Home LATEST NEWS ताजी बातमी मुंबईत मांजरींच्या हत्यांची मालिका? आरोपीला अटक आणि जामिनावर सुटका, नेमकं प्रकरण काय?

मुंबईत मांजरींच्या हत्यांची मालिका? आरोपीला अटक आणि जामिनावर सुटका, नेमकं प्रकरण काय?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मांजर

फोटो स्रोत, Getty Images

(महत्त्वाचे: या बातमीत मांजरींच्या मृत्यूचा उल्लेख आहे.)

मुंबईतील चेंबूर परिसरात काही भटक्या मांजरी आणि तिच्या पिल्लांची निर्घृणपणे हत्या केली जात असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर या प्रकरणी एका 40 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला जामीन मिळाला आहे.

चेंबूरच्या पांजरपोळ परिसरात शनी मंदिराजवळ भटक्या मांजरी आणि त्यांची पिल्लं अशा जवळपास 20 मांजरी मृतावस्थेत आढळल्या असल्याची रुबीना पठाण यांची तक्रार आहे.

चेंबूरच्या आरसीएएफ पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबईतील चेंबूर याठिकाणी ऑगस्ट या महिन्यात सलग काही दिवसांच्या अंतरात मांजरी आणि त्यांच्या पिल्लांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं होतं.

7 सप्टेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 325 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 च्या कलम 11 अन्वये गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणी एका 40 वर्षीय इसमाला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या रुबीना पठाण चेंबूर पांजरपोळ या परिसरात राहतात. रूबीना पठाण यांच्याकडे 12 मांजरी असून त्या त्यांची देखभाल करतात. तसंच परिसरातील मांजरींनाही त्या खाऊ घालतात असं त्या सांगतात.

क्रॉफर्ड मार्केट बसलेली मांजर

फोटो स्रोत, Getty Images

53 वर्षीय रुबीना पठाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी चार मांजरींना मृत अवस्थेत पाहिलं. त्यापूर्वीही परिसरातल्या मांजरी गायब होत होत्या पण मला वाटायचं की कोणी आजारपणामुळे गेलं असेल तर कोणी घेऊन गेलं असेल. पण नंतर सातत्याने मांजरींचा मृत्यू होऊ लागला. साधारण 20 मांजरींचा मृत्यू झाला आहे.”

“हा आरोपी इथेच पुलाखाली राहतो. त्याला पोलिसांनी पकडलं पण आता कोर्टाने सोडून दिलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तिथेच राहणाऱ्या आरोपीला याला अटक केली. यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीला जामीन मिळाला असून यापुढे प्रकरणाची चार्जशीट दाखल केली जाईल. दोन मांजरींचा मृतदेह मिळाल्याची माहिती आहे. पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवला आहे.”

तपासादरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मांजरांची हत्या करणाऱ्याचा संशय असलेल्या व्यक्तीला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक सखोल तपास करण्यासाठी व तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यासाठी त्यास आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

पेटा संस्थेकडून दखल

पेटा (PETA) संस्थेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपीला पकडण्यासाठी आणि दोष सिद्ध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्याला संस्थेकडून 50 हजार रुपयांपर्यंतचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

पेटा इंडियाच्या कायदेशीर सल्लागार आणि क्रूएल्टी रिसपॉन्सच्या संचालक मीत अशर यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “चेंबूरच्या पांजरपोळ परिसरात भटक्या मांजरांवर झालेल्या क्रूरतेच्या घटनांनी आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 20 मांजरे मृतावस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी अनेकांच्या शरीरावर गंभीर जखमा आणि जाणीवपूर्वक केलेल्या हिंसाचाराच्या खुणा होत्या, तर काही मांजरे अद्याप बेपत्ता आहेत. हल्लीच काही दिवसांच्या अंतरावर काही मांजरींचे विद्रूप मृतदेह आढळल्यानंतर त्यांना खाद्य देणाऱ्या तक्रारदाराने पेटा इंडिया आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

“या घटनांमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार दिसून येतोय तो धक्कादायक आहे. प्राण्यांवर केलेली क्रूरता हा केवळ गुन्हा नसून त्याकडे हिंसक वर्तन म्हणूनही पाहिले जाते. संशोधनानुसार, प्राण्यांवर क्रूरता करणाऱ्या व्यक्तींकडून माणसांविरोधातही हिंसाचार केला जाण्याची शक्यता तीन पटीने अधिक असते.

“या प्रकरणाची दखल घेऊन एफआयआर दाखल केल्याबद्दल आम्ही मुंबई पोलिसांचे, विशेषतः आरसीएफ पोलीस ठाण्याचे कौतुक करतो. तपासाला मदत करण्यासाठी आणि या कृत्यांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्या आणि दोषी सिद्ध करण्यासाठीही तपासाला सहकार्य करण्यासाठी पेटा इंडियाकडून 50 हजार रुपयांपर्यंतचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते,” असं या निवेदनात म्हटलं आहे.

पेटा इंडिया लोगो

फोटो स्रोत, Facebook/Peta India

या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 325 नुसार, कोणत्याही प्राण्याची हत्या करणे हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी कमाल पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची, दंडाची किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. हा जामीनपात्र गुन्हा आहे.

“भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 325 नुसार कोणत्याही प्राण्याची हत्या करणं हा दखलपात्र गुन्हा असून यात पाच वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षांची तरतूद आहे. हा जामीनपात्र गुन्हा आहे. तरीही जामीन मिळणं म्हणजे ही केस संपली असं नाही. गुन्हा नोंद केल्याच्या आधारावर, गोळा केलेले पुरीवे आणि पोलीस तपास याच्या आधारे न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर खटला चालवला जाईल. यात आरोपी दोषी आढळल्यास त्याला पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.”

“आरोपीला अटक करताना त्याच्याकडे कथितरित्या प्रतिबंधित अमली पदार्थ, म्हणजेच गांजा आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याकडे प्रतिबंधित अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यातील संबंधित कलमेही लागू करावीत,” अशी मागणी पेटा (PETA India)ने ईस्ट झोन-1 चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्याकडे केल्याचं सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC