Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, South Wales Police
आईचा मृतदेह जवळपास तीन वर्षे फ्रीझरमध्ये ठेवला आणि निवृत्तीवेतनासह इतर लाभ घेतले, या गुन्ह्याअंतर्गत मुलाला यूकेमधील एका न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये ब्रिजेंड काउंटी, पोर्थकॉ, पॉपलर क्रिसेंट इथं सिल्व्हिया (89) यांचा मृतदेह पोलिसांना सापडल्यानंतर ख्रिस्तोफर फिलिप्स (60) याला अटक करण्यात आली.
सिल्व्हिया फिलिप्स यांचं मार्च 2023 मध्ये निधन झालं.
ख्रिस्तोफर फिलिप्सनं डॉक्टरांना सांगितलं होतं की, आईच्या मृत्यूनंतर तो “आपल्या आईला सोडून जाऊ इच्छित नव्हता” तसेच त्याला “आईसोबत अधिक वेळ हवा होता.”
फिलिप्सनं तीन गुन्हे कबूल केले. यामध्ये त्याच्या आईला कायदेशीर आणि सन्मानजनक अंत्यसंस्कार न देणं, तसेच गृहनिर्माण लाभ, हिवाळी इंधन भत्ता (Winter Fuel Allowances) आणि निवृत्तीवेतन यांचा दावा करणं इत्यादी गुन्ह्यांचा समावेश होता.
ख्रिस्तोफर दोन वर्षांचा असताना सिल्व्हियानं त्याला दत्तक घेतलं होतं. मर्थर टायडफिल क्राउन कोर्टातील युक्तिवादानुसार, क्रिस्टोफर त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. ती त्याची एकमेव पालक देखील होती. शिवाय, त्याच्याशिवाय दुसरं कुणीही तिची काळजी घेणारं नव्हतं.
फ्रीझरमध्ये तीन वर्षे ठेवला मृतदेह
न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस्तोफरनं आपल्या आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी तिला आपल्या मिठीत घेतलं होतं आणि सांगितलं होतं की तो तिची काळजी घेईल.
तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी, फिलिप्सनं AO.com वरून एक चेस्ट फ्रीझर विकत घेतला आणि त्यानं तो जेवणाच्या खोलीत ठेवला. मृत आईच्या जनरल प्रॅक्टिशनरनं केलेल्या विनंतीवरून पोलीस घरामध्ये तपासासाठी येईपर्यंत हा मृतदेह तिथेच राहिला
न्यायालयाला सांगण्यात आलं की, स्थानिक डॉक्टरांनी तिच्याशी संपर्क साधण्याचे वारंवार प्रयत्न केले होते. परंतु, ख्रिस्तोफरनं त्यांना घरात येऊ दिलं नाही तसेच त्यांना संपर्क साधू दिला नाही.

जेव्हा पोलीस घरी गेले, तेव्हा ख्रिस्तोफरनं सांगितलं की त्याची आई लंडनला राहायला गेली आहे आणि तिला वैद्यकीय चाचण्या करून घ्यायच्या नाहीत.
फिलिप्स थरथरताना आणि अस्वस्थपणे हालचाल करताना दिसल्यानंतर अधिकाऱ्यांना संशय आला, असं न्यायालयात सांगण्यात आलं.
या संशयानंतर तो वरच्या मजल्यावर पळत गेला आणि नंतर तो त्याच्या प्रेयसीशी फोनवर बोलताना ऐकू आला.
तो असं म्हणत होता की, “पोलीस मला अटक करणार आहेत, तुझ्याकडे मृत्युपत्र देण्यात आलं आहे.”
अधिकाऱ्यांनी फ्रीझर उघडला असता त्यांना त्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला.
तिचा मृतदेह पूर्णपणे गोठलेला असल्यामुळे शवविच्छेदन करण्यास थोडा वेळ लागला. शवविच्छेदकाला मृत्यूचे नेमकं कारण निश्चित करता आले नाही. मात्र, हा मृत्यू संशयास्पद मानला गेला नाही.
न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ख्रिस्तोफर त्याच्या आईच्या मृतदेहाशेजारी झोपायला खाली गेला.
कधीकधी तो फ्रीझर उघडून तिचा हात धरत असे.
डॉक्टरांना आला संशय
सिल्व्हियाने 2021 मध्ये तिच्या स्थानिक डॉक्टरकडे 26 वेळा आणि 2022 मध्ये सहा वेळा भेटी दिल्या. तेव्हापासून तिचा डॉक्टरांशी कोणताही संपर्क झालेला नाही.
न्यायालयात असं सांगण्यात आलं की, तिला शेवटचे 24 सप्टेंबर 2022 रोजी अपघात आणि आपत्कालीन विभागात पाहण्यात आलं होतं आणि तिच्या स्थानिक जनरल प्रॅक्टीशनरनं 26 सप्टेंबर रोजी घरी भेट दिली होती.
फोटो स्रोत, Getty Images
पण, तिचा मुलगा तिच्या औषधांची चिठ्ठी त्यानंतरही वेळच्या वेळी घेत राहिला.
सिल्व्हिया फिलिप्स यांना दवाखान्यातर्फे तपासणीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु, त्यांच्या मुलानं सांगितलं होतं की ती दवाखान्यात येणार नाहीत आणि तिला रक्त तपासणीची गरज नाही.
ख्रिस्तोफर फिलिप्सला राज्य निवृत्तीवेतन, निवृत्तीवेतन क्रेडिट, उपस्थिती भत्ता, हिवाळी इंधन भत्ता, महागाई भत्ता आणि गृहनिर्माण लाभापोटी एकूण £78,190.92 (भारतीय चलनात 1 कोटी 1 लाख 2 हजार 790 रुपये) मिळाले. जर तिला मृत घोषित केलं असतं, तर हे भत्ते थांबले असते.
2008 पासून ख्रिस्तोफर हा तिच्या आयुष्यातील काळजी घेणारा मुख्य व्यक्ती होता. सिल्व्हियाची प्रकृती सतत खालावत गेल्यानं त्यानं 2022 च्या अखेरीस आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. ते दोघे जवळजवळ एकटेच राहत होते, असं न्यायालयाला सांगण्यात आलं.
‘आईचा मृत्यू स्वीकारता आला नाही’
बचाव पक्षाच्या वकील रुथ स्मिथ म्हणाल्या की, फिलिप्सनं पोलिसांना सांगितलं होतं की, “मला तिला मुळात जाऊ द्यायचंच नव्हतं.”
“तो तिच्याशी असा बोलायचा, जणू ती अजूनही जिवंत आहे. तो तिच्या शेजारी बसायचा आणि टीव्ही शो, ‘कॉरोनेशन स्ट्रीट’, घोड्यांच्या शर्यतींबद्दल बोलायचा. तो तिच्याशी तसाच बोलायचा जसा तो पूर्वी नेहमी बोलायचा,” असं रूथ स्मिथ म्हणाल्या.
ख्रिस्तोफर एक “अतिसंवेदनशील व्यक्ती” होता, असंही त्या म्हणाल्या.
जेव्हा स्मिथ म्हणाल्या की ख्रिस्तोफर “आपल्या आईच्या अत्यंत जवळ होता” आणि तिच्या मृत्यूनंतर तो “अत्यंत दुःखात” होता, तेव्हा फिलिप्स आरोपीच्या पिंजऱ्यात ढसाढसा रडला.
त्यांनी सांगितलं की, ख्रिस्तोफरनं आईचं निधन झालं आहे, हे स्वीकारलंच नाही आणि “ती अजूनही जिवंतच आहे असं एक खोटं चित्रच त्यानं जवळजवळ रचलं होतं.”
न्यायालयानं काय म्हटलं?
सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायाधीश लॉईड-क्लार्क यांनी ख्रिस्तोफरला 28 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
त्यापैकी 40 टक्के शिक्षा तुरुंगात आणि उर्वरित शिक्षा परवान्यावर भोगावी लागेल. न्यायाधीश लॉईड-क्लार्क म्हणाले की, त्यानं आपल्या आईचा मृत्यू “जाणूनबुजून लपवला” आणि “ती अजूनही जिवंत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले”.
फोटो स्रोत, Getty Images
“तुम्ही तिची औषधांची चिठ्ठी घेणं सुरूच ठेवलं आणि वैद्यकीय व्यावसायिकांशी व अखेरीस पोलिसांशी खोटे बोललात,” असंही लॉईड-क्लार्क पुढे म्हणाले.
“अधिकाऱ्यांना कळवून तिच्या कायदेशीर दफनविधीची व्यवस्था करण्याऐवजी, तुम्ही 10 मार्च रोजी एक चेस्ट फ्रीझर विकत घेतला आणि तिचा मृतदेह त्यात लपवला,” असंही न्यायाधीशांनी म्हटलं.
लॉयड-क्लार्क यांनी पुढे सांगितलं की, जप्तीच्या कार्यवाहीसाठीची कालमर्यादा नंतर ठरवली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




