Home LATEST NEWS ताजी बातमी आईच्या अनेक पती, प्रियकरांकडून लैंगिक अत्याचार; त्याच महिलेला यामुळे होत आहे फाशी

आईच्या अनेक पती, प्रियकरांकडून लैंगिक अत्याचार; त्याच महिलेला यामुळे होत आहे फाशी

5
0

Source :- BBC INDIA NEWS

क्रिस्टा पाइकच्या वकिलांनी 30 सप्टेंबरला होणारी फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका दाखल केली आहे.

अ‍ॅश्ली सेलर्सचं तिची मैत्रीण क्रिस्टा पाइकशी शेवटचं बोलणं नुकतंच झालं. फाशीच्या शिक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या पाइकने तुरुंगातील कोठडीतून सेलर्सला मेसेज केला होता.

अमेरिकेतील टेनेसी राज्यात तिला प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तयारी सुरू आहे.

बुधवारी (30 सप्टेंबर) तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असताना आपल्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीने तिथे उपस्थित राहू नये, अशी इच्छा पाइकने सेलर्सकडे व्यक्त केली.

“आम्ही हे पाहू नये, असे तिला वाटते,” असं सेलर्सने नमूद केलं.

दयाळू, काळजी घेणारी महिला आणि 31 वर्षांपूर्वी भयंकर गुन्हा करणारी व्यक्ती यांच्यातील संबंध समजून घेणे सेलर्सला नेहमी कठीण जाते.

आता 50 वर्षांची झालेली पाइक 18 वर्षांची असताना तिने तिचा तत्कालीन प्रियकर टॅडारिल शिप याच्यासोबत मिळून कोलीन स्लेमर हिची छळ करून हत्या केली होती. तेव्हा कोलीन 19 वर्षांची होती.

विशिष्ट समस्या असलेल्या (त्रासदायक वर्तन असलेल्या) किशोरवयीन मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार प्रशिक्षण शिबिरात त्यांची भेट झाली होती.

1995 मध्ये टेनेसीतील नॉक्सव्हिलमध्ये या हत्येची माध्यमांमध्ये मोठी चर्चा होती. कोलीनचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या छातीवर पेंटाग्रामचे चिन्ह कोरलेले होते. हे चिन्ह सैतानी विधींशी संबंधित मानले जाते.

कोलीनने आपला अपमान केल्याचा आणि आपल्या प्रियकराला पळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाइकने तिच्यावर केला होता.

कॅम्पमधील इतर दोघांनी नंतर साक्ष देताना सांगितले की, पाइकने खुनापूर्वी आणि खुनानंतर त्याबद्दल बढाई मारली होती. तिने त्यांना कोलीनच्या कवटीचा एक तुकडाही दाखवला होता.

एका वर्षानंतर पाइकला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी 17 वर्षीय शिपला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या जन्मठेपेत पॅरोलची शक्यताही आहे.

वर्षानुवर्षे केलेले अपिलांनंतर आता पाइकच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. फाशी झाली तर अमेरिकेच्या टेनेसी राज्यात 200 वर्षांहून अधिक काळानंतर फाशी दिली जाणारी ती पहिली महिला ठरेल.

1970 च्या दशकापासून अमेरिकेत 1,663 पुरुषांना फाशी देण्यात आली आहे. त्या तुलनेत केवळ 18 महिलांना फाशी देण्यात आली आहे.

कोलीनच्या आईने पाइकला फाशी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या शिक्षेमुळे माझ्या मुलीला ‘अखेर शांती मिळेल’, असं त्यांनी म्हटलं आहे.

1995 मध्ये झालेल्या खूनप्रकरणात विद्यार्थिनी कोलीन स्लेमरचा छळ करून निर्घृणपणे खून करण्यात आला.

मात्र, पाइकच्या वकिलांनी 226 पानी दया याचिका दाखल केली आहे. शेवटच्या क्षणी तिची फाशीची शिक्षा कमी होईल, अशी त्यांना अजूनही आशा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ज्ञांनीही फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.

पाइकवर बालपणी लैंगिक अत्याचार झाले होते. तिला सोडून देण्यात आले होते आणि तिच्याकडे दुर्लक्षही करण्यात आले होते, याची नोंद उपलब्ध आहे.

तिच्यावर किशोरवयात हाच गुन्हा दाखल झाला असता आणि आजच्या काळात तिच्यावर खटला चालला असता, तर तिला फाशीची शिक्षा झाली नसती, असे तिच्या वकिलांचे मत आहे.

कल्पनेपलीकडचा इतिहास

तिला शिक्षा सुनावल्यानंतरच्या काळात तिच्या वकिलांनी तिच्या बालपणाशी संबंधित काही माहिती समोर आणली. ही माहिती ज्युरीसमोर मांडण्याची संधी मिळाली नव्हती, असं ते सांगतात.

“तिच्यावर झालेले अत्याचार आणि बलात्कार यांचा कोणताही इतिहास त्यांनी न्यायालयासमोर मांडला नाही, हे समजून घेणं कठीण आहे. त्यांना त्याबद्दल माहिती होती,” असं कॉर्नेल लॉ स्कूलमधील ‘लिंगभाव आणि फाशीची शिक्षा’ या विषयातील तज्ज्ञ सँड्रा बॅबकॉक म्हणतात. त्यांनी पाइकच्या बचावासाठी काम केले आहे.

“तिचे प्रकरण अनेक कारणांमुळे अत्यंत महत्त्वाचे आहे. लैंगिक हिंसाचाराचा तिचा कल्पनेपलीकडचा इतिहास, त्यासोबत तिचे कमी वय आणि मानसिक आजार, या सगळ्यांचा एकत्रित विचार करावा लागतो,” असं त्यांचं म्हणणं आहे.

1995 मध्ये पाइकच्या वकिलांनी फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ डॉ. डायना मॅककॉय यांची मदत घेतली. मॅककॉय यांच्या रिपोर्टनुसार, पाइकच्या दोन्ही पालकांनी तिच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले होते.

मॅककॉय यांच्या अहवालात म्हटले होते की, पाइकच्या आईच्या अनेक पती आणि प्रियकरांनी तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले होते. तिच्यावर अनेक वेळा बलात्कारही झाला होता. एकदा ती 11 वर्षांची असताना आणि पुन्हा 17 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला.

नंतर असं समोर आलं की, लहानपणी तिच्या आजीच्या प्रियकरानं तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. हे बलात्कार झाल्याचं पाइकनं सांगितले होतं, पण तिच्या आईनं तिच्यावर विश्वास ठेवला नाही, असं मॅककॉय यांनी नमूद केलं.

क्रिस्टा पाइककडे तिच्या पालकांनी दुर्लक्ष केले आणि तिच्यावर अत्याचार झाले.

मात्र, पाइकच्या खटल्यातील वकिलांनी मॅककॉय यांना साक्षीसाठी बोलावले नाही. त्यांनी शिफारस केलेल्या अनेक साक्षीदारांनाही न्यायालयात बोलावले नाही.

10 वर्षांहून अधिक काळानंतर तिच्या प्रकरणाचा आढावा घेणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत हे तपशील समोर आले. नव्या वकिलांच्या पथकाने पाइकच्या बचावासाठी प्रभावीपणे काम करण्यात आधीचे वकील अपयशी ठरल्याचा दावा केला. मात्र, न्यायाधीशांनी हा दावा फेटाळला.

2021 मध्ये तुरुंगात असताना पाइकला बायपोलर डिसऑर्डर असल्याचे निदान झाले. तेव्हापासून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

नंतर पाइकच्या बचावासाठी काम करणाऱ्या आणखी एका फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ डॉ. बेथनी ब्रँड यांनी 2023 मध्ये तिचे परीक्षण केले. पाइकचे प्रकरण अत्यंत दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले. कारण ज्या अनेक व्यक्तींनी तिचे संरक्षण करायला हवे होते, त्यांच्याकडूनच तिच्यावर अत्याचार झाले होते.

“तिचे बालपण शारीरिक, लैंगिक आणि भावनिक अत्याचारांनी भरलेले होते. शाळेत जाण्याच्या वयापूर्वीपासूनच अनेक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले,” असे त्या म्हणतात.

क्रिस्टा पाइकच्या वकिलांनी 30 सप्टेंबरला होणारी फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका दाखल केली आहे.

ब्रँड यांच्या मते, बायपोलर डिसऑर्डरमुळे पाइकला उपचार न झालेल्या मॅनिक एपिसोडचा सामना करावा लागला. तिच्यावर पीटीएसडी म्हणजेच आघातानंतरच्या मानसिक तणावाच्या विकारावरही उपचार झाले नव्हते.

