Home LATEST NEWS ताजी बातमी पाकिस्तानच्या अणुबॉम्बसाठी पैसा पुरवल्याचा आरोप झालेले बँकर, ‘हे’ आहे मुंबई कनेक्शन

पाकिस्तानच्या अणुबॉम्बसाठी पैसा पुरवल्याचा आरोप झालेले बँकर, ‘हे’ आहे मुंबई कनेक्शन

4
0

Source :- BBC INDIA NEWS

आगा हसन आबिदी

लखनौ विद्यापीठात आगा हसन आबिदी यांचे सर्वात जवळचे मित्र इबादतयार खान होते. साहित्यविश्वात ते इबादत बरेलवी या नावाने ओळखले जात. त्यांनी आपल्या ‘गझलान-ए-राना’ या पुस्तकात आगा हसन आबिदी यांच्याविषयी अत्यंत सुंदर शब्दांत लिहिले आहे.

आगा हसन आबिदी लखनौ विद्यापीठात एकाच वेळी इंग्रजी विषयातून एम.ए. आणि एल.एल.बी.चे शिक्षण घेत होते.

एक दिवस आगा हसन आबिदी यांनी इबादत बरेलवी यांना सांगितलं, “मी ना प्राध्यापक होऊ शकतो, ना वकील. हे दोन्ही व्यवसाय माझ्या स्वभावाला साजेसे नाहीत. त्यापेक्षा महमूदाबाद संस्थानात एखादी छोटी-मोठी नोकरी करावी, असं मला वाटते. तिथे माझे वडील नोकरी करतात.”

इबादत बरेलवी यांनी त्यांना सांगितलं, “इतकं शिक्षण घेतल्यानंतर महमूदाबाद संस्थानात मिळणारी नोकरी तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही. माझ्या मनात एक विचार आहे. हबीब बँक नुकतीच सुरू झाली आहे. ती मुसलमानांची बँक आहे. महमूदाबादचे राजासाहेब हबीब सेठ यांना शिफारसपत्र लिहून देतील, तर तुला या बँकेत अधिकारी म्हणून नोकरी मिळू शकते. पण, त्यासाठी तुला मुंबईला जावं लागेल आणि लखनौ सोडून तिथे राहावं लागेल. याचा विचार कर.”

आगा हसन आबिदी म्हणाले, “मित्रा! तू हे काय बोलतोयस? मी बँकेत नोकरी करायची? तुला माझा स्वभाव चांगलाच माहीत आहे. ही नोकरी माझ्या स्वभावाला अजिबात शोभणारी नाही.”

इबादत बरेलवी म्हणाले, “मियाँ शहजादे! परिस्थिती खूप कठीण आहे. मुस्लिमांसाठी नोकरीच्या संधी जवळजवळ बंद झाल्या आहेत. मला वाटतं, हा एकच मार्ग सध्या खुला आहे. राजासाहेबांना सांगून हबीब सेठ यांना शिफारसपत्र लिहून घ्या आणि शांतपणे मुंबईला निघून जा. या नोकरीत भविष्यात प्रगतीच्या अनेक संधी आहेत.”

इबादत बरेलवी यांचा सल्ला आगा हसन आबिदी यांना फारसा आवडला नव्हता. तरीही ते त्यावर विचार करत राहिले.

इबादत बरेलवी लिहितात, “अखेर त्यांनी माझा सल्ला मान्य केला. ते राजासाहेबांकडे गेले आणि हबीब सेठ यांना शिफारसपत्र देण्याची विनंती केली. राजासाहेब खूप सज्जन होते. त्यांनी आगा हसन आबिदी यांच्यासाठी पत्र लिहून दिले आणि सांगितले, ‘हे पत्र घेऊन मुंबईला जा. ईश्वराची इच्छा असेल, तर तुझं काम नक्की होईल.'”

दुसऱ्या दिवशी आगा हसन आबिदी ते शिफारसपत्र घेऊन इबादत बरेलवी यांच्या घरी आले आणि म्हणाले, “मित्रा! राजासाहेबांनी शिफारसपत्र तर लिहून दिले आहे. पण मला काय करावं हे समजत नाही. मी संभ्रमात आहे. तूच मला काय करावं ते सांग.”

इबादत बरेलवी म्हणाले, “हे पत्र घेऊन लगेच मुंबईला जा. हबीब सेठ यांना भेट, त्यांच्याकडे हे पत्र दे आणि हबीब बँकेत अधिकारी म्हणून नोकरी मिळव.”

आगा हसन आबिदी यांचा इबादत बरेलवी यांच्यावर विश्वास होता. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून ते मुंबईला जाण्यास तयार झाले. हवामान खराब असूनही आठवड्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.

3-4 दिवसांनी इबादत बरेलवी यांना मुंबईहून आगा हसन आबिदी यांचे पत्र मिळाले. त्यात त्यांनी लिहिलं होतं, “राजासाहेबांच्या पत्रामुळे माझं काम खूप सहजरित्या झालं. मला नोकरी मिळाली आहे. इथलं वातावरण चांगलं आहे. मुंबई शहरही खूप सुंदर आहे. आता माझं इथं चांगलंच मन रमलं आहे. सध्या माझे प्रशिक्षण सुरू आहे. 3-4 महिन्यांत ते पूर्ण होईल. त्यानंतर मला हबीब बँकेच्या वेगवेगळ्या शाखांची व्यवस्था पाहण्याचे काम दिले जाईल. यासाठी मला भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागेल.”

इबादत बरेलवी सांगतात की, हे पत्र वाचून त्यांना खूप आनंद झाला.

बँकेच्या कामानिमित्त आगा हसन आबिदी वारंवार दिल्लीला येत-जात असत. त्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. इबादत बरेलवी लाहोरच्या ओरिएंटल कॉलेजमध्ये रुजू झाले. आगा हसन आबिदी पाकिस्तानला गेले आणि हबीब बँकेत त्यांची हळूहळू प्रगती होत गेली.

सेहगल कुटुंबाशी संबंध आणि युनायटेड बँकेची स्थापना

हबीब बँकेत काम करत असताना आगा हसन आबिदी यांनी पाकिस्तानातील उद्योगपतींशी ओळखी वाढवायला सुरुवात केली. यापैकी सेहगल कुटुंबाशी त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले.

1959 मध्ये एका व्यावसायिक व्यवहारासाठी सेहगल कुटुंबाला बँकेची हमी हवी होती. परंतु, हबीब कुटुंब ही हमी देण्यास तयार नव्हते. विशेष म्हणजे, या व्यवहारात आबेदी यांना रस होता.

आगा हसन आबिदी यांनी हबीब कुटुंबाला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा अनपेक्षित परिणाम झाला. त्यांना हबीब बँकेची नोकरी सोडावी लागली.

आगा हसन आबिदी

सेहगल कुटुंबाने आगा हसन आबिदी यांच्या कौशल्याचा उपयोग करून नवीन बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातून 7 नोव्हेंबर 1959 रोजी युनायटेड बँकेची स्थापना झाली. या बँकेसाठी लागणारं भांडवल सेहगल कुटुंबाने दिले, तर बँक सुरू करण्याची संपूर्ण कल्पना आगा हसन आबिदी यांची होती.

युनायटेड बँकेची सुरुवातीची 10 ते 12 वर्षे पाकिस्तानच्या बँकिंग क्षेत्रासाठी सुवर्णकाळ ठरली. कराची, लाहोर, रावळपिंडी, पेशावर आणि क्वेटासह अनेक छोट्या शहरांमध्येही बँकेच्या शाखा सुरू झाल्या.

पश्चिम पाकिस्तानसोबतच पूर्व पाकिस्तानमध्येही युनायटेड बँकेने आपली ओळख निर्माण केली. सेहगल समूहाचा पाठिंबा असल्यामुळे पाकिस्तानातील इतर व्यापारी समूहांचाही या बँकेवरील विश्वास वाढत गेला.

1970 पर्यंत युनायटेड बँकेने संपूर्ण पाकिस्तानात 912 शाखा सुरू केल्या होत्या. त्यापैकी 224 शाखा पूर्व पाकिस्तानमध्ये होत्या. याशिवाय, परदेशातही बँकेच्या 24 शाखा सुरू करण्यात आल्या होत्या.

पूर्व पाकिस्तानमध्ये आगा हसन आबिदी यांना सालेह नकवी यांची साथ मिळाली. त्यांची बदली पश्चिम पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तानमध्ये झाली होती. मात्र, आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी पूर्व पाकिस्तानच्या व्यापारी क्षेत्रातही चांगलं स्थान निर्माण केलं.

कराचीमधील आय. आय. चंद्रिगर रोडवरील या इमारतीत अनेक वर्षे बीसीसीआयचे कार्यालय होते. (डावीकडे) आजही ही इमारत एका खासगी बँकेच्या मालकीची आहे.

जागतिक बँक सुरू करण्याचे स्वप्न

1971 मध्ये ढाक्याचा पाडाव झाल्यानंतर युनायटेड बँकेला पूर्व पाकिस्तानमधील आपला व्यवसाय बंद करावा लागला. त्याआधीच सालेह नकवी पश्चिम पाकिस्तानात परतले होते. आता आगा हसन आबिदी यांनी जगभरात शाखा असलेली बँक सुरू करण्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली होती.

1 जानेवारी 1974 रोजी पाकिस्तान सरकारने देशातील सर्व बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. म्हणजेच सर्व बँका सरकारच्या ताब्यात घेतल्या. तोपर्यंत आगा हसन आबिदी यांनी नवीन बँक सुरू करण्याची तयारी पूर्ण केली होती.

आगा हसन आबिदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे प्रमुख शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या आर्थिक मदतीने त्यांनी बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल (बीसीसीआय) ही आंतरराष्ट्रीय बँक सुरू करण्याचे काम हाती घेतले. या बँकेची नोंदणी लक्झेंबर्गमध्ये करण्यात आली होती.

आगा हसन आबिदी यांचे स्वप्न जागतिक बँकेच्या धर्तीवर मुस्लीम गुंतवणूकदारांच्या मदतीने एक आंतरराष्ट्रीय इस्लामिक बँक सुरू करण्याचे होते. ही बँक अतिशय कमी व्याजदराने कर्ज देऊन आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुस्लीम देशांना सक्षम करेल, अशी त्यांची कल्पना होती. त्यामुळे गरीब, मागास आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या तिसऱ्या जगातील देशांनाही विकसित देशांच्या बरोबरीने प्रगती करता येईल, असं त्यांना वाटत होतं.

शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान यांच्या मदतीने आगा हसन आबिदी यांनी आपल्या बँकेचा विस्तार सुरू ठेवला. काही वर्षांतच बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनलच्या 72 देशांमध्ये 400 हून अधिक शाखा सुरू झाल्या. बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या 16 हजारांवर पोहोचली. जगातील 7व्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक म्हणून तिची ओळख निर्माण झाली.

बीसीसीआय ही केवळ एक बँक नव्हती, तर तिची उद्दिष्टेही मोठी होती. विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या देशांच्या कल्याणासाठी तिने विविध योजनांवर काम करण्यास सुरुवात केली.

आगा हसन आबिदी यांनी सर्वप्रथम शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यांनी कराचीपासून स्वाबीपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. यात कोरंगी अकॅडमी, फास्ट विद्यापीठ आणि गुलाम इशाक खान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

बेघर लोकांसाठी ‘ओरंगी पायलट प्रोजेक्ट’ आणि गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी ‘इन्फाक फाउंडेशन’ अशा संस्था त्यांनी सुरू केल्या. या उपक्रमांमुळे जगभरात त्यांची चर्चा झाली.

बीसीसीआयने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही मदत करण्यास सुरुवात केली. कराचीतील एसआययूटी आणि लेडी डफरिन रुग्णालयाला त्यांनी भरीव देणग्या दिल्या.

कुदरतुल्लाह शहाब यांचे 'शहाबनामा

‘बीसीसीआयच्या प्रगतीमागचं रहस्य’

आगा हसन आबिदी यांची कामगिरी आणि यश एखाद्या दंतकथेसारखे ठरत होतं. परंतु, पाश्चिमात्य देशांकडून त्यांच्या यशाचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्याकडे अधिकतर मत्सराच्या नजरेने पाहिलं जात होतं.

कुदरतुल्लाह शहाब यांनी ‘शहाबनामा’ या पुस्तकात लिहिलं, “ऑक्टोबर 1981 मध्ये लंडनमधील प्रसिद्ध ‘न्यू स्टेट्समन’ या मासिकाचा एक अंक माझ्या पाहण्यात आला. त्याच्या मुखपृष्ठावर आगा हसन आबिदी यांचा मोठा रंगीत फोटो होता. त्या फोटोखाली ‘सरकारे विकत घेणारा बँकर’ असं लिहिलं होतं.”

या मासिकात बीसीसीआयच्या संदर्भात आगा हसन आबिदी यांच्यावर 4 पानांचा लेखही प्रसिद्ध झाला होता. लेखातील प्रत्येक वाक्यात मत्सर, स्पर्धा, भीती आणि द्वेष दिसत होता. याचं कारण असं असावं की, लेखकाच्या मते बीसीसीआय ही अत्यंत वेगाने जगाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करणारी बँक होती.

कुदरतुल्लाह शहाब लिहितात, “बीसीसीआयचा वेगाने होणारा विस्तार ही इंग्लंडमधील बँकांसाठी धोक्याची घंटा होती. कारण या बँका संथ गतीने काम करत होत्या. त्यांची कामकाजाची पद्धतही गुंतागुंतीची होती आणि त्या अनेक प्रशासकीय अडचणींमध्ये अडकल्या होत्या.”

ते पुढे लिहितात, “हा लेख वाचल्यानंतर मला आगा साहेबांना भेटण्याची आणि त्यांच्या यशाचं खरं रहस्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली.”

‘शहाबनामा’ या पुस्तकात त्यांनी आगा हसन आबिदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचं सविस्तर वर्णन केलं आहे.

त्यांच्या मते, बीसीसीआयच्या व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील संबंध इतके चांगले होते की, प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण या संस्थेचा महत्त्वाचा भाग आहोत, असं वाटत होतं.

संस्थेच्या व्यवस्थापनाखाली अनेक कल्याणकारी संस्था चालवल्या जात होत्या. इतकंच नाही, तर प्रत्येक कर्मचाऱ्याला दरवर्षी त्याच्या वार्षिक पगाराच्या 2.5 ते 3.5 टक्के इतकी अतिरिक्त रक्कम दिली जात होती. परंतु, ही रक्कम स्वतःसाठी खर्च न करता इतरांच्या मदतीसाठी आणि कल्याणासाठी वापरण्याची अट होती.

पण, कोणताही कर्मचारी या अटीचं किती पालन करतो, याची चौकशी केली जात नव्हती. हा निर्णय प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सद्सद्विवेकबुद्धीवर आणि विश्वासावर सोपवण्यात आला होता.

संस्थेची प्रगती वेगाने होत होती. तिचा व्यवसाय अवघ्या काही काळात चौपट झाला होता. मात्र, तिची वाढ आणि समाजकल्याणाची कामं आंतरराष्ट्रीय संस्थांना खटकू लागली, त्यांच्या नजरेत येऊ लागली.

‘जगभरात सर्वाधिक शोधला जाणारा माणूस’

1988 मध्ये आजारपणामुळे आगा हसन आबिदी यांनी स्वतःहून बीसीसीआयमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांच्या बँकेवर अनेक गंभीर आरोप झाले.

पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी आणि पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यसैनिकांना पैसे पुरवल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला. तसेच, अनेक देशांचे माजी पंतप्रधान आणि गुन्हेगार यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचाही आरोप झाला.

या आरोपांमुळे आगा हसन आबिदी जगभरात सर्वाधिक ‘वाँटेड’ व्यक्तींपैकी एक बनले.

5 जुलै 1991 रोजी इंग्लंड, लक्झेंबर्ग, केमन बेटे, अमेरिका, फ्रान्स, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये बीसीसीआयची मालमत्ता आणि लाखो बँक खाती गोठवण्यात आली.

अमेरिकेने आगा हसन आबिदी यांना चौकशीसाठी आपल्या ताब्यात देण्याचा पाकिस्तानवर दबाव आणला. परंतु, पाकिस्तानने त्यांना अमेरिकेच्या हवाली करण्यास नकार दिला.

आगा हसन आबिदी यांच्या निवृत्तीनंतर सालेह नक्वी यांनी बीसीसीआयची जबाबदारी सांभाळली. अबुधाबीमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि अमेरिकेत पाठवण्यात आलं. तिथे 1994 मध्ये त्यांना 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तुरुंगातून सुटल्यानंतर ते पाकिस्तानला परतले. तिथे त्यांनी बीसीसीआयच्या समाजकल्याणाच्या कामांची जबाबदारी सांभाळली. त्यांनी बीसीसीआयच्या भरभराटीपासून ते तिच्या पडझडीपर्यंतचा प्रवास सांगणारं एक पुस्तकही लिहिलं. परंतु, हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही.

7 सप्टेंबर 2019 रोजी सालेह नक्वी यांचंही निधन झालं. त्यांच्यासोबतच बीसीसीआयची कहाणीही संपली.

अमेरिकेचे नेते जॉन केरी यांनी बीसीसीआयवरील आरोपांची चौकशी केली होती.

आगा हसन आबिदी यांनी पाकिस्तानसाठी केलेली कामं इतकी मोठी होती की, आधुनिक पाकिस्तानच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव घेता येईल.

आगा हसन आबिदी यांनी आयुष्याचे शेवटचे दिवस कराचीमध्ये घालवले. त्यांना पक्षाघात झाला होता. त्यामुळे त्यांना बोलतानाही खूप त्रास होत होता. 5 ऑगस्ट 1995 रोजी कराचीमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांना अलीबाग कब्रस्तानात दफन करण्यात आलं.

(हा लेख पूर्वी 5 ऑगस्ट 2020 रोजी बीबीसीवर प्रसिद्ध झाला होता. तो आता बीबीसी मराठीवर प्रकाशित केला आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC