Source :- BBC INDIA NEWS
Getty Images
वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकांचा निकाल आज (4 नोव्हेंबर) असून डेमोक्रॅटीक पक्षानं या निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
डेमोक्रॅट्सनी सिनेट आणि हाऊसमध्ये विजय मिळवला असून, डोनाल्ड ट्रम्प यांच्या उर्वरित अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी काँग्रेसवर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं आहे.
निकालावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारांच्या विजयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सला प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ते ‘मिडटर्म’ निवडणुकांचे निकाल पूर्णपणे स्वीकारण्यास तयार आहेत.
त्यांनी विरोधी पक्षासोबत मिळून काम करण्याबद्दलही भाष्य केलं आहे.
“होय, मी हे निकाल स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे,” असं ट्रम्प म्हणाले आहेत.
Getty Images
ते पुढे म्हणाले की, “आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
“आपण एकत्र मिळून कदाचित मार्ग काढू शकतो,” असंही ट्रम्प म्हणाले.
मात्र, काही काळापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया हँडलवर ‘व्हेटो’ हा शब्द लिहिलेल्या टोपीचा एक फोटो शेअर केला होता .
त्यांनी यापूर्वी बीबीसीची अमेरिकेतील वृत्त भागीदार असलेल्या सीबीएसला सांगितलं होतं की, ते आपल्या सर्व अध्यक्षीय अधिकारांचा वापर करतील. यावरून त्यांनी असा संकेत दिला होता की, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हमधील बहुमत गमावल्यानंतरही ट्रम्प निर्णयांवर आपला अधिकार वापरू शकतात.
डेमोक्रॅट्सची आघाडी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. या कार्यकाळाच्या मधल्या 2 वर्षांनी या निवडणुका होतात. त्यामुळे त्यांना मिडटर्म किंवा मध्यावधी निवडणुका म्हटलं जातं.
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या (कनिष्ठ सभागृह) सर्व 435 जागांसाठी, तर सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) 35 जागांसाठी मतदान झालं आहे.
आता या निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, 36 राज्यांमध्ये गव्हर्नर पदासाठी मतदान झालं आहे.
बीबीसीची अमेरिकन वृत्त भागीदार असलेल्या सीबीएसनं अनेक राज्यांमधील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीच्या लढतींचा आपला आढावा प्रसिद्ध केला आहे.
त्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्ष मोठी आघाडी घेत असल्याचे दिसत आहे, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर आहे.
Getty Images
अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्ष हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हमध्ये बहुमत मिळवण्याच्या तयारीत आहे, तर सिनेटच्या निवडणुकादेखील डेमोक्रॅट्सच्या बाजूनं झुकत असल्याचं दिसत आहे.
बीबीसीची अमेरिकेतील वृत्तसंस्था सीबीएसच्या अंदाजानुसार, डेमोक्रॅट्स रिपब्लिकन पक्षाकडून हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हचं नियंत्रण हिसकावून घेऊ शकतात.
435 सदस्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हमध्ये बहुमत मिळवण्यासाठी 218 जागांची आवश्यकता असते.
डेमोक्रॅट्स किमान 218 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहेत, तर रिपब्लिकन किमान 160 जागा जिंकतील, असा अंदाज सीबीएसने वर्तवला होता.
हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्ह हे युनायटेड स्टेट्स काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह आहे. त्याच्या सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो.
सामान्यतः, कायद्याचे प्रस्ताव प्रथम हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हमध्ये सादर करून त्यावर चर्चा केली जाते आणि नंतर ते सिनेटमध्ये पाठवलं जातात.
पक्षाला धक्का बसल्यानंतर ट्रम्प यांनी उमेदवारांना धरलं जबाबदार
रिपब्लिकन पक्षाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिली प्रतिक्रिया दिली.
“मी निवडणुकीच्या मैदानात नव्हतो. जर मी असतो, तर आम्ही प्रचंड मताधिक्यानं जिंकलो असतो,” असं ट्रम्प यांनी लिहिलं आहे.
Getty Images
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुनरुच्चार केला की, ते या निवडणुकीत उमेदवार नव्हते आणि जर ते निवडणुकीच्या रिंगणात असते, तर त्यांच्या पक्षानं मोठ्या फरकाने विजय मिळवला असता.
या संक्षिप्त निवेदनाद्वारे, ट्रम्प यांनी स्वतःच्या पक्षापासून स्वतःला दूर ठेवल्याचं आणि निवडणुकीतील आपल्या पराभवाचं खापर रिपब्लिकन उमेदवारांवर फोडल्याचे दिसून आलं.
अनेक रिपब्लिकन नेते मिडटर्म निवडणुकांबाबतच्या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे आधीच नाराज होते.
प्रतिनिधी सभेतील नियंत्रण गमावण्याची आणि सिनेटमध्येही पराभव होण्याची भीती असताना, ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत मतभेद आणखी वाढू शकतात.
आता रिपब्लिकन नेत्यांसमोर निवडणुकीतील पराभवाच्या परिणामांना सामोरे जाण्याचे आव्हान आहे.
मिडटर्म निवडणुका म्हणजे काय?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. या कार्यकाळाच्या मधल्या 2 वर्षांनी या निवडणुका होतात. त्यामुळे त्यांना मिडटर्म किंवा मध्यावधी निवडणुका म्हटलं जातं.
अमेरिकेच्या संसदेत दोन सभागृहं आहेत. एक म्हणजे प्रतिनिधी सभागृह (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) आणि दुसरे म्हणजे सिनेट.
Getty Images
अमेरिकेच्या संसदेमध्ये देशासाठी म्हणजे संधीय कायदे तयार केले जातात आणि ते मंजूर केले जातात. हे कायदे संपूर्ण देशात लागू होतात.
मिडटर्म निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष की विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष, यापैकी कोणाचे अमेरिकेच्या संसदेमध्ये बहुमत असेल, हे ठरणार आहे.
या निवडणुकीच्या निकालावरून अमेरिकेमधील लोक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आतापर्यंतच्या कामावर किती समाधानी आहेत, याचाही अंदाज लावता येणार आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजबद्दल सांगायचं झाल्यास, या निवडणुकीत या सभागृहाच्या सर्व 435 जागांसाठी मतदान होणार आहे. या सभागृहातील सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. नवीन कायद्यांचे प्रस्ताव सहसा याच सभागृहात मांडले जातात आणि त्यावर चर्चा केली जाते.
हाऊसच्या सध्याच्या स्थितीनुसार, एकूण 435 जागांपैकी 219 जागा रिपब्लिकन पक्षाकडे, तर 214 जागा डेमोक्रॅटिक पक्षाकडे आहेत. दोन जागा सध्या रिक्त आहेत.
सिनेट म्हणजे अमेरिकेच्या संसदेचं वरिष्ठ सभागृह. या सभागृहातील एकूण 100 पैकी 35 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सिनेट सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. प्रतिनिधी सभागृहाने मांडलेल्या कायद्यांच्या प्रस्तावांना सिनेट मंजुरी देतं किंवा ते रोखूही शकतं.
सिनेटच्या एकूण 100 जागांपैकी 53 जागा रिपब्लिकन पक्षाकडे, तर 45 जागा डेमोक्रॅटिक पक्षाकडे आहेत. याशिवाय, 2 अपक्ष सिनेटर्सचा डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