“या दोन्ही गोष्टींमुळे ज्या मुलीचा तिने खून केला तिच्यापासून तिला धोका वाटण्याच्या तीव्रतेवर आणि त्या परिस्थितीत तिच्यावर भावनिक नियंत्रणावर निश्चितच परिणाम झाला.”

बॅबकॉक पुढे म्हणतात, “तिला मृत्यूदंड दिला तर या देशातील मृत्यूदंडाची शिक्षा ही केवळ एक विनोद असल्याचेच त्यातून दिसेल. ही शिक्षा सर्वाधिक गंभीर गुन्हे करणाऱ्यांसाठी नाही. ज्यांना सर्वात कमकुवत कायदेशीर मदत मिळते आणि जे सर्वाधिक नुकसान झालेले व असुरक्षित असतात, त्यांच्यासाठी ती वापरली जाते.”

‘तिला या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी’

पाइकने तिची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्यासाठी आवश्यक परिस्थिती असल्याचे सिद्ध केले नाही, असं गेल्या वर्षी टेनेसीच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तिच्या अपीलची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि तिच्या मृत्यूदंडाची तारीख निश्चित करण्यात आली.

याआधी एका फेडरल अपील न्यायालयाने म्हटले होते की, तिच्या आई, वडील आणि मावशी यांनी खटल्यादरम्यान दिलेल्या साक्षीतून ज्युरीला तिच्या कठीण बालपणाची माहिती आधीच मिळाली होती.

बायपोलर डिसऑर्डर, पीटीएसडी आणि मेंदूला झालेल्या नुकसानाबाबतचे नवे पुरावेही ज्युरीसमोर मांडलेल्या माहितीची ‘मोठ्या प्रमाणात पुनरावृत्ती’ होते आणि त्यामुळे निकाल बदलला गेला नसता, असे न्यायालयाने म्हटले.

या प्रकरणाची तुलना काही बाबतीत हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या लिसा मॉन्टगोमेरीच्या गाजलेल्या प्रकरणाशी केली जाते. तिच्या वकिलांनीही ती मानसिक आजाराने त्रस्त आणि अत्याचाराची बळी असल्याने तिला दया दाखवावी, असा युक्तिवाद केला होता.

किशोरवयातील पाइकने जानेवारी 1995 मध्ये स्लेमरचा खून केला. न्यायालयीन कागदपत्रांनुसार खुनाच्या आधी तिने एका मैत्रिणीला

मॉन्टगोमेरीची शिक्षा कमी करण्यासाठी करण्यात आलेले कायदेशीर प्रयत्न अयशस्वी ठरले आणि 2021 मध्ये इंडियाना राज्यात प्राणघातक इंजेक्शन देऊन तिला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.

टेनेसीचे गव्हर्नर बिल ली यांनी पाइकला दया दाखवून तिची शिक्षा कमी केली नाही, तर 30 सप्टेंबरला तिला मृत्यूदंड देण्यात येईल. हा निर्णय शेवटच्या क्षणीच होण्याची शक्यता आहे. ली यांनी यापूर्वी मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या कोणत्याही प्रकरणात दया दाखवलेली नाही.

या आठवड्यात टेनेसीच्या सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा थांबवण्याची पाइकची मागणी फेटाळली. पुढील कायदेशीर पावले कोणती असतील, याबाबत तिचे वकील चर्चा करत आहेत.

मृत्यूदंडाच्या दिवशी पाइकने महिलांचे पथक असावे, अशी मागणी केली आहे. पुरुषांच्या एका गटाने तिला पकडून ठेवणे तिच्या मानसिक आघातात भर घालेल, असे तिचे म्हणणे आहे.

टेनेसी प्रशासनाने तुरुंगात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी पाइकला महिला रक्षक घेऊन जातील, असे सांगितले आहे. मात्र, त्याची हमी देण्यात आलेली नाही.

कोलीनची आई मे मार्टिनेझ यांनी पाइकच्या मृत्यूदंडाचे समर्थन केले.

“तिने गुन्हा केला आहे. मला वाटते, तिने त्याची शिक्षा भोगायला हवी,” असे त्यांनी 2021 मध्ये नॉक्सव्हिलमधील ‘डब्ल्यूबीआयआर’ या टीव्हीला सांगितले होते. या आठवड्यात बीबीसीशी बोलताना तिने या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले.

पाइकला मृत्यूपूर्वी त्रास सहन करावा लागायला हवा, असे मार्टिनेझ यांनी ‘डब्ल्यूबीआयआर’ला सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या, “कोलीनने जितका त्रास सहन केला, तितकाच त्रास पाइकलाही सहन करावा लागला, तर मला बरे वाटेल.”

परस्परविरोधी भावना

“माझे मन दररोज तुटते. कारण मी ते पुन्हा पुन्हा आठवत राहते. आता मला ते सहन होत नाही. माझा मृत्यू होण्यापूर्वी हे घडावे अशी माझी इच्छा आहे,” असेही त्या म्हणाल्या.

“असा एकही दिवस जात नाही, जेव्हा मी कोलीनचा किंवा तिचा मृत्यू कसा झाला, तिच्यावर किती भयानक प्रसंग ओढवला, याचा विचार करत नाही. क्रिस्टा पाइकला फाशी द्यावी म्हणजे हा अध्याय मला संपवता येईल आणि माझ्या मुलीला दिलासा मिळेल. तिला अखेर शांती मिळेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘द जस्टिस कोअलिशन’ या पीडितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मार्टिनेझ यांना फाशी पाहण्यासाठी टेनेसी राज्यात जाता यावे यासाठी निधी उभारला आहे.

या संस्थेचे कार्यकारी संचालक रॉबर्ट ब्रेसेवेल म्हणाले की, पाइकच्या समवयस्कांच्या ज्युरीने ही शिक्षा ठरवली होती आणि कोलीनच्या कुटुंबाचीही हीच इच्छा आहे.

“30 सप्टेंबरला तिची फाशी झाली पाहिजे, या भूमिकेवर आम्ही कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

अ‍ॅश्ली सेलर्ससमोर परस्परविरोधी 2 भावना आहेत. कोलीनच्या आईला न्याय मिळाल्याची भावना बाळगण्याचा अधिकार आहे, असे तिला वाटते. त्याच वेळी तिची मैत्रीण क्रिस्टा पाइकसह प्रत्येकालाच स्वतःमध्ये बदल घडवून नवी सुरुवात करण्याची संधी मिळायला हवी, असेही तिला वाटते.

कोलीन स्लेमरची आई मे मार्टिनेझ आणि नॉक्सव्हिल पोलीस विभागातील निवृत्त गुप्तहेर 2006 मध्ये दोष सिद्ध झाल्यानंतरच्या सुनावणीसाठी न्यायालयाबाहेर.

“टीव्हीवर दिसणारी व्यक्ती किंवा कोलीनसोबत घडलेली भयंकर घटना आणि या सगळ्याचा मेळ घालण्याचा मी विचार करते, तेव्हा मला याचे उत्तर मानसिक आरोग्य आणि मानसिक आघातामध्ये दिसते. ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीकडे आवश्यक गोष्टी नसतात, त्या क्षणी ती परिस्थिती कशी हाताळते, हेही महत्त्वाचे असते,” असं सेलर्स म्हणते.

“तुमच्या तरुण वयात या भयंकर गोष्टी घडतात. त्यानंतर ते आघात तुमच्यासोबत पुढे येतात, आपल्या समुदायातूनही ते पुढे येतात आणि त्यातून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचवू शकता,” असं मत ती व्यक्त करते.

सेलर्स एका दरोडा आणि खूनप्रकरणात सहभागी असल्यामुळे तुरुंगात 25 वर्षांची शिक्षा भोगत होती. तेव्हा तिची तुरुंगात पाइकशी भेट झाली. तेव्हा कडेकोट सुरक्षा असलेल्या या तुरुंगात दोघी आपआपल्या कोठड्यांच्या दरवाजांवरील जेवण देण्यासाठी असलेल्या छोट्या झडपांमधून एकमेकींशी बोलत असत. आता सेलर्स न्यायव्यवस्थेतील सुधारणांसाठी आणि गुन्ह्यांच्या पीडितांसाठी काम करते.

“प्रत्येकाच्या आयुष्याला महत्त्व आहे, हे लोकांना जाणून घ्यायचे असते, नाही का? कोलीनच्या आयुष्यालाही महत्त्व होते, हे त्यांना जाणून घ्यायचे असते,” ती म्हणते.

“या क्षणी क्रिस्टा पाइक प्रत्यक्षात जगण्यापेक्षा तिच्या आयुष्याला महत्त्व आहे, हे सिद्ध करण्यासाठीच अधिक संघर्ष करत आहे, असे मला वाटते,” असंही सेलर्स नमूद करते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC