Source :- BBC INDIA NEWS
Getty Images
-
वाचन वेळ: 6 मिनिटे
“भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे,” अशी आठवण मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेला करून देण्याची वेळ मुंबई हायकोर्टावर आली आहे.
दिया मिर्झाच्या जनजागृती करणाऱ्या व्हीडिओ प्रकरणावर मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठानं “काही राजकारण्यांनी केलेल्या बेजबाबदार टिप्पणीमुळे आम्हाला धक्का बसला आहे,” अशा शब्दात आज (3 नोव्हेंबर) बीएमसी आणि महापौरांची कान उघडणी केली आहे.
खरं तर, ‘दिया मिर्झाचं नक्की काय चुकलं,’ असा प्रश्न मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नेतृत्वातील बीएमसी प्रशासनाकडून झालेल्या कामकाजावर उपस्थित होत आहे.
अगदी दिया मिर्झानंही ‘माझं नक्की काय चुकलं,’ असाच प्रश्न उपस्थित केला होता.
याचं कारणही अगदी तसंच आहे. कारण, आधी मुंबई महानगरपालिकेनंच न्यायालयाच्या आदेशानुसार, वाढत्या प्रदूषणाविरोधात जनजागृती मोहीम राबवण्यासाठी दिया मिर्झासह काही सेलिब्रिटींना काही दिवसांपूर्वी अधिकृतरित्या नियुक्त केलं.
त्यानंतर मग BMC च्या सोशल मीडिया अकाउंटवर या सेलिब्रिटींचे पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश देणारे व्हीडिओ पोस्ट करण्यात आले.
मात्र, गोंधळ उडाला तो फक्त दिया मिर्झाला या मोहिमेत घेतल्यामुळे…
नक्की काय घडलं आणि बीएमसीच्या कामकाजावर न्यायालयानं ताशेरे का ओढलेत, ते पाहूयात.
नक्की काय घडलं?
खरं तर, दिया मिर्झानं प्रदूषणाविरोधातील जनजागृती करणाऱ्या व्हीडिओत जे म्हटलं ते इतर अनेक सेलिब्रिटींनीही म्हटलं आहे.
‘फटाक्यांचा आवाज टाळूया, आनंद द्विगुणित करूया,’ असं म्हणणारे व्हीडिओ निशिगंधा वाड, माधुरी दीक्षित, अजिंक्य रहाणे, हर्षदा खानविलकर यांनीही केलेत आणि तेदेखील बीएमसीच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.
अगदी सगळ्या व्हीडिओंचा आशयही एकसारखाच आहे.
मात्र, मुंबई शहर भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी फक्त दिया मिर्झाच्या व्हीडिओवर आक्षेप घेतला आणि त्यानंतर बीएमसीकडून दिया मिर्झाचा हा व्हीडिओ हटवण्यातही आला.
Ritu Tawade/Facebook
त्यांनी बीएमसीला उद्देशून ट्विट केलं की, “बीएमसी, आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे दिया मिर्झा यांच्याकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत.”
आता दिया मिर्झाचा व्हीडिओ हटवण्यात आला असला तरी माधुरी दीक्षितसहित इतर सेलिब्रिटींचे व्हीडिओ बीएमसीच्या अकाऊंटवर आहे तसेच आहेत.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “दिया मिर्झा या पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेल्या नाहीत. कायमच त्यांनी त्यांच्या ट्वीट आणि पोस्टच्या माध्यमातून आपल्या हिंदू संस्कृतीला आणि देशविरोधी कारवाया चालतात त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. सिलेक्टिव्ह अजेंडा घेऊन त्या काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला खोडण्याचं कामही त्यांनी केलं आहे. अराजक पसरवण्याचं काम करणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करण्याचं काम दिया मिर्झा यांनी केलं आहे. त्यामुळे दिया मिर्झा यांनी हिंदू सणांच्या बाबतीत आम्हाला शिकवू नये असं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.”
BMC/X
पण, दियाचं नक्की काय चुकलं?
या सगळ्या प्रकारानंतर दियाचं नक्की काय चुकलं, हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
अगदी दियानंही यावर व्यक्त होताना म्हटलं की, “कोई पैसा नही लिया है. भलाई का जमाना ही नहीं रहा.”
‘एएनआय’शी बोलताना दिया मिर्झानं म्हटलंय की, “माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि बीएमसी यांनी जनहितार्थ मला ज्या व्हीडिओमध्ये काम करायला सांगितलं. त्यावर कुणी टीका का करावी? वायू प्रदूषण ही चिंतेची बाब आहे आणि प्रदूषण कमी करण्याच्या सर्व प्रयत्नांचं स्वागतच केलं पाहिजे, कारण हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे.”
X/BMC
अगदी हाच मुद्दा ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापटही मांडताना दिसतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, “राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पूर्वग्रहातून जनहिताच्या मुद्द्याला बगल देणं हे मला तर्कदुष्ट वाटतं.”
ते म्हणतात की, “यातून नुकसान नागरिकांचं होतं. त्या व्यक्तीबाबतच्या तुमच्या पूर्वग्रहातून तुम्ही त्या विधानाला नाकारत आहात. यात असा विरोधाभास निर्माण होतोय की, कोर्टाच्या आदेशानुसार, ज्या पक्षांची सरकारं राज्य आणि केंद्रीय पातळीवरती सत्तेत आहेत, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री-पंतप्रधान अधिकृतरीत्या फटाकेविरोधी आवाहन करत आहेत आणि फक्त अन्य कुणीतरी हे करत असताना, पूर्वग्रहातून त्यांना मात्र विरोध केला जातोय, यातून किती विरोधाभास तयार होतो.”

“आवाहन तेच, विधान तेच, फक्त ते ‘क्ष’ने केलं की ‘य’ने केलं यावरून तुम्ही समर्थन करायचं की विरोध करायचं ते ठरवणार. यात प्रचंड विरोधाभास आहे,” असं मत ते व्यक्त करतात.
‘दुजाभाव निश्चितच धक्कादायक आणि निषेधार्ह’
दिया मिर्झासोबत धर्माच्या आधारावर भेदभाव कसा काय केला जाऊ शकतो, असा प्रश्न काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
ट्विटरवर त्यांनी म्हटलं की, “धर्म कोणताही असो, प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार समान वागणूक मिळालीच पाहिजे. महानगरपालिका ही सर्व मुंबईकरांची व संविधानानुसार अस्तित्वात आलेली आहे. तिथे धर्माच्या आधारावर भेदभावाला अजिबात स्थान असू शकत नाही.
Getty Images
महानगरपालिका आयुक्त या सनदी अधिकारी आहेत. भारतीय संविधानाचे पालन करण्याची त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण कृतीची जबाबदारी निश्चित करून आयुक्तांना पदावरून तात्काळ हटविण्यात आले पाहिजे.”
“दिया मिर्झा हिंदू विरोधी आहे. आम्ही त्यांना ब्लॅकलिस्ट केलंय. व्हीडीओ संदर्भात प्रशासनाला जाब विचारणार,” असं महापौर रितू तावडे यांनी 2 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
रितू तावडे म्हणाल्या होत्या की, “कलाकारांची जी यादी आहे ती आम्हाला प्रशासनानं दाखवली असती तर त्यातलं दिया मिर्झाचं नाव आम्ही हटवलं असतं. प्रशासनाने जर हा विषय घेतला आहे तर तेच आता या प्रकरणी उत्तर देऊ शकतात. 100 टक्के आम्ही दिया मिर्झाला ब्लॅक लिस्ट केलं आहे. यापुढे महायुतीच्या सत्तेत देश विरोधी कारवाया करणारी जी व्यक्ती बोलणार त्यांना आम्ही विरोधच करणार आहोत. मी या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारणार आहे असंही रितू तावडे यांनी म्हटलं आहे.”
‘वातावरण किती सडलेलं आहे, याचं हे उदाहरण’
मात्र, आज (3 नोव्हेंबर) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा यांचा व्हीडिओ क्लिप प्रसारित केल्याबद्दल, भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले की, “काही राजकारण्यांनी केलेल्या बेजबाबदार टिप्पणीमुळे आम्हाला धक्का बसला आहे.” तसेच, त्यांनी आठवण करून दिली की, “भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे.”
न्यायालयाने बीएमसीला तो काढून टाकलेला व्हीडिओ पुन्हा प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या या आदेशांचं स्वागत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे करतात.
बीबीसीशी बोलताना म्हणाले की, “केवळ ती दिया मिर्झा आहे म्हणून तिच्याविरोधात ओरड करणं आणि महापौरांनी तिची रि ओढणं हे फारच गंभीर आहे. रितू तावडे या मुंबईच्या महापौर असून मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मुंबई बहुभाषिक, बहुसांस्कृतिक शहर आहे. अशा शहराच्या प्रथम नागरिक असलेली महिला म्हणते की, ही दिया मिर्झा ‘मुस्लीम आहे, देशविरोधी आहे’ आणि तिचा व्हीडिओ काढून टाकायला सांगितला जातो, हे अत्यंत लाजीरवाणं आहे. आपण किती रसातळाला गेलोय, हे दाखवून देणारं ही गोष्ट आहे,” असंही ते सांगतात.
पुढे ते म्हणाले की, “वातावरण फक्त बिघडलेलं नसून आतून किती सडलेलं आहे, याचं हे उदाहरण आहे. अमित साटम काहीही बोलले असले तरीही महापौरांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती, प्रशासनाबरोबर संवाद करायला पाहिजे होता. प्रशासनाला ही जाब विचारण्याची गोष्ट कशी काय असू शकते,” असाही सवाल ते उपस्थित करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




