Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

प्रदीर्घ काळापासून विवाहाचा संबंध सामाजिक आणि कौटुंबिक स्थैर्याशी जोडला गेलेला आहे. मात्र अलीकडच्या आकडेवारीतून असं दिसतं की हे स्थैर्य मिळवण्याचा दबाव आता अनेक लोकांसाठी मानसिक तणावाचं कारणदेखील ठरतो आहे.

इतकंच काय, काही प्रकरणांमध्ये लोक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

एनसीआरबीच्या ‘ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाईड्स इन इंडिया 2024’ या अहवालानुसार देशात आत्महत्या करण्यामागचं सर्वात मोठं कारण अजूनही कौटुंबिक समस्या हेच आहे.

आत्महत्येच्या संदर्भात 2024 मध्ये नोंदवण्यात आलेल्या 1.70 लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये एक-तृतियांशाहून अधिक प्रकरणांसाठी हेच कारण नोंदवण्यात आलं. यानंतर दीर्घकाळापासूनचं किंवा गंभीर स्वरुपाचं आजारपण, अंमली पदार्थांचं व्यसन आणि विवाहाशी संबंधित तणाव यासारखी कारणं समोर आली.

(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)

एनसीआरबीच्या अहवालात लग्नासंबंधित प्रकरणांना वेगळ्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. यामध्ये लग्न न ठरणं, हुंड्याशी संबंधित वाद, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट आणि इतर वैवाहिक तणाव यासारख्या कारणांचा समावेश आहे.

अहवालानुसार, 18 ते 30 वर्षे वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक फटका बसला. तर त्यानंतर 30 ते 45 वर्षे वयोगटातील लोक आहेत.

आकडेवारीत आणखी एक पॅटर्नदेखील दिसतो. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मोठी संख्या विवाहितांची होती. अहवालानुसार, आत्महत्या करणाऱ्या एकूण लोकांमध्ये 67.5 टक्के लोक विवाहित होते.

डेटातून काय समोर आलं?

दर एक लाख लोकसंख्येमागे नोंदवलेल्या आत्महत्यांना ‘सुसाईड रेट’ असं म्हणतात.

या निकषावर अंदमान-निकोबार द्वीपसमूह पहिल्या क्रमांकावर होता. तिथे दर एक लाख लोकसंख्येमागे जवळपास 41 जणांचे मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याची नोंद केली गेली आहे.

त्यानंतर सिक्किम, केरळ, तेलंगाना आणि छत्तीसगड यांचा नंबर होता. तर दिल्लीमध्ये हे प्रमाण 13.2 होतं.

आकडेवारीच्या दृष्टीनं सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांमधील होती. हे एकूण प्रकरणांच्या जवळपास 49 टक्के प्रमाण आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

विवाहाशी संबंधित समस्या (मॅरिज रिलेटेड इश्यू) काय-काय आहेत, याबद्दल बीबीसीनं दिल्लीतील एनसीआरबीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

सहाय्यक संचालक पूनम यांच्यानुसार, लग्नाशी संबंधित तणाव, परस्पर सामंजस्याचा अभाव किंवा नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारे इतर वाद या श्रेणीत नोंदवले जातात.

अर्थात अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे संपूर्ण माहिती नसते. कारण एनसीआरबी राज्यांकडून मिळालेली आकडेवारी गोळा करतं.

तज्ज्ञांना वाटतं की देशातील बहुतांश भागात लग्नाकडे अजूनही ‘सेटल’ होण्याच्या संदर्भात पाहिलं जातं. अशा परिस्थितीत तरुणांकडून लहानपणापासूनच विवाहाबद्दलच्या अपेक्षा लादल्या जातात.

ठरलेल्या वेळेत लग्न न झाल्यास अनेकजणांना सामाजिकदृष्ट्या मागे पडलेलं किंवा इतरांच्या नजरेत कमीपणाचं वाटू लागतं.

लग्नानंतर होणाऱ्या बदलांबाबत भीती

दिल्लीत नातेसंबंध समुपदेशक रिचा होरा म्हणतात, “आजच्या पिढीसमोरची सर्वात मोठी समस्या म्हणजे नातेसंबंध आणि लग्नाबद्दलची वाढती अनिश्चितता आहे. लग्न आपल्या करिअर, स्वप्नं आणि वैयक्तिक आयुष्याला कोणत्या दिशेनं घेऊन जाईल, हे अनेक तरुणांना समजत नाही.”

त्यांच्या मते, “नवीन पिढीला आनंदी नातेसंबंध हवे आहेत. मात्र नात्यांमधील वाढत्या अस्थैर्यामुळे त्यांच्यामध्ये भीती आणि असुरक्षितता वाढली आहे. यामुळे अनेकजणांना त्यांच्यासाठी काय योग्य आहे, हे ठरवता येत नाही. हा दबाव मुलं आणि मुली या दोघांवर दिसून येतो. अनेकजणांना संसार त्यांच्या अटींवर चालवायचा असतो. यामुळे संघर्ष वाढतो.”

रिचा होरा, रिलेशनशिप काउन्सलर, दिल्ली

रिचा होरा सांगतात, “अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यात दीर्घकाळापासून सोबत राहत असलेले अविवाहित कपल्स प्री-मॅरिटल काउन्सलिंगसाठी आले होते. कारण लग्नाबद्दल ते संभ्रमात होते.”

यासंदर्भात यांनी एका प्रकरणाचा उल्लेख केला. जवळपास 8 वर्षांपासून नात्यात असलेलं एक जोडपं मदतीसाठी आलं होतं. दोघांचाही भूतकाळ खूपच कठीण, खडतर होता.

तरुणीनं कुटुंबातील वाईट, बिघडलेले संबंध पाहिले होते. त्याचा परिणाम असा झाला होता की तिला भावनात्मकदृष्ट्या अधिक सुरक्षितता हवी होती. दुसऱ्या बाजूला तरुणानं हिंसक वातावरण पाहिलेलं होतं. त्यामुळे त्याच्या मनात याबाबत वेगळ्या समस्या होत्या.

भावनात्मकदृष्ट्या असुरक्षित असलेले लोक जेव्हा एकमेकांना भेटले, तेव्हा त्यांच्यात जवळीक तर निर्माण झाली. मात्र परस्पर सामंजस्य निर्माण होऊ शकलं नाही. हळूहळू नात्यात तणाव आणि अविश्वास निर्माण झाला आणि त्या तरुणाच्या विवाहबाह्य संबंधांचं प्रकरणदेखील समोर आलं.

न्यायालयात तणावाच्या प्रकरणांची संख्या खूप जास्त

बीबीसीनं यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयातील सीनियर वकील मनीष भदौरिया यांच्याशीदेखील संवाद साधला. त्यांचं म्हणणं आहे की याबाबतीत कोणताही स्वतंत्र अधिकृत डेटा तर नाही. मात्र कौटुंबिक आणि वैवाहिक वादाशी संबंध प्रकरणांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे.

“जवळपास प्रत्येक फॅमिली लॉयरकडे मॅट्रिमोनियल प्रकरणं मोठ्या संख्येनं आहेत. माझ्याकडे येणारी बहुतांश प्रकरणंदेखील लग्न आणि नात्यांशी संबंधित वादांची आहेत,” असं ते म्हणाले.

“अनेकदा अशीही प्रकरणं समोर येतात, ज्यात लग्नामध्ये मोठा खर्च करण्यात आला होता. मात्र काही दिवसांमध्येच प्रकरण कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचलं,” असं ते पुढे म्हणाले.

मनीष भदौरिया, ज्येष्ठ वकील, दिल्ली उच्च न्यायालय

घटस्फोट होऊनही नात्यांमध्ये असणाऱ्या तणावाबाबत ते म्हणाले, “विभक्त होणं हा नेहमीच वादाचा शेवट नसतो. पोटगी, घरगुती हिंसा, हुंड्यासाठी होणारा छळ किंवा इतर आरोपांसाठीची कायदेशीर लढाई दीर्घ काळ सुरू राहू शकते.”

त्यांच्या मते, अनेक प्रकरणांमध्ये लोक सातत्यानं संघर्षाला सामोरं जात असतात. त्याचा मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

मनीष भदौरिया म्हणाले, “जीवनशैली आणि एकमेकांच्या अपेक्षांमधील फरक हेदेखील नात्यांमधील तणावाचं मोठं कारण ठरतं आहे. अनेकदा दोन्ही जोडीदारांना त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे जगायचं असतं. हाच फरक पुढे विभक्त होण्यापर्यंत पोहोचतो.”

समाज बदलतो तेव्हा तणावदेखील वाढतो

आत्महत्येच्या एकूण प्रकरणांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. मात्र तज्ज्ञांना वाटतं की महिलांचं मानसिक दु:ख वेगळ्या प्रकारे दिसून येतं.

प्राध्यापक रीमा भाटिया मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये समाजशास्त्राच्या विभागप्रमुख आहेत. त्या एका तरुणीचं उदाहरण देत सांगतात की तिनं आयआयटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर जर्मनीत काम करण्यास सुरुवात केली. ती अनेक वर्षांपासून तिथेच आहे.

रीमा भाटिया

मात्र तिच्यासाठी जी स्थळं येतात त्यात घरगुती कामं करण्याचीच अपेक्षा केली जाते आहे. प्राध्यापक भाटिया म्हणाल्या, “आपल्याकडे लग्न हे अजूनही युनिव्हर्सल कॉन्सेप्टप्रमाणे आहे. बहुतांश लोक लग्न करतात. बऱ्याचअंशी तो यशाचा निकष मानला जातो. मात्र यातील समस्या अशी आहे की लग्नाबाबत पुरुष आणि महिला या दोघांच्याही अपेक्षा वेगवेगळ्या आहेत.”

“मुली पुढे जात आहेत. त्या शिक्षण घेऊन बाहेर काम करत आहेत. मात्र लग्नानंतर त्यांच्याकडून घरगुती गोष्टींचीही अपेक्षा केली जाते. पुरुष त्याप्रकारे ताळमेळ साधू शकत नाहीत.”

फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमिल दुर्खीम यांचं ‘सुसाईड-अ स्टडी इन सोशियोलॉजी’ हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा संदर्भ देत प्रा. भाटिया म्हणतात, “जेव्हा समाज उत्क्रांत होतो, तेव्हा आत्महत्येसारख्या घटना वाढतातच.”

“इथे असं होतं आहे की महिला बदलत आहेत, मात्र अनेक पुरुष त्यांच्याबरोबर ताळमेळ साधू शकत नाहीत. यामुळे संसारातील तणाव वाढतो. सध्या जे दिसतं आहे ते याच उत्क्रांतीचा सुरुवातीचा टप्पा आहे. हाच सर्वाधिक अशांत काळ आहे,” असं प्रा. भाटिया म्हणाल्या.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC