Source :- BBC INDIA NEWS

स्नेहा चतुर्वेदी

“सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. सरकारनं लक्ष दिलं असतं, तर ‘नीट’चा पेपर फुटला नसता आणि माझी मुलगी वाचली असती.”

हे शब्द आहेत स्नेहा चतुर्वेदी या 18 वर्षीय तरुणीचे वडील कृष्णकुमार चतुर्वेदी यांचे. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.

स्नेहानं नागपुरातील तिच्या राहत्या घरात 20 मे 2026 रोजी आत्महत्या केली.

3 मे 2026 रोजी झालेली ‘नीट’ची परीक्षा स्नेहानं दिली होती. ही परीक्षा पेपरलीक प्रकरणामुळे रद्द झाली.

स्नेहानं आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत पेपरफुटीचा ताणाचा उल्लेख केलाय.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्नेहा चतुर्वेदीच्या आत्महत्येबाबत ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये स्नेहा चतुर्वेदीचा उल्लेख ‘आकांक्षा’ असा केला आहे. त्यांनी म्हटलंय की, “आकांक्षाचा मृत्यू ही आत्महत्या नाही तर मोदींच्या भ्रष्ट आणि ढिसाळ व्यवस्थेचा बळी आहे.”

स्नेहाच्या आत्महत्येची नोंद तिच्या वडिलांच्या जबाबानंतर नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. मात्र, नागपूरच्या झोन-2 चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या माहितीनुसार, “स्नेहाच्या आत्महत्यापूर्वीची कुठलीही चिठ्ठी सापडली नाही.”

स्नेहाचे आई-वडील काय म्हणाले?

स्नेहा चतुर्वेदी मूळची मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यातील आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यानं तिचे वडील कृष्णकुमार चतुर्वेदी पोट भरण्यासाठी ते 20 वर्षांपूर्वी नागपुरात आले.

ते नागपुरातील अंबाझरी हील टॉप परिसरातील अजय नगर भागात भाड्याच्या घरात राहत होते.

कृष्णकुमार आचारी म्हणून काम करायचे. पण आता त्यांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांनी ते काम देखील सोडलं.

त्यांनी मुलीला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तब्येत ठीक नसतानाही ते मुलीच्या शिक्षणासाठी काम करत होते. त्यांनी नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ची शिकवणी तिला लावून दिली होती.

स्नेहा चतुर्वेदी

स्नेहाच्या आत्महत्येबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना तिचे वडील कृष्णकुमार चतुर्वैदी यांना रडू कोसळलं.

कृष्णकुमार सांगतात, “सुरुवातीला नीटची परीक्षा झाली, ती खूप चांगली गेली होती. मुलगी नीट परीक्षा उत्तीर्ण करून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल अशी सांगत होती. पण नीट परीक्षेतला घोळ समोर आला आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागेल असं तिला समजलं तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं.”

“ती बरोबर जेवायची सुद्धा नाही. कोणासोबत मनमोकळी बोलत सुद्धा नव्हती. मी तिला डॉक्टर बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. कितीही मजुरी करावी लागली तरी चालेल पण माझ्या मुलीचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण करेन असं मी मनात ठरवलं होतं. पण, आता माझी मुलगीच राहिली नाही. तिचं शिक्षणही उरलं नाही आणि तिच्या शिक्षणासाठी माझ्यावर कर्जसुद्धा झालं. मी माझं सगळंच गमावलं. जगायचं कोणत्या भरवशावर? सरकारनं परीक्षा चांगली घेतली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती.”

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

स्नेहाची आई निलम चतुर्वेदी यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना आत्महत्येच्या दिवशी काय घडलं, हे सांगितलं.

20 मे रोजी स्नेहा घरात एकटी होती. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तिची आई आणि लहान भाऊ बाहेर बसले होते. हाक मारूनही स्नेहा दरवाजा उघडत नसल्यानं तिची आई घाबरली. त्यानंतर तिच्या लहान भावाला वर चढून खिडकीतून बघायला सांगितलं, तेव्हा स्नेहानं आत्महत्या केल्याचं लक्षात आलं.

बीबीसी मराठीनं नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात जाऊन, स्नेहा चतुर्वेदीच्या आत्महत्येच्या घटनेबाबत माहिती घेतली असता, तिथं स्नेहाच्या वडिलांच्या जबाबाच्या आधारे आत्महत्येची नोंद झालेली दिसून आली.

“स्नेहा ‘नीट’ची परीक्षा रद्द झाली, तेव्हापासून तणावात होती,” असा जबाब तिच्या वडिलांनी दिला आहे.

स्नेहानं लिहिलेल्या चिठ्ठीत काय आहे?

स्नेहानं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय की, “आई-बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास होता. मी खूप अभ्यास करून डॉक्टर बनेन, अशी तुमची अपेक्षा होती. पण आता माझ्यात पुन्हा एकदा NEET परीक्षा देण्याची हिंमत उरलेली नाही.”

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

स्नेहानं पुढे लिहिलंय की, “पहिल्याच प्रयत्नात मला चांगले गुण मिळत होते. माझ्या मेहनतीचं फळ मिळणार, अशी आशा होती. पण आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे आणि यावेळी तितकीच चांगली कामगिरी करता येईल, याची मला खात्री राहिलेली नाही. आई-बाबा, मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. मी सगळं काही उद्ध्वस्त केलं आहे.”

दरम्यान, स्नेहाच्या आई-वडिलांनी स्नेहानं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचा उल्लेख केलाय, मात्र पोलिसांनी ‘अशी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचं’ म्हटलंय.

राहुल गांधी काय म्हणाले?

स्नेहाच्या मृत्यूबाबत राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत मोदी सरकारला जबाबदार धरले.

राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये स्नेहाचा उल्लेख ‘आकांक्षा’ असा केलाय. मात्र, बीबीसी मराठीने तिच्या कुटुंबाशी संपर्क केल्यानंतर लक्षात आलं की, तिचं नाव ‘स्नेहा’ आहे.

राहुल गांधी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणाले, “आकांक्षाचं स्वप्न डॉक्टर बनून देश आणि समाजाची सेवा करण्याचं होतं. आकांक्षाचे वडील शेतकरी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी शेतकरी बापाने ‘किसान क्रेडिट कार्डवर’ 3 लाखांचं कर्ज घेतलं. तसेच, आकांक्षाला नागपुरात कोचिंग घेता यावं म्हणून त्यांनी स्वतः तिथे स्वयंपाकी म्हणून नोकरीही केली.”

“एका बापाला आपल्या परीने जे काही शक्य होतं, ते सगळं त्यांनी केलं. मात्र त्यानंतर NEET परीक्षेचा पेपरफुटीचा घोटाळा समोर आला. परीक्षा रद्द झाली. आणि भविष्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या आणि मानसिक तणावाच्या काळात आकांक्षा आपल्याला कायमची सोडून गेली.”

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

“आकांक्षाचा मृत्यू ही केवळ आत्महत्या नाही; तो देशातील भ्रष्ट आणि ढिसाळ शिक्षण व्यवस्थेचा बळी आहे. आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान? ते आजही त्यांच्या पदावर आणि खुर्चीवर कायम आहेत. पुन्हा त्याच समित्या, तेच बदलीचे आदेश, त्याच चौकशा, पण ना ठोस सुधारणा, ना जबाबदारीची जाणीव, ना न्याय.”

“मोदीजी, सत्तेच्या खुर्च्या कायमस्वरूपी नसतात. त्या येतात-जातात. पण गेल्या बारा वर्षांत शिक्षण व्यवस्थेची जी अवस्था झाली आहे, त्याची किंमत भारतातील संपूर्ण तरुण पिढी मोजत आहे. त्या किंमतीत अनेक स्वप्नं उद्ध्वस्त होत आहेत, आणि तरुणांचे जीवही जात आहेत.”

महत्त्वाची सूचना :

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.

तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC