयास हवी. याबद्दल नरेंद्र महाराजांचं काय म्हणणं आहे?
  • प्रश्न क्र. 5 : सर्पाचं विष चढणार नाही, असा मंत्र नरेंद्र महाराजांकडे आहे, असा अठराव्या अध्यायात उल्लेख आहे. या सामर्थ्याचं जाहीर प्रदर्शन करावं, अशी महाराजांना विनंती आहे. भक्त त्यांनी निवडावेत, समिती विषारी सर्प आणेल. यातून निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामास दंश करून घेणारे भक्त व त्यांना दैवी सामर्थ्यानं वाचवणारे महाराज जबाबदार ठरतील, याची कृपया नोंद घ्यावी. याच बैठकीत भक्तांची नावे द्यावीत व चाचणीची तारीख नक्की करावी. याबाबत नरेंद्र महाराजांचे काय म्हणणं आहे?
  • प्रश्न क्र. 6 : ‘श्री नरेंद्र लीलामृत’ हे पुस्तक महाराज विश्वस्त असलेल्या नरेंद्र महाराज ट्रस्ट, नाणीजतर्फे प्रकाशित केले आहे. आज त्याची सर्वत्र विकी चालू आहे. स्वाभाविकच या पुस्तकातील मजकूर नरेंद्र महाराजांवरच आहे, हे त्यांनी मान्य करावं; अन्यथा हे पुस्तक बाजारातून काढून घ्यावं. तसेच त्यामुळे दिशाभूल झालेल्या व्यक्तींची माफी मागावी व या चमत्कारांवर विश्वास ठेवून नुकसान झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई द्यावी, असे समितीला वाटते. याबद्दल नरेंद्र महाराजांचं मत काय आहे?
  • प्रश्न क्र. 7 : 10 जुलै 1999 या दिवशी जगात महायुद्ध सुरू होणार असून त्या युद्धात महाराजांचे भक्त व महाराज ज्यांना वाचवू इच्छित असतील त्या व्यक्ती सोडून सर्व जण मृत होतील, असं भविष्य ‘नरेंद्रगाथा’ या आपल्या संस्थानतर्फे प्रकाशित होणाऱ्या अंकात म्हटलेलं आहे. या भाकिताबाबत कोणता वैज्ञानिक पुरावा आपण देऊ शकतो, ते नरेंद्र महाराजांनी सांगावं व असं न घडल्यास लोकांची दिशाभूल करून दहशत पसरवली, यासाठी स्वतः कोणती शिक्षा स्वीकारणार ते जाहीर करावं.
सिने अभिनेते निळू फुले आणि  नरेंद्र दाभोलकर. निळू फुले अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात अग्रभागी असायचे.

दाभोलकरांच्या प्रश्नांवर काय देण्यात आली होती उत्तरं?

डॉ. दाभोलकरांनी लिहिलंय की, पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात नरेंद्र महाराजांनी हे कबूल केलं की, मी स्वत:ला कधीही गजानन महाराजांचा अवतार म्हणत नाही. लोकच मला अवतार मानतात. गजानन महाराज संस्थानानं केलेला खुलासा हा त्यांचा वैयक्तिक खुलासा आहे. ‘नरेंद्र लीलामृत’ हे पुस्तक भक्तांना आलेल्या अनुभवांचे आणि भक्तांनी सांगितलेल्या कथांचं संकलन आहे.

पुढच्या प्रश्नास उत्तर देताना आपण एका स्त्रीला फटका मारल्याचं त्यांनी साफ नाकारलं.

तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, संबंधित व्यक्ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलेलंच नव्हतं. गावकरीच म्हणत होते, ‘बहुधा मेली.’ डॉक्टरांनी आशा सोडून दिली. परंतु, संबंधितांचे नातेवाईक आमचे पाय सोडेनात आणि आम्ही म्हणालो, ‘जा, काही होणार नाही.’ गावकरी ज्या व्यक्तीला मृत समजत होते, ती बरी झाली. यामागचा कार्यकारण भाव आम्हाला माहिती नाही.

डॉ. दाभोलकरांनी एकेक प्रश्न विचारणं आणि त्यावर महाराजांनी उत्तर देणं, असे एकूण सात सवाल-जवाब झाले होते.

चौथ्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी पुन्हा कुठल्याच चमत्काराचा आपला दावा नाही, ती भक्ताला आलेली अनुभूती आहे, असं उत्तर दिलं. किंबहुना, महाराजांच्या सर्वच प्रश्नांचं उत्तर चमत्कार करत नसल्याची कबुली होती.

दाभोलकर लिहितात की, “त्याला उघड माघार म्हणायची की, आव्हानातून पळ काढण्याचा प्रयत्न, एवढाच प्रश्न होता.”

पाचव्या प्रश्नाला उत्तर देतानाही, मी आध्यात्मिक मार्गाचा माणूस आहे. इथे लाखो लोक येऊन जातात. कुणाला साप चावतात, कुणाचे उतरतात त्यांची यादी ठेवत नाही व सापाचे विष उतरवण्याचा दावा आपण करत नाही, असं त्यांनी सांगितलं.

‘नरेंद्र लीलामृत’ बाजारातून काढावं की काढू नये, प्रसृत करावं की करू नये, हे लोकच ठरवतील. तुम्ही-आम्ही ठरवणारे कोण ? आपल्याकडे अनेक संतांच्या गाथा त्यांच्या भक्तगणांनी लिहिल्या आहेत. ही त्यांची अनुभूती आहे, असं सहाव्या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र महाराज म्हणाल्याचं डॉ. दाभोलकरांनी लिहिलंय.

शेवटच्या प्रश्नाला उत्तर देताना मात्र 1999 च्या मध्यात तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे, असं मला माझ्या साधनेतून स्पष्ट आध्यात्मिक संकेत मिळाले आहेत, हे महाराजांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते – या भाकितामागे अध्यात्मिक दहशतवाद नाही, तर शांतीसाठीचा प्रयत्न करण्याची भावना आहे.

डॉ. दाभोलकर लिहितात की, ‘सगळ्यात कहर म्हणजे नरेंद्र महाराजांनी असं जाहीर केलं की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आम्हीही करत आहोतच; परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या थोरा-मोठ्यांनी याबाबत त्यांना मार्गदर्शन करावं.’

'चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि त्याला विरोध न करणारे भ्याड असतात,' हे वाक्य डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी उद्धृत करायचे.

डॉ. दाभोलकर लिहितात की, ‘आपल्या टिपणवहीसह ही उत्तरं देण्यासाठी आलेल्या महाराजांचा चेहरा घाबरलेला होता. उत्तर लिहिलेला कागद धरलेला हात थरथरत होता. दात कडकडत होते आणि तो सतत पाणी मागत होता.’

‘चमत्कार आव्हानाचे सवाल-जबाब होऊन आम्ही रत्नागिरीला परतलो. पत्रकार परिषदेसमोर आम्ही चित्रफीत दाखवली. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व दैनिकांनी याबाबत ठळक प्रसिद्धी दिली. नरेंद्र महाराजांचा चमत्काराचा मुद्दा सपशेल पराभूत झाला,’ असंही डॉ. दाभोलकर ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या पुस्तकात लिहितात.

‘राजकारणी बुवा-बाबांच्या चरणी का लागतात याचा शोध घ्यायला हवा’

पत्रकार मुकुंद कुळे यांनी या घटनेच्या काही दिवस आधी नाणीजला जाऊन रिपोर्ताज केला होता. तेव्हा ते चित्रलेखा या साप्ताहिकासाठी काम करायचे.

28 सप्टेंबर 1998 च्या अंकात हा रिपोर्ताज छापून आला होता.

ज्या व्यक्तींची नावे घेऊन नरेंद्र लीलामृत या पुस्तकामध्ये चमत्काराचे किस्से नोंदवण्यात आले आहेत, त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या.

या मुलाखतींमध्ये असा कोणताही चमत्कार आपल्यासोबत घडला नसल्याचं या लोकांनी सांगितल्याचं नमूद आहे.

या रिपोर्ताजमध्ये मुकुंद कुळे लिहितात की, “नरेंद्र महाराजांच्या लीलामृतात देण्यात आलेले दाखले धादांत खोटे आहेत. गुण आलेला नसतानाही महाराजांनी चमत्कार करून रोग बरा केला, असं लिहिण्याचा खोटारडेपणा या पुस्तकात करण्यात आला आहे.”

पुढे त्यांनी लिहिलंय की, “वर उल्लेख केलेल्या माधवीताई लिमये यांचं उदाहरणही या पुस्तकात देण्यात आलंय. त्यांची सोरायसिस नावाची व्याधी महाराजांच्या कृपाप्रसादामुळे बरी झाल्याचं पुस्तकात लिहिलं आहे. जी वास्तविक आजही बरी झालेली नाही. मात्र, खोटारडेपणापेक्षाही त्यांनी चमत्काराची म्हणून दिलेली उदाहरणं चीड आणणारी आहेत. टक्कलावरून हात फिरवताच बाईला केस आले. चमत्काराने कॅन्सरची गाठ बरी केली, मेलेल्याला जिवंत केलं अशा अनेक अविश्वसनीय लीला या ग्रंथात दिलेल्या आहेत. ज्या धांदात खोट्या आहेत. नाणीजपासून जवळच असलेल्या खानू गावातील ठकूबाई मावळंकर यांच्या मानेवर गाठ आली होती. ती महाराजांच्या अंगाऱ्याने बरी झाली, असं लीलामृतात लिहिलंय. वास्तविक ठकूबाईंच्या मानेवरील गाठ मुंबईला सायन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आली.”

पत्रकार मुकुंद कुळे यांनी या घटनेच्या काही दिवस आधी नाणीजला जाऊन रिपोर्ताज केला होता. तेव्हा ते चित्रलेखा या साप्ताहिकासाठी काम करायचे.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे नाणीजला नरेंद्र महाराजाच्या दर्शनास जाण्यालाही दाभोलकरांनी आक्षेप घेतला होता.

त्यांनी जाऊ नये, यासाठी प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयात सतत प्रयत्न केला, जो निष्फळ ठरला, असंही दाभोलकरांनी म्हटलंय.

त्याबाबत त्यांनी लिहिलंय की, ‘महाराष्ट्रातील सर्वांत तरुण संत म्हणून त्यांनी (सुशीलकुमार शिंदे) त्यांचा (नरेंद्र महाराज) उदोउदो केला. त्यांच्यात गाडगेबाबांचा कर्मवाद आणि विवेकानंदांचे चिंतन आढळते, असं जाहीर केलं. नरेंद्र महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं महान कार्य करत आहेत, हे त्यांचे उद्गार तर निराश करणारे ठरावेत.’

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे नाणीजला नरेंद्र महाराजाच्या दर्शनास जाण्यालाही दाभोलकरांनी आक्षेप घेतला होता.

‘महाराष्ट्राच्या सुविद्य मुख्यमंत्र्यांना हे माहीतच नाही, इतके ते अडाणी अथवा गाफील आहेत, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. म्हणूनच हे सर्व राजकारणी बुवा-बाबांच्या चरणी का लागले आहेत, याचा शोध अधिक खोलात जाऊन घ्यावयास हवा,’ असंही दाभोलकरांनी लिहिलंय.

1998 साली ‘नरेंद्र दाभोलकर विरूद्ध नरेंद्र महाराज’ असा आमने-सामने झालेला संघर्ष हा महाराष्ट्रातील बुद्धीप्रामाण्यवादाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा संघर्ष मानला जातो.

21 ऑक्टोबर 2005 रोजी नरेंद्र महाराज यांचा ‘हिंदू जगद्गुरु रामानंदाचार्य’ म्हणून पट्टाभिषेक झाला, अशी माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचार-प्रसाराचं काम करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 साली हत्या झाली.

‘दाभोलकरांनाही मी गुरू मानतो’ – नरेंद्र महाराज

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत आमने-सामने झालेल्या या संघर्षाविषयी नरेंद्र महाराज यांनी 17 ऑक्टोबर 2026 रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील ‘माझा कट्टा’ या चर्चेमध्ये उत्तर दिलं आहे.

त्यांनी म्हटलंय की, “मला जे छळत होते, त्यांना मी सांगितलं की, तुम्ही स्वत: येऊन बघा ना. मलाही अंधश्रद्धा निर्मूलनच करायचं आहे. माझाही तो ध्यास आहे. तुम्ही येऊन पाहा, असं मी त्यांना म्हटलं. पण मला खरं तर तसं करायचं नव्हतं. माझा वापर करून स्वत:ची प्रसिद्धी वाढवणं, आणि काही उकळता आलं तर पाहणं, हा त्यामागे विचार होता. पण मी काही बोललो नाही.”

“एकदा त्यांनी खूपच टीका चालवल्यावर मीच कलेक्टरना म्हटलं की, बदनामी होते आहे, यातून जनप्रक्षोभ होईल. मला यांना भेटायचं आहे. मग ते भेटायला आले. त्यांनी विचारलं की, तुम्ही चमत्कार करता का, मी म्हटलं की माझा चमत्कारावर विश्वास नाही. पण साधुसंतांच्या सहवासामध्ये अनेक प्रकारच्या अनुभूती येतात, यावर माझा विश्वास आहे. ‘ध चा मा’ करून आमची कॅसेट दाखवली जाते की, मी घाबरलो आहे वगैरे. उलट, या टीकेमुळे मला फायदाच झाला,” असं ते सांगतात.

मी माझ्या गुरूंपैकी एक गुरू ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनाही मानतो’, असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलंय की, “दाभोलकर आणि माझा वादविवाद नाही झाला. ते मतभेद होते. मतभेद असले पाहिजेत, त्याप्रकारे त्यांचा माझ्याबद्दल मतभेद होता. त्याप्रकारे त्यांनी निरसन करून घेतलं. पण त्यानंतर दाभोलकरांनी कधीही माझ्यावर टीका नाही केली. त्यांना ज्यावेळी सत्य कळलं, त्यानंतर त्यांनी टीका केली नाही.”

डॉ. दाभोलकरांनी अनेक भोंदू बाबा-बुवांना उघडं पाडलं. देवा-धर्माचं नाव घेऊन शोषण करणाऱ्या बऱ्याच जणांना रंगेहातही पकडलं. काही बाबांशी तर ते आमने-सामने भिडले.

“तेव्हा दाभोलकर बाहेरूनच पेपरबाजी करत होते. मी म्हटलं, असं कशाला? मी त्या व्हीडिओ कॅसेटमध्येही म्हटलंय की, तुम्ही इथे या ना, मलाही अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आहे. मी तुमचा अनुयायी व्हायला तयार आहे. मला श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला काय तो फरक सांगा. मी करतोय ते काय अंधश्रद्धा करतोय, ते सांगा. लोकांना दहा मिनिटं वेळ काढून एकाग्रतेचा व्यायाम करा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, हे जे सांगतोय, त्यामध्ये काय अंधश्रद्धा आहे, ते मला सांगा. मी काय सुधारणा केली पाहिजे, ते सांगा. काय फक्त दाभोलकरांनीच अंधश्रद्धा निर्मूलन केलं पाहिजे का? मी का नको? सेवाभावी वृत्तीनं लोकांची सेवा करायला असंख्य नरेंद्र महाराज या चराचरात तयार झाले पाहिजेत. तसं काम तुम्ही का नाही करत? तर ते बोलले, की तुम्हाला तारीख कळवतो. आजपर्यंत कळवलेली नाहीये,” असाही दावा त्यांनी केला.

“माझा आणि त्यांचा काहीही वादविवाद नाही. माझा त्यांच्याबद्दल व्यक्तिद्वेष नाही. उलट मी त्यांना गुरू मानतो. जर त्यांनी मला असं छळलं नसतं. मोठमोठ्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये माझ्यावर एकेक पान लिहिलं जायचं. तेव्हा मला वाटायचं की, मी फारच मोठा आहे. माझ्यावर टीका करत आहेत तर ते मला स्वच्छ करत आहेत, असं मी समजायचो. ही माझ्यावरची नव्हे तर माझ्या देहावरची टीका आहे. मी विचार करायचो की, काही लोक मला महाराज का मानतात? काहींना मी महाराज दिसतो, तर यांनी लावलेल्या चष्म्यातून मी त्यांना भोंदूबाबा वाटतो. जसा चष्मा तसं दिसतं. त्यामुळे मी स्वत:ला कधीही त्रास करून घेतला नाही,” असंही त्यांनी म्हटलेलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC