Home LATEST NEWS ताजी बातमी आधी आईचं निधन, मग 1 वर्षात वडिलांचा मृत्यू; त्यानंतर केलेल्या एका चाचणीने...

आधी आईचं निधन, मग 1 वर्षात वडिलांचा मृत्यू; त्यानंतर केलेल्या एका चाचणीने ‘या’ तरुणीचं आयुष्यच बदललं

9
0

Source :- BBC INDIA NEWS

एक चाचणी, एक सत्य आणि पूर्णपणे बदललेलं आयुष्य

एखादा आजार आपलं आयुष्य कमी करेल हे आधीच कळलं, तर तुम्ही ती चाचणी करून घ्याल का?

हा प्रश्न लॉरा साइड्ससमोर उभा राहिला, जेव्हा तिला तिच्या वडिलांना 40 व्या वर्षी झालेल्या दुर्मिळ प्रकारच्या लवकर सुरू होणाऱ्या डिमेन्शियाची तपासणी करण्यासाठी चाचणी करण्याची संधी देण्यात आली.

ही चाचणी करण्याच्या निर्णयानं तिचं पुढचं आयुष्य कसं बदललं याबद्दल लॉराने बीबीसी रेडिओ 4 च्या ‘लाईफ चेजिंग’ या पॉडकास्टच्या सूत्रसंचालिका डॉ. सिआन विल्यम्स यांच्याशी संवाद साधला.

लॉरा सांगते की, लहानपणापासूनच ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती, कारण त्या दोघांची व्यक्तिमत्त्वं खूप सारखी होती.

ते डॉक्टर होते आणि “सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारे वडील” होते, असं ती सांगते.

वडिलांच्या अल्झायमरची लक्षणं वाढू लागल्यानंतर लॉराने त्यांची काळजी घेण्यासाठी विद्यापीठातलं शिक्षण सोडलं.

“आम्ही खूप छान वेळ घालवला,” ती सांगते. दीपगृहाच्या सहली आणि कोस्टर (पेयाच्या ग्लासाखाली ठेवायच्या चकत्या) गोळा करण्याच्या त्यांच्या आवडीची ती आठवण सांगते.

“मी त्यांना आंघोळ घालायचे, त्यांच्यासाठी संगीत लावायचे आणि त्यांच्या डोक्यावर गरम पाणी टाकायचे. त्यांना ते खूप आवडायचं.”

रुग्णालयातील एका भेटीदरम्यान वडिलांच्या डॉक्टरांनी लॉराला सांगितलं की, तिला तिच्या वडिलांसारखाच लवकर सुरू होणारा अल्झायमर होण्याची 50 टक्के शक्यता आहे. या आजाराला “लंडन व्हेरिएंट” असं म्हटलं जातं.

“माझ्या मनात फक्त एकच विचार आला, ‘हे तर नाणेफेक करण्यासारखंच आहे’,” ती म्हणते.

“त्या वेळीही मी पूर्णपणे वडिलांच्या आजारात गुंतलेली होते. मी हा विषय मनाच्या खूप खोल भागात दडवून ठेवला.”

एक चाचणी, एक सत्य आणि पूर्णपणे बदललेलं आयुष्य

2009 मध्ये लॉराच्या वडिलांचं निधन झालं. त्याआधी फक्त 1 वर्षापूर्वी तिच्या आईचं निधन झालं होतं.

“अचानक मला इथून निघून जावंसं वाटू लागलं,” ती सांगते.

त्यामुळे तिने एकटीने जगभ्रमंतीचं नियोजन केलं आणि अखेरीस ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये स्थायिक झाली.

तेथेच तिच्या मनात पुन्हा पुन्हा हा विचार यायला लागला की, तिला वडिलांचा आजार वारशाने मिळाला असेल का. त्यामुळे 2013 मध्ये तिने एका तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

त्या तज्ज्ञांनी तिला सांगितलं की, एक चाचणी 99.999 टक्के खात्रीने हे सांगू शकते की, तिला लवकर सुरू होणारा डिमेन्शिया होईल की नाही. जर तिच्याकडे तो जनुक असेल, तर तिची प्रकृती बिघडण्यास सुरुवात होण्याचं अपेक्षित वय 46 ते 48 वर्षांच्या दरम्यान असेल.

“मला फक्त असं वाटलं की मी अजून तयार नाही. मला हे जाणून घ्यायचं नाही,” ती म्हणते.

30 वर्षांची झाल्यानंतर लॉरा त्या चाचणीबद्दल अधिकाधिक विचार करू लागली आणि अखेरीस तिने सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आधी तिला 6 महिन्यांचं अनुवंशिक समुपदेशन घ्यावं लागलं.

“आयुष्यात अशा फार कमी गोष्टी असतात जिथे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आधीच समजतं. ही माहिती पचवणं खूप कठीण असू शकतं,” ती सांगते.

कठीण सत्य

चाचणीचा निकाल मिळण्यासाठी 6 आठवड्यांची प्रतीक्षा केल्यानंतर अखेर तो दिवस आला.

लॉरा सांगते की ती “अत्यंत घाबरलेली” होती.

तिने नंतर एका मैत्रिणीसोबत जेवायला जाण्याची योजना केली होती, पण डॉक्टरांच्या भेटीसाठी ती एकटीच गेली.

एक चाचणी, एक सत्य आणि पूर्णपणे बदललेलं आयुष्य

“मी त्यांना म्हणाले, ‘सरळ मुद्द्यावर या.’ त्यांनी उत्तर दिलं, ‘आम्हाला खूप वाईट वाटतं, पण ही चांगली बातमी नाही. तुम्हाला ते जनुक वारशाने मिळालं आहे.'”

तिला आठवतं, “सगळं काही धूसर झाल्यासारखं वाटत होतं. मी फक्त तिथे बसले होते.”

ती खोलीबाहेर आली तेव्हा तिची मैत्रीण रडायला लागली, पण लॉरानं काही प्रतिक्रिया दिली नाही.

“आम्ही जेवायला गेलो आणि सगळं ठीक होतं. कदाचित मी ते पूर्णपणे स्वीकारलंच नव्हतं.”

नंतर मात्र वास्तवाने तिला धक्का दिला.

“मी खूप रागावले होते. हे इतकं अन्यायकारक का आहे असं वाटत होतं. आता या माहितीसह मी कसं जगायचं? माणूस अशा गोष्टीचं ओझं घेऊन कसा जगतो?”

लॉरा (उजवीकडे) व्यावसायिक शेफ आहे आणि 2 मैत्रिणींबरोबर मिळून एक कॅफे-रेस्तराँ तसेच केटरिंगचा व्यवसाय चालवते.

लॉराला पुन्हा घरी, म्हणजेच ब्रिटनला परतण्याची तीव्र इच्छा होऊ लागली, विशेषतः तिची बहीण गरोदर असल्यामुळे तसं वाटत होतं.

“‘ती बाळाला जन्म देणार आहे, तेव्हा मी जगाच्या दुसऱ्या टोकाला राहण्यात काही अर्थ नाही,’ असं मला वाटलं.”

तरीसुद्धा, तिची जगभर फिरण्याची आवड कायम राहिली. याच काळात तिने निदानापूर्वी आणि निदानानंतरही वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभाग घेतला.

“इतक्या नकारात्मक परिस्थितीतून काहीतरी सकारात्मक गोष्ट निर्माण होत असल्याचा भाग बनता आलं, ही खूप चांगली गोष्ट होती,” ती सांगते.

छोट्या गोष्टींची जादू

आज लॉरा 43 वर्षांची आहे. डॉक्टरांनी ज्या वयात लक्षणं सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला होता, त्या वयापासून ती केवळ 3 वर्षे दूर आहे.

“मला अजूनही काहीतरी जाणवण्याची वाट पाहत असल्यासारखं वाटतं. कधीतरी माझी प्रकृती बिघडायला सुरुवात होईल असं वाटतं, पण त्यामुळे माझी झोप उडत नाही,” ती नमूद करते.

तिच्या आयुष्यात असलेल्या लोकांबद्दल ती स्वतःला “कृतज्ञ आणि खूप भाग्यवान” समजते. मात्र, नवीन नातेसंबंध निर्माण करणं तिच्यासाठी कठीण झालं आहे.

“मी त्याला सांगावं का? सांगू नये का? कधी सांगावं? बर्‍याच वेळा जेव्हा मी हे सांगितलं, तेव्हा नातं तिथेच संपलं,” ती सांगते.

मात्र, तिचं हे गृहितक चुकीचं ठरल्याचं ती म्हणते.

एक चाचणी, एक सत्य आणि पूर्णपणे बदललेलं आयुष्य

“लोकांनी मला दाखवून दिलं की, हे सर्व असूनही माझ्यावर प्रेम केलं जाऊ शकतं. त्यामुळे माझ्या मनात शांतता आणि आनंद निर्माण झाला आहे.”

लॉरा सांगते की ती नेहमीच “भोळेपणाने” असं गृहित धरत आली होती की ती एक दिवस आई बनेल.

“ही अशा काही मोजक्या गोष्टींपैकी एक होती, ज्याबाबत मला कधीच शंका नव्हती की मी चांगली आई बनेन आणि मला ते करायचं होतं. हे खूप कठीण आहे, पण ते करणं योग्य ठरणार नाही. ते न्याय्य ठरणार नाही,” ती सांगते.

आता लॉरासाठी आयुष्य म्हणजे तिला आनंद देणाऱ्या गोष्टींशी नातं जोडणं.

“हे मोठमोठी स्वप्नं पूर्ण करण्याबद्दल नाही. मला ग्रँड कॅनियन पाहायचं आहे असं नाही. आता मला त्या लोकांसोबत वेळ घालवायचा आहे, ज्यांच्यावर मी प्रेम करते आणि ज्यांच्यासोबत मला सुरक्षित वाटतं.”

“मला निसर्ग आवडतो. मला मोकळ्या हवेत राहायला आवडतं. मला पाण्यात डुंबण्याचं वेड आहे. हे कदाचित खूप भावनिक वाटेल, पण मला खरंच असं वाटतं की छोट्या गोष्टीच खऱ्या अर्थाने मोठ्या असतात.”

“मला आशा आहे की या जगातली पुढची काही वर्षं खूप सुंदर जातील. शॅम्पेन पिताना आणि ऑइस्टर खाताना, कारण त्या माझ्या सर्वात आवडत्या गोष्टींपैकी आहेत,” असंही ती नमूद करते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC